मागील भागात आपण पाहिलं की सुलोचनाची अवस्था मोहन फार वाईट करतो, त्यात त्याची आई त्याला साथ देते. प्रियाला बर वाटत नसल्यामुळे सुलोचना तिला घेऊन डॉक्टरकडे जाते. आता पाहूया पुढे,
तिने ते मंगळसूत्र गळ्यातून काढलं आणि तडक रीसेप्टनिस्टजवळ गेली. तिच्याकडून घेतलेला तो फॉर्म तिने भरला आणि डिपॉजिट म्हणून तिने तिचं मंगळसूत्र त्या फॉर्मवर ठेवलं. ते पाहून ती मुलगी म्हणाली,
" अहो मॅडम, हे काही करता, तुम्ही पैसे द्या. "
"ताई कृपा करा माझ्याकडे पैसे नाहीत आता. माझ्या मुलीचा जीव वाचला पाहिजे, जो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. "
ती हात जोडत म्हणाली.
" अहो, पण आम्ही सोने नाही ठेवत, हे आमच्या रूल्स मध्ये नाही. तुम्ही पैसेच द्या. "
ती रीसेप्टनिस्ट म्हणाली.
" पण माझ्याकडे आता पैसे नाहीत, येतील तेव्हा देईन. तोपर्यंत तर हे मंगळसूत्र ठेवा."
ती विनवणी करत होती आणि त्या बिचाऱ्या मुलीचा देखील नाईलाज होता.तेवढ्यात तिच्या पाठीवर कोणाचा तरी हात पडला, तिने मागे वळून पाहिलं तर तिची मॅनेजर विद्या होती. विद्याने तिला काय झालं हे विचारलं असता तिने सगळं त्यांना सांगितलं. त्यावर तिने की जो काही खर्च होता तो भरायची तयारी तयारी दर्शवली आणि ऍडव्हान्स सुद्धा देऊन टाकला. तसं प्रियाची ट्रीटमेंट चालू झाली. इकडे सुलोचनाने लगेचच विद्यापुढे हात जोडले आणि पैसे लवकरच परत देईन असं सांगितलं तसं विद्याने तिच्या हाताला धरलं. दोन चहा मागविले आणि त्या दोघी बाजूच्या एका बाकावर बसल्या. विद्याने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाली,
"सुलोचना, मला आश्चर्य वाटतंय, अग दोन दिवसापूर्वी पगार झालाय, आणि तुझ्याकडे आता लेकीच्या ट्रीटमेंट साठी पैसे नसावेत. जेवढं मी तुला ओळखते, तू उधळपट्टी करणाऱ्यामधली नाही आहेस. तेव्हा आता तुला काही प्रॉब्लेम नसेल तर तू मला सांगू शकतेस."
एवढ्या काही वर्षांत सुलोचना फक्त गप्प राहिली. कारण तिची मानसिकता हीच झाली होती की, "स्त्रीला सहन करायलाच लागतं."
पण आता तिच्याच ऑफिसमधल्या मैत्रिणीने खरं तर पहिल्यांदा कुणी तरी विचारल्यामुळे तिला शांत राहवलं नाही. एवढ्या वर्षात पहिल्यांदा ती मोकळी होत होती. तिने विद्याला सगळं सांगितलं. विद्याने तिला आधी पूर्ण मोकळ होऊन दिल आणि नंतर म्हणाली,
"सुलोचना, तू हुशार आहेस, स्वाभिमानी आहेस. मग का सहन करतेयस हे सगळं? अग आज तुझ्या मुलीच्या जीवावर बेतलं, उद्या तुला काही झालं तर तिने काय करायचं? तुला वाटत का तो तुझ्यानंतर तिला बघेल? अग आधी जे झालं ते झालं, तू आता उभी राहा तुझ्या मुलींसाठी, नाहीतर तिलापण तुझ्यासारखच जगावं लागेल. नवरा काही देव नाही, आणि बायको म्हणजे त्याची मालमत्ता नाही. "
सुलोचनाला विद्याचं बोलण पटल. त्या दिवसापासून तिला जाग आली. का सहन करायचं? .प्रियाला घरी घेऊन जाताना तिच्यात एक आत्मविश्वास होता. तिने मनातच आता मी आवाज उठवणार, माझ्यासाठी मलाच उभ राहावं लागेल, कुणी नाही येणार माझ्या मदतीला.
