कानमंत्र संसाराचा - टीम प्रेषित
"अगं, कांदेपोहे बनवून झाले का?आणि छान आलं घालून चहा पण कर, अजून काय बरं?अरे हो,राधिकाची खोली आवरली आहेस ना?" प्रकाशराव सुलभाताईंना विचारत होते.आज त्यांची लाडकी लेक चांगली आठवडाभर माहेरी राहायला येणार असल्याने प्रकाशरावांनी लेकीच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती.
"अहो,काय हे?राधिका फक्त चार दिवस माहेरपणासाठी येत आहे. तुमची अशी तयारी सुरु आहे जसं कि तुमची लेक मोठी लढाई जिंकून येणार आहे. आता फक्त मी आरतीचं ताट ओवाळायचं बाकी आहे. पुरे झालं आता हॉल मध्ये फेऱ्या मारणं. जरा शांत बसा. ऑफिसमधून ती इथेच येणार आहे. रस्त्यात ट्रॅफिक असेल म्हणून उशीर झाला असेल." सुलभाताई हसत म्हणाल्या.
"कधी यायची माझी बाहुली काय माहित. फोनसुद्धा उचलत नाहीये ती. सुलभा आणि तिला आल्या आल्या खायला दे. भूक लागली असेल तिला." प्रकाशराव काळजीने म्हणाले.
"बापाची वेडी माया. अहो येऊ तर दे तिला. किती हा सूचनांचा भडीमार. शांत तिथे सोफ्यावर बसा पाहू." सुलभाताई बोलल्या आणि तितक्यात दारावर बेल वाजली. प्रकाशरावांनी लगबगीने दरवाजा उघडला, समोर त्यांची लाडकी लेक राधिका उभी होती. आल्या आल्या दारातच तिने वडिलांना मिठी मारली आणि मग आत आली.
" काय मग बाबा, मला यायला उशीर झाला म्हणून किती कॅलरी बर्न केल्या तुम्ही सतत येरझाऱ्या घालून?" राधिकाने हसत विचारले.
"आता फक्त देव पाण्यात ठेवायचे बाकी होते." सुलभाताई हसत म्हणाल्या. आईला पाहून राधिकाने तिलाही मिठी मारली. सुलभाताईंनी तिला विचारले,
" कशी आहेस बाळा? "
"आई एकदम मजेत आहे मी " राधिका उत्तरली. पण सुलभाताईंना राधिकाच्या चेहऱ्यावर ते निरागस हास्य दिसले नाही, ती काहीतरी लपवत आहे असं त्यांना वाटलं.
"अगं तिला बसू दे जरा. जा पटकन पोहे घेऊन ये तिच्यासाठी." प्रकाशराव म्हणाले.
"जा बाळा, तू फ्रेश होऊन ये. मग आपण नाष्टा करू."ताई म्हणाल्या.त्यानंतर तिघांनी गप्पा मारत नाश्ता केला.बरेच दिवसांनी राधिका माहेरी रहायला आल्याने प्रकाशराव आणि सुलभाताई खुश होते.
"राधिका जरा अजून एक कप तुझ्या हातचा फक्कड चहा होऊन जाऊ दे. मला ना सुलभाच्या हातचा चहा पिऊन कंटाळा आलाय बघ." प्रकाशराव ताईंना चिडवत म्हणाले.
"बाबा मी तुम्हाला विचारणारच होते चहासाठी.थांबा.. मस्त चहा घेऊन येते."असं म्हणत राधिका पटकन उठून किचनमध्ये गेली. मोठ्या उत्साहाने तिने वडिलांसाठी चहा बनवला. तिघांचीही संध्याकाळ छान गप्पा मारण्यात निघून गेली. थोड्या वेळाने रात्रीचे जेवण उरकल्यावर सगळे जण झोपायला गेले. सुलभाताई तेल घेऊन राधिकाच्या खोलीत गेल्या.
"बरं झालं आई तू आलीस. मी तुला डोक्यावर तेल घालायला सांगणारच होते." राधिका बोलली.
"तुझे रुक्ष केस पाहून माझ्या लक्षात आले बरेच दिवस तू तेल घातलं नाहीये. चल ये बस." सुलभाताई म्हणाल्या. तेल लावता लावता त्यांनी विषयाला हात घातला.
