कुबडी

विचारांची कुबडी मोडायला लावणारा खणखणीत अलक


ती वयात आली होती.. कुठून कुठून आता तिच्या लग्नाबद्दल चर्चा व्हायला लागली होती.. दिसायला चारचौघींसारखी पण जरा अबोल होती.. लग्नाच्या त्या बोलण्याने तिच्या मनात वादळ उठावं तसं झालं आणि त्यादिवशी त्याचा विस्फोट झाला, जेव्हा घर वाचवण्यासाठी तिच्यासमोर लग्न हा पर्याय ठेवला..

" आज ही परिस्थिती, उद्या काही दुसरंच.. माणूस आहे मीपण एक.. खेळणं नाही.. आता तुम्ही ज्या माणसाशी माझं लग्न लावताय तो मला पत्नी म्हणून स्थान देईलही पण एक स्त्री म्हणून मान देईल का??? " नाही देणार.. " कारण आजजरी तो आपलं घर वाचवायला माझ्याशी लग्न करत असला तरी कधी ना कधी मी लग्न करून तुझ्यावर उपकार केले, ही भाषा तो वापरणारच.. तेव्हा तुम्ही काय म्हणाल, लग्न केलंय तर तोंड बंद ठेवावं लागेल, हेच ना.. नकोय मला असलं जगणं जे उपकारांच्या ओझ्याखाली दबून मरणं आहे.. "


" घर वाचवायचंय ना.. मग त्यासाठी इतर उपायही आहेत.. गावाकडची जमीन विकून भाड्याच्या घराची सोय होऊ शकते आणि या घरावरचं कर्ज मी स्वतःच्या हिंमतीवर फेडेन.. त्यासाठी मला लग्नाची कुबडी नकोय.. "