कर्तव्य की तडजोड? (टीम- दुनियादारी)

कसं आहे आजकालच्या पिढीचे लग्न म्हटले की, खूप वेगळे विचार आहेत. प्रत्येकाचे आपले वेगळे कॉन्सेप्

कर्तव्य की तडजोड? (टीम- दुनियादारी)

"प्राप्ती आणि अमर एकत्र राहायला लागले, माहित आहे का तुला ? आईला शॉक बसला आहे".

प्रीती शालिनी मावशीला सांगत होती .

प्राप्ती तिची बहिण. इंजिनिअर. फर्स्ट क्लासमध्ये. मस्त मोठ्या कंपनीत लगेच नोकरीही मिळाली. मुळातच ती हुशार, मग काय प्रगतीही झाली. चांगली मोठी पोस्ट , उत्तम पगार. तिची ती स्वतंत्र!

अमर प्राप्तीचा बॉस . त्या दोघांबद्दल बऱ्याच दिवसांपासून ऐकिवात होते. प्राप्तीचे इतक्या पटापट झालेले प्रमोशन पाहून साधारण अंदाजही आला होताच.

" अगं प्रीती, आत्ता चालतं सगळं. कॉमन झाले आहे हे सर्व. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून नंतर मग लग्न करायचं. प्राइड कॉम्प्लेक्स मध्ये भाड्याने जे लोक रहातात त्यात ८० % असलीच जोडपी आहेत. करतील की नंतर लग्न." मावशी म्हणाली .

"अगं मावशी, कसे करणार लग्न? बायको आहे ना त्याची लग्नाची, हक्काची. आणि तो म्हणतो , तिला सांभाळणे हे माझे पहिले कर्तव्य आहे. आता इतक्या वर्षांनंतर कुठे जाणार ती ?" प्रीती.

शालिनीला शॉक बसला. कसं आहे आजकालच्या पिढीचे लग्न म्हटले की, खूप वेगळे विचार आहेत. प्रत्येकाचे आपले वेगळे कॉन्सेप्ट! ते समजून घेऊन त्यांना आपल्या विचारांशी जुळवता येणं म्हणजे कठीण काम. त्यात हे लिव्ह इन चं नवं फॅड. काय तर म्हणे आधी एकत्र राहून बघायचं. का? तर म्हणे, लग्नानंतर कोण एडजेस्ट करणार? लग्न म्हणजे तडजोड असा समज यांचा. काय बोलणार आणि किती समजावणार? ही मुले-मुली शिकतात, आपल्या पायावर उभी राहतात. त्यांचे राहणे, विचार सगळंच काही स्वतंत्र. मग त्यात कुणा दुसऱ्याला जर सामायिक करायचं आहे, म्हणजे आपली हक्काची व्यक्ती म्हणून, तर मग त्यांच्या बद्दलच्या असंख्य टर्म्स आणि कंडीशन पण पूर्ण झाल्या पाहिजेत ना!

प्राप्तीचेही असेच काहीसे विचार होते. ती आणि तिचं करियर. त्यापुढे सगळचं नगण्य. लग्नाचा विषय काढला की, तिचं उत्तर ठरलेलं होतं, "मी इतकी कमावती आहे, स्वतंत्र आहे. मला घर, संसार या जबाबदारीत अडकवणारा नवरा नकोय. माझ्या पठडीत बसणारा कोणी मिळाला तर बघा. नाहीतर माझं मी बघून घेईन."

भावोजी गेल्यानंतर ताईने दोघी मुलींना वाढवले होते. सुखसुविधा सर्व होत्या. दोन्ही मुलींनी उच्च शिक्षण घेतले. सगळं काही अगदी उत्तम सुरू होतं. प्राप्तीच्या लग्नाचे विचार सुरूच होते, की अडून अडून असं काहीतरी कानावर यायला लागलं.

" मावशी तू बोल ना तिच्याशी. बघ ऐकते का तुझं" प्रितीच्या बोलण्याने शालिनीची तंद्री भंग झाली.

"ठीक आहे प्रिती. बोलेन मी तिच्याशी. नक्की बोलेन आणि तिला परत आणण्याचा पूर्ण प्रयत्न करेन." शालिनीने प्रीतीला तर समजावले, पण प्राप्तीशी काय आणि कसे बोलणार हा प्रश्न तिला पडला. शेवटी खूप विचार करून तिने प्राप्तीला फोन केला आणि दुसऱ्या दिवशी घरी भेटायला बोलावले. तिनेही यायचे कबूल केले. ठरल्याप्रमाणे संध्याकाळी प्राप्ती शालिनीच्या घरी आली.

