अपराध कोणाचा, शिक्षा कोणाला? - पर्व दुसरे- भाग २५

This part is in continuation with earlier series.

'पण विभाने म्हटलं का की ती आमची सेनापती आहे म्हणून??'- शरयूने शांतपणे विचारलं..

'म्हणजे?? ही पण एक प्यादी??हे काय चालवलंय तुम्हीं??'- कावेरीबाई आता कमालीच्या अस्वस्थ झाल्या होत्या...

इतक्यातच तिथे काही लोक जमा होऊ लागली होती.. लोकांचा जमाव पाहून; आपल्यासोबत आता नक्कीच काहीतरी अघटित घडणार असल्याची जाणीव; कावेरीबाई आणि मोहनला झाली होती..

                           ------------------

'कावेरी मॅडम; तुमच्या माहितीसाठी सांगते की आमच्या म्होरक्याला बघायची तुमची किंवा इथल्या कोणाचीही इच्छा कधीच पुर्ण होणार नाही.. ती व्यक्ती सर्वांसाठी एक दंतकथा बनून राहील..'- शरयूने सगळ्यांना उद्देशून म्हटलं आणि सर्वांचा भ्रमनिरास झाला..

'याने बाकीच्यांना फरक पडेल... मला नाही.. मी कावेरी आहे, कावेरी.. पांडूची लेक... माझ्या शत्रूंना शोधून काढून त्यांना नरकात पाठवणं जमतं मला.. तु नको काळजी करूस..'- कावेरीबाईने ठसक्यात सांगितलं..

'अहो मॅडम, मला हरवणं सोप्प आहे पण हे प्रकरण वेगळं आहे.. ही एक पाताळयंत्री बाई आहे.. ही जे बोलते ते नक्कीच करते.. ही तुरुंगात गेली तर तिथूनही ही खूप काही करू शकते..'- पांडे भीतीने थरथर कापत म्हणाला..

'आणि जर ही दोघे तुरुंगात गेलीच नाही तर??'- शरयूने हसून म्हणताच सगळे पुन्हा एकदा चक्रावले होते..

'काय? का...काय ठरवलंय तु?? हे..हे तुला खुप भा.. भारी पडेल..'- कावेरीबाई आता बिथरल्या होत्या.. मोहन तर अजूनही मोनिकाच्या ठोस्याच्या दशहतीखालीच होता..

'कावेरीबाई, जरा आजूबाजूला जमलेल्या लोकांकडे नजर तर फिरवा..'- शरयूने पुन्हा टाळ्या वाजवल्या तसे त्या लोकांनी आपआपले झाकलेले चेहरे उघडले होते..

त्या साऱ्यां लोकांकडे एकवार नजर पाहताच कावेरीबाई हसू लागल्या होत्या.. त्यांना तस हसताना पाहून मोहन गोंधळला होता.. 

'मम्मा, वेड लागलंय तुला??'- मोहन बोबड्या आवाजात बोलला..

'वेड?? मूर्खा!! इथे आपलं मरण जवळ आलंय आणि तुला अजून ते जाणवत नाहीये?? या लोकांनी आपल्या एकूण एक शत्रूला एकत्र केलंय इकडे.. बघ ती कमला; आपली मोलकरीण; ती पण आहे यांत.. ती शारदा, आशा, पूजा.. आठवतात या मुली?? या सगळ्यांची इज्जत लुटली होतीस तु.. मी यांना जीवे मारण्याच्या धमक्या देऊन गप्प केलं होतं पण आज यांच्या मागे ताकद आहे म्हटल्यावर इथे कोणीच शांत बसणार नाही..'- कावेरीबाई बोलल्या तसा मोहन घाबरून थरथर कापू लागला..

'पण..पण हे.. हे पोलीस आहेत ना?? हे.. हे वाचवतील ना आपल्याला??'- मोहनचा आवाज थरथरत होता..

'अरे हा.. मी विसरलेच होते.. ये तुम्हीं कोणाची वाट बघताय?? अडवा या लोकांना.. तुमच्यासमोर गुन्हा घडतोय आणि तुम्ही हातावर हात ठेवून बसलात??'- कावेरीबाई पोलिसांवर खेकसल्या तसे ते सारेजण हसू लागले..

'कावेरी काकू, तुमच्या साऱ्या शत्रूंची माहिती काढलीय मी.. आणि हे काही एकाच पोलिस स्टेशनचे पोलिस नाहीत.. ही सारी मंडळी आज सुडापोटीच इथे जमली आहेत.. आज तुमचा अंत निश्चित आहे.. पोलिस साहेबांनों; कृपया प्रत्येकाने कावेरी मॅडमना त्याच्या भूतकाळातल्या गुन्हयांची आठवण करून द्या बरं..'- अश्विनीने साऱ्या पोलिसांना विनंती केली..

उपस्थित आठच्या आठ पोलिसांनी आपआपल्या स्वकीयांचे फोटो खिश्यातून काढत; कावेरीबाईसमोर धरले होते.. काहींचें फोटो तिने ओळखले होते तर ज्यांचे फोटो तिने ओळखले नव्हते त्यांच्या आप्त पोलिसाने तिला तिच्या अपराधाची आठवण करून दिली होती..

'एकंदरीत आज मृत्यूयोग अटळ आहे..'- कावेरीबाई राक्षसी हसत म्हणाल्या..

हळूहळू जमाव दोन्ही माय लेकावर चाल करून गेला होता.. महिलांनी कावेरीबाईला चोप द्यायला चालू केला होता तर पुरुष मंडळींनी मोहनचा समाचार घेणं चालू केला होता.. दोघांच्या किंकाळ्या आसमंतात पसरल्या होत्या.. काही क्षणातच दोघांच्या रक्तबंबाळ शरीरातून आवाज येणं बंद झाला होता.. त्यांना निपचित पडलेलं पाहून जमावाने मारहाण थांबवली होती.. 

आता साने परिवार, कंबळे आणि बाकी सर्वांनी साटम परिवाराचे अभिनंदन करत; त्यांचे आभार व्यक्त केले होते.. एक एक करून सारेजण त्यांना आशिर्वादपर शुभेच्छा देत परतू लागले होते.. 

सारा साटम परिवार लोकांच्या प्रतिक्रियांना आदरपूर्वक प्रतिसाद देत होता.. हळूहळू माणसं कमी होऊ लागली होती.. घटनास्थळी असलेल्या पोलिसांनीच कावेरी पांडे अन मोहन पांडेची केस व्यवस्थित बंद करण्याची जबाबदारी घेतली होती.. कंबळे आणि आशु त्यांना त्या कामात मदत करणार होते..

साने मॅडमनीं शरयूचं व्यक्तिशः कौतुक केलं होतं.. तसेच आपल्या मुलींना निर्भीड आणि कणखर बनवल्याबद्दल त्यांनी साटम उभयतांची तारीफ केली होती...

शरयुनेही त्यांचे आभार मानताना आपल्या साऱ्या लेकींचे कौतुक केलं होतं.. सानेमॅडमनी साऱ्या साटम परिवाराला आपल्या घरी पाहुणचाराला येण्याचा आग्रह केला होता आणि त्यांच्याकडून तशी कबुली घेतल्यानंतरच त्या राकेशला सोबत घेऊन तिथून निघाल्या होत्या.. 

आता तिथे फक्त साटम कुटुंब, विभा, आशिष पाटिल , रवी आणि महेश राहिले होते.. कंबळे वृंदासाठी तातडीने निघाले होते.. जाताना त्यांनी पांडेंनाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी नेले होते.. विभा आणि आशिष पुढच्या अर्ध्या तासांत तिथे पोहचणार होते..

शरयूने त्या सर्वांचे आभार मानत त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांचे कौतुक केलं होतं.. अश्विनी अन मोनिका समोर येताच; त्या दोघींनींही एकत्रित तिला मिठी मारली होती.. त्या तिघींना एकत्रित मिठीत पाहून संध्या काहीशी चिडली होती.. लेकींना मिठी मारून होताच; शरयू संध्याकडे सपशेल दुर्लक्ष करत विभाकडे वळली होती..

'तुझ्या हिंमतीबद्दल मनापासून कौतुक बाळा.. तुझ्या हुशारीला माझा सलाम.. एवढी क्रूर माणसं आजूबाजूला वावरत असताना; ज्या पद्धतीने तु स्वतःला सावरलंस; त्यांना गाफील ठेवलंस आणि त्यांची माहिती आम्हांला पोहचवलीस; सारेच काबिल - ए-  तारीफ!! '- शरयूने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत तिचे पुन्हा एकदा आभार मानले होते.. 

'तु माझ्याकडे दुर्लक्ष का करतेयस? तु.. तु बोलली होतीस ना की ही केस जिंकल्यावर तु स्वतःहून मला मिठी मारशील म्हणून?? मग मी जिंकली ना केस?? तरी तु मला का टाळते आहेस??'- संध्याने काहीश्या चिडक्या स्वरात म्हटलं तशी शरयू सर्रकन मागे वळली..

यावेळेस तिचे डोळे लाल होते.. तिचं ते रूप पाहून, संध्या घाबरून गेली होती..

'मी तुला मिठी मारण्यासाठी तु माझी आहेस तरी कोण??'- शरयूच्या चढ्या आवाजानेच संध्या गप्पगार झाली होती..

'काल काय  हाक मारली होतीस तु मला?? मिसेस शरयू?? मिसेस शरयू?? अरे जिला आम्ही दत्तक घेतलं; तिला माझी माया समजली.. त्या पोरीवर मी एवढा अन्याय केला; माझ्या वचनापोटी तिला मी माझ्यापासून दूर ठेवलं.. तिची खरी ओळख इतक्या वर्षांनंतर तिला आज सांगता आली.. आणि तिची तरीही काहीच तक्रार नव्हती ग.. तिने मला काय हाक मारली?? आई!!! आई बोलली ती मला.. आणि तु?? स्वतःच्या संशयापोटी तु काय हाक मारलीस?? मिसेस शरयू??  आणि त्या दोघींनीं स्वतःहून मला मिठ्या मारल्या.. बट तुझा इगो मोठा ना??.. एक केस जिंकलीस अन तीही दुसऱ्यांच्या मेहनातीमुळे.. कसला एवढा अहंकार तुला?? एक गोष्ट लक्षात ठेव..या पुढे तु मला कायम मिसेस शरयू म्हणूनच हाक मारायची.. तुझ्या तोंडून माझ्यासाठी आई हा शब्द कधीच आला नाही पाहिजे.. '- शरयूचा पारा प्रचंड चढला होता.. 

मोनिका, अश्विनीलाही काहीच सुचत नव्हतं.. आशुही आज निर्विकार तोंडाने उभा होता.. 

'आय एम सॉरी आई.. नको ना एवढं रागावू माझ्यावर.. मी नाही ग एवढी मॅच्युअर.. पण तू मला समजून घे ना आई.. आय लव्ह यु आई.. खरंच..'- संध्या आता काकुळतीला आली होती..

'मिसेस शरयू.. मिसेस शरयूच बोलायचं मला.. आई नाही.. तो हक्क गमावलास तु..'- शरयूचा राग काही कमी होत नव्हता..

'प्लीज मला माफ कर आई.. पुन्हा अस नाही होणार माझ्याकडून.. मी तुलाच काय कोणालाही दुखावणार नाही.. तु.. तु सांग ना; मी काय करु म्हणजे तुझा माझ्यावरचा राग शांत होईल?? तु.. तु सांगशील ते.. आईई.....'- संध्याची आर्त किंकाळी घुमली होती..

एक वेगळंच आक्रीत घडलं होतं.. कावेरीबाईनीं मध्येच डाव साधला होता.. शेजारच्या पोलिसाची बंदूक हिसकावत त्यांनी शरयूच्या दिशेने गोळी झाडली होती.. बाकी पोलिसांनी प्रसंगावधान राखत; कावेरीबाईकडून बंदूक खेचून घेतली होती.. गडगडाटी विकृत हसत तिचे धूड खाली कोसळलं होतं ते पुन्हा कधी न उठण्यासाठी..

'संध्या...'- सारेजण ओरडत गोळी लागून; कोसळणाऱ्या संध्याला पकडायला धावले होते.. 
फक्त शरयू अन आशु दोघांची पाऊलं जागीच थिजली होती.. पंचवीस वर्षांपूर्वीची घटना त्यांच्या डोळ्यासमोरून गेली तसे दोघेही हवालदिल झाले होते.. 

'आय..आय एम सॉरी आई... मी.. मी.. नाही.. करणार.. मला.. मिठी...'- संध्याची शुद्ध हरपली होती..

शरयू एका पुतळ्याप्रमाणे निर्जीव झाली होती.. पंचवीस वर्षे आधी संध्या पाटिलने तिच्यासाठी बलिदान दिले होते आणि आज संध्या साटमने तिच्या दिशेने फेकलेला मृत्यूपाश स्वतःवर झेलला होता.. कावेरीबाईला बंदूक उचलून शरयूच्या दिशेने गोळी झाडताना पाहून संध्याने गोळीच्या मार्गात स्वतःला झोकून दिलं होतं...

महेशने तात्काळ आपली गाडी काढत; संध्याला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं.. लेकीची अवस्था पाहून; आशूने उद्विग्नपणे शरयुकडे एकवार पाहिलं होतं.. त्याच्या डोळ्यातले भाव कळताच; शरयू जागीच कोसळली होती.. 

काही वेळापूर्वी विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या साटम परिवारावर आता दुहेरी आघात झाला होता..


क्रमश:

© मयुरेश तांबे

कथेचे सारे अधिकार लेखकाच्या अधीन असून; कथा नावासाहित प्रसिद्ध करण्यास काही हरकत नाही.. 

सादर कथा ही काल्पनिक असून;   एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी सबंध आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा ही नम्र विनंती..

धन्यवाद..

🎭 Series Post

View all