काजवे..

कथा सुंदर काजव्यांची..


#कथा
#काजवे
©स्वप्ना..
"हे बघा हिला काहीही झालेल नाही ए,..तुम्ही जरा तुमचा व्याप कमी करून हिला फिरायला घेऊन जा शहरा बाहेर कुठेतरी,..."
सावीने हे सांगितलं आणि मिस्टर अँड मिसेस कर्णिक नुसतेच एकमेकांना बघत बाहेर पडले,..मिस्टर कर्णीकांना वाटलं काही मानसिक आजार जडला आहे आर्याला म्हणजे आपल्या बायकोला असं सांगतील ह्या मॅडम,.. कारण गेल्या चार महिन्यात तर कसली वागते ही,सगळी सुख पायाशी लोळण घेत पडलेली आहे,मला जरी वेळ नसला तरी जगावं ना हिने हिच्या पद्धतीने,..पण ही नेहमीप्रमाणे काम तर करते पण सतत चिडचिड,अबोला,उदासवाण आणि चिंता करत राहते,..गुरफटून जाते आपल्याच नकारात्मक विश्वात,....आपले फॅमिली डॉक्टरदेखील म्हणाले,"काही झालं नाही त्यांना,.."शेवटी त्यांनीच ह्या सायक्लोजिस्ट सावी ह्यांचा no दिला,..आणि आता ह्या सावी म्हणतात ह्यांना फिरवून आणा,..घरी जेवताना मुलांसमोर हे सगळं कर्णीकांनी मुलांना सांगितलं तस मुलं म्हणाले,"मग जा ना दोघे फिरून या,.."कर्णीकांच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे आठी आली,.." बोल कुठे जायचं,..?"
ते बायकोला म्हणाले,तशी ती शांत बोलत म्हणाली,"तुम्ही नका येऊ मीच जाते मुलांना घेऊन माझ्या हरवलेल्या माहेरी,..कर्णिक आश्चर्याने ओरडले,..काय त्या गावी जिथं तुझं कोणीही राहिलेलं नाही,..जिथे जाऊन तुला दहा वर्षापेक्षा जास्त काळ गेला,..तिथे कशाला जायचं तुला,..??ती म्हणाली,"मला जाऊन येऊ द्या,..मला मुलांना मी कशी जगले ते दाखवते,.."कर्णीकांनी मुलांकडे बघितलं,..आपण स्वतः हिला कुठे नेण्याच्या जबाबदारीतून सुटलो ह्याचा आंनद होता त्यांच्या मनात,...त्यामुळे मुलांना परवानगी किंवा त्यांना काय वाटतं ह्या पेक्षा त्यांनी फर्मान सोडलं,..ठीक आहे तुम्ही जाऊन या दोन दिवस गाडी आणि ड्रायव्हर तुमच्या ताब्यात,..तुम्ही तारीख सांगा,..आईला ह्या सगळ्यातुन बाहेर काढणं गरजेच आहे हे ओळखत मुलं तयार झाली आणि ठरलेल्या तारखेला ती निघाली,..