"काय म्हणतेस मावशी? कशी आहेस? अशी एकदम अचानक कशी ग आठवण काढलीस?" प्राप्तीने आल्या आल्या प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. त्यावर शालिनिने आधी मस्त गरम गरम शिऱ्याची वाटी तिच्या हातात देऊन म्हटले, " आधी तू शिरा तर खा. मग बोलू निवांत." खूप दिवसांनी असा गरम शिरा खाऊन प्राप्ती एकदम तृप्त झाली. मग शांतपणे शालिनीने विषयाला हात घातला.

"प्राप्ती, आता मी जे काही सांगते ते तू शांतपणे ऐकून घ्यावस इतकी माझी विनंती आहे."

शालिनीचे मन ३० वर्षे मागे गेले. "प्राप्ती, आमच्या गावात पाटलांची दोन घरे होती . एक त्याच्या वाड्यापासून थोडे लांब होते. ती रहायची तिथे. देवदासी होती ती. पण ती ही त्यांचीच. मुले ही झाली होती तिला. खूप सुंदर होती ती दिसायला. अगदी लक्ष्मीचे रूप. पाटलांची बायको तिला सवाष्ण म्हणून बोलवायची. ओटी भरायची. अखंड सौभाग्यवती ती, देवदासी. पाटलांनी देवळात लग्न केले होते तिच्याशी. अर्थात गावात अशी अनेक गाजलेली प्रकरणे होती. आणि त्यात कोणालाच वावगे काही वाटायचे नाही. पाटलांच्या आईचा राग होता तिच्यावर. त्यामुळे तिला वाड्यात कधीच जागा मिळाली नाही. तिची काय चुक होती ?

आपल्या पलंगावरून रात्री घराबाहेर जाणाऱ्यांच्या बायकोचे दुखः कुणाला कळणार? 

आणि दिवस उजाडण्यापूर्वी शेज सोडून जाणाऱ्या प्रियकराच्या त्या प्रेयसीचे काय? तिला नसेल का त्रास होत? वाटत नसेल का तिलाही आपलापण सामान्य असा एक संसार असावा. साध्या सत्यनारायणाच्या पूजेला देखील तिला त्याचा हात धरून बसता येत नाही. त्या दोन स्त्रियांचे आयुष्य दिवस आणि रात्रीत विभागलेले असते त्याने. आणि स्वतः मात्र त्याला हवा तसा दिवस आणि हवी तशी रात्र रंगवतो तो, उपभोगतो."

म्हणजे मावशी तुला नक्की काय म्हणायचे आहे? मला तू त्या देवदासीच्या पंक्तीत बसवतेस का ?" प्राप्ती खूप भडकली होती.

शालिनी तिला समजावू लागली, "नाही, ती व्यवहारी होती आणि तो ही. म्हणून तर त्याने करार केला ना.अन्न, वस्त्र व निवारा आणि शय्या सोबत तो मागेल तेव्हा."

प्राप्ती पुन्हा ओरडुन म्हणाली, "बघ मावशी तुला काय म्हणायचे आहे ते कळते आहे मला. मला गरज नाही आहे हे सगळं समजण्याची. आमचे दोघांचेही खूप प्रेम आहे एकमेकांवर. आणि त्याला त्याच्या जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे आणि म्हणूनच."

शालिनिही गरजली. "जबाबदारीची जाणीव? अन्न , वस्त्र आणि निवारा. हीच असते का फक्त बायकोची जबाबदारी? त्याला जर खरंच त्याच्या जबाबदारीची जाणीव असती तर तुला या फंदात पाडले नसते. आवरले असते मन त्याने. माहित आहे त्यालाही की, बायको सोडायची काय किंमत मोजावी लागेल! तुझं काय, ठेवलेली आहेस हवे तेव्हा सोडून जायला! आणि तुझ्यावर जर त्याचे खरंच प्रेम असते न तर त्याने एक काहीतरी निर्णय घेतला असता. प्रेमासाठी राज्य, घरदार सोडले आहे कितीतरी लोकांनी. प्रसंगी आपल्या माणसांशी सुद्धा संबंध तोडले जातात प्रेमासाठी. तो काहीही म्हणो, कायद्याच्या नजरेत कितीही शिकूनही तुझा दर्जा रखेलीचाच.. आणि कायदा सोड, त्याची तर पर्वा नाहीच आहे तुम्हाला. पण देवळात ही पूजेला नाही बसता येणार. त्याचे लोक तर नाहीच स्वीकारणार तुला आणि समाज ही नाही. तुझ्यावर प्रेम आहे न त्याचे? मग असे जीणे का देतो आहे तो तुला ? जिवंतपणी तर जावूदेच, उद्या मेला तरी त्याचे शरीर नाही तुझ्या ताब्यात देणार. हक्क राहील त्याच्याच लग्नाच्या बायकोचा. तळ्यात आणि मळ्यात. दोन्ही दरवाजे उघडे ठेवले आहेत त्याने स्वतः साठी."