"बाळा तू बरी आहेस ना? अमितराव आहेत ना गं व्यवस्थित? घेतात का तुझी काळजी? आणि तुझे सासू, सासरे? ते कसे आहेत स्वभावाने?" ताईंनी विचारले.
"अगं.. आई किती वेळा एकच प्रश्न विचारणार आहेस? आहे गं सगळं ठीक. मी मजेत आहे. काळजी नको करुस." राधिकाने उडत उडत उत्तर दिले.
" तुझा चेहरा का पडलाय? भांडण वगैरे करून नाही ना आलीस? "ताईंनी पुन्हा विचारले.
"आई, काहीपण नको बोलूस ग. असं काही नाहीये. काळजी नको करुस. बरं ऐक ना आपला जुन्या फोटोचा अल्बम घेऊन ये ना. मला फोटो बघायचे आहेत." राधिकाने अल्बम मागवून विषय टाळला.सुलभाताई अल्बम घेऊन आल्या. दोघी मायलेकी अल्बम बघत जुन्या आठवणींना उजाळा देत होत्या.
"आई तू किती खुश आहेस ना. म्हणजे हे फोटो बघ ना. तू सासरी राहून इतकी खुश कशी असू शकते?आणि आजीसोबत तुझं नातं पण किती छान होतं. मला तर तुम्ही दोघी भांडला आहात हे आठवतच नाही." राधिका फोटो पाहून म्हणाली.
"अगं,सासरी खुश आहे म्हणजे काय? हे माझं घर आहे. माझ्या घरी, माझ्या माणसांसोबत मी खुश असणारच ना. आणि हो तुझ्या आजीसोबत खरंच एक वेगळंच नातं विणलं गेलं होतं माझं. त्यांनी कधी मला सून म्हणून वागवलं नाही.. मुलीचाच दर्जा दिला त्यांनी." सुलभाताई म्हणाल्या.
"किती छान गं आई. दुधात साखर विरघळावी तशी तू या घरासोबत एकरूप झालीस. तुला कधी परकेपणा जाणवला नाही का गं?" राधिकाने विचारले.
"राधिका.. काय झालं आहे? काहीतरी नक्कीच वेगळं चालू आहे तुझ्या मनात. मला सांग बघू. सासरी सुखी काय? आणि परकेपणा काय? नक्की काय विचारायचं आहे तुला?" सुलभाताई म्हणाल्या.
"आई अगं.. असं काही नाहीये. मी सहजच विचारलं तुला."राधिका म्हणाली.
"राधिका.. काय झालं? कोणी काही बोललं का तुला? तुला सासरी परकेपणाची वागणूक मिळते का? तू सासरी खुश नाहीये का? सांग मला...."ताई विचारत होत्या.
"अगं.. आई.. कसं सांगू मी तुला. म्हणजे सगळं चांगलं आहे तिथे. कोणी मला काही बोलत नाही, त्रास देत नाही. अमित तर माझ्यावर खूप प्रेम करतो, अमितची आई मला खूप मदत करतात, मला समजून घेतात आणि त्याचे बाबा तर खूप गप्पा मारतात माझ्यासोबत. पण तरी... तरी..." राधिका बोलता बोलता थांबली.
"पण तरी काय बाळा? इतकं सगळं चांगलं असून तुझ्या मनात कसली तिढ निर्माण झाली आहे?"ताईंनी विचारले.
"ते सगळे जणं खूप चांगले आहेत स्वभावानी, माझ्यावर माया करतात पण तरीसुद्धा मला ते माझे वाटत नाहीत. आता लग्नाला दहा महिने होऊन गेले आई पण तरी मला ते घर माझं वाटत नाही. अमितचे आईवडील हे माझ्या आईवडिलांच्या जागी आहेत हे मी स्वीकारू शकत नाही. माझ्या मनात तुम्ही दोघे आहात. हे घर आहे. ते सगळं विसरून मी त्यांना माझ्या आई वडिलांनाचा दर्जा नाही देऊ शकत. माझी त्या घरासोबत अटॅचमेन्ट नाहीये गं. तुझं आणि आजीचं नातं किती छान होतं तसं नातं मी अमितच्या आईसोबत निर्माण करावं हे मला वाटतच नाही. ज्या उत्सहात मी बाबांसाठी चहा बनवते तो उत्साह अमितच्या बाबांनी चहा मागितला तर नसतो माझ्याकडे. मी नाही त्यांना खुश ठेवू शकत. मी तुझ्यासारखी 'परफेक्ट सून' नाही बनू शकत." असं म्हणत राधिका आईच्या कुशीत जाऊन रडू लागली.
आता सुलभाताईंना राधिकाच्या उदास चेहऱ्यामागचे कारण समजले होते.
"बाळा.. अगं रडायचं काय त्यात? थोडा वेळ लागतो गं हा बदल स्वीकारायला. पण मग हळू हळू सवय होते. बास चल. रडू नकोस.." सुलभाताई तिचे अश्रू पुसत म्हटल्या.
"आई, मला भीती वाटतीये कि मी हा बदल स्वीकारू शकले नाही तर? मला सगळं अवघड वाटतंय गं." राधिकाने विचारले.
"अगं.. 'बदल' हा माणसाचा गुणधर्म आहे, प्रत्येक वेळी आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या वळणावर आपण बदल स्वीकारत असतो. आता बघ तू लहान होतीस, जेव्हा शाळेत जायला लागलीस तेव्हा सुरुवातीचे काही दिवस खूप रडलीस. तुला शाळा नकोशी वाटे. तुझ्या मनात इतकी भीती बसली होती कि रात्री झोपेतून उठून पण "आई शाळा नको " करत तू रडायची, पण तरी आम्ही तुला रोज शाळेत न्यायचो. शाळेची इमारत दिसली कि तू लागलीच माझा पदर घट्ट पकडायचीस. तू लहान होतीस. शाळेआधी मी, बाबा आणि आजी हेच तुझं जग होतं आणि त्याच जगाला मागे ठेऊन तुला अनोळखी मुलांमध्ये जायचं होतं. हा तुझ्या आयुष्यात झालेला खूप मोठा बदल होता. पण रोज शाळेत जाऊन जाऊन तुला त्या वातावरणाची सवय झाली आणि मग काही दिवसांनी सुट्टीच्या दिवशीसुद्धा शाळेत जायचा तू हट्ट करू लागलीस. आत्ता सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाहीये राधिका. तेव्हा शाळा होती आणि आता सासर आहे. एक मात्र खरं आहे कि आई वडिलांचा हात सोडून तुला या बदलाला सामोरं जावं लागणारच आहे." सुलभाताई राधिकाला समजावत म्हणाल्या.
"आई.. पण मला खूप दडपण येतं गं. सगळ्यांना खुश करण्याच्या नादात मी नाखुश रहायला लागलीये." राधिका बोलली.
"एकच गोष्ट लक्षात ठेव. तू खुश राहिलीस कि आपोआप आसपासचं जग तुला आनंदी वाटेल. कोणाला खुश ठेवण्याचा वेगळा प्रयत्न करावा लागणार नाही आणि हो मगाशी विचारलस ना परफेक्ट सून कधी होणार? तर 'परफेक्ट सून' वगैरे काही नसतं मुळात माणूस परफेक्ट नसतोच. आपण चुकतो आणि चुकांमधून शिकतो आणि घडतो.. कळलं?रडूबाई झोपा आता. उद्या ऑफिसला जायचं आहे ना." सुलभाताई हसत म्हणाल्या.
"हो आई.. उद्याचाच दिवस जाणार आहे. मग मी चार दिवसांची सुट्टी टाकली आहे. चल गुड नाईट."डोळे पुसत राधिका म्हणाली.
सुलभाताईंनी तिच्या अंगावर पांघरुण टाकले आणि त्या स्वतःच्या खोलीत येऊन आडव्या झाल्या. त्यांना त्या रात्री काही डोळा लागला नाही. सतत राधिकाचा विचार मनात येत होता. "तिने हा बदल स्वीकारला नाही तर? तिला सासरची मंडळी आपलीशी नाही वाटली तर? लग्नाला दहा महिने झाले आहेत, बघू काय होतंय" या साऱ्या विचारात सकाळचा अलार्म वाजला. सुलभाताई उठून कामाला लागल्या.प्रकाशराव आणि राधिकाचा डबा तयार केला. सकाळी राधिका तिच्या ऑफिससाठी आणि प्रकाशराव बँकेत जाण्यासाठी एकत्रच बाहेर पडले. सुलभाताईंच्या मनात पुन्हा विचारचक्र सुरु झालं. त्यांना राधिकाची खूप काळजी वाटत होती.कसं समजून सांगावं या मुलीला त्यांना सुचत नव्हतं. सुलभाताईंना आज सासूबाईंची आठवण येत होती. त्या असत्या तर त्यांनी किती चांगल्या पद्धतीने राधिकाला समजावून सांगितलं असतं, शेवटी अनुभवाचे बोल ते असं त्यांना वाटू लागले. सुलभाताई सासूबाईंच्या फोटोसामोर जाऊन उभ्या राहिल्या. तशाच फोटो न्याहळत त्या बराच वेळ उभ्या होत्या. थोड्या वेळाने त्यांनी डोळे मिटले, शांतपणे कसलातरी विचार करू लागल्या आणि अचानक त्यांनी खाडकन डोळे उघडले, जणू काही त्यांना बंद कुलूपाची चावी मिळाली होती, त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. "आई खरचं तुम्ही असताना किती सकारात्मकता होती घरात आणि आज आमच्यात नाही तरीपण तुमच्या फोटोसमोर उभं राहूनही खूप सकारात्मक ऊर्जा मिळते.. अशाच आमच्या पाठीशी सदैव उभं रहा." असं सासूबाईंच्या फोटोसमोर उभं राहून त्या म्हटल्या आणि नंतर त्या थेट किचन मध्ये गेल्या.
संध्याकाळी राधिका ऑफिसमधून घरी आली. सुलभाताई काय करत आहेत हे पाहण्यासाठी ती थेट किचनमध्ये गेली.
"आई, बेसनचे लाडू करणार आहेस? वा. बरं झालं मला किती दिवसांपासून खायचे होते." राधिका आनंदित होऊन म्हणाली.
"पण यावेळेस तू मला मदत करायची आहेस. चालेल?" सुलभाताईंनी विचारले.
"चालेल काय अगं? पळेल. थांब मी आलेच फ्रेश होऊन." म्हणत राधिका पटकन आवरून किचनमध्ये आली.
"हा,सांग आई.. काय करू?"राधिकाने विचारले.
"हे घे.. बेसन तुपामध्ये खमंग भाजून घे." म्हणत सुलभाताईंनी सूत्र राधिकाच्या हातात दिली.
आई जरा कमी घालू कि तूप. जास्त नाही वाटत का?" राधिकाने विचारले.
"तूप हा तर सर्वात महत्वाचा घटक आहे. त्याच्याशिवाय लाडू वळणार कसे? तूप कमी पडलं कि लाडू वळता येणार नाही आणि अति झालं कि लाडूला आकार देता येणार नाही. त्यामुळे योग्य प्रमाणात तूप महत्वाचं आहे"
ताई म्हटल्या.
बराच वेळ मंद आचेवर बेसन परतून राधिका कंटाळली आणि तिचे हात पण दुखू लागले.
"ए काय गं आई.. किती वेळ अजून? मी गॅस थोडा मोठा करते म्हणजे पटकन भाजून होईल."राधिकाने विचारले.
" नाही.. अजिबात नाही. बेसन मंद आचेवर भाजायचं असतं. कंटाळून लवकर गॅस बंद केलास तर कच्च राहील आणि मोठा गॅस केलास तर करपून जाईल. त्यामुळे असचं भाजत रहा. बघ थोड्या वेळानं खमंग वास सुटेल. " सुलभाताईंच्या सांगण्याने राधिका बराच वेळ बेसन भाजत होती आणि खरचं काही वेळाने बेसनाचा खमंग वास दरवळला.
"आता जरा थंड होऊ दे. तोपर्यंत आपण चहा पिऊन घेऊ " आणि दोघी जणी चहा घेऊन पुन्हा लाडू करायला बसल्या.
"हे घे.. जायफळ, वेलदोडा पूड आणि ही पिठीसाखर घाल आणि सगळं छान मिसळून घे."ताई राधिकाला सूचना देत होत्या.
