झाले मोकळे आकाश-३

.....






भैरवीची बाजू तीच्याचं तोंडून ऐकू :

  
  डिग्रिच्या  दुसर्‍या वर्षाला होते मी.नेहमी स्वतःतचं गुंग असायचे.एकटं राहायला जास्त आवडायचं.माणसांची गर्दी नकोशी वाटायची.फक्त मी आणि मीचं...!


तसं ही एकटं राहण हा माणसाचा मूळतः स्वभाव नसतोच. असतात काही कारणे एकाकी व्यक्तींच्या एकटेपणामागे...माझी ही होती.

आई -बाबांच्या लग्नानंतर दहा वर्षांनी माझा जन्म झाला.सर्वांत मोठी रागिणीताई ,नंतर आभादिदी आणि त्यानंतर त्यांना वंशाला दिवा हवा होता आणि मी जन्माला आले.जन्मापासूनचं नकोशी असलेली अगदी आईलाही!

हे बोलताना तीच्या डोळ्यांतून घळाघळा वाहणारे अश्रू विक्रमांशूच्या नजरेतून सुटले नाहीत.

तीला असं रडताना पाहून ,त्याच्या हृदयात कालवाकालव झाली पण आत्ता जर तीला जवळ घेऊन थोपटल तर ती मन मोकळ करायच्या ऐवजी पून्हा शांतच राहील आणि तेच तर विक्रमांशूला नको होतं.आज तीच्याचसाठी तो तीच्या अश्रूंनाही दूर्लक्ष करायला तयार होता आणि त्याने ते केले ही.तीचं लक्ष नाही हे पाहून त्याने चटकन स्वतःची मान वळवून तिच्यावरील नजर हटवत समोर विस्तृत पसरलेल्या डोंगररांगांकडे पाहू लागला. पण कान मात्र तीला ऐकण्यासाठी आसुसलेले होते.


लहानपणापासून प्रत्येक गोष्टीत मला नकारचं!कधीचं आई -वडीलांच प्रेम अनुभवायला मिळालं नाही.

वडीलांना तर माझी खूप घृणा वाटतं होती, असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही.आधीचं त्यांच्या मुलाच्या स्वप्नांवर पाणी फेरलं मी जन्माला येऊन आणि मी जन्माला आल्या आल्या ,आजी आजोबांचा गावाकडे घरावर दरड कोसळून मृत्यू झाला.मग तर अपशकुनी पणाचा धब्बा ही पडलाच पाठी कायमचा!

माझ्या जन्मानंतर माझ्या बहिणींचे ही अस्तित्व टोचू लागले घरात.त्यांनाही घालून पाडून बोलणी पडू लागली.
बाबा तर आधीच खार खाऊन असायचे आणि आई ही बाबांच्या पावलावर पाऊल ठेऊनचं ! ती कधी बाबांच्या समोर ब्र शब्द काढेल तर शपथ!बाबा म्हणतील, तीचं पूर्वदिशा!

पण या सगळ्या गोष्टींमध्ये मी खूप भरडत गेले.आई निदान थोडक का होईना बहिणींशी बोलायची.त्यांच्या रोजच्या जीवनावश्यक गरजा तर पुर्ण करायची.पण मी???माझ्या गरजा???

माझा जन्म झाल्यापासून आणि आजी आजोबांना देवाज्ञा झाली तसे वडिलांनी घर सावरण्याऐवजी दारूचा सहारा घेतला.दिवसरात्र त्या घरासमोरच्या पारावर बसून असायचे.ना काही काम ना धंदा.जास्त दिवस कामाच्या ठिकाणी न फिरकल्यामुळे काम ही सुटलेच कायमचे. मग काय त्याचं खापर ही माझ्याचं नावावर फोडलं गेलं.

सर्वजण माझे असूनही कोणीचं नव्हतं त्या घरात माझं असं! नाती काय असतात ? आपुलकी, जिव्हाळा, आईबाबांच प्रेम ,बहिणीचं प्रेम यासाठी तरसायचे मी क्षणाक्षणाला,पण हाती निरसपणाच यायचा नेहमी!

हे सांगताना भैरवीच्या डोळ्यांतून अश्रू वाहतचं होते पण हात -पाय ही थरथर कापत होते एके काळी अनुभवलेल्या या जाणीवेने!

विक्रमांशूला तीची अवस्था अजीबात पाहवत नव्हती.किती ते साठलं होत मनात तीच्या.काय आणि किती.आज फक्त रितं व्हायचं होतं तीला.एवढे दिवस मनात साठवतं आलेली तळमळ ,ओसंडून वाहू द्यायची होती.मोकळं करायचं होतं अपार साचलेल्या दुःखाला आणि सोबतचं डोळ्यांआड कितीतरी वर्ष दबा धरून असणार्‍या नेत्राश्रूनां!!!

त्यामूळेचं विक्रमांशूने तीला आपल्या कवेत घेण्यासाठी सरसावलेला हात ही तीने, आपल्या हाताला समोर करून जागेवरचं रोखला.

पून्हा जर मी निशब्द झाले तर??? नकोच!
आज मला बोलायचंय! मनभरून बोलायचंय !आज नको अडसर कशाचा.हलकं व्हायचयं मला!


सतराव वर्ष लागलं होतं मला.रागिणीताईचं लग्न झालं होतं एव्हाना.आभा दिदी कॉलेजला शिकायला जातं होती. आणि मी नूकतीचं दहावी पास झाले होते.हेचं एक चांगल होत माझ्या आयूष्यात.शाळा शिकायला कधी अडवलं नव्हतं,तिघींनाही!

तसं तर मला घरात जास्तवेळ थारा नको,वडिलांना मी समोरसुद्धा नको असायचे नाहितर त्यांच्या नजरेतील तो दहशतभरा जाळ...!!! दरदरून जायचे मी जागीचं भितीने.

म्हणूनचं मला शाळेचं तोंड बघायला मिळालं.काम करायला आणि संध्याकाळी झोपायलाचं तेवढं कसंबसं मला आसरा दिला होता.

क्षणभर विष्षण हसली भैरवी ते दिवस आठवून डोळ्यांतील पाण्यासकट! खरचं केवीलवाण हसू होत ते. काय नव्हतं लपल त्यामध्ये? तीचा भूतकाळ अहं तीचं वेदनादायक गतआयुष्य!


एक दिवस मी अशीच मागच्या अंगणात बसून भांडी घासत बसले होते.वडिलांना समोर नको असायचे ना मी.

दार ठोठावलं कोणीतरी बाहेरचं!आतमध्ये काहितरी काम करणारी आई धावतपळतचं दरवाजाकडे गेली. एरवी अशीच घाबऱ्या- घुबऱ्या व्हायची ती.वडिलांना दारूचा नाद लागलेला आणि त्यातचं मगं आजारपण मागे लागलं.तरी सवय काही सूटतं नव्हती.आईने त्या माणसाला  बाबांना दारू देऊ नका म्हणून हात जोडून विनवणी केली होती एकदा.

बाबा ही पहीले खूप चांगले होते म्हणे माझे जन्माच्या आधी.कोणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही.पण सगळ्यांशी प्रेमाने मिळूनमिसळून वागायचे.मान होता त्यांना तीथे.

पण आज त्यांची अवस्था! त्या माणसालाही दया आली हात पसरून समोर उभ्या असणाऱ्या आईवर.मग तो बाबांना तीथूनचं माघारी लावायचा.

पण सवय ही चांगली असो वा वाईट (आणि त्यातल्या त्यात वाईट सवयी) कायमची सुटणं भयंकर अवघडं! बाबांनाही ते जमेना! रोज तीथे जाऊन काहितरी आदळआपट करून यायचे देत नाही प्यायला म्हणून!

तीकडे भांडण लागली की ,रोज दरवाजावर थाप असायची! मग आई असेल नसेल तश्याच अवतारात धावत जायची.अनवाणीचं!

शांतपणे बाबांना हाताला धरून घरी घेऊन यायची.पण घरी आल्यावर मात्र तोंडाला कुलूप लाऊन आपलं काम करत बसायची.कधीच तोंड उघडणार नाही बाबांसमोर. काहीसुद्धा बोलायची नाही बाबांना. एक शब्द ही नाही!

रागिणीताई ,आभा दिदी आईच्या वागण्यावर काहिचं बोलायच्या नाहीत.कदाचीत त्यांना आईने सांगितले असेल काही. मला माहिती नसेल.

मी एकदा हिम्मत करून विचारलचं आईला.

असं ही माझ्याशी कोणी प्रेमाने बोलायचंच नाही.

अंगावर खेकसतचं म्हणाली ," नवर्‍याला उलटून बोलायचं नसतं नकूशे ! तू पोटाला आली आणि सगळ चक्रचं फिरलं. चांगला हसता खेळता माझा संसार पुरता ढासळला.जन्माला आल्या आल्या आजी-आजोबा ला गिळलसं.आणि तूझ्या पायगूणामूळ नोकरी बी गेली ह्यांची. काय म्हणून अवदसा सुचली आणि तूला जल्म दिला.सगळ व्हत्याचं नव्हतं झालं..."


ती अजून बोलतचं होती पूढे, पण माझ्या डोळ्याला मात्र धारा लागलेल्या.जीव नकोसा झाला होता अगदी.नेहमी अवहेलना आणि अंगावर येणारे तीव्र ,धारदार ,जहाल शब्द ! नेहमी आतून विखरून टाकायचे मला.

काय केलं होतं यांनी माझ्यासाठी? जन्मापासून मला दूर लोटलं.लांब सारलं. अगदी माझं नाव ही नकोशी होते म्हणून "नकूशी ".

हसायला येत होतं माझ्या नशिबावरं.

शाळेत नाव घालायचं ,तेव्हा तीथेचं वर्गातल्या बाईंनी नाव दिलं मला "भैरवी "

म्हणाल्या या नावाला सार्थ करून दाखवं. खूप शिकून मोठी हो.अन्याविरूद्ध लढा द्यायला शीक. त्याआधी तूला स्वतःच्या पायावर ऊभं रहायला हवं. काही कळलं नाही एवढं त्यावेळी, फक्त त्यांच आपुलकीने बोलण मात्र मनाला भावलं. तेव्हापासून शिक्षणातचं मन रमवायचे जास्तीत जास्त.

मनात ठरवलंं होतं खूप शिकायचं मोठं व्हायचं.मग तेव्हातरी अभिमानाने, आनंदाने मला आई-बाबा जवळ घेतील.दहावी झाली तशी मी कॉलेजला जायची स्वप्न पाहायला लागलेले पण आई म्हणली," नाही शिकायचं पूढे.मी नाय करू शकणार तूझ्या शिक्षणाचा खर्च.बास झालं तेवढं लयं झालं.तेवढं शिकली तेवढचं लयं झालं.बापाला घरी बसवलं आणि तूला कॉलेजात जायाचाय.पैसं काय झाडाला लागल्यात व्हयं?"

झालं.ज्या गोष्टीचा आधार होता,ती ही अर्ध्यातचं साथ सोडून जाताना दिसत होती.पून्हा पदरी नेहमीप्रमाणेचं निराशा!

दिवस सरत होते.मनातील आशा धूसर होत चालल्या होत्या.आणि त्यादिवशी मी एवढा एक प्रश्न विचारला की " बाबांना काहीचं का बोलतं नाही तू "तर अशा जहरभर्या शब्दांनी मलाचं निशब्द केलं तीने.

पून्हा ठरवलं काहीच बोलायचं नाही शांत रहायचं.मरण जवळ करावं म्हंटल तर मरणाची भिती.बाईंनी एवढ्या आपुलकीने जवळ घेऊन नाव दिलं होत मला.मला जगण्याचा मार्ग दाखवला होता आणि मी मरणाचा मार्ग निवडावा ? मनातले विचार दूर सारून ,डोळे पुसत पून्हा कामाला लागले.


" नकूशे ए नकूशे !" भांडी जाळीत मांडत होते तोवरच आईची हाक ऐकू आली. पटपट भांडी मांडत दोन्ही हातात जाळी उचलून आत धावले.स्वयंपाकघरात भाड्याची जाळी ठेऊन पटकन आईकडे जाऊ लागले.

पण तीच्याकडे धावत जाणारी पावलं जागीचं थबकली.बाहेरच्या खोलीतं कोणीतरी आलेलं दिसतं होतं.एक माणूस आणि बाई.चांगली उंची कपडे घातलेली अंगावर.

आईने त्यांच्याकडे थोडसं हसून पाहतं "आलेच "म्हणून आतं आली.

दाराआड लपलेली मी दिसताचं पून्हा अंगावर खेकसली,
" बह्यरी झालीस का? इथं काय अशी दार धरून ऊभं राह्यलीयं.जा पळ वाण्याच्या दुकानातनं अर्धा किलो साखर आण चहापावडर घिऊन यं, आणं तूझं बाबा दिसलं तर सांग, त्यांच गावाकडलं मित्र आल्यातं त्यास्नी भेटाया.या म्हणाव घरला."माझ्या हातात पन्नासाची नोट दामटत तीने मला दुकानात सामान आणायला पाठवलं.

मी त्यांच्या समोरून गेले नाही.मागच्या दरवाजातून वळसा घालत दूकानाकडे पळाले.

"ही आई पण ना! बाबांना मी समोर नको असते आणि आता म्हणते दिसले तर बोलावून आणं.त्यांचे ते लाल लाल डोळे बघूनचं कोणी माझ्या अंगावर आगीचा गोळा फेकतेय असे वाटते.भितीचं वाटते मला त्यांची.तसे कधीचं हात उगारला नाही बाबांनी माझ्यावर पण कधी समोरही ऊभं करतं नाहीत की जवळ घेत नाहीत.कूशीत घेऊन थोपटतील का प्रेमाने कधी?बोलतील आपुलकीने माझ्याशी? "
मी माझ्याचं धुंदीत स्वतःशीच बडबडत दूकानाकडे चालले होते.
ते आलेले पाहुणे आधी कधी पाहिले नव्हते घरी.आई म्हणाली ना बाबांचे मित्र आहेत म्हणे.पण ते किती छान नीटनेटके कपडे घालून आलेत.बाबांच्या आणि त्यांच्यात किती सारा फरक आहे. मग हे मित्र कसे? म्हणजे बाबांचा अवतार तर...

पण सगळेजण म्हणतात बाबा आधी चांगले होते. म्हणजे थोडे तिरसट होते, पण कोणाला जाणूभूजून त्रास नाही द्यायचे.नोकरी होती तेव्हा खूप पैसे होते छान चालू होतं अगदी त्याचं.पण माझ्या जन्मानंतरच तसे वागायला लागले...

"पण माझी काय चूक? "

"माझी काय चूक?"

भैरवी सांगता सांगता तंद्रीत मोठ्यानेचं बोलली.आणि इकडे विक्रमांशू तीचा किंचीत मोठा आवाज जरा दचकलाचं!

आजपर्यंत साधं बोलायला जिला कष्ट पडायचे ,ती एवढ्या टीपेच्या आवाजाची धनी होते?
पण प्रश्न तर साहजीकचं योग्य आहे.

तिची काय चूक?

खरचं ,काहीही चूक नसताना का बर तीच्या जीवाला जन्मल्यापासून यातना?

प्रारब्ध की मनुष्यप्राण्याचा चुकीचा अट्टाहास?

क्रमश:

 ©️ मनमंजिरी ?


उत्सुकता चाळवली ना पूढे काय ?अजून खूप काही आहे भैरवीच्या मनात साचलेले.ते आलेले पाहुणे तीच्या आयुष्यात काही बदल घडवतील का?घरचे तीला मनापासून स्विकारतील कधी ?करेल का तीचं शिक्षण पूर्ण ती? काय असेल विक्रमांशूचा निर्णय तीची बाजू ऐकल्यावर? पाहू हळूहळू... 


Keep reading and commenting.


🎭 Series Post

View all