डायरी..

डायरी अन् त्यात व्यक्त झालेली ही आगळीवेगळी प्रेमकथा..


           वाणी सौंदर्याने नटलेली.. तिला जन्मजात लाभलेलं सौंदर्य इतरांना वरदान वाटत असलं तरी तिला तिचं सौंदर्य श्राप वाटायचा. कारण तिचा जन्म एका तमाशेवालीच्या पोटी झाला होता.. 

            खरंतर तमाशा हा पूर्वी फार मानाचा प्रकार होता, लावणी तर दिमाखात चालायची.. पण जेव्हापासून या तमाशा प्रकारात अश्लीलता, शृंगाराचा बीभत्स रस शिरू लागला तसतसा लावणी वा तमाशा केवळ एक ऐय्याशीचा बहाणा ठरू लागला.

          मोठमोठे श्रीमंत घराण्यातील रसिक मंडळी आवर्जून तमाशाला जायचे पण हे रसिक लावणीपेक्षा लावणी सादर करणाऱ्या लावण्यवतींवर भाळायचे.. 

          त्या तमासगीर लावण्यवतींवर कुदृष्टी फेरून त्यांच्याशी शारीरिक जवळीक साधण्यासाठी प्रयत्न करू लागले आणि लपून छपून काही लावण्यवतींची बोली लावू लागले. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर सेक्स रॅकेट चालायचे असंच म्हणावं लागेल आणि अशाच परिस्थितीची साक्षीदार होती वाणी.. 

           वाणीने कधीच तिच्या वडिलांना पाहिलं नव्हतं, लहानपणी बापाचा चेहरा पाहायला आसुसलेली ती वयाच्या दहाव्या वर्षीच सगळ्या सत्यापासून जाणती झाली. आपल्या आईला क्षुल्लक पैशांसाठी परपुरुषाची किळसवाणी ख्याली राखताना पाहून हादरली ती बिचारी.. सुरुवातीला चिडली ती आईवर पण जेव्हा कळलं की, वाणीचं जीवन या नरकात बरबाद होऊ नये म्हणून तिची आई स्वतःला झिजवत होती, हे जाणताच वाणीला तिच्या आईचा अभिमानच वाटला.. 

               वयाच्या १६ व्या वर्षी वाणीचं मेट्रिक मुलींच्याच बोर्डिंगमध्ये झालं. वाणी कधीच तिच्या आईला भेटायला जात नव्हती तशी ताकीद आईनेच दिली होती. वाणी तशी समजुतदारच होती आणि आईच्या मर्जीतलीह म्हणून आईचा शब्द पाळायची.. 

               आज बऱ्याच दिवसानंतर आई वाणीला भेटायला आली होती. सोने पे सुहागा म्हणजे आजच वाणीला  शिष्यवृत्ती जाहीर झाली होती. त्यामुळे ती आज खूश होती खूप.. आईला ही बातमी कळताच ती पण खूश झाली. वाणी परत आईला तमाशाचं काम सोडून द्यायला बोलली, कारण आईची तब्येत दिवसेंदिवस ढासळत असली तरी काम मात्र वाढतच होतं.

पण आईने परत हसून नेहमीचं उत्तर दिलं, " पोरी ह्यो नरक हाय.. हितं येकदाचं फसलं तं बाह्येर येण्यासाठी रस्ताच नाय राहात.." 

            " पण आई.. " वाणी पुढे काही बोलणार तोच आईने अडवलं आणि पुढे बोलली, " पण बिण काय नाय पोरी.. तू लय शिक.. मोठी व्हय.. आणं तू बाह्येर पड बाई याच्यातून, आणं तुयासारख्या बाकी पोरींले बी वाचव.. मायी अख्खी जिंदगी झिजली पण तुयं किंवा बाकी नवीन पोरींसोबत आसं झालेलं मले नाय बघवणार.. " असं म्हणून आईने पदराने डोळे पुसले स्वतःच तर वाणीने आईचा हात हातात घेतला आणि आईला धीर देत आईच्या डोळ्यात बघून शिकून मोठे होण्याचे वचन दिले. 