त्याच रात्री मोहन तिला पुन्हा मारायला उठला, तेव्हा पहिल्यांदाच सुलोचनाने त्याचा हात पकडला. आणि त्याच्या डोळ्यांत डोळे घालून ती म्हणाली,
"परत मला हात लावलात, तर याच घरातून मी बाहेर पडेन. माझी नोकरी आहे, माझी ओळख आहे. तुमच्या पैशांची मला गरज नाही, पण माझ्या पैश्यांची तुम्हाला गरज आहे. तेव्हा यापुढे माझ्याशी वागताना जरा जपून."
असं म्हणून तिने त्याचा हात झटकून दिला आणि प्रियाला जवळ घेऊन झोपी गेली. पण इकडे मोहन जरा दचकलाच. पहिल्यांदाच बायकोनं इतक्या निर्धाराने उत्तर दिलं होतं. त्या रात्रीनंतर मारहाणीच्या घटना कमी झाल्या. पण सासूच्या टोमण्यांमध्ये मात्र अजिबात फरक पडला नाही. पण आता तिच्यात हिम्मत आली होती.
पुढच्याच महिन्यात तिने स्वतःसाठी, मुलींसाठी बचत करायचं ठरवलं. नंतरच्या काही वर्षांत सुलोचनाने एका गोष्टीचा ठाम निश्चय केला. आपल्या पैशांवर आपलाच हक्क! बँकेत आपलं स्वतंत्र खातं उघडायचं, त्यात पगार टाकायचा, आणि हळूहळू बचत करायची.
सुरुवातीला नवऱ्याला कळलं नाही. पण जेव्हा त्याने पाहिलं की सुलोचना आता पूर्ण पगार त्याच्या हाती देत नाही, तेव्हा तो भडकला. पण सुलोचनाने तोपर्यंत आपली मानसिक तयारी केली होती. ती आता त्याला ऐकवायची आणि निघून जायच्या धमक्या द्यायची.
"आता माझ्या पैशांवर माझा हक्क आहे. तुम्हाला काही लागलं तर सांगा, मी देईन. पण माझा पगार आता तुमच्या हाती मी देणार नाही.आता मी स्वतंत्र आहे. "
काळ पुढे गेला. आता दोघंही निवृत्त झाले. पण फरक एवढाच की मोहनने जो काही सेव्हिंग केला होता, तो फक्त स्वतःसाठीच खर्च करत होता. त्याला स्वतःच्या दवाखान्यांचा, औषधोपचारांचा खर्च भागवायचा होता. आणि घरातला इतर सर्व खर्च? तो अजूनही सुलोचना करत होती. प्रियाच्या आवडीचं क्षेत्र सुद्धा सुलोचनाने केलेल्या बचती मुळे तिला निवडता आलं, नाहीतर आता काय परिस्थिती असती, जर ती तेव्हा उभी राहिली नसती.
मोहन आताही काहीच बघत नव्हता, तरीही तिला आता त्रास होत नव्हता. कारण या सगळ्यातून ती बरंच काही शिकली होती. तिला कळलं होतं की आपल्याला कोणीही दुय्यम समजू नये, आपण स्वतःसाठी उभं राहायला हवं.
आज सुलोचनाच्या चेहऱ्यावर समाधान होतं. तिच्या सारख्या कितीतरी स्त्रिया असतील, ज्या अजूनही अशा परिस्थितीत अडकलेल्या असतील. त्या वेळेवर आवाज उठवत नाहीत, म्हणून त्यांचं संपूर्ण आयुष्यच नशिबाच्या नावाखाली घालवलं जातं.
सुलोचनाने तिच्या अनुभवावरून इतर महिलांना सांगायची.
"अन्याय सहन करत राहू नका. आर्थिक स्वातंत्र्य मिळवा, स्वतःच्या पायावर उभ्या राहा. नाहीतर आयुष्य हातातून निसटून जाईल."
आता तिला कोणाच्या टोमण्यांची भीती नव्हती. तिच्या पावलावर पाऊल ठेवून तिची लेक स्वतःसाठी उभी राहिली होती.
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा