एक बंधन

फक्त दिड दोन महिन्यांची ओळख ! आणि ती म्हणत होती, 'तुझा गृप सोड ! मी किंवा ते." का बरं सायलीत माझा ज??

"एक बंधन"

          "चल दादा, येते मी बाSSय."
          खांद्यावरची सॅक सावरत सायु म्हणाली.

          "ओक्के. रात्री ऑनलाईन ये,गप्पा मारूयात." मी बोललो.

          "हो, वेळ भेटला तर नक्की." हातातल्या मोबाईलकडे बघत ती म्हणाली.

          मी एक हलकसं स्मित केल्यावर गोड हसून सायुनं कॉलेज कट्ट्यावरून आमचा निरोप घेतला आणि ती चालू लागली. आता कट्ट्यावर स्मृती आणि मी दोघंच उरलो. आमची बस येण्यासाठी अजून अर्धा तास बाकी होता म्हणून आणखी काहीवेळ आम्ही दोघं तिथेच रेंगाळणार होतो. सायु मार्गाला लागताच मी मान वळवून समोर स्मृतीकडे बघितलं तर ती अजूनही कॉलेजच्या गेटकडे जाणार्या पाठमोऱ्या सायुकडे पाहत होती. मी एकदा तिकडे एकदा इकडे असं करत स्मृतीची गंमत बघत होतो. एव्हाना सायली गेटच्या बाहेर पडून दिसेनाशी झाली आणि स्मृती ताळ्यावर आली. मला हसू आलं. मला हसताना बघून स्मृतीनं विचारलं,

          "का हसतोय रे ?"

          "आधी मला सांग तू सायुकडे एवढी टक लावून का बघत होतीस ?" मी प्रतिप्रश्न केला.

          "काही नाही... अशीच.. विचार करत होते.."

          "कसला ?" मी विचारलं.

          "कसं जमतं रे तुला इतकं सहजपणे कुणाशी नातं जोडायला ?" स्मृतीनं प्रश्नांची मालिका कंटिन्यू केली.

          "म्हणजे ?" मी हसलो.

          "अरे कोण कुठली ही कालची मुलगी; अलगद आपल्या गृपमध्ये सामावून घेतलीयेस ?"

          "का ? आवडलं नाही ? की आवडली नाही ?" मी खोचकपणे खेचली.

          "तसं नाही रे पण बघ ना किती रूळलीये ती इतक्या लवकर आपल्यामध्ये, आपण तिला सिनीयर असूनही.. ते फक्त तुझ्यामुळे."

          "मग ?"

          "मग काही नाही. रडशील तू एक दिवस !"

          "इम्पॉसिबल ! आणि तुला असं का बरं वाटतंस माझे राणी ?" मी.

          "मी आज नाही ओळखत तुला. सेंटी आहेस तू. ऊद्या सायली शी कशावरून वाद झाला आणि ती जर तुला सोडून गेली ना तर त्रास होईल लक्षात ठेव."

          "वाद का बरं होईल ? "

          "तू ना... खूप सरळ स्वभावाचा आहेस. तुला आजिबात माणसं ओळखता येत नाहीत. सगळं जग तुला तुझ्यासारखंच सरळ स्वभावाचं वाटतं."

          "असू शकेल पण, 'आपण जसं कुणाशी वागतो तेच रिफ्लेक्ट होऊन आपल्याकडे परत माघारी येतं' अशी माझी धारणा आहे. आजवर अनेकदा हे अनुभवलंय म्हणून तुला जी भिती वाटतेय, सायलीबरोबर माझा वाद वगैरे होईल किंवा काय नी मग मला त्रास होईल, हे पटत नाही." मी म्हणालो.

          "एखाद्या दिवशी अनुभव घेशील तेव्हा सांगशील मला येऊन, तुझी धारणा की काय ती कुठं गेलीस ते."

          "धारणा जाऊदे कुठंही, आपली बस निघून जायला नको." मी हातातल्या घड्याळाकडे बघत हसत विषय बदलवला.

          "हम्म् चल." सॅक घेऊन ती उठली आणि आम्ही दोघे कॉलेजमधून बसस्टॉपकडे जायला निघालो.

          मोकळी बस बघून दोघांनाही हायसं वाटलं.

          "आज मोकळी !" स्मृती आनंदानं चित्कारली. मला गंमत वाटली, हसू आलं.

