एक रक्षाबंधन असे ही.

रक्षाबंधन हे बहिणी भावाचे नाते जपणारे असते.कितीही दुरावा असला की ह्या नात्याने त्यांच्यात परत एकदा प्रेम निर्माण होते. ही कथा अशीच एका बहीण भावाची आहे.
प्रणव एका पुण्यातील मोठ्या इंडस्ट्रीमध्ये नोकरी करत होता. घरची परिस्थिती अगदीच श्रीमंतीची पण सांगायला तसें जवळचे त्याचे कोणीही नातेवाईक नव्हते. प्रिया म्हणजे प्रणवची बायको आणि अवनी प्रणवची लहान मुलगी. असे त्यांचे लहानसे कुटुंब होते. प्रिया ही आय.टी. इंडस्ट्रीमध्ये वरच्या पोस्टला होती.
असंच एक दिवस  हे छोटेसे कुटुंब जेवणाला बसले असतांना, अवनी आपल्या बाबांना सांगत होती.
" पप्पा, आता ह्या महिन्यात खुप साऱ्या सुट्ट्या   मिळणार आहेत. आपण जायचे का रक्षाबंधनच्या दिवशी कुठे तरी!"
नाही तरी ऑगस्ट महिना म्हणजे सणांनी गजबजलेला महिना असतो, त्यामुळे त्यांचे ठरलेले असायचे  तिघांनाही सुट्टी मिळाली की ते कुठे तरी एखादे छानसे रिसॉर्ट बघून फिरायला जायचे.
लागलीच प्रिया प्रणवला सुचवत म्हणाली.
"प्रणव, माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे,ह्या रक्षाबंधनच्या दिवशी मलाही सुट्टी आहे आणि असेही अवनीला भाऊ नाही  त्यामुळे आपण अनाथ आश्रमातील मुलांना अवनीकडून राखी बांधण्याचा कार्यक्रम केला तर....
नाही म्हणजे तुला माझी कल्पना आवडली असेल तर आपण नक्कीच जाऊ!"
" प्रिया, तुला चांगलंच माहिती आहे, की मी गेल्या 20 वर्षात स्वतःच्या हाताला कधी रक्षाबंधनाच्या दिवशी  कुणाकडून राखी बांधुन घेतली नाही!"
"पण का नाही बांधत तू राखी प्रणव...??"
क्षणभर प्रणव काहीच बोलला नाही. खुप काही बोलायचं होत तिच्या सोबत पण आज ती समोर नव्हती. तिच्या आठवणी मात्र अजूनही तश्याच होत्या, कोणत्या माणसांच्या गर्दीत ती हरवली होती, फक्त आठवणींचे एक नाव सोडून गेली होती. प्रणवच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले होते, डोळे अश्रूनी  काटो काट भरून निघाले होते. क्षणभर त्याच्या समोर त्याचा निघून गेलेला शांताचा तो लहानपणीचा चेहरा हळूच डोळ्यांसमोर तरंगून गेला.परत जाग्या झाल्या त्या भूतकाळातल्या आठवणी, नकळत त्याच्या तोंडून भरभर शब्द निघाले  
"प्रिया... गेल्या 20 वर्षात कशी दिसत असेल गं, शांता...? मी जर समोर गेलो तर मला तरी ओळखेल का गं ती ...?"
"प्रणव... तू कुणा विषयी बोलतो आहे मला काहीच समजतं नाही बघ..!"
"अगं... प्रिया मी शांता विषयी बोलतो आहे, माझी शांता, माझ्या कुशीत घेऊन मी तिला तासन तास फिरवायचो. कधी माझ्यापासून तिला दूर ठेवले नाही. आणि अशी अचानक माझ्या जीवनातून चिमणीसारखी भुर्ररकन उडूनही गेली ती, जराही मी जवळ नाही दिसलो की खुप रडायची गं ती.... श्वास होता तो माझा आणि उरलेलं शेवटचं नात. माझी लहान बहीण.