           दुपारचं जेवण मायलेकीने एकत्रच केलं. मग आईला बसस्टँडवर सोडायला गेली ती.. आईचा निरोप घेतला. 

            पाहता पाहता एक वर्ष गेलं. वाणीला १८ वर्ष लागलं होतं नुकताच आणि तिचा आज १२ व्या वर्गातील कॉलेजचा पहिला दिवस होता. वाणीने ११ वी पासून कोएड कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता तर शिष्यवृत्ती लाभल्याने तिच्या राहण्याची व्यवस्था शासकीय गर्ल्स हॉस्टेलमध्ये केली गेली होती. गर्ल्स हॉस्टेलपासून जरा अंतरावर कॉलेज असल्याने ती सायकलने जायची. आजही सगळं आवरून वेळेच्या जरा आधीच ती हॉस्टेलबाहेर पडली आणि कॉलेजच्या दिशेने वळली. पंधरा-वीस मिनिटांनंतर ती पोहोचली कॉलेजला.. 

           कॉलेजमध्ये काही नवीन चेहऱ्याशिवाय नवीन काहीच नव्हतं वाणीसाठी.. पहिला तास सुरू झाला. पहिलाच दिवस असल्याने सगळ्यांचा परिचय देण्याघेण्याचा कार्यक्रम पाच एक मिनिटे चालला.

         बऱ्याच जणांच्या परिचयानंतर एक आवाज मात्र आज वाणीच्या कानाला हवाहवासा वाटला आणि तिच्या नकळत तिची मान आवाजाच्या दिशेने गेली. 

        तिच्याच नजरेपुढे जरा काही अंतरावरील बाकावर मध्यम उंचीचा, गहूवर्णीय सडपातळ बांध्याचा मुलगा उभा होता. तारुण्याची झालर त्याच्या चेहऱ्यावर जाणवत होती. डोळ्यात एक वेगळंच तेज आणि कुणालाही भुरळ पडेल अशी भेदक नजर त्याची, साधंच पण इस्त्री केलेलं शर्ट इन केलेलं आणि बेलबॉटम पॅटर्नचा पॅंट घातलेला, विशेष म्हणजे त्याच्या कपड्याला कुठेही तसूभरही वळ्या पडलेल्या नव्हत्या. त्याने त्याच्या बारीक बारीक केसांचा साधाच भांग केलेला. असा होता तो, ज्याच्या व्यक्तिमत्त्वाने इतर मुलींसह वाणीचीही विकेट पडली होती.      

              वाणी एकटक त्याचं निरिक्षण करत असतानाच तेवढ्यात त्याने त्याचं नाव सांगितलं, गौरव वानखेडे. त्याच्या आवाजाने तिच्या अंगावर तिच्या नकळत शहारा आला. तिच्या नकळत ती परत परत त्यालाच न्याहाळत होती. तिलाही कळत नव्हतं असं का होतंय पण तरी ती त्याच्या हालचाली टिपण्यात दंग होती. 

               त्याचा स्वभावही चांगला होता. सरांचा तास संपताच बऱ्याच जणांशी त्याची मैत्री झालेली, चक्क मुलींसोबतही..  

             पण वाणी जरा शांत स्वभावाची म्हणून मनात असतानाही स्वतःहून पुढाकार तिने घेतला नाही. पाहता पाहता सारे शिकवणीचे तास संपताच वाणी वर्गाबाहेर पडली. वर्गाबाहेर पडताच पार्किंगमध्ये ती लगबगीने गेली आणि सायकल घेऊन बाहेर पडणार तोच मागून तिला हाक मारताना गौरवचा आवाज आला, त्याच्या आवाजाने वाणीने मागे वळून पाहिलं तर तिच्यापुढे तोच उभा होता.

 तिने विचारलं, "काय झालं?" 

त्यावर तो बोलला," मी गौरव.. तुझ्याच वर्गात आहे. सर आणि वर्गातले सगळेजण बोलले मला की, तू हुशार आहेस, तर मला काही अडचण गेली तर तू मदत करशील. मला रेग्युलर कॉलेज करता नाही येणार कारण मी पार्ट टाइम काम करून शिकणार आहे. म्हणून नोट्स वगैरेसाठी मदत करशील का? " 

" अम्म.. मी एवढी हुशार नाही आहे पण माझ्या परीने जमेल ती मदत मी करणार. आणि हा नोट्सची सुध्दा मदत मी करणार." वाणीने मदत करण्यासाठी होकार दिल्याने गौरव खूश झाला आणि थॅंक्यू बोलून त्याच्या मार्गाने गेला तर वाणी तिच्या मार्गी.. 

           असंच कॉलेजमध्ये ये - जा करणं सुरू होतं. अधूनमधून गौरव यायचा, नोट्स घेऊन जायचा, एकदोन दिवसात नोट्स पूर्ण झाले की, वाणीचे नोट्स तिचे तिला परत करायचा. दोघांची काहीशा प्रमाणात मैत्री झाली होती. जास्त बोलत नसले तरी कधी कुठे दिसताच हलकेसे हसून दोघेही प्रतिसाद द्यायचे. मध्यंतरी कॉलेजमध्ये परीक्षा झाली. त्यात दोघांना बऱ्यापैकी गुण पडले. 

          त्यानंतर आता गौरव रेग्युलर कॉलेज करायला लागलेला, आता क्वचितच तो सुट्टी घ्यायचा. वाणीने कारण विचारलं तर तो बोलला की, त्याने कामाचा वेळ बदलून घेतला आहे जेणेकरून कॉलेज नीट करता यावं. मग काय रोजचं कॉलेज सुरू असायचं.

              दरम्यान वाणीला गौरव आवडायला लागला होता आणि याची जाणीवही तिला होती पण तिने अव्यक्तच राहायचं ठरवलेलं. पाहता पाहता वर्ष संपलं बारावीच्या परीक्षेतही वाणी ७५% घेऊन उत्तीर्ण झाली. गौरव सुध्दा ७० % घेऊन उत्तीर्ण झाला.     

           वाणीने आईला कळवलं, आईने पुढचं शिक्षण घे हे सक्तीने बजावलं. म्हणून आईच्या सांगण्यावरून वाणीने त्याच कॉलेजमध्ये बी.ए. ला प्रवेश घेतला. आता सर्व नवखे वाटत होते तिला.. कारण सगळे चेहरे अनोळखी होते पण तेवढ्यात तिच्या पाठीमागून ओळखीचा आवाज आला आणि त्या आवाजाने ती भलतीच खूश झाली कारण तिच्यापुढे गौरव उभा होता. 

ती चेहऱ्यावरचा आनंद झाकतच बोलली, " तू इथेच ऍडमिशन केलंस? मला वाटलं तू सुद्धा दुसऱ्या कॉलेजमध्ये जाणार. " 

" नाही गं कसं जाणार.. तू जिथे जाशील मी तिथे तिथे येईलच.. " तो बोलला.

"म्हणजे? " ती 

" अगं म्हणजे मला सतत तुझी गरज पडते ना.. नोट्स असो किंवा इतर काही अभ्यास असो.. बाकी कुणी माझी नाही ना मदत करणार म्हणून तुझा पाठलाग करत थांबलो इथेच. " तो बोलला. 

" अच्छा.. बरं चल वर्गात जाऊ.. वेळ झाली आहे सर येतीलच.." वाणी कसनुसं हसत बोलली तर तिच्या सोबतीने गौरव ही वर्गाच्या दिशेने चालू लागला. 

            पाहता पाहता कॉलेजचा पहिला दिवस संपला. असेच दिवसामागून दिवस सरत होते. आता गौरव आणि वाणीची मैत्री घट्ट झाली होती. बोलणं ही वाढलं होतं, कॉलेजमध्ये रोज भेटी व्हायच्या. असंच सगळं सुरू होतं.. 