          "कोपऱ्यातले सीट्स!" मी तिच्या कानाजवळ मुद्दामहून कुजबुजलो.

          "येड्पट" ती त्रासली. यावर मी नेहेमीचं खट्याळ हसलो.

          बसमध्ये चढून आम्ही मागच्या पुढच्या सीट्सवर बसलो. तिने पाठीमागे तोंड फिरवलं न् आमच्या टाईमपास गप्पा रंगल्या.
          स्मृतीचा स्टॉप येताच ती 'बाय' बोलून उतरून निघून गेली आणि मी मघाशी कट्ट्यावर झालेल्या आमच्या संवादावर विचार करायला लागलो. विचारांची गाडी सायलीबरोबर झालेल्या पहील्या भेटीवर येऊन स्थिरावली आणि मी आमच्या दोघांत बहरलेल्या नात्याचा मागोवा घ्यायला लागलो.


          कॉलेज सुटलं होतं. नेहेमीप्रमाणे कट्ट्यावर धम्माल चालू होती. एकमेकांची मनसोक्त खेचणं सुरू होतं. एवढ्यात,
          "एक्सक्यूज मी, आपल्यामध्ये स्मृती कोण आहे?"
          पाठीमागून जवळून एका मुलीचा आवाज आला म्हणून मी मागे फिरलो तर माझ्या पुढ्यात पाच-सहा फुटांवर एक गोड चेहऱ्याची, गव्हाळ वर्णाची मुलगी ऊभी होती. तिच्याकडे बघून लगेच कळलं, फर्स्ट इयर ची नविन मुलगी आहे. तिची न् माझी नजरानजर झाली. इतक्यात पाठीमागून आमच्या कंपूतून एकजण म्हणाली.

          "स्मृती ?..ती काय तुझ्यासमोर, तुझ्याकडे बघत ऊभी आहे." आणि लगोलग सगळ्या कट्टेकरांचा हास्यकल्लोळ झाला. केलेली कमेंट माझ्यासाठी होती. स्मृती आज लवकर घरी निघून गेली होती.

          समोरची मुलगी हसू दाबून गप्प ऊभी होती. तिचा हसू आवरण्याचा आटोकाट प्रयत्न माझ्या नजरेतून सुटला नाही.

          "यांच मनावर घेऊ नकोस. बोल काय काम होतं ?" मी तिचं अवघडलेपण दूर करत बोललो.

          "स्मृतीकडे होतं. नाहीये का ती येथे ?"

          "ओ मॅडम, स्मृती नाहीये. ती गेली घरी पण स्मृतीची 'स्मृती' आहे, सांगा काय ते" आणखी एक पुरूषी कमेंट माझ्यासाठी पास झाली.

          "मला स्मृतीचा नंबर द्याल ?" तिनं अपेक्षेने विचारलं.

          'हो, घे.' म्हणत मी तिला नंबर सांगितला. तिने तो आपल्या मोबाईलमध्ये सेव करून घेतला.

          "तुझं नाव ?" इति मी.

          "कशाला रे ?" एक मित्र मधेच बोलला.

          "राssहुssल, स्मृ रागावेल." दिशाने सूर लावला.
          मी कट्ट्यावरील मित्रमैत्रिणींकडे त्रासून पाहीलं.

          "मी सायली ! सायली ****" ती मुलगी उत्तरली.

          "सायु !" मी उद्गारलो.

          "हम्म्..दादा." ती गोड हसून बोलली. तिने मला दादा म्हणून संबोधल्यानं कट्टेकरांनी पुन्हा एकदा हसून खसखस पिकवली.

          "राहुलदादा !" तिच्या नजरेत नजर मिसळत मी सहजपणे तिला आपलं बनवलं.

          ही होती सायुबरोबरची माझी पहीली भेट आणि झालेली ओळख, सहज जोडलेल्या एका सुंदर अशा नात्याची सुरवात. कंडक्टरनं माझ्या स्टॉपची घोषणा केली न् मी कट्टास्मृतीतून जागा झालो. सॅक खांद्यावर अडकवत बसमधून लगबगीने खाली उतरलो.


          अवघ्या महिन्याभरात आमच्यामधलं बहिणभावाचं नातं बहरू लागलं. समदु:खी लोकं लगेच जवळ येतात असं म्हटलं जातं. मला वाटतं ते बऱ्याच अंशी खरं असावं. सायली न् माझ्याबाबतीत असंच काही झालं असावं. आमच्या दोघांच्याही जिवनात 'त्या' जिवन समृद्ध करणाऱ्या नात्याची कमतरता होती. आम्हाला दोघांनाही आपले हक्काचे बहीणभाऊ नव्हते. याच कारणानं आमच्या दोघांमधील स्नेहबंध जुळून आले असावेत.


          ऑगस्ट महीन्यातला पहीला शनिवार होता. कॉलेजचे त्या दिवशीचे शेवटचे दोन तास आमचे प्रॅक्टिकल्स होते. स्मृती आणि मी बॅचमेट्स असल्याने बरोबर होतो. दुसऱ्या दिवशीच्या फ्रेंडशीप डेच्या तयारी साठी चर्चा करायला गृपमधील बाकीच्या मित्रमैत्रिणींना, आम्हाला उशीर झालाच तर कट्ट्यावर आमच्यासाठी थांबायला सांगितलं होतं. अपेक्षेनुसार प्रॅक्टिकल्स लांबलेच. कसंबसं लॅब इन्चार्जला गंडवून आम्ही दोघे निघालो. निघताना सवयीप्रमाणे मोबाईल उचकायला घेतले तर त्यावर खंडीभर कॉल्स न् मेसेज आलेले होते. मोबाईल सायलेंट मोडवर असल्याने मघाशी कळायचा संबंधच नव्हता. मेसेज वाचून एवढंच उलगडत होतं की कट्ट्यावर नक्कीच काहीतरी गडबड झालेली आहे. घाईगडबडीने आम्ही दोघं कट्ट्याकडे निघालो. माझ्या फोनवरती आणखी एक मेसेज येऊन धडकला. मेसेज सायलीचा होता. 'आजपासून तुमच्या गृपमध्ये येणार नाही. आपला संबंध कायमचा संपला, बाय.' काय झालं कळायला मार्ग नव्हता. ती फोन उचलत नव्हती. कट्ट्यावर पोहोचलो तर तिथे कोणीच नव्हतं. एकच कळत होतं, सायुबाबत कोणीतरी काहीतरी आक्रस्ताळेपणा केलेला होता. स्मृतीने दिशाला फोन लावला.

          "कट्ट्यावर काय झालं ?" स्मृती.

          "अगं काही विशेष नव्हतं. प्रदिप सायलीची मजाक करत होता तर त्याचं बोलणं तिने मनाला लावून घेतलं.त्यावरून दोघांची भांडणं झाली. आम्ही दोघांनाही समजावलं पण कोणीच माघार घेतली नाही. ती निघून गेली. जाताना रडली. नंतर पद्या सटकला. ऊद्याचा प्लान विस्कटला, थांबण्यात अर्थ नव्हता. आम्ही घरी निघून आलो. तुम्हाला कॉल्स न् मेसेज केलेले.' दिशाने सांगितलं.

          "डिटेल्स दे, नक्की काय झालतं ?" स्मृती.

          "संध्याकाळी भेट मग सांगते. रागिट आहे ती सायली. घमंडी कुठली ! " दिशाने मापं काढले.

          "बरं ठिकेय. संध्याकाळी भेटते. "
          स्मृतीने कॉल संपवून मला काय झालं सांगितलं. मी सायलीला मेसेज केला, 'एकदा कॉल रिसीव कर, प्लीज.'
          पुढच्याच मिनिटाला तिचा मेसेज आला, 'pls,leave me alone.' संवादाचा मार्ग तात्पुरता खुंटला.

          "तू उद्या सायुची भेट घे." स्मृतीने सुचवलं.

          "ठिकेय." बोलून आम्ही मार्गाला लागलो.

          संध्याकाळी सायलीचा आपण होऊन फोन आला. दुपारी काय झालं ते तिनं मला सगळं सविस्तर सांगितलं. विशेष काही नव्हतं पण बोलण्या-बोलण्यात अन् समजून घेण्यात एकमेकांचे गैरसमज झालेले होते आणि त्यामुळे वाद विकोपाला पोहोचून मनं दुखावली गेली. मी सायलीसमोर चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रस्ताव मांडला. तो तिने सरळसरळ धुडकावून लावला.

          "मी तुमच्या गृपमध्ये येत होते त्याला काहीतरी कारणे होती. काही होतं असं, जे मला तुमच्यात मिसळण्यासाठी प्रवृत्त करत होतं. पण आजच्या वादानंतर सगळ्यांचे स्वभाव कळाले. मी आता कधीच तुमच्यामध्ये येणार नाही." ती रडवेली होत बोलली.

          "सायु, थोडं समजून तर घे. सगळे भेटू, चर्चेतून मतभेद मिटवू. कळतनकळत झालेले गैरसमज दूर होतील..."
          माझं बोलणं मध्येच तोडत ती रागाने उसळून बोलली,
          "गैरसमज ?? कुठले गैरसमज ! आहेस कुठं तू ? तो प्रदिप काय बोल्ला माहितीये का ? 'तू असशील त्या राहुलची लाडकी, आमची नाहीस. त्याच्या डोक्यावर जाऊन बस. आमच्यात नाही आलीस तरी चालेल.' असं बोललाय तो... आणि तू म्हणतोस गैरसमज दूर करू. काही गरज नाहीये मला. ठेव फोन, नाही बोलायचं मला तुझ्याशीसुद्धा. बाय.."

          "अगं ऐकून तर घे माझं.. चिडतेस कशाला ?"

          "मी चिडत नाहिये आणि मला तुझं काहीसुद्धा ऐकायचं नाही आहे. ऐकायचं असेलच तर तू ऐक माझं, तू तो गृप सोड माझ्यासाठी !" सायलीने मला धर्मसंकटात टाकलं होतं.

          "हे सोप्पंय का माझ्यासाठी ? काहीतरी विचित्रपणाने वागू नकोस. समजून घे.."

          "लहान बहीण मानतोस ना मला ? मग माझ्यासाठी येवढंही करू शकत नाहीस काय ?..मी माझा निर्णय ऐकवलाये. आता तू ठरव काय ते. आजची रात्र घे विचार करायला. बाय."

          "अगं पण..."

          "पणबिन काही नाही...बेस्ट ऑफ लक.. बाय.." माझं बोलणं मध्येच तोडत तिने शेवटचं ऐकवलं.

          या मुलीसुध्दा ना ! कधीकधी एकदम विचित्र अनाकलनीय वागतात. छोट्याशा गोष्टींवरून पटकन गैरसमज करून घेतात, विनाकारण रागावतात. डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. मी पद्याला फोन लावला.

          "हां बोल."

          "दुपारी काय झालतं रे ?"

          "तू लागला का तिची वकिली करायला ?"

          "हे बघ पद्या, ती माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे माहीतीय तुला. उगाच भांडणाच्या ट्रॅकवर येऊ नकोस. काय झालतं ते निट सांग."

          "त्या पोरीला मजाक कळत नाही. एवढा कुठं राग असतोय काय ? उगाच पराचा कावळा करतीये. सोड..मला ह्या विषयावर बोलायचं नाही."

          "हे बघ, तुझी चूक असेल.. मान्य कर. उगाच पळ काढू नकोस."

          "माझी चूक !! ठिक आहे. तुला वाटतंय तसं तर तुला हवं ते कर."

          "तुला नक्की मुद्दा न्यायचा कुठे ते सांग.." मी रागात बोललो.

          "तू योग्य निर्णय घेशील ! चार वर्षांची यारी लक्षात ठेव." तो चिडला.

          "बरं ठिक आहे." आता बोलण्यात अर्थ नव्हता. मी फोन बंद केला.

          वाद, मतभेद यादरम्यान दोन्ही बाजूंनी चर्चेचे मार्ग खुंटले तर मनात एकमेकांबद्दलची निर्माण झालेली अढी वाढतच जाते. पुन्हा संवादाची सगळी शक्यता मावळते. निर्माण झालेले मतभेद, मनभेदांत रूपांतरीत होतात आणि सगळेच संबंध कायमचे संपुष्टात येतात. हे होऊ नये म्हणून चर्चेसाठी कुणी एकाने पुढाकार घेणं गरजेचं असतं. येथे तर ती शक्यता आता मावळलीच होती. त्रयस्थ म्हणून मी घेतलेला पुढाकार दोघांनीही आपापले निर्णय ऐकवून नाकारला होता. उलटपक्षी मलाच धर्मसंकटात टाकलं होतं. प्रदिपबरोबर चार वर्षांपासूनची जिवलग मैत्री होती आणि सायली...???

          फक्त दिड दोन महिन्यांची ओळख ! आणि ती म्हणत होती, 'तुझा गृप सोड ! मी किंवा ते." का बरं सायलीत माझा जिव अडकत होता ? काय होतं असं तिच्यात, जे मला तिच्याकडे खेचत होतं ? कोण कुठली ही कालची मुलगी जी आज भावनिकदृष्ट्या माझ्या मनावर स्वार होत होती ? का बरं मला तिची इतकी ओढ वाटत होती ?
          ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं केवळ एकाच शब्दानं मिळत होती,

          'प्रेम'

          जे आजवरच्या माझ्या जिवनात माझ्या वाट्याला कधीच आलं नव्हतं, 'लहान बहीणीचं निरागस प्रेम !' जे मी तिला बघताना, तिच्याशी बोलताना, हितगुज साधताना अनुभवायचो.

          कित्येक वर्षे सरली होती. वर्षातले 'ते' दोन दिवस मी मनोमन कुढत काढायचो. कुणाशीही बोलायचो नाही, एकटाच उदास राहायचो. नावाला म्हणण्यापुरत्या लहानपणापासून अनेक बहीणी बनल्या पण त्यातील कुणीही मला इतकी ओढ लावली नव्हती, जी सायुनं मला पहिल्याच वेळी 'दादा' म्हणून संबोधताना लावली होती. चालू वर्ष माझ्यासाठी सायुच्या रुपानं अनमोल भेट घेऊन आलं होतं आणि मध्येच हे असं विपरीत घडलं. ऊद्या फ्रेंडशीप डे होता आणि नंतर आठ दिवसांवर राखी. एकीकडे जिवलग मित्र, दुसरीकडे मानलेली बहीण. निर्णय करणं खरंच कठीण होतं. मी शांतपणे उदास होऊन डोळे मिटले.

          सकाळी सकाळी स्मृतीचा फोन आला.

          "बोल." मी.

          "साई रिसॉर्टला सगळ्यांनी यायचा प्लान ठरलाय दुपारी चारला." स्मृती.

          "मग?"

          "तुलाही यायचंय."

          "मी नाही येणार."

          "का ?"

          "अ स च.."

          "मला माहीतीय, सायलीशी वाद झाला ना ?"

          "नाही. फक्त फोन."

          "मग ?"

          "मला काय करावं कळत नाही. तुला माहितीय, ती मला महत्वाची आहे."

          " हो तर.. पण आम्ही कुठं काही बोललो का ?"

          "पण ती बोललीये."

          "काय ?"

          "मी किंवा तुझा गृप."

          "हे अती करतीये ती ! ठरव काय ते."

          "आता तूही काहीतरी नविन ऐकव." मी रागात बोललो.

          "मी सायलीही नाही अन् प्रदिपही नाही. तू चांगला ओळखतोस मला. मला माहितीय, आठ दिवसांवर रक्षाबंधन आहे जे तुझ्यासाठी महत्वाचं आहे. हवं तर आज येऊ नकोस, फोन बंद ठेव. मी सगळ्यांना समजावेन पण एक लक्षात ठेव, 'तुला जेवढी सायलीची ओढ आहे तेवढीच तिला तुझी असेल तरच नात्याला काहीतरी अर्थ आहे. आणि तिला जर खरंच ओढ असेल तर आज तू आलास तरी तिला काहीही फरक पडणार नाही. तुझी ह्या वर्षीची राखी नक्की असेल.' बघ, विचार कर. ठेवते मी. बाय, टेक केअर." स्मृतीने फोन बंद केला.

          मी आणखीनच विचारात गढलो आणि शेवटी सगळी मरगळ झटकून, उठून आवरायला लागलो.

          दुपारी चार वाजता मी साई रिसॉर्टवर मित्रमैत्रिणींसोबत फ्रेंडशीप डे चं सेलिब्रेशन करत होतो. मैत्रीच्या नव्याजुन्या आठवणींना ऊजाळा देत होतो. संध्याकाळी सात वाजता सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि मी रूमवर परतलो.
          आजचा कॅमेऱ्यात बंद झालेला दिवस गृपमधल्या मित्रांनी आठ-साडेआठला फेसबुकवर शेअर केला. पाचच मिनिटांत सायलीचा व्हाट्स अप वर फोटोला टॅग करून मेसेज आला,

          "Congratulations."

          "Pls, understand."

          "गरज नाही. तुझा गृप तुला लखलाभ."

          "मान्य आहे, तुझे त्यांच्याशी मतभेद झाले आहेत, पण त्याचा त्रास मला का देतेस ? "

          "अरे व्वा ! तुला त्रास होतोय तर.."

          "तुला माहीतीये, तुझं माझ्या जिवनातील महत्व काय आहे ते."

          "हो तर ! पण ते तुला माझ्यापेक्षा जास्त चांगलं माहीती आहे आणि म्हणून तर मी काल सांगूनही तू आज त्यांच्यासोबत 'Celebration' करत होतास ! नाही का ?"

          "सायले, तुझे प्रतिसाद सुन्न करतात ! मी साधा सरळ आहे. उगाच बोलण्यात गोल फिरवू नकोस. मला तू सुद्धा हवी आहेस."

          "गरज नाही इमोशनल व्हायची. मला नाही बोलायचं तुझ्याशी. जस्ट गो टू हेल. ब्लॉक करतीये मी. परत कॉंटॅक्ट करू नकोस. "

          मी दिलेला प्रतिसाद टिक झालाच नाही. तिनं नंबर ब्लॉक केला होता. मी हताश झालो.

          पुढील चार-पाच दिवस सायली मुद्दामहून कॉलेजला आलीच नाही. भेट होण्याचा संबंधच नव्हता. ना ती कोणाचा फोन उचलत होती ना ब्लॉक काढत होती. ऊद्या राखीपौर्णिमेचा दिवस होता. एक उदासी मनांत भरून राहीली होती जी खूप असह्य होत होती. कोणातही बोलू वाटत नव्हतं. एक विचार मनांत आला आणि मी चमकलो. 'जर माझी ही अवस्था असेल तर सायलीची सुद्धा अशीच अवस्था असेल का ?' मी तिच्या भुमिकेत शिरून विचार करू लागलो आणि मनाशी काही पक्कं ठरवलं.
          स्मृतीला फोन करून , सायलीशी कसाही कॉंटॅक्ट करून तिची मनस्थिती जाणून घेण्यास सांगितली.

          सुमारे तासाभराने मला सायलीचा एक मेल आला.

"राहुलदादा,
          लहानपणापासून एकटी वाढले. आईबाबा, बहीणी सर्व होते पण नेहेमी एका भावाची कमी वाटत राहीली. मैत्रिणींचे भाऊ बघून मनांत नेहेमी चरफडत रहायची. शाळेत असताना नेहेमी एका भावाचा शोध घेत राहीले जो कधीच मला भेटला नाही. सतत वाटायचं मला समजून घेणारा, ज्याच्याजवळ कसला हट्ट धरता यावा असा हक्काचा भाऊ असावा. पण मला तो कधीच कुणात सापडला नाही. शाळेत साजरा होणारा सण हा फक्त नावापुरताच असायचा. बहीणभावाच्या नात्यातील प्रेमाची ओल त्यात कधीच नव्हती. पुढे ज्यु. कॉलेजला गेल्यावर तर कुणाला दादा म्हणून संबोधन्याचा विषयच नव्हता. कॉलेजात असं काही बोलणं, मानणं एकदम ऑड समजलं जायचं. शेवटी या निर्णयाप्रत आलेली, 'आपल्या नशिबात हक्काचा भाऊ नाहीच आहे.'

          तुला माहीतीये का दादा, मी लहान असल्यापासून राखीच्या दिवशी काय करतीये ते ? मी बाप्पाच्या मूर्तीला राखी बांधते. कृष्णाच्या फोटोशी त्याला भाऊ समजून बोलते. माझ्या आजवरच्या भावविश्वात तेच दोघेजण माझे खरेखुरे भाऊ राहीले आहेत. तेच माझे जिवलग सोबती बनले. तू सहजपणानं माझ्याशी जोडलेलं नातं बघून मी हरखून गेले. तुझ्या गृपमध्ये मिसळले. त्यामागे 'माझ्या दादाचा गृप' ही प्रबळ भावना होती. कधी नव्हतं ते मला गवसलं होतं. तुझी सोबत, तुझं प्रेमाचं बोलणं हवंहवंसं वाटत होतं. अजूनही वाटतं.

