Login

जरा थांब ना -3

दूहीता आणि ऋतूराज ह्या कॉलेज वयीन जोडीच्या हलक्याफुलक्या प्रेमाची अतिशय गोड सुंदर कथा ‘जरा थांब ना’
जरा थांब नाऽ!-3
@राधिका कुलकर्णी.

व्हॉट्सॲपवर ऋतूराजने मेसेज केलाय हेच पचनी पडायला तिला दोन मिनिट लागले.

‘मुळात ह्याला माझा नंबर..?’

तिचा विचार किती मुर्खपणाचा होता ह्यावर तिचे तिलाच हसू आले.
‘जिथे त्याने दोन सेकंदात माझे नाव शोधले तिथे माझा नंबर शोधणे त्याला कितीसे अवघड. मी पण नाऽ!’

तिने स्वतःलाच एक टपली मारली. पोटात गुदगुल्या होत होत्या.

‘काय पाठवले असेल त्याने!’

जेवण झाल्यावर गुपचूप तिने मेसेज वाचला आणि तिला हसूच फुटले.

‘ओह माय गॉड, काय हा!’

मेसेजमध्ये लिहिले होते,

‘त्या प्रत्यूषपासून लांब रहा!
अरेऽ हा कोण मला सांगणारा मी कुणाशी बोलायचं नी कोणाशी नाही ते! म्हणजे मगाशी आम्ही चिठ्ठ्यांवर आलेल्या नावाप्रमाणे जो डान्स केला, नंतर जेवताना सुद्धा एकत्र गप्पा मारत होतो ते त्याने पाहिले असेल का? पाहीले तर पाहीले!
पण ह्याने मला असा मेसेज केला म्हणजेऽ,
हाऽ मलाऽ!’

तिच्या मनात विचारांची गर्दी झाली.

‘तो माझ्याबद्दल इतका विचार का करतोय? हे फक्त काळजीपोटी की अजून काहीऽ?’

तितक्यात कॅम्पफायरभोवती सगळे येऊन जमा झाले. वेगवेगळे गेम्स सुरू होते. इतक्यात प्रत्यूष दूहीताच्या कानात येऊन काहीतरी कुजबुजला. त्याबरोबर ती तिथून उठून सगळ्यांना बाय करून प्रत्यूषसोबत निघून गेली. बघता बघता दोघेही दूर कुठेतरी दिसेनासे झाले. गेम्सच्यामधूनच त्यांना जाताना ऋतूराजनेही बघितले पण तो काहीच बोलला नाही.

खूप वेळाने दोघेही परत आपापल्या टेन्टमध्ये परतले. एव्हाना बाकी सगळे तंबूत विसावले होते.
तीही कपडे बदलून तिच्या बेडींगवर विसावलीच होती की थोड्याच वेळात दूर काहीतरी बोलण्याचे अंधूक आवाज कानी पडू लागले. आधी हळू येणारे आवाज नंतर एकदम वाढले आणि सगळ्याच मुली जाग्या झाल्या. सगळ्या आपापल्या टेन्टमधून बाहेर येऊन पहातात तो मुलांच्या टेन्टमधून काहीसे जोराने भांडण्याचे आवाज येत होते. आत्ता ह्यावेळी मुलांच्या तंबूत जाणे अलाऊड नसल्याने सगळ्याच पुन्हा आपापल्या जागी विसावल्या. सकाळी चहाच्यावेळी प्रत्यूष दूहीताकडे चहाचा गुल्लक घेऊन पोहोचला. त्याने तिचाही चहा सोबत आणला होता. ती व तो एका कठड्यावर बसून चहा घेत होते इतक्यात तिला कालचा प्रसंग आठवला. तिने लगेच विचारले,

“काल रात्री कसला गोंधळ चालू होता रे मुलांच्या तंबूत? आम्ही आवाजाने बाहेर आलो पण काही कळले नाही. आणि तिकडे यायला अलाऊड नव्हते म्हणून परत झोपी गेलो आम्ही.”

“अगं काही नाही गं. हा आपला हीरो स्वतःला जरा जास्तच शहाणा समजतो.”

“अरे पण नेमकं झालं काऽय?”