प्राप्ती निघून गेली भडकून. शालिनीनेही तिला बिलकुल नाही थांबवले.

दुष्यंताची जात ही. कधीच नाही बदलणार . तेव्हा हि शकुंतला फसली होती आणि आताही.नावे फक्त वेगळी . समाजाने नाती निर्माण केली आहेत ती फक्त अंकुश ठेवायला. पुरुषाला मुलगा, पती, वडील या नात्यात बांधले तरच राहतो तो. नाहीतर कुठे जाईल कळणार नाही. अर्थात ही बंधने आत्ता स्त्री ला ही लागू आहेतच! "Relationship" किती गोड शब्द आहे हा आणि फसवा देखील तितकाच. मानली तर जबाबदार. नाहीतर??

खूप दिवसांनी प्रीती आली होती भेटायला .

"मावशी , प्राप्ती कायमची अमेरिकेला गेली. ऑफिसमधून ऑफर आली होती तिला"

"अरे मस्तच , म्हणजे शेवटी अमरने निर्णय घेतला तर .!"

"नाही ग मावशी. ती एकटीच गेली. मध्ये अमरचे कसलेतरी इमर्जन्सी ऑपरेशन करावे लागले होते. तिनेच नेले होते त्याला हॉस्पिटल मध्ये . पण फॉर्म वर सही घेताना मैत्रिणीची कशी घेणार? बायको असताना? आणि त्याची बायको आलीही. त्यानेच बोलावले होते तिला बहुतेक. तिचीच सही, तीच बसली होती त्याच्या शेजारी. त्याचं जेवण औषधं सगळं काही बायकोच बघत होती. अमर ही काही बोलला नाही त्यावेळी."

त्याच दिवशी फ्लॅट रिकामा करून समान घेऊन प्राप्ती घरी आली. पूर्ण दिवस स्वतः ला कोंडून घेऊन खूप रडली. मी आणि आईने प्रयत्न केला आधी विचारण्याचा, पण मग सोडून दिले. ७ दिवसांनी ती नॉर्मल झाली आधीसारखी! सगळं सांगून एकदाची मोकळी झाली. अमेरिकेच्या ऑफरचं बोलली, तेव्हा आधी आईने विरोध केला; पण मग मी समजावलं आईला. त्यातून बाहेर येण्याचा हाच योग्य मार्ग होता. आता खुश आहे ती तिथे. २ महिने झाले. दिवाळीला येणार आहे परत. प्रोजेक्ट संपतो आहे तिथला. मग लग्नाचं बघू असं म्हणाली."

शालिनी: "हं. बरे झाले. पूर्ण वाटोळे होण्याच्या आत सुटली ती आणि तिचे तिलाच समजले हे चांगले झाले. ठेच लागल्याशिवाय शहाणपण येत नाही हेच खरे!"

स्त्रीची व्यथा खूप जुनी आहे, अगदी तुळशीपासून.

तिला सुद्धा विष्णूबरोबरचा आपला संबंध समाजमान्य करून घेण्यासाठी प्रत्येक वर्षी त्याच्याबरोबर लग्नाला उभे राहावे लागते आणि तरीही तिचे स्थान घरात नाही. अंगणातच तिचे अस्तित्व आहे .

पण लक्ष्मी हि सुखी असेल का? जरी त्याच्या नावाचे मंगळसूत्र मिरवत असली तरीही आपला पती आपला नाही याची खंत नसेल का तिला? तिने आपले सर्वस्व ओतले आहे त्याच्या पायावर . पण तो फक्त तिचा नाही हे सत्य स्वीकारले असेल का तिने?

पुराणातल्या कथा. खऱ्या असतील किंवा खोट्या! पण बरेच काही शिकवून जातात . निदान धोक्याचा कंदील तरी दाखवतात. आत्ताच्या लक्ष्मीला आणि तुळशीला.

नमस्कार वाचकहो! ईरा चँम्पयन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत टिम 'दुनियादारी' घेऊन येत आहे आपल्यासाठी एकाहून एक सरस आणि उत्कृष्ट कथांची मेजवानी!

तुम्ही आमच्या 'प्रेम तुझा रंग कसा' या कथामालिकेला भरगोस प्रतिसाद दिलात.

त्यानंतर आलेल्या 'आभास दि हनी ट्रॅप' या सारंग चव्हाण यांच्या कथेलाही भरभरून दाद दिलीत. तशीच दाद ह्या कथेलाही भरघोस व्ह्युज देऊन द्या व आमच्या टीमला विजयी करा.

माझी कथा कशी वाटली हे कमेंट्समधे सांगायला विसरू नका.

धन्यवाद.

-तुमची आमची 'दुनियादारी'.