झुला

..


सांज सावळी क्षितिजावरती रंग विखुरते
साथ मागण्या अंधाराच्या कुशीत शिरते
वेड लावते एक चांदणी मंतरलेली
काजळकाळी रात मलाही हळवी करते

कुणास ठावे कशी अचानक प्रीती जडते
जुनी कहाणी पुन्हा नव्याने तशीच घडते
काळजावरी हवीहवीशी फुंकर पडता
एक वेदना शब्दांमागे हळूच दडते

गूढ सावली भिंतीवरती उगाच फिरते
हात फेरण्या समीप जाता क्षणात विरते
निरव शांतता छेदत जातो एक उसासा
कुणी दिवाणी चांदणराती उगाच झुरते

काळजातल्या जखमेवरची खपली उडते
आणि नेमकी आठवणींची ठिणगी पडते
झुला रिकामी उगाच झुलतो वाऱ्यासंगे
आणिक माझ्या श्वासांची लय तिथेच अडते

© वृषाली प्रभुदेसाई - जोशी