             दोन वर्षे कधी सरले कळलेच नाही. बी. ए. च्या तिसऱ्या वर्षाला असताना गौरवच्या वडीलांच्या अचानक झालेल्या निधनाने त्याच्यावर त्याच्या घरच्या जबाबदारींचं ओझं वाढलं. तो फार कमी येऊ लागला कॉलेजमध्ये. दिवसरात्र काम करण्याशिवाय त्याच्याकडे पर्यायच नव्हता. मध्यंतरी कॉलेजच्या परीक्षेला गैरहजर असल्याने त्याच्या गुणांमध्ये घसरण पडली. पण ही घसरण अंतिम परीक्षेत घडू नये म्हणून वाणीने गौरवला समजावले.

             " गौरव तू बोलला होतास तुला अधिकारी व्हायचं आहे मग त्यासाठी तुला शिकावं लागेल ना.. बघ ही परीक्षा झाली की, तू स्पर्धा परीक्षांचा जोमाने अभ्यास कर.. परिस्थितीपुढे हात नाही टेकायचे, परिस्थिती आपल्याला खंबीर बनवते हतबल नाही. म्हणून यापुढची आणखी दोन वर्षे ताकतीने अभ्यास कर आणि स्पर्धा परीक्षा दे.. 

             तुझ्यात जिद्द आहे तू नक्कीच अधिकारी होशील हा माझा विश्वास आहे आणि माझा विश्वास तू तोडणार नाही असं मला वाटतं, असं नव्हे तर ही मला खात्री आहे.. आता पुढे तुझा निर्णय तूच घे पण फक्त एकदा विचार कर.. संधीचं सोनं करायचं की राख करायची हे ज्याच्या त्याच्या हाती असतं..म्हणून मी जे सांगितलं त्यावर जरा विचार करून बघ.." एवढं बोलून ती गप्प बसली. 

                त्यालाही वाणीचं पटलं. त्याने एकाएकी तिला घट्ट मिठी मारली. तो स्पर्श वाणीला सुखावून गेला असला तरी भान राखत ती त्याच्यापासून दूर झाली. 

               तो क्षणात ओशाळला आणि बोलला," वाणी मला माफ कर.. ही मिठी तू मला समजून घेतलंस त्यासाठी तर होतीच शिवाय ही मिठी मैत्रीपलिकडची होती. मला खूप आवडतेस तू.. अगदी बारावीच्या पहिल्या दिवसापासून.. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.. तुलाही मी आवडतो असं मला वाटतं पण जर हा माझा गैरसमज असेल तर मी खरंच माफी मागतो. पण तू तुझा निर्णय जरा वेळ घेऊन कळव आणि उत्तर मनाने सांगितलेलं असावं मेंदूने दिलेल्या सल्ल्याचं किंवा चार लोकांचा विचार करत घेतलेलं नसावं.. हीच एक अपेक्षा आहे माझी.." 

         वाणीसाठी गौरवचं असं व्यक्त होणं अनपेक्षित होतं. तिला लगेच होकार द्यावा असं वाटून गेलं. पण अभ्यासात कुठलाही व्यत्यय नको म्हणून तिने बी. ए. चा निकाल लागल्यानंतर उत्तर कळवते,असं सांगितलं. गौरवलाही तिचं म्हणणं पटलं.

            त्याने जोमाने चांगला अभ्यास केला आणि बी.ए.च्या तिसऱ्या वर्षाची परीक्षा दिली. निकाल यायला अवकाश होता. सुट्ट्या होत्या, त्यात त्याने एक सार्वजनिक लायब्ररी जॉईन केली. 

            दुसरीकडे वाणीला कुणालाही न कळवता तिच्या मूळ गावी जावे लागले होते.. कारण तिच्या आईचं कॅन्सरमुळे निधन झालं. वाणी गावी गेली, तेव्हा तिच्या आईचं पार्थिव पाहून तिने टाहो फोडला.

            पण तेवढ्यात एक लहानशी १० वर्षाची मुलगी हातात एक पत्र घेऊन आली. वाणीने ते पत्र वाचलं. ते तिच्या आईने कुणाकडून तरी लिहून घेतलं होतं. त्यात आईने लिहिलं होतं की, ज्या नरकापासून ती वाणीला वाचवू पाहत होती शेवटी त्याच नरकात तिला तिने ओढलं. कारण आईने वाणी लहान असताना कर्ज घेतलं होतं जे अजून फेडल्या गेलेलं नव्हतं आणि ज्याच्याकडून कर्ज घेतलं होतं त्याची कुनजर आता वाणीच्या लहान बहिणीवर होती. आईने पत्रात विनवणी केली होती की, वाणीच्या लहान बहिणीला यातून मुक्त करावं..

         पत्र वाचून वाणीला धक्का बसला कारण वाणीच्या लहान बहिणीबद्दल तिला ठाऊकच नव्हतं.. ती इकडेतिकडे तिची बहीण कोण याचा शोध घेत नजर फिरवताच एक मुलगा आला आणि त्यानेच सांगितलं की, जिने पत्र दिलं तीच वाणीची लहान बहीण आहे "कविता. "

           वाणीने घट्ट मिठी मारली कविताला.. पण कविता मात्र काय होतंय, काय नाही यापासून अनभिज्ञ.. दोघीही बराच वेळ बिलगून होत्या. तेवढ्यात एक तमासगीर आला आणि त्याने दोन्ही बहिणींवर किळसवाणा कटाक्ष टाकला आणि त्याच किळसवाण्या नजरेने तो बोलला, " हे समदं ठीक हाय.. पण आता मायेनं घेतलेलं कर्ज कोण फेडणार हाय तुम्हा दोघींपैकी?"   

            वाणीने कविताला स्वतःच्या पाठीमागे लपवलं आणि धीर एकवटून प्रश्न केला, " कर्ज किती आहे? " 


" बाई.. कर्ज रकमेचं नाही एहसानाचं हाय.. तुया मायेले जवा गरज होती तवा दिले म्या पैकं.. बदल्यात तिनं मले वचन दिल व्हतं का, त्ये मरेपर्यंत माया तमाशात लावणी करत राहीन.. आण वेळ पडन तवा तिच्या पोरीले बी ह्येच करा लागन.. तिनं सारी जिंदगी वाह्यली तमाशाले.. कदी लेकरूबाळ होऊ नाय दिलं.. येक पोरगं हाये तिले असं बोलली व्हती ते.. मले वाटलं हुतं, आता का फायदा पोरगं हाय म्हणल्यावर आणं तसं बी मरताखेपी ह्ये कविता पैदा झाली.. असो.. मायी तं चिंता मिटली.. पण मले ह्ये आजच कळलं का तिले पोरगं नाय पोरगीच व्हती पण ह्ये खबर तिनं लपवून ठेवली व्हती.. पण ते मेली आन् सारे गुपितं खोलून गेली.. त्ये जाऊ दे.. पण आता माया तमाशाची मर्जी कोण राखल मले फक्त येवढंच सांगा?" तमासगीर बोलला. 

         त्याचं बोलणं ऐकून वाणी धास्तावली.. तिला काहीच कळत नव्हतं.. असंख्य विचारात कविताचा चेहरा तिच्यापुढे आला आणि तिने एक उसासा घेतला आणि तिने शेवटी काळजावर दगड ठेवून, मनातल्या वाणीचा गळा घोटून बहिणीसाठीच तो काळा निर्णय घेतला. तिने कवितासाठी स्वतःला झोकून दिलं त्याच नरकात.. 

         पण हे सगळं करताना त्या तमासगीरकडून स्टॅंपपेपरवर लिहून घेतलं की, तो कधीच कविताला या तमाशात ओढून घेणार नाही.  हो नाही म्हणता म्हणता तो शेवटी तयार झाला. नशीब तिचं की, आईच्या निधनाच्या तिसऱ्याच दिवशी तिला पायात घुंगरू घालून लावणी करायला भाग पाडले गेले. 

