अपराध कोणाचा, शिक्षा कोणाला? - पर्व दुसरे- भाग ६

This part is in continuation with earlier series.

'दादा, चॉईस चांगली आहे रे बट..'- वृंदाने मध्येच दरवाजा उघडत महेशला चिडवलं..

'खरंच लव्ह ऍट फर्स्ट साईट नाही ना झालं मला?? नजरच हटत नाहीये हिच्यावरून..'- स्वतःलाच टपली मारत महेश हसतच आपल्या रूममध्ये शिरला..

                               -----------
संध्या आपल्या रूमच्या बंद दरवाज्याआडून दोघा बहीण भावाचा संवाद ऐकतच होती.. तिच्या मनात विचारांच काहूर उठलं होतं..

अनायसे ती कंबळेंच्या घरात प्रवेश करती तर झाली होती.. साऱ्या कुटुंबाशी तिची जवळीक ही झाली होती.. तिच्या लक्ष्यप्राप्तीसाठी ती या घरातच राहणे कधीही चांगले होते पण महेश?? महेश जर खरेच आपल्या प्रेमात पडला असेल तर नसती गुंतागुंत होऊन आपल्याला पुढे प्रॉब्लेम होऊ शकेल.. संध्याच्या डोक्यात विचारांनी थैमान घातले होते..

शेवटी ती शांतपणे खोलीतल्या कोचवर बसली आणि तिने डोळे मिटले.. तिला तिच्या डॅडची शिकवण आठवू लागली.. काही वेळाने तिच्या चेहऱ्यावर एक तेज झळकू लागलं; एक हलकं हसू फुललं.. तिचा निर्णय झाला तशी ती निमूटपणे बेडवर जाऊन झोपी गेली.. मध्येच तिच्या काय मनात आलं अन तिने सकाळी लवकरचा अलार्म सेट केला आणि ती झोपी गेली..

दुसऱ्या दिवशी तिचा पहाटेचा अलार्म वाजला तशी ती उठली.. तशी घरी असताना ती कधीच वेळेत उठली नव्हती.. तिला उठवणे म्हणजे तिच्या घरच्यांसाठी कायम अग्निदिव्यच असायचं..बहुतेक वेळा बिचाऱ्या अश्विनीला ते काम पार पाडावे लागायचे.. पण इतके सगळे असलं तरी जेव्हा मॅडमचं स्वतःच असे काही काम असेल तेव्हा मात्र ती स्वतःहून लवकर उठत असे..

                                  --#--

'अरे बाळा, तु एवढ्या लवकर उठलीस?? झोपायचं ना?'- संध्याला सकाळीच किचनमध्ये पाहून सुधा काकू चकीत झाल्या होत्या..

'नाही काकू, गेस्ट आहे म्हणून सगळं ताटावर थोडं घेईन मी?? तसही तुम्ही एकट्याच एवढ्या माणसांसाठी राबत आहात मग मी आज तुमची एक दिवस मदत केली तर कुठे बिघडलं?? आणि अस ही आहे ना काकी, की मला किचनमध्ये फारसं काही जमत नाही; अगदी काहीच नाही म्हटलात तरी चालेल.. पण काही कट करून द्यायचं असेल, धुवून घ्यायचं असेल तर तशी बारीकसारीक काम मी करू शकेन.. जर तुमची परवानगी असेल तर.. '- संध्याने लाडीकपणे म्हटलं तशा सुधा काकी हसल्या..

'ए तु मस्तच आहेस ग.. तुझ्या घरच्यांनी छान संस्कार केलेत तुझ्यावर.. बरं आज पोह्याचा बेत आहे तर तु.. तु एक काम कर, मला कोथिंबीर धुवून दे'- सुधा काकूंनी तिला काम सांगितलं..

संध्याच्या मदतीने आज सुधा काकूंचा काम खूप लवकर आटपले होते.. बाकीचे जागे होण्याला एक तासाभराचा वेळ होता.. संध्याच्या सांगण्यावरून सुधा काकू आणि संध्या दोघीही बाजूच्याच मंदिरात जाऊन आल्या.. संध्याची धार्मिक बाजू पाहून सुधाकाकींना छान वाटलं होतं..

