कामाची विभागणी

It's about house work responsibility should be taken by both husband and wife.

कामाची विभागणी 

नंदिनी आज खूप नाराज होती. काहितरी बिनसलं होतं तिचं. सारखी चिडचिड. धुसफुस चालू होती. राघव ऑफिसला निघून गेला तेव्हा तर त्याचं तिच्याकडे लक्षही नव्हतं. आदल्या दिवशी रविवार होता. त्यामुळे आजपासून पुन्हा नेहमीचं रूटीन चालू झालं होतं.

नंदिनी तशी कर्तव्यदक्ष गृहीणी होती. आधी ती नोकरी करायची. परंतु कोविड मुळे तिला तिची नोकरी गमवावी लागली होती. दुसरी शोधण्याचा तिचा प्रयत्न चालू होता. राघव या बाबतीत तिला कधीही विरोध करत नव्हता.

दोघांचा तसा राजाराणीचा संसार. मग अगदीच काय झालं होतं बरं? नंदिनीने सगळी कामं आवरली आणि एक कप दुध हळद घेऊन बाल्कनी मध्ये जाऊन खुर्चीत बसली. चहा तिला आवडायचाच नाही. एक एक घोट घेत ती कालचा प्रसंग आठवू लागली.

रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. राघव IT कंपनीत असल्याने त्याला शनिवारीदेखील सुट्टी असायची. शनिवारी त्याच्या दिवसभर झोपा काढून झाल्या होत्या. मित्रांसोबत गप्पा झाल्या होत्या. नंदिनीने त्याच्या सगळया खाण्याच्या फर्माईशी पूर्ण केल्या होत्या. त्यामुळे रविवार काही वेगळा नसणार हे गृहितंच धरलं होतं राघवने.

झोप आधीच पूर्ण झाल्यामुळे राघवला सकाळी लवकर जाग आली. नंदिनीला झोपलेली बघून तो फ्रेश व्हायला गेला. आल्यावर बघतो तर ती उठली होती. अचानक नंदिनी म्हणाली, “ए राघव चहा ठेव ना माझ्यासाठी. आज घ्यावा वाटतोय.”

“तुझा तू ठेवून घे गं. आणि माझ्यासाठीपण ठेव.”

“पण ठेवला तू तर काय बिघडणार आहे?”

“ते माझं काम नाही. प्यायचा असेल तर बनवून पी. आणि आज बटाटेवडे कर.”

“मग काय फक्त बायकांचंच काम आहे का? तूच तुझे बटाटेवडे करुन घे ना मग..”

“ए बाई वाद नको घालूस. मी हे काम करायचं तर पैसे कमवायला कोणी येणार आहे का?”

“असं कोणतं मोठं काम सांगितलं रे मी. फक्त चहाच बनवायला सांगितला ना. आणि अशी कोणती कामं करतोस तू घरातली? सगळं तर देतेच ना तुला हातात. कामावरुन थकून येतोस तर मलाही कळतं की आरामाची गरज आहे ते. पण झालाय की काल आराम. मग सुट्टीच्या दिवशी केली घरातली दोन चार कामं तर बिघडलं कुठे?”

“मला नाही आवडत सांगितलं ना एकदा.” एवढं बोलून राघव मोबाइल मध्ये बोटं खुपसू लागला.

नंदिनीचा अगदी जळफळाट झाला. पण सांगणार कोणाला. उगीच वाद नको म्हणून तिने पुढे काही म्हटले नाही. मात्र मनातून हा विचार काही गेला नाही.

दुधाचा शेवटचा घोट घेतला आणि मनाशी तिने काहितरी ठरवले. दिवस सरला आणि राघव घरी यायची वेळ झाली. आल्या आल्या भूक लागली म्हणून आरडा ओरडा सुरु झाला.

नंदिनी निवांत मोबाईल मध्ये गाणी ऐकत बसली होती.

“तुला ऐकू येत नाहीये का? वाढ पटकन. खुप भूक लागलेय मला.”

“अरे तुला सांगायचीच विसरली बघ. मी मैत्रिणीबरोबर बाहेरच जेवून आलेय. आणि माझं पोट भरलंय. त्यामुळे तुझं तू बघून घे.” एवढं बोलून ती बेडरूममध्ये जाऊन झोपली सुध्दा.

राघवला हे अनपेक्षित होतं. त्याने खुप चिडचिड केली. स्वयंपाकघरात जाऊन डबे आणि फ्रिज धुंडाळले. नेमकं त्यात त्याला एक पारले बिस्किटांचा पुडा सापडला. बिस्किटं खाऊन आणि पाणी पिऊन तो तसाच तडफडत झोपी गेला.

‘उद्या उठू दे हिला. डबा घेऊनच नाही जाणार मी. मग कळेल हिला.’ रागाच्या भरात राघवच्या मनात उगीचंच काहीबाही विचार येत होते.

दुस-या दिवशी नेहमीप्रमाणे तयार होऊन राघव नाश्त्याची वाट बघत बसला होता. तेवढ्यात नंदिनी तयार होऊन बाहेर जायला लागली.

“कुठे चाललीस?”

“अरे योगा क्लास लावलाय मी आजपासून. लेट झालंय. चल बाय.”

“आणि माझा नाश्ता…”,राघवचे शब्द ओठातंच अडकले. नाश्ता आणि डबा न घेता तो ऑफीसला गेला.

असं जवळजवळ आठवडाभर झालं. शेवटी एके दिवशी कंटाळून राघवने नंदिनीशी बोलायचं ठरवलं. राघव तसा समंजस होता. घरातली भांडणं आईवडलांकडे नेऊ नयेत एवढं साधं गणित त्याला येत होतं.

शनिवार असल्याने राघव घरीच होता. नंदिनी स्वत:साठी दुध हळद पीत बाल्कनीमध्ये बसली होती.

“का अशी वागतेय? मला बाहेरचं खाणं झेपत नाही हे माहीत आहे ना तुला?”

“तुला खरंच कारण माहीत नाही का राघव?”

राघवने जरा आठवून म्हटलं, “ अगं एक चहाच तर होता. नाही म्हंटलं तर एवढं बिघडलं कुठे?”

“फक्त चहाचा प्रश्न नाहीये राघव. मी काही तुला खाण्यासाठी बनवून मागितलं तर तुझ्या नाही म्हणण्याचा प्रश्न आहे. तेही इतक्या बेफिकिरीपणे. घरातली काम करताना ती मी एकटीनेच करावी हा जो तुझा ठेका असतो ना त्याचा प्रश्न आहे.”

“मग आपण कामाला बाई लावायची का?”

“आपण काय इतके श्रीमंत नाही लागून चाललो आणि आपण अजुनही भाड्याच्या घरात राहतो हे नको विसरु. असं तर नाहीये ना की तुला काही बनवताच येत नाही.  राघव तुला सगळा स्वयंपाक करता येतो. मी फक्त चहाच मागितला होता. इतकी छोटी गोष्ट त्यालाही नाही म्हणाला. का? तर तुला आवडत नाही. तुला माहीत आहे का की मलाही नाही आवडत स्वयंपाक करायला. कोणी आयतं दिलं तर माझ्याही पोटात दोन घास जास्त जातात. तू करतोस का या सगळयाचा विचार?”

राघवला आता थोडं थोडं जाणवू लागलं की तिला काय म्हणायचंय. तो ऐकत राहीला की ती काय म्हणतेय.

“माझी नोकरी असो की नसो, पण घरात मीच काम करायचं हा अट्टहास सोडून दे राघव. तू सुट्टीच्या दिवशी आराम करणार, तुला सगळं चमचमीत खायला हवं, वस्तू जागच्या जागी हव्या. परंतु त्यासाठी कोणीतरी मागे राबतंय हे दिसतं का तुला? अरे मीही नोकरी केलेय. मला माहीत आहे बाहेरचा ताण असतो, थकवा असतो. पण सुट्टीच्या दिवशी घरातल्या कामाला हातभार लावला तर बिघडलं कुठे?”

“मला असं यापुढे चालणार नाही. माझीही स्पेस आहे. एरवी तुझी बारीकसारीक गोष्ट, वेळेवर खाणंपिणं, आवडनिवड या सगळयाची काळजी मी घेतेच ना. कधी केलेय का टाळाटाळ? मग माझी आवडनिवड कोण जपणार? आणि असं कोणतं मी तुझ्याकडून महागडं गिफ्ट मागितलं की तू नाही देऊ शकत. घर दोघांचं आहे ना मग मिळून कामं नको का करायला?”

“मलाही वागता येतं रे तुझ्यासारखं बिनधास्त. मीही सगळी कामं टाकून देऊ शकते. पण मी असं करत नाही कारण हे माझं घर आहे. आणि तू इथे हॉटेलमध्ये राहिल्यासारखं वागतोय. मला त्रास होतो या सगळ्याचा.”

नंदिनीचे हे कळकळीचे बोलणे राघवला मनापासून जाणवले. कुठेतरी आपलीच चूक आहे हे त्याला पटले. फक्त प्रेम असून भागत नाही. जबाबदारीदेखील घ्यावी लागते याची थोडीफार जाणीव त्याला झाली.

“Sorry नंदिनी. खरंच माफ कर मला. मी एवढा विचार नव्हता केला गं कधी. लहानपणापासून आईने काहीच करु दिलं नाही. काम केलं की म्हणायचे पुरुषांनी बायकांची कामं नाही करायची. स्वयंपाक मी हॉस्टेलला राहिलो तेव्हा शिकलो. आणि मी तुला गृहीतंच धरलं बघ. मला जाणीवच नव्हती की मी हक्काच्या नावाखाली माझी जबाबदारी टाळतोय. यापुढे नाही होणार असं. स्वयंपाक असो, नाहीतर घरकाम मी तुला बरोबरीने मदत करेन. तुझी खाण्यापिण्याची आवड जपेन. सुट्टीच्या दिवशी हमखास तुझ्यासाठी काहितरी बनवेन. पण तू अशी वागू नकोस. मला माझी चूक कळलेय.”

“ठिक आहे. पण मला भूक लागलेय.”

“बरं राणीसरकार सांगा काय बनवू तुमच्यासाठी?”

“मस्त गरमागरम उपमा.”