काहीतरी वेगळं करायचंय!!

This story is for parents regarding career choice of their children. Nowadays many new fields have opened up. Rather than running behind medical and engineering, they may help child to choose some equal exciting field as their career.

सादर कथा काल्पनिक असून एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी सबंध आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा...

                               --------
  
'हॅलो सिया? टीव्ही.. टीव्ही वरची बातमी पाहिलीस?'- सुलक्षणाबाई लेकीला फोनवर विचारत होत्या..

'कसली बातमी आई? इकडे घरकाम आणि वर्क फ्रॉम होम मधून फुरसत भेटेल तर बाकी काही करायला मिळेल ना ग? जीव अगदी मेटाकुटीला आलाय माझा.. एवढं मरमर करून ना घरच्यांना काही कौतुक की बॉसला कसलं सोयरसुतक...तूच सांग ना काय ती बातमी..'- सियाच्या बोलण्यातून तिचा वैताग स्पष्ट होत होता..

'अग सिमरन... आपल्या समोर राहायची ना?'- सुलक्षणाबाईनां शब्द फुटत नव्हते..

'तिच काय आता परत? आई, बघ आता जास्त रंगवत नको बसवूस.. सांग काय ते लवकर..'- सिया आता पलिकडून चिडली होती..

'अग, तिला म्हणे राज्याकडून विशेष पुरस्कार मिळणार आहे.. या कोव्हीड काळात तिने केलेल्या लोकांच्या सेवेसाठी तिच विशेष कौतुक केलं जाणार आहे..'- सुलक्षणाबाईनी एका दमात सांगून टाकलं..

'आई.. ठीक आहे ग.. ती हुशारच होती.. फक्त चाळीत आपल्या कोणाला तीची हुशारी कळली नव्हती.. कळली ती फक्त तिच्या  आई-बाबांना.. त्यांनी तिला हवा तो पाठिंबा दिला आणि त्याचीच परिणीती आज तिच्या यशात आहे.. आई-बाबांनी मुलांवर आपल्या इच्छा न थोपवता; त्यांना करिअर निवडीत हवी ती मोकळीक दिली की असलं चांगलं ऐकायला मिळणारच.. सोड जाऊ दे..आता तू ठेव फोन.. मी संध्याकाळी फोन करेन तुला..आता खूप काम अडली आहेत..'- सियाने फोन ठेवला आणि नकळतपणे सुलक्षणा बाई भूतकाळात शिरल्या..

राहून राहून त्यांच्या मनात सियाच वाक्य रुंजी घालत होते-' आई-बाबांनी आपल्या इच्छा मुलांवर न थोपवता; करीअर निवडीत त्यांना मोकळीक दिली म्हणजे असलं चांगलं ऐकायला मिळणारच..'

'मग? मग आम्ही सियावर आमच्या इच्छा थोपवल्या? तिला काय ते ऍनिमेशन करायचं होतं पण आम्ही कुठे करून दिले तिला? तिला इंजिनिअरिंग करायला लावली..'- सुलक्षणाबाई विचारांत हरवून गेल्या..

सिया आणि सिमरन एकाच चाळीत राहणाऱ्या.. एकाच शाळेत, एकाच वर्गात; त्यामुळे एकमेकांच्या छान मैत्रिणी.. दोघींमध्ये एकच मोठा फरक म्हणजे सिया अभ्यासात प्रचंड हुशार तर सिमरन एक सर्वसाधारण हुशारीची..

नेमकं हेच सार सियाच्या घरी खटकायचं.. दोघींच्या मैत्रीला त्यामुळेच सियाच्या घरून कायम प्रखर विरोध होता.. सुलक्षणाबाई तर कित्येक वेळा सिमरनच्या घरच्यांना सूनवत असत.. सिया पासून सिमरन लांब राहावी म्हणून हरप्रकारे त्यांचे प्रयत्न चालूच असत.. निरागस वयापर्यंत सिया आणि सिमरन छान मैत्रिणी होत्या पण हळूहळू सियाला तिच्या घरच्यांचं पटू लागलं आणि ती सिमरन पासून लांब राहू लागली होती.. सिमरनला झाल्या प्रकारचं वाईट वाटू लागल होतं..

'बाबा? मला अभ्यासात गती चांगली नाही, यात माझा काय दोष? अभ्यास नाही आला म्हणजे मी आयुष्यात काहीच करू शकणार नाही का? '- सिमरनच्या डोळ्यांत पाणी होतं..

'अहो रडुबाई.. जग कुठे चाललं आहे आणि तु काय रडत बसली आहेस?? कोण म्हणतं अभ्यास म्हणजे सर्वस्व?? तुझ्या कमी मार्क्सनां पाहून आम्ही तुला कधी ओरडलो का? तुझं प्रगतीपुस्तक हातात धरून कधी तुझी कानउघडणी केली का? नाही ना? कारण त्याला कारण आहे बेटा... शिक्षण आवश्यकच आहे.. पण या अभ्यासक्रमाने तुझ्या आयुष्याची दिशा न ठरावी.. तु तुझं क्षेत्र तु स्वतः निवड... पण जे काही निवडशील ते विचारपूर्वक निवड.. त्या गोष्टीत तुझं मन रमावं, तुला तिथे काम करताना मजा यावी.. जे काही निवडशील त्यात तुला स्वतःला झोकून देता यावं..बघ कर तुझा तु विचार.. आम्ही आहोत आमच्या लेकीच्या सोबत..'- बाबांनी धीर दिला तस सिमरनला हायस वाटलं..

नेमकं आठवड्यातच शाळेने विद्यार्थ्यांसाठी 'करीअर मार्गदर्शन शिबीर'; आयोजित केले होते.. सिमरनने शांतपणे स्वतःला हवे ते बारकावे टिपून घेतले होते.. आपल्याला न समजलेल्या शंका तिने तिथल्या उपस्थित तज्ज्ञांना विचारून घेतल्या होत्या.. 

'पप्पा- मम्मा, मी ऍनिमेशन करणार'- घरी येता येताच सियाने आपला निर्णय घरात सांगितला तस घरात एकच वादळ उठले..

'काय डोक्यावर पडलीस का ग?? बाहेर कोण कुत्रं तरी विचारत का त्या ऍनिमेशनला? बाहेर विचार जगाला नाव तरी कधी ऐकलं का असलं? आणि आपलं ठरलं आहे.. आम्हांला तुला इंजिनिअरिंग झालेलं पाहायचं आहे.. दादा बघ, आता मास्टर्स करतोय.. पुढच्या वर्षी बघ कशा त्याला कंपन्यांकडून त्याला ऑफर वर ऑफर्स येतील त्या..'- बाबांनी वरच्या पट्टीत सियाचा विचार खोडला तशी ती हिरमुसली..

'अहो, हिच्या डोक्यात असले अभद्र विचार यायचेच ना.. ती आपली शेजारची सिमरन म्हणे आचाऱ्याचा कोर्स करणार आहे.. काय म्हणे तर शेफ..जळलं मेल लक्षण ते.. लग्नानंतर तेच तर करायचं आहे..'- सुलक्षणाबाई मुद्दाम मोठयाने बोलत होत्या..

हळूहळू चाळीत दबक्या आवाजात कुजबुज सुरू झाली होती.. सिमरन आणि तिच्या घरच्यांच्या निर्णयांवर लोक मागून तर कधी उघड टिका करत होते.. मात्र सिमरन आणि तिच्या घरच्यांचा निर्णय पक्का होता.. 

कालांतराने सिमरन आणि सिया आपापल्या क्षेत्रांत सेट झाल्या होत्या.. सिमरनचं करीअर तिच स्वतःच निवडलेलं असल्यामुळे ती मन लावून काम करत होती.. स्वतःहून एकेक नवीन गोष्ट आत्मसात करत; आपल्या ज्ञानात भर घालत होती.. तिच्या करिअरच्या उंचीचा आलेख हळूहळू उंचावत चालला होता.. एकेकाळी तिला नाव ठेवणारी लोक आता तिच उघड कौतुक करू लागली होती..


इथे सियाच्या मनात अजूनही इंजिनिअरिंग आणि ऍनिमेशनमधील द्वंद्व संपलं नव्हतं.. परिणामी ती कशीबशी आपली नोकरी सांभाळून होती.. एक सर्वसाधारण नोकरदारांने आपली ढोबळ ड्युटी करावी असंच काहीसं वेळापत्रक तिच बनलं होतं..

सिमरनच नाव आता चांगलं गाजू लागलं होतं.. तिच्या कौशल्यामुळे तिला अनेक नामांकित हॉटेल्सच्या ऑफर्स समोरून आल्या होत्या.. ती एक नावाजलेली शेफ बनली होती.. आपल्यासारख्याच समविचारी समिरशी विवाहबद्ध होत; तिने आपलं वैवाहिक जीवन सुरू केलं होतं.. लग्नानंतर दोघांनीही मिळून स्वतःच रेस्टॉरंट उभं केलं होतं.. दोघांच्या मेहनतीने तेही अल्पावधीतच नावारूपाला आलं होतं.. कधी काळी तिला नाव ठेवणारी लोक आता सिमरनच उदाहरण आपल्या मुलांना देऊ लागली होती..

इथे सियाच स्वतःच असं काही कर्तृत्व नव्हतंच त्यामुळे तिच्या घरच्यांनी तिच लग्न इंजिनिअरिंग मुलाशी लावून दिलं होतं.. सिया सासरी गेली तरी तिच्या मनातली आपल्या मम्मा-पप्पांच्याबद्दलची अढी कधी पूर्णपणे गेली नव्हती.. सिमरनच्या घरच्यांसारखं आपल्या घरच्यांनी आपल्याला पाठिंबा दिला असता तर कदाचित आज आपलंही नाव नक्कीच असतं.. कित्येकदा तिने हे त्यांना बोलूनही दाखवलं होतं..

साऱ्या गोष्टीं सुलक्षणाबाईच्या डोळ्यासमोरून गेल्या आणि त्यांचे डोळे पाणावले.. त्यांनी पदराने डोळे फुसले..

सिमरनला पुरस्कार भेटला आणि दुसऱ्या दिवशीच साऱ्या चाळकऱ्यांनी तिचा ऑनलाईन सत्कार आयोजित केला होता.. साऱ्यांनी तिच भरभरून कौतुक केलं.. शेवटी सुलक्षणाबाईनी माईक हाती घेतला तसे सर्व चमकले.. सर्वांना त्यांच्या बोलण्याची उत्सुकता लागली होती.. पलिकडून सियाही चकीत झाली होती..

'चुकलो आम्ही सिमरनचे आई-बाबा.. शंभर टक्के चुकलो..  तुमच्या मुलीच्या अभ्यासातील गतीवरून तिच्या आयुष्याची दिशा ठरवून बसलो.. पाठ्यपुस्तकी शिक्षण आपल्या ज्ञानासाठी असलं तरी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी त्यात पारंगत असण्याची गरज नाही.. आम्ही कायम सिमरनच्या आवडीला नाव ठेवली, तिच्या करीअर निवडीला हसलो पण आज बघा ना; आज ती ताठ मानेने या सत्कार सोहळ्यात बसली आहे, या सोहळ्याची सत्कारमूर्ती आहे ती.. आणि आमची सिया कुठे हरवून गेली; आम्हालाच माहीत नाही.. काश आम्हीही तुमच्यासारखं तिच्या आवडीला पाठिंबा दिला असता.. जास्तीतजास्त काय झालं असतं? थोडी अडखळली असती पण आई-बाप म्हणून आम्ही सावरून घेतलं असत तर बिघडलं नसतं.. कमीतकमी आपली आवड जगल्याच समाधान तरी तिला आयुष्यभर लाभलं असतं.. पण आम्ही तिला तेही लाभू दिलं नाही ओ.. म्हणूनच आज या समारंभात मी सिमरन आणि तिच्या कुटुंबियांची, माझ्या सियाची माफी मागते.. अगदी हात जोडून माफी मागते.. आणि साऱ्यांना नम्र विनंती करते की जर तुमची मुल पठडीतल्या वाटा सोडून नव्या वाटा निवडत असतील तर त्यांना खुशाल निवडू द्यात.. थोडासा पाठिंबा द्या.. थोडे धडपडले तर सावरून घ्या पण आपल्या इच्छा त्यांच्यावर थोपवू नका.. एक उदाहरण समोर आहे.. सिमरन चे आई-बाबा बनावे की सियाचे आई-बाबा, निवड तुमची..'- सुलक्षणाबाईना पुढे बोलता येईना तशा शांत बसल्या..

'व्वा काकी व्वा.. देर आये पर दुरुस्त आये.. तुमच्या मोकळेपणाला सलाम..'- सिमरनने आपल्या जागेवरून उभं राहत टाळ्या सुरू केल्या तसा सर्वांनी टाळ्या वाजवत सुलक्षणाबाईच्या स्वतःची चूक कबूल करण्याच्या कृतीला दाद दिली होती..

'काकी, आज तुम्हांला पश्चाताप झाला.. अंमळ उशीर झाला बट ठीक आहे.. आशा आहे की सिया आपल्या मुलांसोबत असं करणार नाही.. आणि सियाच काय, इथे उपस्थित साऱ्यांना माझं नम्र आवाहन आहे की मुलांना जगू द्या.. तुमचे अनुभव त्यांच्याशी शेअर करा.. तुमच्या समोर आलेले खाचखळगे त्यांच्यासमोर मांडा पण ते टाळण्यासाठी तुम्ही निवडलेल्या वाटा त्यांच्यावर थोपवू नका.. त्यांना त्यांच्या वाटा निवडू द्यात.. वाट चुकले तर तुमच्यापरीने सावरा पण त्यांना नाव ठेवून त्यांचा आत्मविश्वास डळमळीत करू नका तर त्यांना प्रोत्साहन द्या.. बघा एक ना एक दिवस त्यांना हवी असलेली वाट ; त्यांना नक्की गवसेल.. यशाचे क्षितिज त्यांच्या समोर असेल आणि तुम्हांला त्यांचा अभिमान वाटत असेल..माझ्या आई-बाबांनी सुद्धा जगाच्या बोलण्याची चिंता करत माझ्या आवडीला रोखलं असते तर कदाचित मी ही अशी तुमचं कौतुक स्वीकारत बसली नसती.. त्यांनी मला समजून घेतलं, त्यांनी मला फुलू दिलं, माझं करीअर बहरले ते त्यांच्या पाठिंब्यावरच.. म्हणूनच मी  आयुष्यभर त्यांचीं ऋणी राहीन..'- सिमरनने सर्वांचें आभार मानले..

कित्येक वेळ साऱ्या ऑनलाइन समारंभात टाळ्यांचा कडकडाट चालूच होता..

समाप्त..


© मयुरेश तांबे..