Login

त्रस्त गृहणी भाग सात

Recipes In Rainy Season Cook By Housewife ढोकळ्याची गाथा
त्रस्त गृहिणी भाग सात

वाचक हो तुम्हाला म्हणून सांगते मला ना हा पावसाळा ऋतू अजिबात आवडत नाही. एकतर आम्हा गृहिणींच्या पाचवीला पुजलेला मेला तो स्वयंपाक. म्हणजे एक अख्खा दिवस चार वेगळे वेगळे पदार्थ वेगळ्या वेगळ्या वेळेला करूनही रात्री बिछान्यावर जरा पाठ टेकवली, हो म्हणजे दिवसभर मोबाईल पाहता पाहता, वेळ मिळेल, सवड मिळेल तसं आम्ही घरकाम करून घेतो. या सगळ्या धामधुमीत लोळायला म्हणून वेळ मिळत नाही हो.

हां तर मी काय म्हणत होती, रात्री बिछान्यावर जरा पाठ आडवी केली, की लगेच डोक्यात उद्या सकाळी मुलांच्या डब्याला काय द्यायचं? हा विचार डोकावतो. बरं जे मुलांसाठी केलं ते नवऱ्याला ऑफिसच्या डब्यासाठी चालणारं नसतं. नवऱ्याच्या डब्यासाठी कोरडी भाजी केली, की हमखास सासू-सासर्‍यांना, नणंद-दिर या माना-पानांच्या मंडळींना कोरड्या भाजीने हमखास ठसका लागतो आणि मग कोरड्या भाजीने आमचं पोट भरत नाही, एखादी रस्सेदार उसळ कर, आमटी कर, गेला बाजार वरणाला निदान तडका तरी दे बाई! अशा हुकूम वजा, विनंती वजा, सूचना सतत कानावर येत राहतात. आणि मग माझ्यासारख्या गृहकृत्यदक्ष गृहिणीचा जीव बेजार होतो. हो हो आहेच मी गृहकृत्यदक्ष! आणि ही पदवी माझी मीच मला दिली आहे. कोणी म्हणून काय विचारता?

तर रात्री झोपता झोपता डोक्यात असे नाना विचार अगदी धुमाकूळ घालत असतात. बाहेर आकाशात विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, त्यावर मुसळधार कोसळणारा पाऊस आणि मनात अशी विचारांची झालेली तुंबळ गर्दी! माझ्यासारखी गरीब बिचारी गृहिणी अगदी पिचून जाते हो या सगळ्यात! वरून पावसाळी हवेचा गार गार आस्वाद घेण्यासाठी मग दुपारच्या वेळी कांदा, बटाटा, पालक आणि दुनियेत असतील नसतील तेवढ्या सगळ्या प्रकारच्या भाज्यांचे भजे बनवायच्या फर्माईशी सतत स्वयंपाक घरात धडकत असतात. त्यात आमचे धाकटे चिरंजीव! त्यांचं कांद्याशी अगदी हाड वैर, त्यांच्यासाठी मग मुगडाळ पकोडा, किंवा मिक्स डाळ वडा, असलं काहीतरी करावं लागतं! लोकं पावसाळी पर्यटनाला जातात, पावसाळ्याचा मनमुराद आनंद घेतात, हाती रंगबिरंगी, इंद्रधनुशी रंगाच्या छत्र्या घेऊन रिल्स बनवतात, उन्हाळ्यातलं पर्यटन कमी म्हणून की काय ते जिथे जिथे जातात तिथले नद्या, नाले, धबधबे,ओढे, तरंगणारे ढग आणि कशा कशाचे फोटो आणि रिल्स बनवून स्टेटसला चिटकवतात आणि माझ्यासारखी गृहिणी जी सतत दिवाणखाना ते स्वयंपाक घर अशा सगळ्यांच्या फर्माईशी पूर्ण करण्याकरिता टाचा झिजवत असते तिचा जीव झुरवतात.

मला एक कळत नाही, या लोकांकडे एवढा वेळ आणि पैसा कसा असतो? बरं असू द्या! वेळ, पैसा, हौस-मौज सगळं असू द्या, पण त्याचं असं जाहीर प्रदर्शन करण्याचं काय कारण? तिकडे तो पाऊस धो धो मुसळधार बरसत असतो आणि इकडे माझ्या जीवाची लाही लाही होत असते. पण सांगणार कुणाला आणि ऐकणार तरी कोण? असू देत.

तर जेव्हा हा मुसळधार पाऊस कोसळत असतो, नदीला पूर, महापूर येतो. गावच्या गाव पाण्याखाली जातात, मुलं शाळेत अडकतात, चाकरमानी लोक रस्त्यावर गुडघाभर पाण्यातून सर्कस करत स्वतःची वाट शोधत असतात, तेव्हा मेलं हवामान खातं काहीच बोलत नाही. आणि मग लोकांच्या बोंबा ऐकून त्या हवामान खात्याला एकदम खडबडून जाग येते. मग पिवळ्या रंगापासून ते लाल रंगा पर्यंतचे वेगवेगळे अलर्ट्स जाहीर केल्यानंतर, जनतेला आणि सर्व सामान्यांना सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर, मुलांना अति पावसामुळे भोलानाथ ऐवजी एकनाथाने शाळेची सुट्टी जाहीर केल्यानंतर, पावसाच्याही पोटात दुखायला लागतं, त्यालाही सर्वसामान्यांच्या सुट्टीचा हेवा वाटत असावा म्हणूनच हवामान खात्याच्या अलर्टची वाट पहात तो बदाबदा कोसळतो आणि हवामान खात्याचा अंदाज आला रे आला की तो गायब होतो.

जाऊद्या हे नेहमीचच! तर मी काय सांगत होती की सकाळी उठून मला प्रश्न पडतो की डब्यात काय द्यावं? एका मैत्रिणीने सांगितलं इडली, डोसा, उत्तप्पा हे चांगले पर्याय होऊ शकतात. दुसरी म्हणाली अग दाळ तांदुळाचा ढोकळा कर. तिसरीने तर थेट दाल-ढोकली म्हणून त्याचा फोटोच ग्रुप वर टाकला. तर पहिली म्हणाली अगं दाल-ढोकली म्हणजे वरणफळ किंवा चिकोल्या, दुसरीने लगेच तिच्या मताला स्वतःचं संपूर्ण अनुमोदन देऊन समर्थन दीलं. आता जिने डाळ तांदूळ वापरून ढोकळा टाकला होता ती म्हणाली की युट्युब वर ज्या अनेक अति उत्साही आणि रिकामटेकड्या मैत्रिणी दिवस-रात्र काही ना काही बनवतात ना! त्यापैकीच एकीने सांगितलं की डाळ तांदुळाचा जो ढोकळा बनतो त्याला दाल-ढोकली म्हणतात. लगेच दुसरीने त्या चैनल वर जाऊन तिथे कमेंट करून त्या युट्युब वालीचा पार पचका करून टाकला. तेवढ्यात चौथी आली आणि तिने सांगितलं डाळ तांदूळ वापरून जो ढोकळा बनवतात ना त्याला खमण ढोकळा म्हणतात. आणि जी दुसरी मैत्रीण होती ना जिने युट्युब वालीचा पचका केला तिने आणखीन माहिती पुरवली, की ती असं डाळ तांदुळाचे सारण तर बनवतेच पण त्यात भोपळाही किसून टाकते. आणि चवीलाही छान लागतो म्हणे तो ढोकळा!

आता या सगळ्या ढकला ढकलीमध्ये म्हणजे ढोकळा ढोकळी मध्ये, त्या बिचाऱ्या ढोकळ्याच्याही पोटात ढवळलं असेल आणि त्याला वाटत असेल की कुणी आपल्याला या बायकांच्या गराड्यात ढकललं. त्यावर मी म्हटलं “अगं लहानपणी काहींना गणितात, काहींना भाषा विषयात आणि काहींना इतिहास भूगोलात भोपळे मिळत होते, त्यावेळचे आपले गुरुजी किंवा वर्गातल्या बाई म्हणायच्या की तुमच्या डोक्यात काय कांदे बटाटे भरले आहेत का? म्हणजे बघा आपल्या आयुष्यात या भाज्या अगदी शालेय जीवनापासून धुमाकूळ घालत असतात.” त्यावर सगळ्या जणींनी खो-खो हसण्याचे इमोजी ग्रुप वर टाकले.

वाचक हो माझा हा लेख वाचून जर तुम्हालाही हसू आलं असेल तर तसं कमेंट मध्ये नक्की सांगा.

पुन्हा भेटूया लवकरच.


©® राखी भावसार भांडेकर नागपूर.


सदर लिखाण संपूर्णतः काल्पनिक असून त्याचा वास्तवात कुणाशी कुठलाही संबंध नाही तसा तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.

सदर लिखाणाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित असून लेखिकेच्या परवानगीशिवाय कोणीही ते वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


🎭 Series Post

View all