           आज परत हा सगळा भूतकाळ ती घुंगरू घालताना आठवत होती, तिच्या पहिल्या लावणीला जेवढी मंडळी तमाशाला होती त्याहून तिप्पट मंडळी आज तब्बल ४ वर्षानंतर आली होती.    

          आज परत तो तमासगीर तिच्या खोलीत शिरला आणि लावणीला साहेब व मोठे अधिकारी मंडळी आली असल्याने जास्त अदाकारी करायचं वाणीला सांगून दम देऊन गेला. तिने तिचे अश्रू पुसले, त्या आठवणींना मनातच साठवून मंचावरील पडद्याआड उभी राहिली..

          गाण्याचे बोल सुरू होताच पडदा सरला आणि गाण्याच्या बोलासह वाणीनेही लय साधली, ठेका धरला.. तिच्या लावणीला भयंकर शिट्ट्या वाजल्या, पैशाची बरसात केली. शेवटी लावणी सादर करून ती जेव्हा अदाकारीने मुजरा करत पडद्याआड जात होती, तेव्हा अचानक एका इसमावर तिची नजर खिळली. दोघांची नजरानजर झाली, त्याच्या डोळ्यात असंख्य प्रश्न होते तर वाणीचे डोळेही पाण्याने डबडबलेले. ती मागेपुढे न पाहता लगेच पडद्याआड झाली आणि लगेच तिच्या खोलीत शिरली. 

              असंख्य विचार सुरू होते तिच्या डोक्यात, विचारांचं काहूर माजलेलं पण तेवढ्यात तिच्या खोलीत तो तमासगीर त्याच इसमाला घेऊन आला आणि त्या इसमाची मर्जी राख असा जरब वाणीला देऊन गेला. आता त्या खोलीत फक्त ते दोघेच होते. ती डोळ्यातले अश्रू लपवण्यासाठी पाठमोरी उभी राहिली. 

               पण त्याने तिचा चेहरा स्वतःकडे केला आणि तिच्या डोळ्यात बघत बोलला, " वाणी, काय केलंस तू हे? का सोडून गेलीस तू मला? माझ्या कठीण परिस्थितीत तू होतीस. तुझ्या परिस्थितीत मला का सामील करून घेतलं नाहीस? मित्र म्हणायची ना मला मग मैत्री एवढीच होती का? माझं प्रेम होतं तुझ्यावर आणि माझं प्रेम एवढं पोकळ नव्हतं की, तुझ्या भूतकाळाला सामावून घेतलं नसतं.. तुझ्या आईची इच्छा तर हीच होती ना की, तू शिकून मोठं व्हावं.. मग आई गेली तर तिचं स्वप्न, तिच्या इच्छानांही तू अस्थिसह पुरल्या का? आणि तुझ्या बहिणीच्या भविष्यासाठी काहीतरी केलं असतं गं.. काढला असता ना मार्ग.. 

            प्रेम तर तुझंही होतंच की.. तूच मला हे सांगितलंस, तूच सगळं कबूल केलं होतं सारं तुझ्या डायरीतून.. मग एवढ्या लवकर हार मानलीस? तू माझ्यासाठी योग्य की अयोग्य हे कोण ठरवणार? ती लोकं जी आता इथे शिट्ट्या वाजवतात अन् बाहेर मुखवटे धारण करून फिरतात. अशा लोकांसाठी तू माघार घेतलीस ते ही का म्हणून की, तू माझ्या प्रेमाच्या लायक नाहीस.. 

           वाणी इथे प्रत्येकाला त्याच्या पात्रतेनुसार सगळं मिळतं.. तुझी ती डायरी मला भेटली खरी.. पण तोपर्यंत बराच वेळ झाला होता. ती डायरी मला तुझ्या गर्ल्स हॉस्टेलमधल्या निशिगंधाने दिली. ती बोलली मला की, तू ती डायरी मला द्यायला सांगितली होती. मी सगळी डायरी वाचली, सगळं कळलं मला पण त्यानंतर माझं तुझ्यासाठीचं प्रेम कमी नाही झालं.. मी तर तुझ्या आणखी प्रेमात पडलो.. पण कदाचित नियतीलाच काही वेगळे मंजूर होते..    

             तू तुझ्या मूळ गावीच तमाशा न करता तमाशाची ठिकाणे वारंवार बदलत राहलीस. म्हणून तुला शोधणे मला कठीण झालं. तुला माहीत आहे फक्त आणि फक्त तुझ्यासाठी मी शिकलो, स्पर्धा परीक्षा दिली आणि जिल्हाधिकारी झालो. 

            आज मी गावोगावी जाऊन तमाशाच्या ठिकाणांना भेट देऊन माझ्या वाणीची शोधाशोध करतो. इथे तिथे सर्वत्र.. तुझ्यासारख्या वाणी, कवितांना या काळोखातून बाहेर मी काढलं आहे आणि खास एक आश्रम काढलंय.. एवढेच नव्हे तर तुला जाणून आनंद होईल की, तुझी कविता ही याच एका आश्रमात शिकतेय. तू आतापर्यंत जे केलंस त्यानुसार झालंय फेडून कर्ज सारं.. आता चल इथून.. तुझा गौरव आलाय तुला घेऊन जायला.. वाणी आता तू चल माझ्याबरोबर." तो इसम अर्थात गौरव एकदाचा बोलून गप्प बसला. 


" गौरव.. हे शक्य नाही रे आता.. खरंच मी अपवित्र झाली आहे.. कित्येकांच्या किळसवाण्या नजरांची शिकार झाली आहे मी.. मी ती वाणी नाही राहिली. तुझी जुनी वाणी नाही राहिली.." वाणी बोलली. 


" तुझ्या पावित्र्याची सिध्दी नको मला.. माझा तुझ्यावर विश्वास पूर्वी होता तेवढाच आहे. किंबहुना पूर्वीपेक्षा जास्त विश्वास आहे. म्हणून तू चल माझ्याबरोबर. आणि इथल्या मुलींची काळजी नको करू.. त्यांना इथे ठेवणार नाही आहे मी, म्हणून घेऊन चलतोय आपल्याच सोबत त्यांना. त्यांनाही आश्रमात दाखल करूयात. म्हणून काळजी न करता फक्त चल माझ्या बरोबर.." गौरव वाणीच्या डोळ्यात डोळे घालून बोलला. 


" पण.. " वाणी बोलली. 


" पण बिण काही नाही.. वाणी जर तू माझ्यावर खरं प्रेम केलं होतं तर चल माझ्याबरोबर.. जगाची फिकीर नाही मला.. तू फक्त चल. मला फक्त तू हवी आहेस. लोकांच्या नजरांना मी घाबरत नाही तू ही घाबरू नकोस. " गौरवने वाणीचा हात धरून तिला तिच्या तंबूसारख्या खोलीतून बाहेर आणलं. 

         वाणीचा हात गौरवने पकडलेला पाहून तमासगीर त्या दोघांच्या जवळ आला आणि तो त्यांना उलटसुलट बोलू लागला. तेवढ्यात काही क्षणात गौरवचा पी. ए. आला, त्याने गौरव जिल्हाधिकारी असल्याचं सांगितलं आणि बाकी काही कुरबुर केली तर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात येईल अशी धमकी दिली. तो तमासगीर चांगलाच घाबरला. मग गौरवच्या सांगण्यावरून तिथल्या सर्व मुलींना बाहेर काढण्यात आले आणि त्यांना नजीकच्या आश्रमात रवाना केले गेले. 

         दुसरीकडे गौरव वाणीला घेऊन कविता ज्या आश्रमात होती, त्या आश्रमात आला. कवितानेही लगेच ओळखलं वाणीला. दोघींनी तब्बल चार वर्षानंतर घट्ट मिठी मारली. त्यानंतर कविताने गौरवचं खूप कौतुक करून सांगितलं. ते ऐकून वाणीला त्याचा खूप अभिमान वाटला.

          बऱ्याच दिवसानंतर झालेल्या या भेटीत वाणीने गौरवच्या घरच्यांची विचारपूस केली तेव्हा कळलं की, आता त्याची आई सुध्दा वारली.. आता त्याचं आयुष्य फक्त वाणी आणि त्याची नोकरी होती. असंच बरंच बोलणं झालं. नंतर गौरवने एक उसासा घेतला आणि धीर एकवटत वाणीला लग्नाची मागणी घातली. तिला काही कळेना.. तिच्या मनातलं ओळखून त्याने विश्वास दिला आणि शेवटी तीही तयार झाली. 

              एक आठवड्यानंतर वाणी आणि गौरवने लग्न केलं. दोघे एकरुप झाले. लग्नानंतर वाणीने परत तिचं अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण केलं आणि ती आता शिक्षिका होऊन तमासगीर कुळातील मुलामुलींना ती शिकवते.         

             जी मुलं शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना ती शिकवत आहे. वाणी आणि गौरवचा संसार आश्रमातील लेकरांसोबत सुरळीत सुरू आहे. तमाशात चालणारे अनैतिक प्रकार गौरवने त्याच्या अखत्यारीतील जिल्ह्यात तरी जवळजवळ बंदच केले आणि उर्वरित ठिकाणी तो त्याचे काम अविरतपणे करतोय. 


समाप्त.. 


        " अरेच्चा! कविता मावशीने आई - बाबाच्या लव्हस्टोरीबद्दल बरंच काही डायरीत लिहिलंय.. वाचून तर किती भारी मज्जा आली.. पण आईचा भूतकाळ खूप स्ट्रेंज होता. बाबांनीही लहान वयातच बरंच काही अनुभवलं. 

           भारी म्हणजे प्रेम केलं पण निभावलंही.. वाह.. आईबाबा, अभिमान वाटतो मला तुमची मुलगी होण्याचा.. आणि मावशी थॅंक्यू तू जर आईबाबाचं हे प्रेम एखाद्या कथेच्या स्वरुपात तुझ्या डायरीत लिहिलं नसतं तर कदाचित वाचायला मिळाले नसते. ह्या आजकालच्या मोबाईलच्या युगात ही अशी डायरी वाचण्याचा काही औरच मजा आहे.. 

            या डायरीमुळेच मला ही मोबाईलच्या युगाआधीची प्रेमकथा वाचता आली आणि चक्क आईबाबांचीच.. भारीच.. आता मावशी परत घरी आल्यावर तिला स्पेशल थॅंक्यू बोलणार आणि आणखी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आईबाबांची लव्हस्टोरी त्यांच्याचकडून परत एकदा ऐकून घेईल.. 

             परत तोच थ्रिल, तोच सस्पेन्स, तेच प्रेम अनुभवायला मिळेल, तेही खुद्द अनुभवींच्या मुखातून.. मज्जाच.. चला तोपर्यंत स्टडी करते.. ६ वाजले आहेत, आईबाबा आता काही वेळात येतीलच घरी.. मग काय आज बरेच राज उघड करणार.. तो पर्यंत अभ्यास करते. 

              पण काहीही म्हणा मावशीची ही डायरी आणि या डायरीतली ही काही पाने मनाच्या गाभाऱ्यात कायम जपून राहतील.. " डायरी वाचून झाल्यावर चेहऱ्यावर एक समाधानी स्माईल ठेवून एकांतात स्वतःशीच स्वतः बोलून "नीरा" (वाणी आणि गौरवची मुलगी) डायरी स्टडी टेबललगतच्या ड्राॅव्हरमध्ये ठेवून अभ्यासाला लागली. 

                 

....... समाप्त ....... 

        

               नमस्कार वाचकहो, कशी वाटली मोबाईल येण्या आधीची प्रेमकथा.. या कथेतील वाणी आणि गौरवचा प्रेम प्रवास तुम्हाला आवडला असेल, अशी अपेक्षा करते.. धन्यवाद.. बाकी काळजी घ्या.. 

               तुमचीच सेजल अर्थात श्रावणी..