Login

जरा थांब ना -2

Beautiful Love Story Of A Guy Ruturaj Who Is Full Of Attitude And A Very Simple Cute Girl Duhita. How they Depart and Meet Again In life Is Stay Jara Thamb Naa.
जरा थांब नाऽ ! -2
@राधिका कुलकर्णी.


“अरे व्वा! फार लवकर शिकलीस की! पण तरीही प्रश्न उरतोच?”

“ लुक ऋतूराज, आपण काही वेळापुरते योगायोगाने इकडे भेटलोय, बोलतोय, सोबत चालतोय राईट! ज्या मुलाबरोबर एक शब्द बोलण्यासाठी पोरी लाईन लावून उभ्या असतात आणि तो त्यांना भाव पण देत नाही तोच मुलगा मला कड्यावरून पडताना अचानक वाचवायला येतो काय, पुन्हा असं काही घडू नये म्हणून माझी काळजी घेतो काय, गप्पा मारतो काय!
ह्या गोष्टी माझ्यासाठी खूप मोठ्या आहेत. आता हेच बघ ना, मला तुझं नाव माहीत आहे पण तुला तर माझं नाव पण माहित नाही आणि तुला ते जाणून घेण्यात पण रस नाही माहितीय मला. मग मला सांग इतक्या सुंदर योगायोगाला मनाच्या कुपीत अत्तरासारखे बंद करायचे सोडून नको त्या विषयावर चर्चा करून त्या क्षणांची माती करू का मी?
म्हणून शांत बसले. आय होप तुला तुझं उत्तर मिळाले असेल आणि थॅंक्यू! तू मगाशी मला पडता पडता वाचवलेस. आताही ह्या निर्जनस्थळी माझी सोबत तुझी इच्छा नसतानाही करतोय. खूप खूप थॅंक्यू!”

तिला वाटलं होतं शेवटच्या वाक्यावर तो म्हणेल ‘अगं, असं काही नाही’ पण तो काहीच बोलला नाही.

ती समजून चुकली. हे जे काही वाटणं आहे ते फक्त आपल्यापुरते आहे.
‘नाहीतरी बरोबरच होते त्याचे. त्याच्याजागी मी असते तर मी तरी वेगळं काय केलं असतं?
कोणी नाही म्हणून सोबत केली असती फक्त.
मग तोही वेगळं काय करतोय, तेच तर करतोय.
काय चुकलं त्याचं? ‘मान न मान, मै तेरा मेहमान’ असं उगीच गळ्यात पडणं कुणाला पसंत पडेल?’

आपल्याच विचारांच्या आवर्तनात ती चालत होती आणि कानावर एक हाक पडली. मान वर करून बघितले तर तो चक्क तिला तिच्या नावाने हाक मारत होता.
दूहीताऽऽ..
‘ बापरे, वॉव्ह! पण ह्याला माझं नाव कसं कळलं?’

आश्चर्य आणि प्रश्नांच्या चक्रीवादळात घेरलेली दूहीता घाईघाईने अंतर कापत त्याच्यापर्यंत पोहोचली.
मनातला प्रश्न ओठी येणारच की तो उत्तरला,

“इतकं आश्चर्य वाटायची काहीच गरज नाहीये. तो बघ तुझ्या ड्रेसला लावलेला बिल्ला क्रमांक 16. कॅम्पमध्ये
सगळ्यांना एक बिल्ला क्रमांक दिला आहे लावायला. तोच वाचून लिस्टमधले तुझे नाव कळले मला.”

एकिकडे मन खट्टू झाले तर दुसरीकडे थोडासा आनंदही दाटला. त्याला लिस्टमधले माझे नाव जाणून घेण्याची इच्छा झाली हेही नसे थोडके ना!
मनातल्या मनात आपलीच पाठ थोपटत ती शांतपणे चालत होती तेवढ्यात त्याच्याकडून अनपेक्षितपणे एक प्रश्न आला.

“नाईस नेम!”

“थॅंक्यू!”

“बाय द वे, अर्थ काय गं ‘दूहीता‘ चा?”

“अं.. ?”

तिला दोन मिनिट लागले हे समजायला की तो आपल्याला आपल्या नावाबद्दल विचारतोय.

“दूहीता म्हणजे - कन्या, मुलगी.”

“वाह्! युनिक नेम हं.”

त्यांच्या गप्पा हळूहळू रंगत होत्या इतक्यात पावसाची सर आली. म्हणता म्हणता त्याने जोर धरला आणि पायाखालची जमीन निसरडी व्हायला लागली. आपल्या सॅकमधून तिने रेनकोट काढून घातला. पण डोंगरावरच्या पावसाचा जोर इतका होता की त्यापुढे त्या रेनकोटचा टिकाव लागला नाही आणि तिचे सर्वांग चिंब ओले होऊ लागले. चालताना तिचा पाय जमिनीवरून घसरायला लागला आणि नकळतपणे तिने त्याचा हात आधारासाठी पकडला. त्याने चमकून तिच्याकडे बघितले. आपण काय करून बसलो हे समजताच तिने घाईने हात सोडला तशी ती पुन्हा घसरून पडणार एवढ्यात त्यानेच तिचा हात घट्ट पकडला. त्याच्या हाताचा तो उबदार स्पर्श एवढ्या पावसातही अंगावर रोमांच उठवून गेला तिच्या. अंतरंगात एक वेगळीच गोड हलचल होत होती. तो मात्र झपझप पावले टाकत तिला आपल्याबरोबर खेचत आडोसा शोधत होता. अखेरीस दूर एक टपरीवजा शेड दिसली आणि तो घाईघाईने तिला पकडत तिकडे चालू लागला. दोघेही पावसाने चिंब भिजले होते. तिला थंडी पण वाजत होती. दोघेही शेडमध्ये पोहोचले. एक म्हाताऱ्या बाई आतल्या बाजूला चुलीवर काहीतरी करत होत्या. ह्या दोघांना बघून तिने विचारले,
“पावसात अडकलासा जनू? हिथला पाऊस लय वंगाळ. कधी पन पडतूया. च्चा घिनार का?”

ऋतुराजच्या उत्तराची वाटही न बघता दूहीताने लगेच होकार भरला. तिला खूपच हुडहुडी भरली होती. ती आज्जींना विचारून त्यांच्या चुलीजवळ शेक घेत बसली. ऋतूराज तिच्या प्रत्येक बालीश हरकती बघून मनातल्या मनात हसत होता.
आज्जींनी दोघांना चहा बिस्कीटं दिले. खरंतर ‘चहा बरोबर गरमागरम भजी मिळाली असती तर किती बरे झाले असते’ असं दूहीताच्या मनात येऊन गेले. त्याच क्षणी ऋतूराजने आज्जींना प्रश्न विचारला,

“आज्जी, चहासोबत भजी नाहीत का?”

त्याच्या त्या प्रश्नाने ती दचकलीच.

‘बापरे! ह्याला मनातलंही वाचता येते की काय!’

त्यावर आज्जी म्हणाल्या,

“नाय रे लेकरा, मी हिकडं भुट्टं इकाया बसते. पण ती पन सपली. घरला निगनार एवढ्यात पावसानं दांगडू सुरू केला. च्चाचं सामान ठूत असते म्या कदीमदी लागलं तर, म्हूनशान इचारलं तुमास्नी. तुमीबी लय वलं झाला हाईसा. बसा घडीभर. ह्यो काय फार वेळ टीकायचा न्हाई. च्चा बिस्कूट खावा तवर थांबन ह्यो बी.”

दोघांनी चहा बिस्कीटं खाल्ली. ते खाऊन तिलाही जरा तरतरी आली. थोड्यावेळात पाऊस थांबला तसे दोघेही झरझर पावले उचलत आपल्या कॅम्पबेसला पोहोचले.

तिकडे जाताच तो मुलांच्या आणि ती मुलींच्या तंबूत शिरली. ती बघत होती जाताना हा बघतो का पण त्याने मागे वळूनही बघितले नाही.
तिला थोडा रागच आला त्याचा आणि वाईटही वाटलं. पण काही गोष्टी ह्या आपल्या हातात नसतातच.
आनंद आणि सुखाचं अस्तित्व दवबिंदूंसारखं असतं. अगदी क्षणिक! पण त्या इवल्याशा क्षणात त्याचे मोती होणं हेच किती अनमोल असतं.
ही भेटही तशीच!

तिने स्वतःच स्वतःचं समाधान केलं आणि आपले ओले कपडे बदलले. केस एका टॉवेलने बांधले तोपर्यंत हळूहळू बाकीचे सगळे कॅम्पबेसला पोहोचले.

कॅम्पचे दोन तीन दिवस कसे उडून गेले कळलेही नाही. वेगवेगळे खेळ आणि शेवटचा कॅम्पफायर आणि मग सकाळी डिस्बर्स असा ठरलेला कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला होता.
रात्रीच्या जेवणाची व्यवस्था झाली. एका टेबलवर सगळे पदार्थ मांडलेले. प्रत्येकजण आपल्या हाताने वाढून घेऊन आवडीच्या मित्रांचा गृप करून हसणे, खिदळणे, मस्करीत एकमेकांना टाळ्या देत चिडवण्यात जेवणं चाललेली.
दूहीता काहीतरी वाढून घ्यायला पुन्हा टेबलकडे जाताच ऋतूराजही नेमका तिथे आला. तिने हसून स्माईल केले पण त्याने काही प्रतिसाद न देता एक चिठ्ठी तिच्या बाजूला सरकवून निघून गेला.
तिने आश्चर्याने हळूच उघडून बघितली तर लिहिले होते.

“चेक व्हॉट्सॲप.”

खूप वेळची तिच्या फोनला रेंजच नव्हती पण तरीही तिने फोन उघडून बघितला आणि तिला हसूच फुटलं.

ओऽह नोऽ!

……………………………………………………..
क्रमशः -2
@राधिका कुलकर्णी.

काय असेल व्हॉट्सॲप मेसेज?
दूहीता इतकी आश्चर्यचकित का झाली?
हे सगळे पुढील भागात पाहू.

🎭 Series Post

View all