          देशाच्या सिमांवरती लढणाऱ्या जवानांसाठी निरनिराळ्या संस्थांमार्फत पाठविल्या जाणाऱ्या राख्यांच्या उपक्रमात मी दरवर्षी न चुकता भाग घेत असते. त्यावेळी त्यामागे, कुणी माझ्याचसारखा अभागी भाऊ असेल ज्याला बहीण नसेल; तो माझी राखी हातात बांधून आनंदीत होईल ही भावना असते. महीन्याभरापूर्वी राख्या जमवून पाठवताना, यावर्षी आपल्याला खऱ्याखुऱ्या भावाला आपल्या हाताने प्रत्यक्ष राखी बांधता येणार या विचारानं मी गहीवरून गेले होते. तो आनंद मी शब्दांमध्ये वर्णूच शकत नाही. गेला संपुर्ण एक महीन्याचा काळ माझ्यासाठी एक आनंदाचं पर्व ठरलेला. पण मागच्या आठवड्यात तुझ्या गृपसोबतच्या कॉन्फ्लिक्टनं माझ्या आनंदावर विरजण पाडलं आणि मी निराश झाले. रागाच्या भरात तुलाही नको ते सुनावून बसले. माझ्यात तुला स्वत:होऊन फोन करायची हिम्मत नाही. ना तुझ्यासमोर ऊभं राहण्याची. मला मघाशी स्मृतीचा फोन आला. म्हणून तुला हे लिहून पाठविण्याचं धैर्य मी गोळा करू शकले. सॉरी दादा. मला माफ करशील ना ? तुझ्या ह्या लहानग्या सायुला समजावून घेशील ना ? प्लीज..एकदाच...
―तुझी सायु."


          पत्र वाचून संपलं होतं. मोबाईल च्या स्क्रीन वर डोळ्यांतील आसवं टपकली. स्क्रीन अंधूक झाली. आता तिला फोन करणं अथवा मेसेज करणं मला शक्य नव्हतं. मी स्वत:ला सावरू शकत नव्हतो. मी शांत बसून राहीलो.

          "कुठं आहेस रे ?" सकाळी स्मृतीचा फोन आला.

          "रुमवर."

          "लवकर ये, आपल्याला जायचंय."

          "कुठं ?"

          "सायलीच्या हॉस्टेलवर."

          " आं ?? येडीयेस काय ? तिथं ती खडूस रेक्टर आत येऊन देईल का ? तिचा न् माझा छत्तीसचा आकडा आहे."

          "भलत्या शंका नको काढूस. मी सगळं प्लान केलंय."

          "निट सांगशील का ? "

          "तुला बाकी काय करायचंय ? तू ये फक्त."

          "ठीक आहे. मी असं करतो, तिथे हॉस्टेलवरच येतो."

          "ओके. दहा वाजेपर्यंत ये."

          पावणेदहा वाजता मी हॉस्टेलच्या गेटवर पोहोचलो तर तिथे स्मृती, दिशा, आशिष, प्रणव, गौरव, विहान आणि प्रदीप असे सर्वजण आलेले होते. गेटवर एंट्री करून आम्ही तेथील हॉलमध्ये थांबलो.

          थोड्या वेळाने सायली आम्हाला सामोरी आली. आसवांनी तिचे डोळे भरून आलेले होते. हातात निरंजनाचं भरलेलं ताट होतं. निरंजनाची समई मंद प्रकाश पसरवत होती. मी नुसता बघत राहीलो. तिनं मला निरंजनानं ओवाळलं. जिवनात पहील्यांदाच मी काहीतरी वेगळं अन् अदभूत अनुभवत होतो. ओवाळून होताच तिने ताटातली राखी आपल्या नाजूक हातांत घेतली. तिच्यावरील अक्षरे चमकली, 'राहुलदादा' अशी !

          मला गलबलून आलं. सायु ती राखी माझ्या हातात बांधत असताना माझ्या तळहातांवर तिच्या डोळ्यांतून नितळ आसवं टपकली. त्या पडलेल्या जलमौक्तिकांनी मी जिवनात भरून पावलो होतो.

खेळकर खोडकर ती एक सखी
हसत हसत हाती बांधितसे राखी ॥

रुसवा फुगवा रोजचाच असतो
सॉरी बोलताच खुद्कन हसते ॥

मैत्रिणीशी बोलताना मुद्दाम चिडविते
वहिनी आणावी म्हणूनी पाठी लागते ॥

गोंधळल्या दादाला पटकन सावरते
दादा बोलूनी कॉलेजात मिरविते ॥
[पूर्वप्रकाशित]
―र ! /११-१२/९/१७