एका पाऊलवाटे कडे गाडी लागली,..दोन्ही बाजूने गर्द झाडी आणि मधून एकच वाहान जाईल असा रस्ता,..गाडीचा एसी बंद करून तिने काचा खाली घेतल्या,..आंब्याला,कडूलिंबाला मोहर आलेला होता,..त्याचा सुगंधी वास वाटेवर दरवळत होता,..ऊन असलं तरी झाडांमुळे असलेली सावली आणि गार हवा यामुळे एसीची गरज भासत नव्हती,..रस्त्याने तीन चार बायका डोक्यावर घागरी घेऊन चालल्या होत्या त्यातलं पाणी रस्त्याने हिंदकळून सांडलं की त्या मातीचा सुंदर सुवास येत होता,.. तिच्या चेहऱ्यावर वेगळच समाधान दिसायला लागलं होता,.. मुलं आईला निरखत होते,.. एका मोठ्या वडाखाली तिने गाडी थांबवली,..ड्रायव्हरला म्हणाली,"तुम्ही या सावलीत आराम करा आम्ही येतो गावातून फेरफटका मारून,..मुलांना डोक्यावर हॅट घालायला लावून ती निघाली तशीच जुन्या आठवणीतली,.. वडाच्या उजव्या हाताकडून गाव सुरू झालं होतं,..भडक केशरी रंगाच्या देवळात तो सुपारीमारुती तसाच ठाण मांडून बसलेला होता गावाचं रक्षण करत,..तिने मुलांना दर्शनाला नेलं,..छोट पण खुप छान होतं ते देऊळ,.. बाहेरून भडक केशरी असलं तरी आतमध्ये अगदी एसी सारखं थंडगार,..अंधारं,.. तो तेलाचा तेलकट वास,..शांत जळणारा मातीचा दिवा,..त्याचा प्रकाश मारुतीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता,..मी आहे असं ठामपणे सांगणारा हा मारुती,..आजोबा आपल्याला रोज इथे आणून सांगायचे,..हा चिरंजीव देव आहे,..ह्याला मरण नाही त्यामुळे तुम्ही जे मागता ते तो ऐकतो म्हणून त्याला जगण्यासाठी बळ मागायचं,.. आपणही रोज त्याला बळ मागायचो आणि खरंच आपल्याला इतक्या अडचणी असून आपण कधीही घाबरायचो नाही,..पैसा, घरदार,सुखसोयी काहीही नव्हतं आपल्याला तरी आपण आंनदी होतो कारण ते बळ ह्याला मागून आपण निवांत असायचो,..आणि आता आपल्या सुखसोयीत आपल्याला मनाच बळ देणारा हा मारुती हरवला,..हे विसरायला नको,..आजोबांनी मनात कोरलेला हा प्रार्थनेचा काजवा तिला आठवला आणि एका छान विचाराने ती लक्ख झाली,..मुलंही व्हिडीओ, फोटो ह्यात ते मंदिर सामावून घेत होती,..तिथुन बाहेर पडताना तिने परत मनातून डोळ्यात अश्रू आणत मारुतीला विणवल बळ दे,..आणि ती मूर्ती खुदकून हसल्यासारखी तिला वाटली,..
मंदिरा बाहेर येताच समोर असणारी तिची गोळ्या,बिस्किटची टपरी दिसली,..मुलांना घेत ती तिथे गेली,..नेहमी हातावर खाऊ देणारे अण्णा पलीकडे खुर्ची टाकून बसलेले होते,.. त्यांचा नातू टपरीवर होता,..ती अण्णांशी जाऊन बोलली,..अण्णा खळखळून हसले,..तिला तोंडभरून आशीर्वाद दिला नातवाला म्हणाले,.".ए हिच्या पोरांना खाऊ दे रे आणि पैसे घेऊ नकोस." त्यांच्या ह्या बोलण्यावर,..गरीब असलो तरी देण्याचा आंनद कसा घ्यावा हे खुप आधीपासून तिच्या मनात रुजवलेला काजवा अण्णांनी आठवणीने परत उजळवून दिला,..आपण तर चटकन जुने कपडेही कोणाला देत नाही,..इतके साठवले कि त्याचाही ताण येतो आपल्यावर दयायला शिकलं पाहिजे हा विस्मृतीतला काजवा तिने हृदयात ठेवला आणि एका आनंदाने उजळून ती तिच्या आवडीचं बोरकूट घेऊन ते लहानपोरीसारखं चाखत चाखत शाळेच्या रस्त्याकडे लागली,.. ती जिल्हा परिषद शाळा,..तशीच फक्त रंगवली म्हणून थोडी चमकदार दिसत होती,..शाळा भरलीच होती आणि प्रार्थना सुरू होती,..तिच प्रार्थना
"शुद्धी दे,बुद्धी दे
हे दयाघना, शक्ती दे,मुक्ती दे
आमुच्या मना,..."
