जाणीव

जाणीव


"एवढा मोठा सायेब झालास आणि तरीबी या म्हातारीला भेटायला आलास एवड्या लांबून!"
"आजी,आईवडीलांनंतर तूच तर सांभाळलंस मला. आजही आठवतो तो भयंकर प्रसंग. मी आठ - दहा वर्षांचा असेन. तिन्हीसांजेला बाहेर खेळत होतो आणि आई आत भाकऱ्या करत होती. मला आवडतात तशा पातळ. आणि एकाएकी घराला आग लागली. मला काही कळेचना. बाबांनी आग विझवायचा खूप प्रयत्न केला पण ती इतकी मोठी होती की प्रयत्न हरले."


"सकाळी जळलेल्या अवस्थेतले त्या दोघांचे मृतदेह बाहेर काढले. मी फक्त रडत होतो. \"आई - बाबा\" असा ओरडत होतो. पण माझ्या पहिल्याच हाकेला ओ देणारी आई निपचित पडली होती. तेव्हा तू मला परिस्थिती हलाखीची असतानापण सांभाळलंस. जगायला शिकवलंस. स्वतः उपाशी राहून माझं पोट भरलंस. तुझ्या मुलीची शेवटची आठवण असलेली सोन्याची माळ माझ्या शिक्षणासाठी गहाण ठेवलीस. कसं विसरेन मी तुला? आज मी जों कुणी आहे तो तुझ्यामुळे. आपल्यात रक्ताचं नातं कधीच नव्हतं पण जन्म जन्माचं नातं नक्कीच आहे."


"लेकरा. लय बरं वाटलं बघ तुला असं सुटाबुटात बघून. "आजीचे डोळे पाण्याने डबडबले. तिने मायेने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि त्याने तिला आपल्यासोबत एका ठिकाणी नेऊन गाडी थांबवली. तिचा हात पकडून खाली उतरवलं. समोर असलेल्या आलिशान बंगल्याकडे ती पाहू लागली. तो तिला बंगल्याजवळ घेऊन गेला आणि तिच्या हातात किल्ल्या देऊन,"आजपासून तू इथेच राहायचं माझ्यासोबत." असं म्हणताच आजीला काय बोलावं तेच सुचेना. तिने केलेल्या कष्टाचं, मायेचं आज चीज झालं होतं.