गेल्या इतक्या दिवसात मी कधी तुमच्या दोघींना याबद्दल सांगितलं नाही पण माझी एक बहीण आहे ह्या जगात पण माहित नाही आज कुठे असेल.मी उद्याची राखी बांधेल तर तिच्या हातूनचं "
अस म्हणतं प्रणव रडू लागला,
प्रियाने त्याला समजावले पण, रात्रभर तो झोपला नाही, सारखा शांताचा विषय निघाला म्हणून विचार करत बसला.
अशीच रात्र उलटून गेली, रक्षाबंधनाचा दिवस उगवला. प्रिया आज जरा लवकर उठली होती, छान तयार होऊन तिने अवनीला ही तयार केले होते. प्रणवला त्यांना बघून आश्चर्य वाटले.
"कुठे निघालात तुम्ही एवढ्या सकाळी सकाळी आणि एवढं नटून थटून!"
"काही नाही बस्स... आज जायचं ठरलं आहे ते शांताला भेटण्यासाठी.
तू पण लवकर आवरून तयार हो,आज आपण तिला नक्कीच भेटणार देवाची कृपा असेल तर आणि तूझ्या मनगटाला  राखी बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार !"
"पण प्रिया तिला शोधणार तरी कुठे, जिकडे तुमची शेवटची ताटातूट झाली त्या ठिकाणी  जाऊन आपण माहीती काढणार आणि थेट तिच्या नवीन आई बाबांशी बोलणार."
प्रिया, प्रणव व अवनी गाडीत बसून त्या अनाथ आश्रमात येतात जिकडे त्यांची शेवटची भेट झाली होती, तिकडूनच शांताला, स्टार कंपनीचे मालक, अरविंद देशमुख व त्यांची पत्नी डॉ. शारदा देशमुख यांनी दत्तक घेतले होते. ते आता कंपनीच्या कामासाठी थोड्या वर्ष्याच्या कालावधीसाठी अमेरिकेत रहात होते. पण पुढील वर्षात ते परत नवी मुंबईमध्ये स्थिरावणार होते. पण नुकत्याच थोड्या दिवसांकरिता देशमुख कुटुंब आता मुंबईमध्ये आले होते.
गाडीत बसल्या बसल्या प्रणवच्या डोळ्यांसमोर  शांताची शेवटची भेट आठवत होती.
*****
एक लहानसे गाव त्यात काशिनाथ आणि गिरीजा एका झोपडीत काबाड कष्ट करून आपले हातावर चालणारे पोट भरत होते. त्यात त्यांना दोन आपत्य एक शांता आणि दुसरे गोपी (गोपी म्हणजेच प्रणव होता.)
गिरीजा लोकांचे कपडे, भांडी धुण्याचे काम करत असे,पण स्वप्न मात्र तिने मोठे बघितले होते. आपल्या मुलाला मोठे इंजिनीयर बनवायचे, पण नियतीला हे स्वप्न साकारतांना थोडा अधिकच वेळ लागणार होता.
एक दिवस असचं काशिनाथ झोपडीच्या दाराजवळ बसलेला असतांना त्याला अचानक मळमळुन आले आणि त्याला रक्ताच्या उलट्या सुरु झाल्या, डॉक्टरकडे गेले असतात समजले की काशिनाथला टी.बी आजार झाला आहे. पण कर्जबाजारी कुटुंब,  करून करून पैश्याची व्यवस्था करणार तरी कुठून. लहान गोपी एका हॉटेलावर कामाला लागला, शिकण्याच स्वप्न बाजूला ठेऊन घरची परिस्थिती डोळ्यांनमध्ये तो साठवत होता. घरापासून दूर शहरात एका हॉटेलवर तो कामाला लागला.
हालाकीचे दिवस काढत कसा बसा जगत होता. रोज घरची वाट बघत रडत होता. पण करणार तरी काय...?
तश्यातच घरची बातमी आली की काशिनाथ आता राहिला नाही, लहान शांताला घेऊन गिरीजा कशी बशी जगत होती. कर्जबाजारीमुळे लोकांनी तिचे जगणे कठीण करून टाकले होते. 