तिने उत्सुकतावश विचारले. त्यावर प्रत्यूष,

“अगं, काल कॅम्पफायर गेम्स चालू असताना मधेच आपण दोघं फिरायला गेलो ना, त्यावरून त्याने मला सुनावले. कॅम्पचा नियमभंग वगैरे वगैरे बोलायला लागला. मी म्हणलं, अरे मी काही तिला जबरदस्तीने कुठे आडोशाला नेले नव्हते. आम्ही ओळखतो एकमेकांना. आमची मैत्री आहे आधीपासूनची म्हणून गेलो पाय मोकळे करायला तर त्यात काय बिघडलं! तर लागला आवाज चढवायला. सगळ्या मुलींची जबाबदारी आहे म्हणे माझ्यावर. इथे कोणीही कुणाशी एकट्यात भेटायचे, बोलायचे नाही हे आधीच सांगितले होते तरीही तू मुद्दाम का वागलास? म्हणून हमरीतुमरीवर आला. माझं पण टाळकं फिरलं. मी म्हणालो त्याला, चल आहे माझं लफडं तिच्यासोबत तुला काय करायचंय? आमचं आम्ही पाहून घेऊ! तर त्याने हात उचलला ना राव माझ्यावर. मग थोडी बाचाबाची झाली आमची. बाकीचे मधे पडले म्हणून प्रकरण मिटलं, नाहीतर काल राडाच झाला असता तुला सांगतो. ”

“देवाऽ, अरे पण तुला असं खोटं बोलायची काय गरज होती प्रत्यूष? त्याला नाही माहित की आपण शाळेपासूनचे मित्र आहोत. आणि तो मुलींच्या काळजीपोटीच बोलत होता नाऽ.?”

“अगं पण ही काय भाषा झाली? म्हणे तिच्यापासून लांब रहायचं. हा कोण मला सांगणारा की मी कुणापासून लांब रहायचं आणि कुणापासून नाही?
माझं डोकंच सरकलं. म्हणून मग मी तसं बोललो, तर अंगावर असा धावून आला जसं काही मी त्याचीच गर्लफ्रेंड पळवलीय. च्यायला! तू असशील स्कॉलर तर तुझ्या घरी. त्याचा रोब इकडं नाही दाखवायचा आपल्यावर.”

प्रत्यूष बोलत होता आणि आत्ता तिला त्या मेसेजचा खरा अर्थ उलगडू लागला होता.

‘कदाचित तो मला लाईक तर करत नाही नाऽ! आणि मी लांब रहा सांगूनही त्याच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून प्रत्यूषबरोबर कॅम्पफायर सोडून गेले ह्याचा राग त्याने प्रत्यूषवर तर नसेल काढला?
आता तो कॉलेजमध्ये परत कधी भेटेल की नाही देव जाणे. पण मी त्याचं मन दुखावलंय. मला एकदा त्याला जाऊन भेटलं पाहिजे. त्याच्या मनात प्रत्यूषने जो गैरसमज निर्माण करून ठेवलाय तो दूर करायला पाहिजे. पण कसं?’

तिच्या मनात विचारांचे वादळ उठले होते. त्या क्षणिक सोबतीने आपले काम करायला सुरुवात केली होती. जितकी ओढ दूहीताच्या मनात ऋतूराजविषयी झाली होती नकळत तितकीच किंबहुना त्याहून जास्तच त्यालाही तिच्याबद्दल काहीतरी वाटत असावे बहुतेक. पण तोंडाने बोलला तर तो ऋतूराज कसला!
नेहमीच एक ॲटिट्यूड घेऊन वावरायच्या सवयीने मनातलं सांगायला जागाच कुठे होती. पण दूहीताने त्याला भेटायचं ठरवूनच गाडीत चढली. दोन दोनच्या सीटपैकी आपल्या सीटवर ती जाऊन बसली आणि बाजुच्या सीटवर अचानकपणे प्रत्यूष येऊन बसला. तिच्यासमोरच्या सीटवरून ऋतूराज रागाने तिच्यावर एक जळजळीत कटाक्ष टाकतोय असा तिला भास झाला.
गाडीच्या चाकांच्या गतीने तिच्याही विचार आणि आयुष्याला एक वेगळे वळण प्राप्त होत होते. हे नवे वळण तिला कुठे नेऊन सोडते? हेच बघणे बाकी होते. कधीकधी काही वाटा सुरवातीला खूप मऊ, मुलायम, एक गोड अनुभूती देऊन जाणारे भासतात पण सगळ्याच वाटा वाटतात तशाच असतील हे जरूरी नाही नाऽ.
विचारांच्या आवर्तनात कुठूनतरी अचानक सौमित्रची कविता ऐकू येऊ लागली.
कवितेचे बोल होते..

‘माझीया मना,
जरा थांब नाऽ।
पाऊली तुझ्या,
माझीया खूणा।
तुझे धावणे अन् ,
मला वेदना।’
……………………………………………………
क्रमशः -3

काय चाललंय दूहीताच्या मनात?
ऋतूराजलाही तसंच काही वाटतंय की हा दूहीताच्या मनाचा भ्रम आहे?
ती ऋतराजला भेटून त्याचा गैरसमज दूर करण्यात यशस्वी होईल?
चला बघूया पुढील भागात.


🎭 Series Post

View all