जशास तसे

A Stingy Man

चला हसवू या.....

शीर्षक-जशास तसे!

हिम्मतराव एक मोठी असामी.. श्रीमंत.....
घर तर जणू मोठा बंगला!
संपत्तीची काही कमी नाही. पण मनाने मात्र फारच कंजूष.... एवढा कंजूस की जेवण झाल्यावर सुपारी जास्त खाऊन संपते म्हणून आपल्या खोलीत त्या सुपारीला एक दोरी बांधून ठेवली. लोलका सारखी. ती सुपारी दोरीने लटकवून ठेवून जाता येता चोखायची म्हणजे सुपारी संपतही नाही, आणि सुपारी खाल्ल्याचा आस्वादही घेता येतो.....
असं हे व्यक्तिमत्व!
हिम्मतराव नोकर सुद्धा एकच ठेवायचे. जेणेकरून जास्त नोकरांना पगार द्यावा लागू नये म्हणून! नोकर सुद्धा स्वभावाने साधासुधा शोधायचे. त्याच्याकडून भरपूर कामे करवून घ्यायचे.
महिन्याच्या शेवटी त्याच्या पगारातून पैसे कापून घ्यायचे. जसे की, त्याने महिन्याभरात किती पाणी पाय धुण्यासाठी वापरले, किती पाणी पिला, किती वेळा त्यांच्या ओट्यावर बसला, इत्यादी बारीक-सारीक गोष्टी ते टिपून ठेवत. नंतर पैसे कापून उरलेले त्याच्या हातावर ठेवत.
असे केल्यामुळे दर चार-पाच महिन्यांनी नोकर नोकरी सोडून जात असे. त्यांची ही सवय सगळीकडे परिचित होती.

एकदा एका हुशार नोकराने त्याला अद्दल घडवायची ठरवले. त्याचे नाव होते पोपटराव! तो पोपटासारखा सतत बोलत राहायचा. कुणीही समोर असो वा नसो, त्याचे बोलणे चालूच..... बोलताना तो सतत हातवारे करायचा. कुणी समोर दिसले की त्याच्या तोंडाचा पट्टा सुरू! काहो काय करताय? कुठे राहता? कसे काय आले? जेवले का? पाणी पिले का? ऐकणाऱ्याला थोडीशी हीउसंत मिळूनदेणारा प्राणी म्हणजे पोपटराव...

असा हा पोपटराव नोकरी मागण्यासाठी हिम्मतरावांकडे गेला. हिम्मतरावांना म्हणाला, मालक आपल्याकडे काही काम मिळेल का? मला कामाची खूपच आवश्यकता आहे. मला पैशांची खूप गरज आहे हो! त्याने आपली सर्व माहिती हिम्मतवांना दिली.
असं म्हणतात की हुशार लोक कमी बोलतात. पण इथे उलटे होते. तो जसा जसा जास्त बोलायचा, तसं तसं त्याचं डोकं वेगात धावायचं. त्याला माहीत होतं की यांना सुद्धा नोकराची आवश्यकता आहे.
त्यांना नोकराची आवश्यकता होती च. त्यांनी लगेच त्यालाकामावर ठेवून घेतलं.
परंतु त्याने हिंमतरावांसमोर दोन अटी ठेवल्या. मी स्वतः नोकरी सोडणार नाही, ही पहिली अट. दुसरी अट अशी की तुम्ही जर मला कामावरून काढलं, तर मला एक वर्षाचा पूर्ण पगार द्यावा लागेल.
हिम्मतवांनी दोन्ही अटी मान्य केल्या.

मालक जे जे काम सांगतील ते काम तो करायचा. पण कसा.....

एकदा मालकांनी त्याला सांगितलं, जा आंघोळीला गरम पाणी घेऊन ये. त्याने उकळत पाणी बकेटमध्ये आणलं. मालकांनी ते पाणी अंगावर घेतल्याबरोबर त्यांचं अंग भाजून निघालं.
मालक त्याच्या अंगावर जाऊन ओरडले. मुर्खा त्यात थंड पाणी कोण मिसळणार!
पोपटराव म्हणाला ,मालक तुम्हीच तर गरम पाणी आणायला सांगितलं..
एकदा पोपटराव ने धुण्यासाठी सर्व कपडे एका गाठोड्यात बांधले. दुसऱ्या दिवसासाठी ते काम ठेवलं. दुसऱ्या दिवशी एक बोहारी ण
म्हणजे कपड्यांवर भांडे देणारी बाई मालकाकडे आली. मालकांनी म्हटले, ते कोपऱ्यातले गाठोडे आणबरं!
नोकराने ते धुण्यासाठीच्या कपड्यांच गाठोडं आणलं. तेसर्व कपडे तिला दिले. तिने आनंदाने एक भांड पोपटराव च्या हातात ठेवलं. आणि निघून गेली. हिम्मतरावांनी कपाळावर हात मारला. अरे! ते नवीन कपडे तिला कशाला दिले? पोपटराव म्हणाला, अहो तिने हे पहा किती छान भांड दिलं.


एकदा मालकाने त्याला जाड भेंडीतले दाणे सोलून ठेवायला सांगितले. त्याने भेंडीतले दाणे सोलून दाणे कचऱ्यात फेकले, व टरफल पातेल्यात आणून ठेवली.
मालकाने त्याच्या मूर्खपणाबद्दल त्याला खूप शिव्या घातल्या.

एकदा घरातलं तेल संपल्यामुळे मालकाच्या बायकोने त्याला त्यांच्या ऑफिसमधून तेलासाठी पैसे मागविले. तो पळतच ऑफिसमध्ये जाऊन जोरदार ओरडला. मालक! स्वयंपाकातलं तेल संपलं! पैसे हवे आहेत.
ऑफिस मधील सगळे लोक हसायला लागले.
हिम्मतवांनी म्हटलं, अरे! हळू बोलायचं ना.. त्याने बरं म्हटलं.

एकदा हिम्मतरावांच्या बायकोचं याच्या सततच्या बोलण्यामुळे दुर्लक्ष होऊन विजेच्या तारेला हात लागला. अन् ती बेशुद्ध पडली.
नोकर ऑफिसमध्ये धावत गेला. आणि हळू बोलून सांगायला लागला. हिम्मतरावांना काहीच ऐकायला येत नव्हतं. त्यांनी म्हटलं, मोठ्याने बोल.
अहो... मालकीण बाईला शॉक लागला. त्या बेशुद्ध पडल्या आहेत...
मग हे मोठ्याने नाही का सांगायचं.....
हिम्मतराव त्याच्यावर जोरदार ओरडले.
तो म्हणाला, तुम्हीच तर म्हणाला होतात, हळू बोलत जा म्हणून!

असा हा पोपटराव! त्याने मालकाला असे कारनामे करून खूपच जेरीस आणलं.
मालक त्रासून गेल्यामुळे त्याला एक वर्षाचा पगार देऊन नोकरीवरून काढून टाकलं..

अशा कंजूष मालकाला चांगलीच अद्दल घडली!!!!


छाया राऊत (बर्वे)