किती वेळा ही प्रार्थना म्हणून आपण दुःखी असलो तरी परत आंनदी व्हायचो,..दुःखाला आत पर्यंत शिरू न देण्याची मागणी ,चांगलं वागण्याची मागणी हेच तर होतं सार आणि आपण मात्र आपल्या गुरफटलेल्या आयुष्यात हे विसरूनच गेलो,..हरवत गेलो मोठ्या मोठया गोष्टीत,..ती विचार करत होती आणि शाळेतून पुढच कडवं ऐकू आलं,..
"तरतम् हे उमजेना
उमजेना सत्य,फसविते आम्हाला
विश्व हे अनित्य...."
खरंच आपल्या मनात रुजलेले प्रार्थनेचे हे काजवे आता उजळून गेले आणि आपल्याला आतून छान वाटतय ह्याची जाणीव तिला झाली आणि मुलांना जाणवलं आई उत्साहाने गाव दाखवित आहे आपल्याला,....शाळा सोडत ती पुढे वळली,..मोठ्या निलगिरीकडून ते झाड अजून तसंच उभं होतं,...अनेकांच्या घरात डोकावत,..कितीतरी घरांची सुख दुःख ह्याने बघितली होती ना,..तो मात्र त्याच निसर्गचक्र सांभाळत,..त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडत उभा आहे खंबीरपणे,.. तिने त्याच्या खाली पडलेल्या शंकुच्या टोप्या उचलल्या,..मुलांना गम्मत दाखवली,..तेवढ्यात आलेला वारा निलगिरीच्या आवाजाने वेगळाच सळसळणारा,.. तिला हसू आलं,..
तिला तिची सखी,..शिती,.. लहानपणीची सखी,....पलीकडच्या अळीतली,.. तेंव्हा जातपात काही डोक्यात नसणार वय,..तिच्या सोबत ह्या झाडाखाली आपण तासनतास रमयचो,..कंटाळवाणा, उदासीनता असलेला दिवस कधी उगवायचाच नाही ना आयुष्यात,..आपली ती मैत्रीण ही होतीच तशी,..तिच घर होतं पलीकडे बघू जाताना तिची चौकशी करू तिच्या माहेरी म्हणत ती मुलांना घेऊन आपल्या जुन्या घराकडे वळली,.. तिची पावलं जड झाली होती तिकडे जाताना,..आता कोणी नाही त्या वाटेवर आपल्यासाठी हातात भाकर तुकडा घेऊन उभं,..दारात फुलपात्र पालथं घालून डोळे किलकीले करून बसलेली आजी,..आई लगबगीने हातातले लेकरं घेण्यासाठी सरसावणारे आपले बाबा आणि हातातलं सामान घेणारा भाऊ कोणी राहिलं नाही,...आजी,आई,बाबा देवाने नेले आणि भाऊ हे सगळं विकुन शहरात गेला,..त्याला तरी कसं रोखणार शेवटी त्यालाही त्याच्या कुटुंबाची काळजी करणं भाग होत,..इथे राहून ते नसत झालं,...तिने त्या सारवलेल्या भिंतीवर हात फिरवला,..थोडीफार डागडुजी करून घर तसंच उभं होत,..रांजण खोचलेली जागा,..त्या मातकट भिंतीवर बहरलेली हिरवीगार तुळस,..पत्र्यावर सावली धरून उभा असलेला लिंब आणि आपले बाबा आपल्याला बांधून द्यायचे तसा दोरीचा झोका,..सगळं तसंच होतं,.. तिने दाराची कढी वाजवली,..कोण म्हणतं शकू बाई बाहेर आली,..खोल गेलेले डोळे तिघांवर रोखत म्हणाली,"कोण पाहिजे,.."हिने चटकन सांगितलं,..घर बघायचं आतून,..मी कल्पी इथेच राहिलेली,..असं म्हणताच शकू बाईने,"अग ये ये ये,.. म्हणत आत घेतलं,..सुनबाईला सरबत कर ग ताज्या लिंबाचं मालकीण बाई आली आहे घराची असं सांगताच,..कल्पिने आश्चर्याने बघितलं,..हसत शकू बाई म्हणाली,"अग लहानपण जगली तू इथं,..क्षणभर आलीस हे बघायला मग तुला मालकी पण दिलं तर बिघडलं कुठं,..तू काय कायम येऊन रहाशील का इथं,..?
