चाफा बोलेना भाग 1

परिस्थितिशी जुळवून घेत , त्यातूनहीँ ईतरांच्या जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या कविताची ही कथा आह??

भाग 1
चाफा बोलेना

पावसाची सर थांबली आणि ऊन पसरले तशी सुषमाने दीपुला दप्तर दिले आणि कुलुप लावून दोघे शाळेच्या दिशेने निघाले .दीपुला शाळेत सोडून, टाटा करून ती कामावर जाण्यासाठी निघाली. गद्रेकाकूंकडे स्वयंपाकाचे काम करायची ती.
कोपऱ्यापर्यंत पोहोचली नाही तोच चपलेने \"राम\" म्हटले! चपलेला शिवायला आता जराही जागा उरली नव्हती .दोन दिवसांनी सुरेशरावांचा-दिपुच्या बाबांचा पगार होणार तेंव्हा नवीन चप्पल घेऊ असे ठरले होते .ते प्रेस मधे कामाला होते .
सुषमा तशीच विचारात पाय ओढ़त चालताना तिच्या बाजुला हॉर्न वाजवत एक कार थांबली . गोविंदभाऊ- गद्रेसाहेबांच्या ड्रायव्हरने हाक मारली . " वहिनी बसा, साहेबांच्या घरीच चाललो आहे " .
"देव पावला !" म्हणत सुषमा गाडीत बसली .

" गोविंदा, लिस्ट मधले सगळे समान आणले ना ? बरं केलंस हिला घेऊन आलास ! " " सुषमा, आधी चहा ठेव बरं " -गद्रेकाकू.
" अहो, पाय ओढत चालल्या होत्या वहिनी घाईत . माझं लक्ष गेलं , मग हाक मारली नी घेऊन आलो " - गोविंदभाऊ.
" अगं बाई! काय झालं गं सुषमा, पाय मुरगळला की काय ?" - गद्रेकाकु .
" नाही हो काकू, शाळेच्या कोपऱ्यावर वळले नी चप्पल तूटली".
- सुषमा .
" बरं, बरं ! आधी चहा घ्या . माझी पूजा व्हायची आहे " . - गद्रेकाकु.
" तुमचे चालू दया सावकाश, मी चहा घेऊन निघतो " -गोविंदभाऊ .

गद्रेकाकु त्यांचं आटोपुन आल्या तेंव्हा सुषमा पोळ्या लाटत होती.
" अगं सुषमा , काल आम्ही साहेबांच्या ऑफिस मधल्या निशिकांतकडे भेटायला गेलो होतो ".
-गद्रेकाकु.
" तेच ना गेले काही दिवस तुमची सगळ्यांची धावपळ चालू होती त्यांच्या मिसेससाठी…. फार वाईट झाले हो ! मागे जेवयला आले होते इथे तेंव्हा पाहिले होते. किती छान कुटुंब होते! मुलेही लहानच आहेत ." - सुषमा.
"हो गं ! अचानकच झालं सगळं . पोटात दुखते म्हणून मंजूश्रीला हॉस्पिटलमधे एडमिट केले . काविळीचे निदान झाले आणि आठ दिवसांत होत्याचे नव्हते झाले ". -गद्रेकाकु.
"साहेबांनी आणि तुम्ही किती धावपळ केली ! किमयाताई त्याच हॉस्पिटलच्या कॉलेज मधे शिकते ना? " - सुषमा
"हो गं , माझी किमया तर तिथेच थांबुन हवे नको बघत होती " -गद्रेकाकु.
"काल त्यांच्याकडेच भेटायला गेलो होतो . मुले बिचारी भांबावलेली, किती लहान आहेत की त्यांना अजुन कळतही नाही काय प्रसंग आलाय ते!
किमयाने जरा बाहेर फिरवून आणले, गप्पागोष्टी करुन हसवले त्यांना . निशिकांत अगदी खचून गेलाय ! साहेबांना मोठ्या भावाप्रमाणे मानतो तो . तिथे निशिकांत आणि मंजुश्री दोघांचेही आई वडील होते . त्यांची घरे गावी आहेत आणि इथे राहून मुलांना बघण्या सारखी वयं ही नाहीत. मुलेही लहानच आहेत त्याचे पुन्हा लग्न करून दिले तर मुलेही रुळतील आणि हळू हळू तोही सावरेल . असा विचार त्यांनी मांडला. आम्हालाही ते योग्य वाटले . अशी कोणी मुलगी आहे का पहाण्यात असे विचारल्यावर माझ्या डोळ्यासमोर आपली कविताच आली बघ ! किती प्रेमळ आणि समजूतदार आहे !"
- गद्रेकाकु.
सुषमाचे हात काम करता करता थबकले. कविता तिची नणंद, गुढग्या पर्यंत लांब केस, मध्यम ऊंची, सावळा पण तजेलदार रंग, गोड किनरा आवाज, लाघवी स्वभाव, रेखीव चेहरा, मोठे भावुक डोळे.
" अग्गो बाई, काकू कवितासाठी म्हणताय ?" - सुषमा
"हो गं सुषमा, निशिकांत ही किती जीव लावतो पहिलेस ना ?आपल्या किमयाच्या बारावीच्या वेळी किती मेहनत घेतली, क्लास लावू दिला नाही, टाईम टेबल देवून तिचाअभ्यास घेतला दोघांनी, प्रिलिम नंतर घरीच घेऊन गेले होते दोघे तिला!तिचे खाणे पीणे, अभ्यास, एक्सरसाइज, सगळे करवून घेतले आणि मेफिकलला मेरिटवर एडमिशन मिळाली तिला.
सुषमा, निशिकांतचा चांगला जॉब आहे , स्वतः चा 3 बी एच के फ्लैट आहे, मनमिळावू,प्रेमळ स्वभाव आहे.
किती वय असेल तरी कविताचे आता?"
-गद्रेकाकु
" बत्तीस चालू असेल आता " -सुषमा
" तो पस्तीसचा, बघ कविताचेही चांगले होईल आणि त्याचेही घर सावरेल ." - गद्रेकाकु
" पण काकू, मी असं कसं सांगू तिला? "- सुषमा
" अगं तू आधी सुरेशरावांशी बोलून घे, तुम्हा दोघांना योग्य वाटत असेल तर कविताशी मीच बोलेन "
- गद्रेकाकु
" बरं, ठीक आहे " - सुषमा
" आणि हो, जाताना ह्या नवीन चपला घालून जा " - गद्रेकाकु
" काकू, तुम्ही पण ना !,"- सुषमा
" अगं, परवा सवाष्ण म्हणून तुला बोलणार तेंव्हा देण्यासाठी आणल्या होत्या. त्या आजच ने. डोळ्यातून पाणी नको काढू बाई आता! अगं तू माझी काळजी घेतेस की नाही , तशीच मी तुझी घेतली एव्हढेच ! " -गद्रेकाकु
दरवर्षी काकू सुषमाला सवाष्ण पूजनाला बोलावून इतर सौभाग्यवाणां सोबत काही गरजेच्या वस्तु ही भेट म्हणून देत असत .


क्रमश: