अविस्मरणीय क्षण

आई होण्याचा क्षण हा प्रत्येक स्त्रीचा अविस्मरणीय प्रसंग असतो

गोष्ट छोटी डोंगरा एवढी 


माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग



           हा एक असा क्षण असतो जो प्रत्येक बाई आयुष्यात काहीही झाले तरी कधीच विसरू शकत नाही. पहिले लग्न झाल्याचा आणि त्यानंतर आई झाल्याचा. लग्न झाल्यावर ती एक पत्नी असते, पण आई झाल्यावर मात्र ती फक्त आणि फक्त एक आईच असते.

हा क्षणच असा असतो जेव्हा त्याचा अनुभव आपल्याला आल्यावर समजते की, आपली आई आपल्या सोबत कधी कधी इतकी कठोर का वागायची? कधी कधी तिची सुद्धा चिडचिड व्हायची, पण नेमकं आपल्याला त्यावेळी ते सगळं का होतंय हे कळायचं नाही. तेव्हा फक्त ती एव्हढंच म्हणायची,"तू जेव्हा आई होशील ना तेव्हा तुला समजेल."

पण जेव्हा एक स्त्री आई होते ना तेव्हा तिला सारं काही कळत, तेव्हाच तिला आपल्या आईची त्यावेळची मनस्थिती समजू लागते आणि त्याचवेळी मात्र त्या दोघी माय लेकी नसून खऱ्या अर्थाने मैत्रिणी होतात, अस मला तरी वाटतं.

लग्नानंतर जेव्हा समजलं की मी आई होणार आहे. त्यावेळी माझ्यापेक्षा जास्त आनंद तर तिलाच झालेला. तेव्हापासून, अगदी तेव्हापासूनच ती मला सगळं सांगू लागली. मी ज्यावेळी तिच्या गर्भात होते तेव्हापासूनचा तो संपूर्ण प्रवास ते आत्तापर्यंत फक्त मीच तीच विश्व होते.

         आता मी आई होणार म्हटल्यावर तर तिने सगळे लाड पुरवले माझे, मला काय हवं नको ते सगळं बघितलं. जेव्हा मला प्रसव वेदना सुरू झाल्या तेव्हा जणू काही तिलाच त्या यातना पुन्हा होताय असा भास होत होता.

हे समोरच दृश्य बघून माझ्या आईचे डोळे सुद्धा नकळत पाणावले होते. कारण आज मी आई झाले असले तरीही मला पुन्हा तिचंच बाळ होऊन राहावंसं वाटत होतं. तिच्या कुशीत शिरून पुन्हा ते सारे क्षण जगावेसे वाटत होते.

पुन्हा, मला ते सगळं काही आता पुन्हा जगता येणार होतं. फक्त आणि फक्त ती माझी आई असल्याने आणि मी आई झाल्यामुळे.


    बंद दरवाज्या आडून आर्त रडण्याचा आवाज येत होता. त्या आवाजाने कोणी सुखावला होता, तर कोणी निश्वास टाकला होता, तर कोणाची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती. एक नजर मात्र खूप व्याकुळ झाली होती. कधी एकदा त्या इवल्याशा जीवाला उराशी कवटाळून त्याच्या त्या आर्त सादेला प्रतिसाद देईन असं झालं होतं.

जणू काही तो इवलासा जीव सांगत होता. अगदी आपला छटाक भर जीव पणाला लावून,
"अग नऊ महिने तुला फक्त अनुभवलं मी, तुझी मूर्ती मी मनात तयार केलीय. तुझ्या स्पर्शानं, तुझ्या आवाजानं. आता नाही ग सहन होत हा मिनिटभराचा ही दुरावा. कधी एकदा तुला पाहीन असं झालंय. नको ना ग इतका वेळ लावू, नको ना असा दुष्टपणा करुस. आजवर अंतराने अनुभवलेला तुझा स्पर्श आज प्रत्यक्ष अनुभवायचा आहे. माझ्या मनात मी घडवलेली तुझी मूर्ती आज प्रत्यक्ष पहायची आहे."


           आणि जणू काही मला त्या बाळाच्या रडण्याची कीव आली असावी बहुदा. एका नर्सने पांढरी शुभ्र दुलई आणली आणि ती माझ्या बाळाच्या सर्वांगाला लपेटली. दुलईची ऊब सुद्धा माझ्या बाळाचं रडणं थांबवू शकली नाही. पण त्याच्या रडण्याकडे दुर्लक्ष करून त्या नर्सने स्वतःच्या डोळ्याचं काजळ बाळाला लावलं आणि हसत हसत बाळाला माझ्याकडे घेऊन येऊ लागली.

नऊ महिन्याच्या प्रतिक्षेपेक्षा हा काही मिनिटांचा प्रवास जास्त लांब वाटत होता. अखेर स्वारी आईच्या कुशीत विसावली. माझे डोळे मात्र आता भरून पावले होते. कडा नकळत पाणावल्या होत्या.

सोसलेल्या सर्व वेदना एका क्षणात नाहीशा झाल्या होत्या. किलकिले डोळे उघडत बाळाने अगदी पहिल्यांदा आपल्या वात्सल्यमूर्तीला पाहिलं होतं. जादूची कांडी फिरवल्या प्रमाणे त्या एका नजरेत त्याच रडणं बंद झालं. नकळत आमच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली. आम्हां दोघांनाही आता आमचं स्वतःच विश्व सापडलं होत.


धन्यवाद


सौं तृप्ती कोष्टी