चिऊ 2

चिऊ ही तुमच्या आमच्या सारखीच शाळेत जाणारी मुलगी. बघा आवडते का..

तसे तर चिऊच्या आयुष्यात रडण्याचे खुप प्रसंग आले. रड़ुबाईच म्हणा हवं तर तिला. पण सारखं सारखं काय हो रडत रहायचं. आणि ते प्रसंग येतीलंच की पुढच्या भागांमध्ये. 
तर आज चिऊची गोष्ट रड़ुबाई नाही. चला तर मग वाचूया.
चिऊ जिकडे रहायची तिकडे घरासमोरून एक पायवाट जायची. ती पायवाट पुढे शेत आणि मग पुढे जंगलात जाऊन मिळायची. त्या पायवाटेवर थोडंच पुढे एक मोठा मैदानी परिसर होता. त्यावर खुप रानटी झाडी होती. पावसाळ्यात तर अक्षरशः तिथे रानटी गवतांचं शेत तयार व्हायचं. त्या पायवाटेच्या एका कडेला तुरळक घरं होती. 
तिथेच एका बाजूला एक जांभळाचं झाड होतं. त्या जांभळाच्या झाडाला लागूनंच त्या जागेच्या मालकाने एक तारेचं कुंपण केलेलं होतं. जांभळाच्या झाडाला खेटून अगदीच एकमेकांना गुंफून एक धामणाचं झाड होतं. आता ब-याच लोकांना धामण माहीत असेल ते फक्त सापाचा प्रकार म्हणून. पण काही जाणत्या लोकांना धामणच्या इवल्याशा फळांबाबत नक्कीच माहीत असणार. ती इवलीशी फळे. कच्ची हिरवट असतात तेव्हा आंबट लागतात. आणि पिकली की लालसर होतात. तेव्हा गोड लागतात. त्या फळात बी गरापेक्षा थोडी मोठीच असतात. रानमेवा म्हणतात त्यातलंच हे फळ. जांभळाची फळे सुद्धा कच्ची असली की हिरवट आणि थोडी कडवट असतात. पिकायला लागली की हलक्या जांभळ्या रंगाची आणि मग गडद जांभळया  रंगाची होतात. त्या दोन्ही झाडांपासून थोडं दूर काजूचं झाड होतं. हो तेच जे आपण dryfruit म्हणून खातो. काजूची फळं थोडी आंबट आणि तुरट आणि किंचीत गोड असतात. त्यात केसाळ भाग जास्त असतो. त्याच्या बुडाला फळाचं बी असतं. ते भाजून किंवा फोडून काढलं तर आतून काजू निघतो. 
तर जांभूळ आणि धामणाच्या झाडावर जायला त्याच्याभोवती असणा-या तारांचा उपयोग व्हायचा. खरं तर उपयोग म्हणण्यापेक्षा दूरुपयोग म्हणावं लागेल. कारण त्या तारा ह्या हद्द समजून संरक्षणासाठी बांधल्या होत्या. हा नियम धाब्यावर बसवून त्या परिसरातील मोठी मुलं मुली त्या दोन्ही झाडांच्या फांद्यांवर जाऊन बसायची. ती गोड रसाळ फळे खाण्यासाठी. प्रत्येकाची जागा ठरलेली असायची. आणि ही फळे उन्हाळ्यात येणारी असल्याने उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पोरांची चंगळ व्हायची.
आता तुम्ही म्हणाल यात चिऊ कुठे आहे. अहो ती तर कच्चा लिंबू होती. जर सुदैवाने जागा मिळाली तर तिला झाडांवर बसायला मिळायचे. नाहितर मोठी पोरं पोरी तिला बसू द्यायचे नाहीत. आणि सगळी चांगली पिकलेली फळे खाऊन झाली की ती पोरं खाली उतरायची. आणि चिऊचा नंबर लागायचा. त्या झाडांवर काळ्या आणि लाल रंगाच्या मुंग्या असायच्या. एखादी मुंगी चावली की जांभळाच्या पानांचा चिक लावायची पोरं. पोरंच ती. काहीही उद्योग करायची. चिऊचा हात मात्र कायम सुजलेला रहायचा. मग आई चिऊला ओरडायची. हळद लावायची. हात बरा झाला की पुन्हा तेच.