होती नव्हती ती झोपडीही आता  पावसाने वाहून गेली होती. लहानश्या शांताला घेऊन गिरीजा आता तालुक्याला येऊन पोहोचली होती. पोटच्या मुलाचे स्वप्नपूर्ण व्हावे म्हणून  तिने गोपीला आणि शांताला अनाथआश्रमात  सोडले होते. जरा वेळासाठी बाहेर जाऊन येतें म्हणतं ती कायमची त्यांना सोडून गेली होती. ती ह्या जगात आहे की नाही हे देखील त्या लेकरांना माहित नव्हते. 
आता त्या दोघांना एकमेकांशिवाय ह्या जगात दुसरे कुणीचं नव्हते. गोपी थोडा समजदार  होता म्हणून तो आपल्या बहिणीला सांभाळू शकत होता. अगदी थोड्याच दिवसात शांताला नवीन आई वडील मिळणार होते ते म्हणजे, अरविंद देशमुख आणि शारदा देशमुख.
शांताला ते दत्तक घेणार होते. 
अगदीच थोड्याचं दिवसांनी पुण्यातले विजय पटेल यांनी गोपीला दत्तक घेतले होते. त्याचे नामकरण प्रणव असे केले होते,
एकमेकांपासून दूर गेलेले भाऊ बहीन एकमेकांच्या  नजरेच्या आड निघून गेले होते कायमचे. 
******
प्रणवला देशमुख साहेबांचा पत्ता आश्रमातून मिळाला होता. त्याने वेळ वाया नं घालवता गाडी त्यांच्या घराकडे नेली.
घराजवळ येताच त्याचा हृदयाचा ठोका चुकला, चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. कशी असेल माझी बहीण..? मला तरी ओळखेल का..? असे नाना प्रकारचे प्रश्न डोक्यात घर करत होते. बाकी काहीही असो आज तर राखी बांधूनच जाणार आणि कायमचे माझ्या बहिणीशी नाते जपण्याचे आश्वासन पाळणार. असे म्हणतं प्रणव गाडीतून उतरला.
दारावरची बेल वाजवली.
"टिंग... टॉंग, टिंग...टॉंग " दार उघडले गेले, खरं तर दारात एक सुंदर नटलेली देखणी सडपातळ बांधा असलेली मुलगी उभी होती. अंगावर  काठापदराची साडी तिला उठून दिसत होती. ते कमरेला भिडणारे  केस तिची आणखीच शोभा वाढवत होते.
प्रणव तिच्याकडे बघतच राहिला.जसे तिला बघून त्याच्या डोळ्यांचे पारणें फिटली असावी.
" कोण पाहिजे तुम्हांला...? "
त्याच्या तोंडातून शब्द निघत नव्हता. तो तिच्याकडे बघत बसला. ती काय विचारते यावर त्याचे बिलकुल लक्ष नव्हते. तेवढ्यात प्रियानेच बोलायला सुरुवात केली.
" हे देशमुख साहेबांचे  घर काय...? "
"हो, पण आपण कोण..?आत या ना...!"
असे म्हणतं तिने त्यांना आत बोलावले.
बोलता बोलता देशमुख साहेबांजवळ प्रणवने गेल्या वीस वर्ष्यापूर्वीची ओळख काढली .
ओळख सांगता सांगता त्याला गहिवरून आले. आतल्या खोलीमधून दिव्या (शांता )हे सारे एकत होती. तिला हे सारे समजले होते,  तिलाही गहिवरून आले. ती त्यांच्या समोर येऊन उभी राहिली.
प्रेमाने भावाला गच्च मिठी मारली.
त्या दिवशी रक्षाबंधन होते, प्रणवने तिच्या हातची राखी आजपर्यत सोडली नाही तिच्यात आठवणीत बरेच काही होते त्या रेशमी धाग्यात. राखी फक्त रेशमी धाग्याची नसून बहिणीच्या प्रेमाची होती.


लेखिका :- सौं रुपाली बोरसे.