आईचे अस्तित्व काय ??

आईची महती
आई एक अस्तित्व

लग्न झाल्यावर मुलींचं आयुष्य खूप म्हणजे खूपच बदलून जातं.नवीन घर,वातावरण,माणसे आणि नाती यांच्याशी जुळवून घ्यावं लागतं.काही बदल चांगले असतात तर काही वाईट.पण लग्नाआधीची मुलगी आणि लग्नानंतरची मुलगी यामध्ये खूप तफावत दिसून येते.

त्यातल्या त्यात मुलींच्या आयुष्यात तेंव्हा जास्त बदल होतो जेव्हा त्या आई होणार असतात.होणाऱ्या बाळाची चाहूल लागल्या पासूनच मुली अचानक हळव्या होऊन जातात.शारीरिक,भावनिक आणि मानसिक बदल घडून येतात. आपल्या पोटात आपलाच अंश वाढवण हे जणू स्वर्गसुखच असत प्रत्येक मुलीसाठी.एक अनोखी नाळ जोडली गेलेली असते बाळ पोटात असतानाच.बाळाचं खेळणं,झोपणं,भुकेने गोंधळ घालणं सगळच पोटात असल्यापासून ओळखायला लागते आई.

असंख्य कळा सोडून जेंव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा नऊ महिने पोटात वाढवताना झालेला त्रास एका क्षणात नाहीसा होतो आणि सगळं विसरून घट्ट छातीशी कवटाळून घेते आई आपल्या बाळाला.

अत्यंत सुखाचा आणि तितकाच भावनिक क्षण असतो हा कोणत्याही आईसाठी.मग त्या माऊली साठी मुलाचं सुख सगळ्यात महत्वाचं ठरतं.त्याच्या सुखासाठी दिवस रात्र जागून,कष्ट करून मेहनतीने कसलीही तक्रार न करता आई आपल्या मुलांना वाढवते,संस्कार देते.

या गोष्टीची परतफेड कशानेच होऊ शकत नाही.पण या गोष्टीची जाणीव मुलींना तेंव्हाच होते जेंव्हा त्या आई होतात.

पण आई मात्र तिच काम,कर्तव्य,प्रेम,जबाबदारी पार पाडत राहते सतत काहीही तक्रार न करता.आणि फक्त आईचीच नाही तर घरातल्या प्रत्येकाची जबाबदारी यशस्वी पणे पूर्ण करते आई.

मुलं ती जन्माला घालते पण मुलं त्यांच्या बाबांचं नाव चालवतात.मग कशासाठी करते सगळा खटाटोप आई??? घरातल्या लोकांना आपलं मानते,जबाबदाऱ्या सांभाळते,घराच्या सुखासाठी झटत राहते पण त्या आईच स्वतंत्र अस्तित्व असते का घरात?? आपण ते मान्य करतो का आपण ??? तिचा कधी विचार केला जातो का ??? तिची मतं विचारात घेतली जातात का ?? तिचं ही स्वतंत्र अस्तित्व मान्य केले जाते का ??

प्रत्येकच घरात अस चित्र नसेल बघायला मिळत पण आज ही बहुतांश घरामध्ये अशीच परिस्थिती आहे हे खेदाने सांगावं वाटतं.

आई आणि बाबा हे दोघंही एकमेकांना पूरक आहेत.मुलांना दोघांचीही तितकीच गरज आहे.
आई घरात राहून (आताच्या माता नोकरी करून सुध्दा) संस्कार देते तर बाबा पैसे कमावून मुलांच्या गरजा भागवतात.आई घराचा पाया असते तर बाबा इमारत.आई मुलांच्या चुका पदराखाली घेते तर बाबा रागावून त्या सुधारण्याचा प्रयत्न करतात.आई हक्काची वाटते तर बाबा ्चा धाक वाटतो.पण दोघेही असणं तितकेच महत्वाचे आणि गरजेचे असते मुलांसाठी.

म्हणून समानता ठेवा,आदर ठेवा आणि आईच स्वतंत्र अस्तित्व,विचार, मत मान्य करा.

एक आई.