गुरुपौर्णिमा साजरी झाली..

सासू जेंव्हा आई बनते आणि गुरुपौर्णिमा साजरी होते.
"कधी एकदा सोहमचे दोनाचे चार हात करेन असे झालेय मला." मालतीताई चहाचा कप उचलत म्हणाल्या.


"चहा केला तर इतकी दमलीस मालती तू? की तुला मदतीला सून हवीय. खरच आता वयोवृद्ध झालीस म्हणायचे तू." हसून केशवराव म्हणाले.


"तसे नाही हो. म्हणजे बघा ना, आता सोहमचेही शिक्षण पूर्ण झालेय. तो जॉबही शोधतोय आणि माझ्या गुणी लेकाला चांगला जॉब मिळेल अशी माझी पूर्ण खात्री आहे. सून घरात आल्यावर मला एक चांगली मैत्रीण तर भेटेलच पण जेंव्हा ती माझी मुलगी बनून मला "आई" अशी हाक मारेल ना तेव्हा माझी तीस वर्षांपासूनची इच्छा पूर्ण होईल." मालती आनंदाच्या भरात केशवरावाना आपल्या मनीचे गुज ऐकवत होत्या.


रोजच मॉर्निंग वॉकला गेल्यावर सहकारी मित्राचे सासूसुनाच्या भांडणाचे किस्से ऐकून केशवरावाचे कान किट्ट झाले होते.पण आता आपल्या आनंदात असणाऱ्या बायकोला ते सांगून आधीच नकारात्मक विचारांची पेरणी करायला नको म्हणून केशवराव स्मितहास्य करून गप्प बसले.


प्राध्यापक म्हणून रिटायर झालेले हे देसाई जोडपे अगदी आनंदात राहत होते. एकुलत्या एक सोहमची काळजी घेत होते. बारीक सारीक गोष्टीतही सोहमला शिस्त शिकवत होते. मुलं कितीही मोठी झाली ना तरी ती आई वडिलांसाठी लहानच असतात हेच खरं. सोहमलाही आई बाबा जे सांगतात त्याचे अनुकरण करायची सवय होती. त्यामुळे तोही आई-बाबांची प्रत्येक गोष्ट मनापासून ऐकत होता. 

थोड्याच दिवसात सोहमसाठी एका मुलीचे स्थळ आले. थाटामाटात लग्न पार पाडले. मुलगी अगदी देखणी होती पण स्वभाव थोडासा अहंकारी होता.प्रत्येक गोष्टीत सासूसासऱ्यानी दिलेल्या सूचना तिला खटकत होत्या. आईच्या मायेने वागवणारी सासू त्याच मायेने चुकेल तिथे समजावून सांगत असेल तर त्यात नक्कीच मुलाचे आणि सुनेचे हित दडलेले असते हे सुनेला समजणे सुनेच्या एकंदरीत वागण्यावरून अशक्यच वाटत होते. 


गोष्टी छोट्याच होत्या जसे की, जास्त अन्न शिजवून उरलेले फेकून द्यायचे.पण अन्नाची किंमत मालतीताई जाणत होत्या. शेतकरी वडीलांनी शेतात धान्य पेरणी केल्यापासून ते बाजारात विकायला नेई पर्यंत गाळलेल्या घामाचे मोल त्या जाणत होत्या. कितीदाही समजावले तरी सुनेच्या पचनी पडेना तेव्हा सासूबाईंनी सुनेचे मन न दुखावता आपली नेहमीची युक्ती योजली. उरलेल्या पोळ्यांचा रुचकर उपमा बनवून सर्वांच्या ताटात घ्यायचा ठरवला आणि तसे केलेही.

पण ते म्हणतात ना, कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ पडते तसच शर्वरीच्या म्हणजे त्यांच्या सुनेच्या बाबतीत घडले. तिने सकाळी सासूबाईंनी बनवलेला कालच्या पोळ्यांचा उपमा खाल्ला आणि तिला दुसऱ्या दिवशी फुड पॉइजनिग झाले. तेंव्हा सोहम आईवर थोडासा चिडला. बायकोच्या म्हणण्याप्रमाणे त्यालाही वाटले, शिळे अन्न खाल्ले म्हणून फुड पॉइजनिग झाले. सकाळी सोहम बायकोला घेऊन हॉस्पीटलमध्ये गेला. 

"सोहम लहान होता तेंव्हापासून आपण सगळेच शिल्लक पोळ्यांचा उपमा बनवून खातोय. तो खाल्ल्यावर कधीच आपल्यापैकी कोणाला फुड पॉइजनिग झाले नाही." आईच्या डोळ्यात पाणी तरळले.

आज सोहम उलट बोलला म्हणून आईबाबांना खूप वाईट वाटले होते. 

पण बाबा प्रसंगावधान दाखवत आईला म्हणाले," हो खरेय तुझे, पण तिला नसेल सहन होत तर कशाला करतेस तू तर एवढा अट्टहास? यापुढे तिने गरम करून अन्न खावे याचा तू अजिबात हट्ट करू नको." आईने होकारार्थी मान हलवली. 


हॉस्पीटलमध्ये गेल्यावर शर्वरीला डॉक्टरांनी अशक्तपणा आलाय म्हणून सलाईन लावायचे ठरवले. शर्वरीला ज्या बेडवर ऍडमिट केले होते तिथेच शेजारच्या बेडवर सोहमला शर्वरीच्या ऑफीसमध्ये काम करणारी आसावरी दिसली. तिलाही फुड पॉइजनिग झाले होते.

आसावरी शर्वरीला म्हणाली, "काल आपण त्या गाड्यावरची पाणीपुरी खाल्ली ना, त्याचाच हा परिणाम आहे बघ." 

शर्वरी काहीच बोलली नाही. सोहमलाही फुड पॉइजनिगचे खरे कारण समजले. शर्वरीची पहिली चूक म्हणून सोहमने पाणीपुरीची गोष्ट आईबाबांना न सांगण्याचे कबूल केले. पण त्याबदल्यात शर्वरीने अन्न वाया घालवायचे नाही आणि आईबाबांचे ऐकायचे हे कबूल करून घेतले. शर्वरीनेही सोहमचे सर्व म्हणणे मान्य आहे म्हणून होकारार्थी मान हलवली. 

घरी आल्यावर सोहमने आईबाबांची माफी मागितली.

"अरे नाही उलट माझेच चुकले. शर्वरी मी विसरलेच होते प्रत्येकाची प्रकृती सारखी नसते ना. तू यापुढे शिळा उपमा नकोस खात जाऊस. आम्ही खाऊ." सासूबाई प्रेमाने म्हणाल्या.

"नाही आई, तुम्ही खूप चांगल्या आहात. मीच माफी मागते तुमची.मला माफ करा.मला तुम्ही बनवलेल्या उपम्याने नाही तर बाहेर खाल्लेल्या पाणीपुरीने फुड पॉइजनिग झाले होते." शर्वरी खरे बोलली म्हणून सोहमच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.

मालतीताईनी आपल्या सुनेला प्रेमाने जवळ घेतले.

सोहमने एकांतात शर्वरीला विचारले,"आईला खरे नव्हते सांगायचे ना, मग कसे सांगितलेस?"

"असे मी तुला काहीच बोलले नव्हते." शर्वरी सोहमला म्हणाली.

"म्हणजे?" सोहम म्हणाला.

"तुला माहितीय ? मी काल आईंची डायरी वाचली. त्यात त्यांनी त्यांच्या वडीलांचे कष्ट आणि एकंदर त्यांच्या घरच्या परिस्थितीचे वर्णन केले होते.तेव्हा मला समजले की,  आईंना अन्नाची इतकी किंमत का आहे ते? सकाळी मला रात्रभर झालेल्या उलटी आणि जुलाबामुळे पूर्णतः गळून गेल्यासारखे झाले होते. मी नीट तुला काहीच सांगू शकत नव्हते. म्हणून तुझ्याशी काहीच बोलले नाही. सर्वकाही तू एकटाच बोलत होतास." शर्वरी सोहमला म्हणाली.

"थॅंक्स माझ्या आईबाबांना समजून घेतल्याबद्दल.जास्त काही अपेक्षा नाहीत गं त्यांच्या तुझ्याकडून. त्याच तू पूर्ण कराव्यास असं मला मनापासून वाटतं." सोहम शर्वरीला जवळ घेत म्हणाला.

" हो.ते माझेही आईबाबाच आहेत. यापुढे मी माझ्याकडून कोणतीही चूक होऊ देणार नाही. ऐक ना सोहम, उद्या गुरुपौर्णिमा आहे. काय द्यायचे रे गिफ्ट त्यांना?" शर्वरी उत्साहाने म्हणाली.

"त्यांना गिफ्टचा अजिबात शौक नाही. तू फक्त अन्नाची हेळसांड करू नकोस. हेच मोठं गिफ्ट असेल आईबाबांसाठी." सोहम शर्वरीला म्हणाला.

"ये काय रे तू पण?" म्हणून शर्वरी सोहमला बिलगली.

दुसऱ्या दिवशी शर्वरीने लवकर उठून सर्वांच्या आवडीचा अगदी सासूबाईंच्या योग्य प्रमाणात नाश्ता बनवला आणि आईबाबांना खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.


आईवडील हेच मुलांचे पहिले गुरु असतात. आयुष्यभर मुलांच्या हिताचे निर्णय ते घेत असतात. मग त्यांचे मन राखण्यासाठी मुलांनी स्वतः मध्ये चांगला बदल केला तर खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमा साजरी होईल असे मला वाटते.

कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.


सौ.प्राजक्ता पाटील