आनंद कशात असतो...

My Concept Of Joy


आनंद ही एक सुखद भावना आहे. पण आनंद कशात आहे किंवा आनंद नेमका कश्याने मिळतो हे भल्याभल्यांना न उलगडलेले कोडे आहे...

माझं असं म्हणणं आहे की आनंद हा एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या घटनेतील किंवा प्रसंगातील सकारात्मकता स्वीकारण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतो.

फार डोईजड तत्वज्ञान झालं का? सांगते, माझा मुद्दा छोट्या छोट्या उदाहरणावरून समजावून सांगते..

स्वर्णिमा आज खूप आनंदी आहे. आठव्या इयत्तेचा निकाल आलाय अन् तिला 85% गुण मिळालेत. आकांक्षा मात्र नर्व्हस आहे, सकाळपासून शांत बसलीये कारण तिला 85% च गुण मिळालेत.
स्वर्णिमाला वाटतंय की उत्तीर्ण होण्यासाठी लागणाऱ्या 35% पेक्षा तिला तब्बल 50% गुण जास्त मिळालेत. शिवाय 98% गुण मिळवणारी मुलगी उत्तीर्ण होऊन नववीत जाणारे आणि ती सुद्धा नववीतच जाणार आहे... so दोघी सारख्याच..मग मॅडम खूष खूष...

आकांक्षा मात्र 98 % वाली पेक्षा मी कुठे कमी आहे ह्याचा विचार करतेय.
स्वर्णिमाची सकारात्मकता स्वीकारण्याची क्षमता जास्त आहे म्हणून ती जास्त आनंदी आहे.

कविता अन् अनिता दोघी ऑफिसमधील मैत्रिणी...दिवाळीमध्ये दोघींकडेही त्यांच्या नणंदा मुलाबाळासह राहायला येणार आहेत.
अनिता ही बातमी कळल्यापासून कुरकुर करतेय. तिला आता कामाचं जास्त लोड येणार,नणंद खूप शिष्ठ आहे, खर्च वाढणार वगैरे वगैरे...
कविता मात्र खूप आनंदी आहे. तिनं नणंदेची मदत घेऊन तिला आवडणाऱ्या नणंदेच्या हातखंडा करंज्या बनवून घ्यायचं ठरवलंय. शिवाय लेक आली की तिच्या सासूबाई लेकीसाठी नवनवीन पदार्थ बनवतात त्यामुळे हिलाही ते खायला मिळतात. मग हिने रात्री खिचडीचा कुकर चढवला तरी चालतोय. मुलं पाहुण्या मुलांसोबत रमतात, त्यांना चारचौघामध्ये राहण्याची सवय होते वगैरे वगैरे...

कविता आणि अनिता ह्या दोघींकडील परिस्थिती सारखीच आहे. कवितानं प्राप्त परिस्थितीमध्ये सकारात्मकता शोधलीय अन् अनितानं फक्त नकारात्मक मुद्दे!

वंदनानं नवीन ऑनलाईन बिझनेस सुरु केलाय. त्यात साड्या, ड्रेसेस, ज्वेलरी ती विकते. सुरवातीला जम बसायला वेळ लागतोय.
ह्या बिझनेसमधून फार कमी उत्पन्न होतंय, महिना 1000/- नफा फक्त! एव्हढ्यानं काय होणारे? वंदना वैतागलीय.
"अगं घराची तुझी सगळी कामं सांभाळून घरबसल्या 1000/- मिळालेत ना! महिन्याचा भाजीचा खर्च ह्यातून सहज निघेल" मैत्रिणीनं समजावलं.
"असा तर मी विचारच केला नव्हता." वंदनानं कबुली दिली. आता हळूहळू वंदना कमी उत्पन्न असल्याच्या दुःखापेक्षा मिळतंय त्या आणि तेव्हढ्या स्वकष्टार्जित उत्पन्नाचा आनंद घ्यायला शिकलीये.

कोरोना अन् लॉकडाऊनच्या बिकट काळात आनंदी राहणं तेव्हढं सोपं नव्हतंच. पण आपण निरोगी आहोत, सर्व कुटुंबासोबत आहोत,दिवसातून तीन वेळा पोटभर जेऊ शकतोय हा सकारात्मक विचार ज्यांनी केला ते आनंदी राहिले.

प्रतीक्षाच्या वडिलांचे 65 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले.तीनं हाच विचार करून मनाची समजूत घातली की जास्त त्रास न होता वडिलांची सुटका झाली. कोरोनाकाळातदेखील त्यांना विनासायास योग्य उपचार मिळाले. ह्या सकारात्मक विचारामुळे ती ह्या दुःखातून लवकर सावरू शकली.

विभावरीच्या मुलाला खूप प्रयत्न करूनही मनासारखी नोकरी मिळाली नाही. त्यानं स्वतःच्या गावातच दुकान थाटलं. नातेवाईक, शेजारीपाजारी त्याला नोकरी नाही म्हणून सहानुभूती दाखवत. विभावरी आणि तिच्या नवऱ्यानं मात्र ह्यातही सकारात्मक दृष्टिकोन ठेवलाय. त्यांचं स्वतःचं दुमजली घर आहे, दोघांनाही पेन्शन आहे त्यामुळे आर्थिक अडचण नाही. त्यामुळे आपला मुलगा आपल्या गावी,आपल्याजवळ आहे,एकमेकांचा एकमेकांना आधार आहे, ह्यात ते तिघंही आनंदी आहेत.

आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात सकारात्मक आणि नकारात्मक. सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडणं शक्यच नाही. मनाविरुद्ध घटना घडल्या तरी त्यातली सकारात्मकता आत्मसात करणं म्हणजे आनंदी /सुखी /समाधानी असणं असं मला वाटतं. तुमचं काय मत आहे?