पण काहीही असो. त्या दोन्ही झाडांवर बसण्यात एक वेगळीच मजा होती. चिऊला ती झाडं खुप आवडायची. तिचं सगळं बालपण त्या झाडांनी व्यापलं होतं. काजुच्या झाडाजवळ खुप क्वचितंच जायची चिऊ. त्या झाडाचा मालक बघितलं तर ओरडायचा. मग उगीच कशाला तिकडे जायचं. पण मोह आवरत नाही ना. तसे गल्लीतली तिच्या वयाची मुलं मुली असायची तिच्या सोबतीला. कधी कधी मोर्चा काजुकडे वळायचाच. एकदा तर त्या मालकाने स्वत:हुनंच काजू दिले पोरांना. चिऊच्या इवल्याशा ओंजळीत काजूचं फळ. खुश झाली पोर.
तिकडे जवळंच पण थोडं दूर एक पाण्याचा ओहोळ होता. त्यावर एक लाकडी पुल. तासन् तास त्या पुलावर बसून पाण्यात होणा-या हालचाली बघणं म्हणजे असीम शांततेचं उत्तम उदाहरण. 
 चिऊ खुप खेळायची मैदानावर. पकडापकडी, आंधळीकोशिंबीर. अर्थात सोबत बरीच समवयस्क मुलं होतीच. चिऊला सायकलवर राऊंड मारायला तर खुपंच आवडायचे. मग उगीचंच एक हात सोडून सायकल चालव, डोळे बंद करुन चालव,दोन्ही हात सोडून, उभं राहून चालव. असे नाना प्रकार व्हायचे. काय मज्जा यायची सायकलवरुन पुढे जाताना हवेची झुळूक गालावर घ्यायला. ही सगळी उन्हाळ्याची मज्जामास्ती म्हणजे चिऊचा जीव की प्राण.
पावसाळ्यात वाढलेल्या रानटी फुलांचा रस खुपच गोड लागायचा तिला. सगळी पोरं मग चतुर आणि सुई अशा उडणा-या पाखरांना पकडायची आणि त्यांची लग्न लावायची. चिऊला तर चतुर पकडायला विशेष आवडायचे. पकडायचे आणि सोडून द्यायचे. फुलपाखरं बघत हिंडत राहणं, मध्येच पाण्याचे झरे बघणं, त्यात उगीचंच पाय टाकणं,पड्णा-या पावसाच्या धारा अंगावर घेणं. किती सांगायचं. 
एकदा असंच खुप पाऊस पडत होता. शाळेला सुट्टी होती. नाले भरुन वाहत होते. घरासमोर सगळीकडे खुप पाणी पाणी झाले होते. सगळी मुलं आपापल्या घरात. चिऊला मात्र खुप कंटाळा आला. काय करू? ती खुप आईच्या मागे लागली. “आई बाहेर जायचंय.” आता आई तर नाहीच म्हणणार ना. चिऊने थोडी कळ काढली. थोड्या वेळाने पावसाचा जोर ओसरला. पण रिमझीम धारा चालूच होत्या. आता मात्र चिऊकडून रहावलं नाही. तिने आईला सांगून बाहेर धुम ठोकली. आपल्या नेहमीच्याच मैदानाकडे. मनात तरंग उठत होते आनंदाचे. पावसाच्या धारा. ते पाणी पिऊन तृप्त होत होती ती. ओलेचिंब झालेले कपडे. आणि थंड वारा. जणू स्वर्गातंच होती ती. पाऊस असला तरी ब-यापैकी ऊन होतं. सगळं कसं लख्ख दिसत होतं. चिऊला किती आणि काय काय डोळ्यात साठवू असं झालेलं. 
ती तशीच धावत सुटली आणि अचानक जागच्या जागी थबकली. वाटेच्या एका बाजूला खुप गवत उगवलं होतं. वाटेवर पाण्याचं डबकं तयार झालेलं. वरुन पडणारे पावसाचे थेंब त्या पाण्यावर चक्री तयार करत होते. आणि तेवढ्यात एक बेडुक त्या गवतातून  बेडूक उडया मारत मारत धावत पळत आला. आणि वाटेच्या दुस-या कडेला निघून गेला. आता तुम्ही म्हणाल बेडूकंच तर होता. चिऊ बेडकाला इतकी घाबरते? अहो बेडूक असता फक्त तर परवडलं असतं हो. पण त्याच्यामागून जेव्हा साप एखाद्या रेसमध्ये धावतात तितक्या वेगात अंगाचे वळसे घेऊन त्या बेडकामागे आला तेव्हा मात्र चिऊच्या सर्वांगातून शहारा आला. चिऊ तशीच मागे फिरली आणि तिने घराकडे धूम ठोकली. 


कशी वाटली तुम्हांला चिऊ? आवडली का? आवड़ेल तिला अधूनमधून भेटायला? तिच्या आयुष्यातल्या गमतीजमती वाचायला? नक्की कळवा.

🎭 Series Post

View all