किती सहजतेने मोठेपणा देणारी ही माणसं,..आपलंही मन असच तर होतं,.. हा सुद्धा काजवा हरवला आपल्या मनातून म्हणून तर रेल्वेत सुद्धा तात्पुरती असलेली जागा थोड्यावेळही देत नाही आपण कोणाला,..आणि ह्या आजी पाहा,.. तेवढ्यात सरबत आलं,..ते घेतल्यावर कल्पिने मुलांना घर दाखवलं,..मुलं म्हणाली,"आई किती साधं राहायचे तुम्ही,..तेंव्हा त्रास नव्हता का होत तुम्हाला,..आपल्या कडे काहीच नाही ह्या गोष्टीचा,..ती हसली म्हणाली,"झालाही असेल पण तेंव्हा सहज स्वीकारायला शिकवलं होत मग मन त्रास करून घ्यायच नाही,.."ह्या वाक्यावर तिच तिलाच वाटलं मग आता का आपण त्रास करून घेतो,..नवऱ्याने असं केलं,.. मुलं अशी वागली,.. शेजारचीने असं केलं,...खरंच आपल्यातला स्वीकारणारा काजवा हरवूनच गेला,..ती निरोप घेत निघाली अनेक काजवे सापडून मन उजळून गेलं म्हणून,..
गाडीजवळ येतानाच तिला हाक आली,.. कल्पे,..ही थबकली नेमकं कोण,..?जवळ येताच तिने पाठीत धपाटा घातला,..ओळखत नाही काय,..मोठ्या घरात,शहरात गेली लग्न होऊन तर,..कल्पिने बोलण्यावरून ओळ्खलक शिते,.. गळ्यातच पडल्या दोघी,..पोरांच्या गालावरून तिने हात फिरवले,.. नवरा काय करतो म्हंटल्यावर शिती म्हणाली,"दोन्ही हात गेलेत यंत्रात,आता घरीच असतो आणि मी जाते त्याच्या जागी,.."तुला काय येत ग म्हणताच कल्पी म्हणाली,"विसरली का निलगिरीच्या झाडाखाली,..त्या टोप्या ,त्या बारीक लवंगा वेचून त्यातून आपण काहीतरी बनवायचो,..एकदा तर त्या टोप्यांपासून आपण बनवलेली ती मोठी टोपी बाईंनी सगळ्या शाळेत दाखवत सांगितलं होतं,..निसर्गातली एवढी छोटी गोष्ट जर उपयोगी येते तर आपण तर एवढं मोठं शरीर घेऊन जगणारी माणसं,.. आपण कष्टाने कसही कोणाच्या उपयोगी पडू शकतो,..मग मी कष्ट करते आणि जगते,.."शितीनी हा महत्वाचा काजवा उजळवून दिला आणि आता कल्पी म्हणजे आताची मिसेस कर्णिक काजव्यासारखी स्वतःचा प्रकाश शोधत आनंदाने घरी परतली,.. ती परत सायकोलॉजिस्ट कडे गेली नाही कारण मनात उजळलेले काजवे तिला आता त्या उत्साहाच्या लयीत चमकतच ठेवतात,..

©स्वप्ना अभिजीत मुळे(मायी)औरंगाबाद.