सकाळी डायनिंग टेबलावर सर्वजण एकत्र जमले होते.. फक्त संध्या टेबलवर नव्हती तसे विक्रम कंबळेंनी लेकीकडे चौकशी केली..

'अग, तुझी मैत्रीण अजून उठली नाही की काय??'- त्यांनी विचारलं..

'आता मला तिच्या सवयी कशा माहीत असणार पप्पा?? चिल ना.. उठेल तेव्हा करेल की नाश्ता.. मम्मा, आण की ग लवकर ब्रेकफास्ट.. भूक लागली आहे जाम..'- वृंदाने जागेवरून आवाज दिला..

'आणते आणते.. स्वतःचा नाश्तापण उठून घेता येत नाही पोरीला..'- आतून सुधाकाकीचा आवाज आला तसे सर्व टेबलवर चाट पडले..

'वृंदा, आज गेलीस तु.. मम्माचा मूड काही वेगळाच दिसतोय.. आज काहीतरी वेगळं घडलेलं दिसतंय..'- महेश वृंदाला घाबरवत म्हणाला..

'ओह हे कारण आहे तर मम्माच्या रागाचे.. वृंदा मागे बघ..'- महेशने वृंदाचे लक्ष ब्रेकफास्टच्या प्लेट्स घेऊन येणाऱ्या संध्याकडे वेधले तसा वृंदाने आपल्या कपाळावर हात मारला..

'संध्या, अग तु घरात पाहुणी आहेस आणि तु? म्हणजे अशी कामे??'- कंबळेंनी विचारलं तशी संध्या हसली..

तिला हसलेलं पाहून महेश पुन्हा स्वतःचे भान हरपला.. वृंदाने ते पाहून आजीला खुणावले..

'काका.. काका बोललं तर चालेल ना तुम्हांला की सर बोलू??'- संध्या बोलता बोलता थांबली..

'अग, तु काकाच बोल.. ते सर परक्यासारखं वाटत.. काकाच बोल..'- कंबळे..

'काका, काकी तर कायमच एकट्याने ही काम करत आल्या आहेत.. म्हटलं मी आज आहे तर त्यांना मदत करावी.. बाकी काही नाही.. आणि हो, कालपासून तुम्ही माझ्यासाठी एवढं सारं करताय तर मी तुमच्यासाठी एवढं केलं तर कुठे बिघडलं??'- संध्याने सर्वांच्या समोर प्लेट्स सरकवत म्हटले तसे सर्वजण हसले..

' तु एक दिवस आलीस आणि तुला माझी काळजी वाटली पण इकडे आमच्या कन्येला विचार.. तिला कधी स्वतःच्या आईची अशी फिकीर वाटते का ते??'- सुधा काकींनी वृंदाकडे पाहत म्हटलं...

'काकी, ती नव्या पिढीची आहे.. तिच लाईफ गोल फिक्स असतील.. चुलीपेक्षा करीअरवर फोकस करत जगणं तिला पसंत असेल.. जेवण बनवायला तर नोकर-चाकर भेटतील पण करीअर?? ते तर तिच तिलाच करावं लागेल, मेहनतीने मोठं व्हावं लागेल ना?? मग ती कशाला किचनमध्ये आपली एनर्जी वेस्ट करेल??'- संध्याने पोहे वाढता वाढता वृंदाची बाजू घेतली..

संध्याच्या बोलण्यावर तिथे काही काळ निरव शांतता पसरली होती..

'हे थँक्स डिअर.. भारी सपोर्ट देतेस ग तु.. बट मम्मा आय एम रियली सॉरी.. तुला आणि संध्याला सकाळी मंदिरातून रिटर्न् येताना पाहिलं.. तुझ्या फेसवर खूप छान ग्लो होता ग.. खूप खुश दिसत होतीस.. तुला रोज अस एकटीला कामात टाकून आम्ही तुला तुझी अशी स्वतःची काही लाईफ ठेवलीच नाही ना ग??

तुला घरकामासाठी आणि आमच्या सेवेसाठी गृहीतच धरलं आहे आम्ही.. तुम्ही हाऊस वाईफ म्हणजे घराची खरी सपोर्ट सिस्टम बट तुम्हांला कायमच कमीपणा दिला जातो..  तुमचं महत्त्व कधी कळतच नाही ना ग आम्हांला.. तुम्हांला पण ते आम्हांला समजवायच नसतं कारण तुम्हीही स्वतःला आमचे नोकर समजू लागता..

तुला माहितेय मम्मा, आम्हांला तुझं काम कधी समजतं?? जेव्हा तु आमच्या आजूबाजूला नसतेस ना, जेव्हा सकाळी भूक लागते; पोहे, उपमा खायचा असतो पण ब्रेड बटर किंवा कधी कधी फक्त चहावर ब्रेकफास्ट उरकावा लागतो ना; तेव्हा तु आठवतेस, कामावर जाताना रुमाल भेटतो पण सॉक्स कुठे ठेवला हे आठवत नाही, शोधून तो सापडत नाही तेव्हा तुझी आठवण येते.. कामाला जातो, तुझा टिफिन नसतो, कॅन्टीनमध्ये काहीही खाऊन पोट भरावं लागते तेव्हा तु आठवतेस.. संध्याकाळी भूक लागते, कसेबसे घरी यावं आणि तुला आवाज द्यावा तर तु नसतेस ; मम्मा तुझी खूप आठवण येते ग तेव्हा.. रात्रीच्या जेवणाचे पण तेच.. सकाळपासून रात्री पर्यत सारं लाईफ तुझ्या जिवावावर चालतं ग आमचं.. पण.. पण मी म्हटलं ना, जो पर्यत तु आहेस, तो पर्यंत काय फिकीर?? बट आता नाही मम्मा..

आता नाही.. उद्या.. ना आज पासूनच मी तुला तुझ्या कामात मदत करणार.. आणि हा तु पण मला हक्काने बोलवायचं..'- वृंदाने भावुक होत सुधा काकींना मिठी मारली तसे सुधाकाकींच्या डोळ्यांत पाणी आलं...

काही वेळ घरातले वातावरण भावुक झाले होते.. 

'अरे आता रडण्यातच दिवस घालवाल की?? या म्हातारीच्या पोटाला काही मिळेल की नाही??'- आजीने नाटकी आवाज दिला तशी तिथे हास्याची एक लाट उसळली.. 

'घ्या आजी.. मी वाढते तुम्हांला...'- संध्याने आजीच्या प्लेटमध्ये पोहे वाढले.. हळू हळू करता; तिने सर्वांच्या ताटात पोहे वाढले.. तस संध्याने स्वतःच्या घरी असली कोणतीच कामे केली नव्हती पण शरयुतली निरीक्षण शक्ती तिच्यात पुरेपूर उतरली होती आणि त्याच जोरावर तिने हा हा म्हणता सगळ्यांचा ब्रेकफास्ट अगदी योग्य पद्धतीने मांडला होता.. स्वतःच्या चेहऱ्यावर शांत भाव ठेवत; तिने आपलं ही ताट वाढून घेतलं..

'अग हे ताट जास्त झालं की ग??'- सुधाकाकींनी तिला म्हटलं तशी ती नाजूक हसली.. 

'तुमचं आहे ते काकू.. जर काकांना काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्हीही आमच्यासोबतच नाश्ता का नाही करत?? एखाद दिवस गरमागरम खा की.. इतर दिवस तर गारेगार खाताच की..'- संध्याने हसत त्यांना म्हटलं तसा त्यांचा चेहरा उतरला..

'सुधा, बस ग आज तु.. इन फॅक्ट आजपासूनच तुही आमच्या सोबतच नाश्ता आणि जेवण करायची.. प्रत्येकाने आपल्याला काय आणि किती हवं ते आधीच सांगावं.. सुधा त्या प्रमाणे बनवेल आणि आपल्यासोबतच खायला बसेल.. संध्या बरोबर बोलतेय; सुधाचाही हक्क आहेच की.. तिनेच केलेलं जेवण तिने थंड का खावं?? आपण एकत्र गप्पा मारत जेवायचं आणि ती मात्र नंतर एकटीने कोपऱ्यात बसून कसंबसं ते गार झालेलं अन्न पोटात ढकलणार.. चालणार नाही.. यापुढे बिल्कुल चालणार नाही..'- कंबळेंनी बायकोचा हात पकडत त्यांना खुर्चीवर बसवलं..

सुधा काकूंच्या डोळ्यांत पुनः पाणी वाहू लागलं होतं.. भरल्या डोळ्यानेच त्या संध्याकडे पाहत कृतज्ञता व्यक्त करत होत्या..  पुढे साऱ्या खेळीमेळीत नाश्ता संपला होता.. सर्वजण आज खूप आनंदी होते.. नाही म्हटलं तर महेश तेवढा हरवला होता.. संध्याच्या प्रेमाची धुंदी त्याला वेडावत चालली होती.. स्वतःला सावरण्याचा त्याचा प्रयत्न सुरू असला तरी तो संध्याच्या प्रेमात हरवत चालला होता..

कंबळेंनी नाश्ता झाल्यावर संध्याची जुजबी चौकशी केली होती.. संध्याने साऱ्या प्रश्नांची उत्तरं योग्य ते प्रसंगावधान राखत दिली होती..

'ओह ग्रेट बेटा.. तुला स्वतःची ओळख बनवायची आहे हे ऐकून छान वाटलं आणि त्यासाठी तु एवढा मोठा स्ट्रगल करायला तयार झालीस.. ब्राव्हो..आय लाईक यु बेटा.. बेटा, मी तुला एक विचारू का??'- संध्याच्या उत्तरांनी कंबळे चांगलेच इम्प्रेस झाले होते..

'हो, विचारा ना काका..'- संध्या..

'तु माझ्याकडे प्रॅक्टीस करशील?? आय मिन माझी असिस्टंट म्हणून राहशील?? मी तुला पे करेन?'- कंबळेंनी तिला सर्वांसमोर विचारले तसे सगळेच संध्याच उत्तर ऐकण्यासाठी आतुर झाले..

'नक्की काका.. तुम्ही या नागपुरात सर्वात भारी वकील आहात.. खूप नाव ऐकलं आहे तुमचं.. चालेल मला.. तुम्हांला असिस्ट करणं माझ्यासाठी सौभाग्यशालीच असेल..'- संध्याने त्यांना होकार दिला तसे सर्वजण खुश झाले..

'बट काका, उद्यापासून हा.. प्लीज.. मला आज माझी राहण्याची सोय बघायला जावं लागेल.. हे असं तुमच्या घरी राहणं मला तरी पटणार नाही.. सॉरी त्याबाबत..'- संध्याने  हसत म्हटलं तसे सगळ्यांचे चेहरे पडले..

'बाळा, तुला कोणीच काही त्रास देणार नाही इकडे.. तु का दुसरीकडे शोधण्याचा त्रास करून घेत आहेस??'- सुधाकाकी काळजीने म्हटल्या..

'नाही काकू.. मी काकांकडून सगळंच लुटून घेऊ शकत नाही.. त्यांचं ज्ञान तर मी लुटणारच आहे पण घरातली जागा.. नाही नाही.. मला थोडं तरी आत्मनिर्भर बनू द्यात..'- संध्या पुन्हा गोड हसली..

'ठीक आहे.. तु आज शोध तुझं राहण्याचं ठिकाण.. पण नाहीच जुळून आलं तर मात्र तु इथेच राहायचं.. वाटल्यास आमची पेयींग गेस्ट म्हणून.. मंजूर??'- वृंदाने म्हटलं..

'ठीक आहे.. पण आज काही तरी सोय नक्कीच होईल.. '- एवढं बोलून संध्या सर्वांचा निरोप घेऊन आपल्या रूममध्ये तयारीला गेली..

'विक्रमा, ही बाहुली आपल्याच घरातच राहिली पाहिजे रे.. बघ एका दिवसात पोरीने काय चैतन्य आणलं तुझ्या घराला.. कायमची राहील तर उजळून टाकेल तुझं वैभव..'- आजीने म्हटल तसे कंबळेना जोरात हसू आलं..

'काय आई तु पण ना? कायमची कशी राहील ती आपल्याकडे??'- कंबळेना अजून हसू आवरत नव्हतं..

'एवढा वकील झालास पण डोक्याने गाढव आहेस गाढव.. सध्या ठेव तुझी असिस्टंट म्हणून पण मला माझी नातसून म्हणून हिच मुलगी हवी या घरात.. एवढं लक्षात ठेव..'- आजीने स्पष्टपणे सांगितले तसे सगळेच चकीत झाले..

आजी आपलं म्हणणं मांडून आपल्या खोलीत निघूनही गेल्या होत्या.. बाकीचे अजूनही धक्क्याने एकमेकांचे तोंड बघत बसले होते; कोणालाच काय प्रतिक्रिया द्यावी हे सुचत नव्हते तसे सगळेजण आपापल्या मार्गी निघाले..

या साऱ्या घडामोडीत एकमेव व्यक्ती खुश होता तो म्हणजे महेश.. त्याने काही न सांगताच आजीने त्याची इच्छा तिची इच्छा म्हणत वडिलांच्या मनात भरली होती.. त्याच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.. संध्याला आपल्यासोबत कसं बोलत करावं या विचाराने तो बेडरूमकडे आला होता..

                                 --#--

संध्याने रघुकडून आस चा पत्ता घेतला होता.. आज रूम शोधण्याच्या बहाण्याने ती साऱ्या घटनांचा मागोवा घेण्यासाठी बाहेर पडली होती.. दिलेल्या पत्त्यावर ती पोहचली होती.. संस्थेच्या गेटवर भलेमोठे सील लावले गेले होते तसेच दोन हवालदार राखणीला बसवले गेले होते..

'काय झालं असावं यार एवढं मोठं?? कंबळेना तर एवढ्यातच विचारू शकत नाही नाहीतर त्यांना संशय येईल.. यार, कुठे भेटेल हा आशिष पाटिल? देवा, काय तरी चमत्कार घडवून आण ना.. '- संध्याने आभाळाकडे पाहत हात जोडले..

ती तशी प्रार्थना करत असतानाच तिच लक्ष बाजूलाच उभ्या असलेल्या एका मुलाकडे गेलं.. मुलाची दाढी अंमळ जास्तच होती.. त्यात त्याने गॉगल आणि डोक्यात टोपी घातल्याने जवळपास त्याचा चेहरा समजणे अवघडच होते..

तो मुलगाही एकटक, असहाय्यपणे संस्थेला लागलेल्या सीलकडे पाहत होता..  एका क्षणाला त्याच्या डोळयातून पाणी आलं तसा त्याने गॉगल बाजूला करत आपले डोळे फुसले आणि पटकन गॉगल लावला.. घाबरून त्याने आजूबाजूला एकवार पाहिले आणि परत तो पहिल्यासारखा गेटकडे पाहताना हरवून गेला..

'वॉव.. काय डोळे होते याचे..'- संध्या मनाशीच बोलली..

'तुम्ही पण याच संस्थेत राहायला होतात का??'- संध्याने त्या मुलाला विचारलं..

'हम्म.. हो..'- त्या मुलाला हसू आलं आणि तो हलका मागे फिरला..

'मग यात हसण्यासारखं काय आहे??'- त्याच्या हसण्याचा राग आला तशी संध्या चिडली..

'मॅडम, चुकलं माझं.. ना तुम्हांला माझं हसणं समजणार आणि ना माझ्या हसण्यामागच रडणं तुमच्या लक्षात येणार.. सो लिव्ह इट..'- त्या मुलाने मान खाली घालत उत्तर दिलं तस संध्याच्या मनात कसनुस झालं..

तो मुलगा काही वेळ तसाच उभा राहून मागे फिरला.. जाता जाता आसच्या कुंपण भिंतीला हात लावत तो चालत होता.. अधूनमधून तो गॉगल काढून डोळे फुसत होता.. 

'यार हाच तर आशिष नव्हता ना??'- संध्या संशय आला तशी त्याच्या मागे धावली..


क्रमशः

© मयुरेश तांबे

कथेचे सारे अधिकार लेखकाच्या अधीन असून; कथा नावासाहित प्रसिद्ध करण्यास काही हरकत नाही.. 

सादर कथा ही काल्पनिक असून;   एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी सबंध आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा ही नम्र विनंती..

धन्यवाद..

🎭 Series Post

View all