मागील भागात आपण पाहिलं की सुलोचनाला प्रत्येक बाबतीत मोहनने दाबून ठेवलं होत. तो तिला आर्थिक स्वातंत्र्य देत नव्हता. आता पाहूया पुढे,
बिचारी सगळं सहन करत राहिली. मोहन तिच्यावर जबरदस्ती देखील करायचा. अश्यातच तिला दिवस गेले. तिला वाटलं होत आता तरी दिवस बदलतील, पण नाही. तिची सासू आता वंशाला दिवाच हवा म्हणून तिच्या मागे लागली. ते कमी होत की मुद्दाम तिची नणंद येऊन तिला दुधात केसर टाकून द्यायची, का तर तिला येणार मूल गोर हव होत. हे बघून तर तिला खूप त्रास व्हायचा. एकटीच रडायची, पण तिचा नवरा मोहन तिला म्हणायचा,
" बघ, माझ्या बहिणीला आपली किती काळजी आहे. "
पण त्याच्या बहिणीचं हिनवणे त्याला दिसायचं नाही.
तिचे दिवस भरत आले होते. त्या वर्षी हिवाळ्यात जरा जास्तच थंडी पडली होती. तिचे पाय देखील सुजले होते. त्यामुळे तिला नवीन उबदार चादर घ्यायची होती. तिने तसं मोहनला सांगितलं. पण मोहनने स्पष्ट शब्दांत सांगितलं,
"अशा लाडांच्या सवयी लावून घेऊ नकोस. काही गरज नाही ह्या फाजीलपणाची"
ते ऐकून तिला रडू आलं होतं. तिची एकही इच्छा त्याने पूर्ण केली नव्हती म्हणून तिने न कुरकुरता जुनी फाटकी चादरच ओढून घेतली आणि शांत पडून राहिली.
यथावकाश तिने एका गोड मुलीला प्रियाला जन्म दिला. तिच्या नशिबाने प्रिया वडिलांच्या रंगावर गेली. पण मुलगी झाली म्हणून परत सुलोचनाला सासूने खूप टोमणे मारले. प्रिया सहा महिन्याची झाल्याबरोबर इकडे मोहनने पुन्हा जॉबला जाण्याचा तगादा लावला. इकडे तिची सासू प्रियाला सांभाळायला तयार नव्हती आणि बाई ठेवून तिच्यावर पैसे उधळायला मोहन तयार नव्हता. शेवटी पैश्यांच्या हव्यासापोटी मोहनने त्याच्या आईला तयार केल.
इकडे पैशांवरचं नियंत्रण पुरेसं नव्हतं म्हणून काय, पण मोहन कधी कधी तिच्यावर हातही उचलायचा. अगदी किरकोळ कारणांसाठी. कधी जेवणात मीठ कमी, तर कधी घर उशिरा आवरलं गेलं, इतक्याच कारणांसाठी. आणि सासू? त्या सगळं गालातल्या गालात पाहायच्या, काही वेळा तर मोहनला मुद्दाम चिथवायच्याही. सुलोचनाला मोहनने मारलं की त्यांना खूप जास्त आनंद व्हायचा.
इकडे एक दिवस प्रिया खूपच आजारी पडली. तिला डॉक्टर कडे घेऊन जाण्यासाठी सुद्धा तिच्याकडे पैसे नव्हते. तिने मोहनकडे पैसे मागितले, पण त्याने ते पैसे सगळे दारूत उडवले असल्यामुळे तिलाच उलट धक्काबुक्की केली. सासूकडे पैसे मागितले असता,
त्यांनी दिलेले उत्तर तर तिच्यासाठी एकदम धक्कादायक होत.
" घरात असतील त्या गोळ्या दे, तुझा पगार झाला की जा घेऊन तुझ्या लाडकीला, एवढ्यात काय ती मरणार नाही. "
ते ऐकून तिची तळपायाची आग मस्तकात गेली. ती तशीच उठली आणि धावत धावत आपल्या लेकीला घेऊन बाजूच्या डॉक्टरकडे गेली.
इकडे ती डॉक्टरला विनवणी करून प्रियाला ऍडमिट करायला खूप विनंती करते. तेव्हा डॉक्टर तिला म्हणतात की तुम्ही काउंटरवर पैसे जमा करा आणि आम्ही पुढच्या तयारीला घेतो. तिच्याकडे पैसे नसतात, तिला काय करावे काहीही सुचत नाही तेवढ्यात तिचं लक्ष आपल्या गळ्यातल्या मंगळसूत्रावर जातं. तसही याचा काही उपयोग नव्हता ते फक्त नावापुरती होतं म्हणून तिने जास्त विचार न करता त्याचा उपयोग आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी करायच ठरवल.
प्रियाला वेळेवर उपचार भेटतील का?
मोहनला त्याची चूक समजेल का?
की सुलोचना आपल्यासाठी उभी राहील?
क्रमश
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा