घरगुती पार्ट १

घरगुती पार्ट १


“तू अगदी घरगुती दिसत आहेस ” हि कमेंट वाचली आणि तिला अगदी धस्स झाले.
जिने हि कमेंट पाठवली ते नाव वाचून तर मनात अजूनच जास्त दुःख झाले. ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून तिचीच खास समजली जाणारी तिची जुनी रूम पार्टनर होती.
ती, काहीच महिन्या आधी बाळंतपणामुळे जॉब सोडून घरी बसलेली. घरी कोणी नसल्याने , बाळाला कोण बघणार म्हणून ७ वर्षाच्या करीयर वर पाणी टाकून बाळाचे सर्व करत बसलेली, मनातून खच्चीकरण झाल्याने, आपल्या घरालाच पूर्ण वेळ देऊन नंदनवन करण्याचा प्रयत्न करणारी, जमत नसलं तरी रोज नवनवीन गोष्टी करून नवऱ्याचे मन जिंकू पाहणारी, हजारदा प्रयत्न करूनही घरगुती न होता येणारी अशी आमची सुमन. मनातून कितीही चांगली असली तरी घरकामात मात्र पूर्णपणे फ़ेल . साधा पोळी भाजीचा स्वयंपाक करताना हि तिच्या नाकीनऊ येत. त्यात बाळाला सांभाळून दिवसभर घरकाम करणे जाड जाई. पण मी हे करू शकते हा आत्मविश्वास ठेऊन जिद्दीने सगळ्यांना सामोरी जाणारी. कधी कधी जुने आयुष्य आठवले कि मन खट्टू होई . प्रत्येक क्षेत्रात अव्वल राहिलेली सुमन घरकामात मात्र नेहमीच मागे राहिली. करिअर मध्ये नवनवीन उच्चांक गाठत असतानाच एक दिवस तिला गर्भवती असल्याचे कळाले आणि नेहमीप्रमाणे हि जबाबदारी सुद्धा आपण पार पडू शकतो हा आत्मविश्वास तिला नाडला. बाळासाठी ७ वर्ष केलेल्या मेहनतीवर पाणी फिरवावे लागले . राखेतून उठणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे तिने पुन्हा जिद्दीने घरातली कामे करून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला पण बाळाकडे बघायला कुणीच नसल्याने, तिची अवस्था इकडे आड तिकडे विहीर सारखी झाली.
गेले ६ महिने घरात राहून घर सांभाळणे सुद्धा किती मोठे काम आहे याची तिला कल्पना आली होती.प्रत्येक काम करताना तिला ते किती अवघड आहे आणि बाकीच्या बायका ते कस करत असतील हा विचार करून तिला नवल वाटे. त्यामुळे घरगुती बाई तर ती नक्कीच नव्हती एवढा स्वतःबद्दल तिला आता अंदाज आला होता.
पण का कोण जाणे त्या एका कमेंट ने तिचे मन खूप दुखावले. दिवसभर तोंड पाडून ती आपली कामे करत राहिली. आज तर आकाशात पण काळे मेघ दाटून आले होते अगदी सुमनच्या मनाप्रमाणे. कधीही ढगफुटी होऊन पाऊस पडनार होता पण सुमनने खूप सांभाळले होते स्वतःला.
रात्री अजित आल्यानंतर, बडबड करणारी सुमन आज चिडीचूप होती. जेवताना मुलाला ओरडणारी, अजित ला उठून उठून जबरदस्ती जेऊ घालणारी सुमन आज स्वतः पण अर्धी चपाती च खाऊन उठली तसे अजित ला काहीतरी काळबेरं आहे असं वाटले.

सलोनी पठाण


🎭 Series Post

View all