तगमग ( भाग चौथा )

लहान मुलांना लहान समजणं ही केव्हढी मोठी चूक ठरू शकते


बेड रूम मधे पलंगावर तिने माझी नवीन बाहुली झोपवून ठेवली होती. अंगावर पांघरूण टाकलेलं होतं. फक्त तोंड उघड ठेवलेलं होतं. ती हात धरून मला त्या बाहुली कडे घेऊन गेली.

" काय झालं ग " मी विचारलं.

" बघा ना. काका. अंग नुसतं तापलं आहे. केक पण खाल्ला नाही तिने. तुम्ही यायच्या आधी दोन दिवस झाले. काहीच खात नाहीये. मला तर खूप काळजीच लागून राहिली आहे. तुमच्या तरी हाताने काही खाते का बघा ना "
तिच्या बोलण्यात एव्हढी काकूळती होती आणि वेदना होती की कोणत्याही क्षणी ती रडायला लागेल की काय असं मला वाटलं. त्यामुळे मला देखील ती बाहुली आजारी वाटायला लागली. प्रीतीच्या पाणीदार डोळ्यात तर पाणीच पाणी जमा झालेलं होतं.

मी अगदी तिच्या विचारांशी समरस होऊन तिच्याशी बोलायला लागलो. बाहुलीच्या कपाळावर हात ठेवून पहिला.

" सध्या तर काही ताप आलेला दिसतं नाही आहे तिला. कदाचित थकली असेल म्हणूनही जेवण जातं नसेल तिला " मी तिची समजूत घालायला लागलो.

" आणि काय आहे ना प्रीती. कदाचित तिला नजर लागली असेल. कारण तुझी बाहुली एव्हढी सुंदर आहे ना. आपण तूझ्या आईला नजर काढायला सांगू तिची. मग तर झालं. "

मग नजर काढण्याचा कार्यक्रम झाला. त्या सोबत बाकीच्या सगळ्या बाहुल्यांची पण नजर काढली गेली. खर तर मला याच बाहुलीची नजर काढावीशी वाटत होती. इतकी ती गोड बोलतं होती.

" मला  माझ्या बहुल्यांना बरं नसलं ना तर अजिबात कोणत्याच कामात लक्ष लागतं नाही. " प्रीती मला म्हणाली. " नाहीतर तिच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवून बघू या का. कदाचित ताप उतरेल तिचा. या आधी असं कधीच झालं नव्हतं हो काका " प्रीती मला सांगत होती.

" प्रीती बेटा, इतकी काळजी नको करू. होईल ती बरी. अशाने तुझीच तब्येत खराब होईल. मी सांगतो ना तुला, तूझ्या बाहुलीला काहीच झालेलं नाहीये. "

" काका, पण तिने वाढदिवसाचा केक देखील खाल्ला नाही अजिबात हे तुमच्या लक्षात आलं का. अहो केक म्हटला की ती झोपेतून उठून बसते. बरं मी तिला विचारलं तर म्हणाली मला छातीत जळजळतय. "प्रीती तळमळीने मला सांगत होती.

" अग मग तिला नक्की अपचन नाही तर ऍसिडिटी झाली असेल. त्यात काय एव्हढी काळजी करायची. तुझा माझ्यावर विश्वास नाही का. "

" आहे ना, म्हणून तर तुम्हाला सांगितलं मी. इथं माझं कोणी ऐकतही नाही की माझ्या बोलण्याकडे कोणी लक्षही देत नाही. "

" मी आहे ना आता. काळजी करू नको. मी लक्ष देतो तूझ्या बाहुली कडे " मी असं म्हटल्यावर तिने खरच बाहुलीच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या.
मला म्हणाली, " काका, तुम्ही तरी विचारून बघा तिला. दुध घेते का, पाणी पितेस का "

" प्रीती, तू जरा शांत राहशील का. काका खूप दुरून आले आहेत. त्यांना आणि बाबांना गप्पा मारू दे जरा " तिच्या आईने तिला थोडं दटावून सांगितलं. तसं तिने रडवेला चेहरा केला. आणि ती पण बाहुलीच्या बाजूला अंगावर पांघरूण घेऊन झोपली.

" प्रीती तू पण थोडा आराम कर. मी इथंच बाबांशी गप्पा मारत बसतो." असं म्हणून मी बाहेरच्या खोलीत येऊन गप्पा मारत बसलो.

अर्थात आमचा विषय कॉलेजचे दिवस, एकत्र अभ्यास करतांना केलेल्या गमती जमती, खोड्या आणि इतर दुसरे मित्र काय करतात याबद्दलच होते. शिवाय काकूंच्या हातच्या पुरण पोळ्या आणि दळ बेसनाचे लाडू याची तर आवर्जून आठवण काढली मी. काकांचा सोडून सगळे विषय  आम्ही बोलतं होतो. कारणं त्यांना जाऊन आता सहा महिन्याच्या वर काळ होऊन गेला होता. त्या मुळे त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा काढून त्या दुःखाला पुन्हा ताज करण्यात काहीच अर्थ नव्हता. कारणं झालेली गोष्ट शोक करून परत तर येतं नाहीच. मग पुन्हा पुन्हा का त्या गोष्टी उकरून मनाला पुन्हा दुःखी करून घ्यावे असं मला वाटतं. म्हणून मी फक्त काका गेले वाईट झालं. एव्हढंच बोलून विषय बदलवला.

" शेवटी काय आहे ना काकू मरण कोणाला चुकलंय. " मी सांत्वना दाखवत म्हणालो.

" होय रे बाबा. आजकाल खर म्हणजे जाणारा सुटतो म्हणायचं. आणि जोडीदार गेल्यानंतर जगण्याला तरी काय अर्थ उरतो रे " काकू कळवळून बोलतं होत्या.

तेवढ्यात आतून पुन्हा प्रीतीची हाक आली.

" काका, आत या ना लवकर. बघा ना बाहुलीने उलटी केली." मी धावतच आत गेलो.

"काय झालं प्रीती."

" काका, बघा ना. मी तिला दूध पाजलं. तर लगेच तिने उलटी करून टाकली. काका, तुमच्या ओळखीचा एखादा डॉक्टर असेल तर बघा ना "

" बरं बरं, बेटी. तू काळजी करू नको. मी आहे ना " मी तिला सांत्वना देत म्हणालो.

मग मी बाहेर येऊन मित्राला म्हणालो,

" अरे ही तुझी मुलगी अशी काय वागते रे. नेहमीच अशी वागते का "
तर त्याने काहीच उत्तरं दिलं नाही. आणि काकूंनी डोळ्याला पदर लावला.

( क्रमश:)

🎭 Series Post

View all