"बघू बरं... हा.. आता हे घे..लाडू वळ बघू" ताई म्हणाल्या.
आणि राधिकाने लाडू वळला.आज पहिल्यांदा बेसन भाजण्यापासून ते लाडू वळण्यापर्यंत राधिकाने एकटीने सर्व केल्याने ती जाम खुश झाली.
"काय मग, डोक्यात काही प्रकाश पडला?" ताईंनी विचारलं.
" हो... लाडूची रेसिपी लक्षात आली.. " राधिका उत्तरली.
"बघायला गेलं तर आज मी तुला लाडूची आणि नात्यांमधील गोडव्याची रेसिपी पण शिकवली आहे. म्हणजे बघ ना बेसन बराच वेळ मंद आचेवर भाजायचं. त्यात अजिबात घाई गडबड करायची नाही. तसच नात्यांचं पण आहे ग. एकमेकांना समजून उमजून घ्यायला थोडा वेळ घ्या. तुम्हा मुलांना सगळं इन्स्टंट पाहिजे असतं. दहा महिने होऊनही तुला ते घर आपलंस वाटत नाही कि झालं.. तू लगेच मी अड्जस्ट झाले नाही अजून असा शिक्का मारला. पण तू कधी प्रयत्न केलास नातं फुलवण्याचा? मनावर एक पडदा बांधला आहेस ना तो बाजूला सार आणि मग बघ. नातं फुलायला वेळ दे. जसं बेसन जरा थंड झाल्यावर आपण साखर घातली तसचं नात्यातसुद्धा थोड्या कालांतराने साखररुपी प्रेम आणि आपुलकीचा गोडवा टाक म्हणजे सगळं एकदम छान मिसळून येईल बघ.
आणि मग मला तेव्हा सांग ही रेसिपी वापरून तुझं सासरच्या मंडळींसोबत नातं अगदी माझ्या आणि आजीच्या नात्यासारखं बहरतं कि नाही ते.मग तुला सासऱ्यांना चहा करून द्यायला पण आनंद वाटेल. आणि सासूसोबत आपलेपणा जाणवेल.
बाळा आपण मुली ना या तुपाप्रमाणे आहोत. माहेर आणि सासर यांना घट्ट बांधून ठेवायची ताकद आपल्यात आहे. कारण सासर आणि माहेर अशी दोन घरं अनुभवायचं सुख देवाने फक्त आपल्याला दिलं आहे. आपण माहेरी नाती जगतो तर सासरी नाती जपतो. बाळा संसार हा कधीही नं संपणारा अविरत प्रवास आहे, या रस्त्यात पुढच्या वळणावर काय येईल माहित नाही, म्हणून तर ही नाती या प्रवासात आपली खूप साथ देतात, कधी पडलो, लागलं तर सांभाळून घेतात. तुझी माहेरची जागा कधी कोणी घेऊ शकणार नाहीये पण एक लक्षात ठेव सासरी तुला स्वतःची जागा निर्माण करायची आहे, हा बदल स्वीकाररून आमचा हात सोडून तुला नवीन जग निर्माण करायचं आहे.."
सुलभाताईंच्या बोलण्याने राधिकाला तिची चूक उमगली, तिने डोळ्यातील पाणी पुसले आणि आईला लाडू भरवत म्हणाली, "आई... सॉरी मी खूप चुकले पण आता यापुढे असं नाही वागणार.हा 'संसाराचा कानमंत्र' मी नक्की लक्षात ठेवेन.ही तुझी नवीन नात्यात गोडवा आणायची रेसिपी नक्की ट्राय करेन. हा बेसनचा लाडू सगळ्यांना खायला घालून नक्कीच सासरी आनंदी राहीन ..."
राधिकाचे उत्तर ऐकून सुलभाताईंना खूप बरे वाटले. काही दिवस माहेरी राहून राधिका अगदी आनंदी मनाने नव्या जोमात सासरी परतली.
समाप्त.
सिद्धी भुरके ©®
24/2/2021
वाचकहो संसाराचा कानमंत्र तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. कथा आवडली तर like आणि कंमेंट नक्की करा. धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा