अपराध कोणाचा, शिक्षा कोणाला? - पर्व दुसरे- भाग २३

This part is in continuation with earlier series.

'मी.. मीच ना ती?? म्हणूनच तु माझा एवढा राग करतेस ना?? मी तुझी मुलगी नाही म्हणूनच तुला मी केलेली कोणतीच गोष्ट पसंद येत नाही ना..सांग ना.. आता का मान फिरवतेस?? मिसेस शरयू मला उत्तर हवंय..'- संध्याला आता रडू कोसळलं होतं..

'तुला जे समजायचं ते समज..'- शरयू आशुचा हात धरून त्याला जबरदस्ती बाजूला घेऊन गेली होती..

                          ------------------------

संध्या हॉस्पिटल क्वारीडोरमध्ये एकटीच अश्रू गाळत उभी होती..

 मुलगी रडत असूनसुद्धा शरयूने तिला सावरायला न जाणे अन आशूलाही तिच्याकडे जाण्यास मनाई करणे सर्वांनाच खटकले होते.. 

'हे, आता तुला काय झालं??'- वृंदाची औषध आणायला निघालेला महेश; संध्याला तस रडताना पाहून जागीच थबकला होता..

'महेश, प्लीज जा इथून.. माझा मूड नाहीये..'- संध्याने रडता रडताच महेशला धुडकावून लावलं होत..

'ओये.. तुझ्या एवढंच टेन्शन मला पण आहे कळलं.. माझी बहिणपण आय.सी.यु. मध्ये आहे.. पण मी तुझ्यासारख कुढत बसलो नाहीये.. माझ्यात माणुसकी आहे म्हणून तुला विचारलं.. अशा वागण्याने आयुष्यात एकटीच राहशील.. कोणीच स्वतःच नसेल सोबतीला..'- महेश तिला सूनवुन पुढे निघाला होता..

'हे वेट.. तुझी बहीण?? वृंदा??तिला काय झालं??'- संध्याने पुढे निघालेल्या महेशचे शर्ट धरून त्याला मागे ओढलं होतं..

'ते मम्माच.. शी.. मॉम बोलायला लाज वाटते.. त्या बाईच आणि तिच्या जन्माचं सत्य समजलं आणि तिला जबर मानसिक धक्का बसलाय.. अजूनही शुद्धीवर आली नाहीये.. सानेमॅडम आणि राजेश प्रयत्न करत आहेत..'- महेशने उत्तर दिलं तस त्याच्याही डोळ्यांत पाणी तरळलं..

'कु.. कुठे आहे ती?? '- संध्याने विचारलं..

महेशने तिला वॉर्ड क्रमांक सांगताच ती लगबगीने तिथे धावली होती..

इकडे डॉक्टरांनी पांडेंची प्रकृती अस्थिर झाली असून त्यांना किमान आजच्या दिवसात तरी कोणाला भेटता येणार नसल्याची साऱ्यांना कल्पना दिली होती..

सारे जण आपापल्या घरी जाण्यासाठी वळले होते.. कंबळेना बाहेर येताच वृंदाबद्दल कळलं तसे ते गडबडीने तिला पाहण्यासाठी धावले होते..

वृंदा अजूनही बेशुद्धच होती.. ती आय.सी.यु मध्ये असल्याने संध्या किंवा कंबळेंनां तिला भेटणं शक्य नव्हतं तसे ते दोघेही बाहेरूनच तिला पाहत दुःखी होते..

शरयू अन आशुही त्यांच्यामागून तिकडे जाणार तोच शरयूचा फोन वाजला होता.. पलिकडून शरयुला धक्कादायक बातमी कळली होती.. सुधा कंबळे, मोहन अन वैष्णवीची कोणीतरी सुटका केली  होती.. याउलट आसमध्ये वास्तव्यास असणाऱ्या साऱ्या मुलांमुलींना ट्रेस करत; त्यांचे अपहरण केले गेले होते.. 
घटनास्थळी शरयूसाठी चिठ्ठी ठेवली होती.. 

'तुला वाटत असेल की तूच चलाख आहे तर तो तुझा गैरसमज आहे.. मी कोण आहे? माझी ताकद काय? हे तुला माहितीही नाहीये.. बऱ्या बोलाने तुझ्या सगळ्या कुटुंबासकट मी सांगितलेल्या ठिकाणी ये.. आणि सोबत कंबळे, महेश, राकेश, पंकज, विभा, आशिष, रवी आणि तो मरायला टेकलेला पांडे या सगळ्यांना सोबत आण.. यातला एकजरी नाही आला तर ही वीसच्या वीस माणसं मारली जातील..'- चिट्ठीमधला मजकूर वाचून शरयूच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता.. तिच्या चेहऱ्यावर दाट भीती जमा झाली होती.. 

शरयुला घाबरलेली पाहून एका व्यक्तीला अतिशय आनंद झाला होता..

शरयूने साऱ्यांना आजची रात्र एकत्रित राहण्यासाठी विनवले होते.. वेगवेगळे राहिल्यास साऱ्यांना धोका होऊ शकतो; हे तिचं म्हणणं सर्वांना पटलं होतं.. सर्वानुमते आजची रात्र साने मॅडमच्या बंगल्यात एकत्र राहण्याचे ठरले होते..

त्या अज्ञात व्यक्तीने उद्या सकाळची वेळ दिली होती.. एका पडक्या कारखान्याचा पत्ता दिला गेला होता.. वीस जणांचा जीव पणाला लागल्याने इन्स्पेक्टर राकेशलाही काही करता येत नव्हतं.. 

महेश अन संध्या वृंदासोबत हॉस्पिटलमध्ये थांबले होते.. तर पांडेसोबत त्याची पत्नी, विभा अन आशिष थांबले होते.. ते सारे उद्या सकाळी थेट त्या जागेवर पोहचणार होते.. 

सारी रात्र कोणाचाच डोळा लागला नव्हता.. आता पांडेपेक्षा शक्तिशाली अजून कोण याचेच उत्तर सारेजण शोधत होते.. आणि दुसरा दिवस उजाडेपर्यंत कोणाजवळच त्याच उत्तर नव्हतं..

दुसऱ्या दिवशी शरयूने सर्वांना धीर देत; आलेल्या प्रसंगाला शांत डोक्याने सामोरे जाण्याची सूचना केली होती.. 

सारे जण दिलेल्या पत्त्यावर पोहचले होते.. हॉस्पिटलमधून संध्या, महेश, विभा, आशिष आणि पांडेंची बायको असे सारेही वेळेत पोहचले होते.. पांडेंना कुटुंबाच्या जबाबदारीवर डिस्चार्ज घेत तिथे आणलं गेलं होतं.. त्यांच्या प्रकृती मध्ये काहीसा सुधार पडला होता आणि सध्याच्या घडीला नेमकं काय होतंय किंवा होणार त्याचा अंदाज फक्त त्यालाच होता.. पण त्याचा नाईलाज असल्याने त्याला कोणालाही सावध करता येत नव्हतं..

सारे जण इकडेतिकडे पाहत असतानाच दहा-बारा गुंडांनी त्यांना चहूबाजूने घेरलं होतं.. बंदुकीचा धाक दाखवत त्यांना त्या पडीक कारखान्याच्या अधिक आत नेलं गेलं होतं.. 

आत मलमपट्टी केलेला मोहन व्हीलचेअरवर बसून होता.. बाजूलाच वैष्णवी उभी होती तर सुधा कंबळेला हात पाय बांधलेल्या अवस्थेत बाजूलाच बसवलं होतं.. तिच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या.. मारामुळे त्या ग्लानीमध्येच होत्या..

त्यांची ती अवस्था पाहून पांडे अन कंबळे दोघांच्याही डोळ्यांत पाणी होतं.. दोघांनी आपापले डोळे पुसण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची आपापसात नजरानजर झाली होती..

 पांडेसोबत विवाहबाह्य सबंध असले तरी सुधा कंबळेंनी ते कधी  चव्हाट्यावर येऊ दिले नव्हते किंवा मुलांच्या पालनपोषणात तिने कसर सोडली होती..पांडेच्या आईचीही तिने मागची कित्येक वर्षे चांगली सेवा केली होती.. त्यामुळे स्वतः बाबत काहीही झालं तरी बाकीच्यांसाठी कंबळे तिचे ऋणी होते.. 

'या या.. आम्हीं तुमचीच वाट पाहत आहोत.. अब आयेगा असली मजा.. आमच्याशी पंगा घेण्याचा काय परीणाम होतो ते तुम्हांला आज कळेल..'- मोहन दात विचकत म्हणाला..

'संध्या डार्लिंग.. त्या दिवशी खूप हुशार बनली होतीस ना?? माझ्या  पायांना निकामी करायला निघाली होतीस ना?? आज बघ; मी तुझी काय हालत करतो ते.. त्या दिवशी शारदावर बलात्कार केला म्हणून मला मारहाण करवली होतीस ना?? मग आज तुला माझ्यापासून कोण वाचवणार?? आज तुझ्या शरीराचा भोग घ्यावा म्हणतोय..'- मोहनने संध्याच्या चेहऱ्यावरून विकृतपणे नजर फिरवत म्हटलं..


'मोहन.. खबरदार तिच्याबद्दल असा विचार जरी केलास तर..'- महेश रागाने ओरडला तशा साऱ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या.. 

'ओह, गर्लफ्रेंड बद्दल बोललो तर एवढा राग.. ठीक आहे; मग तुझ्या बहिणीला आण..'- मोहनने  निर्लज्जपणे सांगितलं तसा सर्वांनाच संताप अनावर झाला होता.. 

साऱ्यांना मोहनची चीड आली होती पण बंदूकधारी गुंडामुळे सर्वांचाच नाईलाज होता..

'त्या आसच्या पोरांना आणा रे...'- मोहनने फर्मान सोडलं तस दोन-तीन गुंडांनी जाऊन त्या वीस जणांना आणलं होतं. रघुही त्या विसांमध्ये शामिल होता..

त्यां साऱ्यांना ठीकठाक पाहताच आशिष आणि रवीला हायस वाटलं होतं.. रवीला जिवंत पाहताच ते सारेजण त्याही अवस्थेत खुश झाले होते.. सारेजण हात उंचावून रवीला अभिवादन करत होते.. 

इतक्यात मोहनने त्यांच्या पायाजवळ गोळी झाडत त्यांना घाबरवले होते.. आता सगळीकडे निरव शांतता पसरली होती..

'माझ्या दोन मागण्या आहेत.. त्या जर तुम्ही पूर्ण केल्यात तर तुम्ही सगळे घरी सुखरूप जाऊ शकता.. आणि एक जरी मागणी पुर्ण नाही झाली तर तुमचे मृत शरीरपण कोणाला भेटणार नाही..'- मोहनने गंभीरपणे म्हटलं..

'काय आहेत तुझ्या मागण्या??'- कंबळेंनी विचारलं..

'एक रवी पाटिलने आस ची जागा आमच्या नावावर करावी.. म्हणजे आमचा रखडलेला ड्रीम प्रोजेक्ट पुन्हा सुरू करता येईल..'- आपलं बोलणं मध्येच तोडत मोहन पुन्हा संध्याकडे पाहून हसू लागला होता..

'मान्य.. मी आसची जागा तुमच्या नावावर करायला तयार आहे..'- रवीने लागलीच होकार दिला होता..

'आणि दुसरी??'- महेशने रागात विचारलं..

'ती तर मी आधीच सांगितली ना.. मला या संध्याच शरीर हवंय.. जास्त नाही.. फक्त काही तासांसाठी..'- मोहनने संध्याकडे पाहत म्हटलं..

'मोहन.. जिवंत सोडणार नाही मी तुला.. '- महेश रागात मोहनवर धावून गेला होताच की मोहनने संध्यावर बंदूक रोखत; त्याला थांबवलं होत..

संध्या आतून घाबरली होती.. तिच्या घशाला कोरड पडली होती.. तिने मनात नसतांनाही शरयुकडे मान वळवून पाहिलं होतं.. शरयूने मात्र आपली मान फिरवली तसे संध्याने अतिदुःखाने आपले डोळे गच्च मिटले होते.. 

'राग आला एका मुलाला.. चल तु माझा फ्रेंड म्हणून तुला अजून एक ऑप्शन देतो.. माझी माणसं तुला मारतील अगदी तसच जस त्या मोहिलेंनी मला मारलं होत.. आणि जर तु पंधरा मिनिटं.. फक्त पंधरा मिनिटं त्यांचा मार सहन केलास तर मी हिला हातही लावणार नाही.. बोल.. तयार??'- मोहनने महेशला खिजवण्यासाठी  आव्हान पुढे केलं होतं..

'मंजूर आहे मला.. चल ये बघू; तुझं कौर्य जिंकत की माझं प्रेम..'- महेशने त्याच आव्हान स्वीकारलं होतं..

संध्याच्या डोळयातून आता घळाघळा पाणी वाहू लागलं होतं.. तिच्या रडण्याचा आवाज हळूहळू वाढला होता.. एवढं होऊन शरयू अन आशुच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते.. उपस्थित साऱ्या मंडळींना याच गोष्टीचे भयंकर आश्चर्य वाटत होतं..

मोहनच्या इशाऱ्यावरून त्याच्या तीन गुंडांनी महेशला घेरलं होतं.. लाकडी दांड्याने त्यांनी महेशच्या सर्वांगावर मारणे चालू केले होते..   त्याचे मार वर्मी लागत असले तरी महेशच्या तोंडून आवाज निघत नव्हता.. पाच मिनिटे जबर मार लागल्यानंतर महेशच्या चेहऱ्यावर वेदनेची तीव्रता दिसू लागली होती.. अशातच एक फटका त्याच्या डोक्यावर लागला आणि तिथून रक्त येऊ लागलं होतं..

लेकाची ती अवस्था पाहून; कंबळे कपाळाला हात लावून खाली बसले होते..

'स्टॉप इट.. आय सेड स्टॉप इट.. नको मारुस त्याला.. मला तुझी कंडिशन मान्य आहे.. मी.. मी स्वतःला तुझ्या हवाली करायला तयार आहे.. बट त्याला नका मारू..'- रडवलेल्या संध्याने मोहनसमोर हात जोडले होते..

'नाही संध्या.. अजिबात नाही.. आज माझे प्राण गेले तरी तु स्वतःला त्याच्या हवाली करणार नाहीस.. तुला.. तुला वृंदाची शप्पथ..'- महेशने ओरडून तिला विनंती केली होती..

'तुझ्या तर साल्या.. माझा चान्स घालवलास..'- मोहनने त्याच्या माणसांना त्याला अधिक बेदम मारण्याचे आदेश दिले..

ते तिघेजण त्याला मारण्यासाठी दांडा उगारणार तितक्यातच टाळ्यांचा आवाज आला होता.. त्यासरशी साऱ्यांच्या नजरा आवाजाच्या दिशेने वळल्या होत्या..

शरयूने पुन्हा एकदा टाळ्या वाजवल्या होत्या.. यावेळेस मात्र मोहनच्या माणसांनी साऱ्या बंदुका मोहनवर रोखल्या होत्या.. 

आता मोहनच काय सगळेच चक्रावून गेले होते.. शह- प्रतिशहाचा खेळ सर्वांत वेड लावणारा ठरत होता.. शरयू या संपुर्ण लढाईत निर्विवाद वर्चस्व गाजवत असली तरी अधूनमधून तिच स्वतःला हतबल दाखवणं लोकांच्या आकलनशक्तीपलीकडे जात होतं..

मोहनच्या तोंडून तर भीतीने एक शब्द फुटत नव्हता.. त्याने मदतीसाठी त्याच्या सूत्रधाराकडे पाहिलं तर ती व्यक्तीही काहीशी शॉक झाली होती.. इतका वेळ पांडेला बोलण्यापासून अडवायला त्याच्यावर रोखलेली बंदूक ती व्यक्ती शरयुवर चालवणार तितक्यातच वैष्णवीने हळूच जात त्या व्यक्तीच्या डोक्याला मागून बंदूक लावली होती.. 

'वैष्णवी???'- मोहन चिडून बोलला होता..

'वैष्णवी नाही रे.. मोनिका..'- त्या मुलीने बंदुकीची पकड अधिकच मजबूत करत त्या व्यक्तीला पुढे आणलं होतं..

त्या व्यक्तीला पाहताच सर्वांनाच वेड लागायची वेळ आली होती.. सगळे एकमेकांकडे टकमक पाहत होते.. 

'आता तू नक्की कोण??'- त्या व्यक्तीने मोनिकाला प्रश्न केला तशी ती, शरयू अन आशु हसू लागले होते..

'मी?? मी.. संध्याची मोठी बहीण..'- तिने शरयुला डोळा मारत म्हटलं तशी शरयुही हसू लागली..

तिच्या या उत्तराने संध्याचा पार गोंधळ उडाला होता.. ती वैतागून कधी आशुकडे तर कधी शरयुकडे पाहत होती.. दोघेही तिच्याकडे पाहत हसत होते.. त्यांच्या अशा वागण्याने तिला अधिकच राग येत होता..

'आई.. तुझी लेक कशी टोमॅटोसारखी लाल झालीये बघ..'- मोनिका सस्पेन्स वाढवत म्हणाली..

कोणीच काही सांगत नाही म्हटल्यावर; संध्याने पुढे होत मोनिकाच्या चेहऱ्याला आपलं नख लावलं होत..

'ये रानटी.. ओरिजनल चेहरा आहे माझा.. अश्विनी दिदी नाहीये मी..'- मोनिकाने लटक्या रागाने सांगितलं..

'तु.. तु सांग ना मग.. कोण तु?? '- संध्याने तिला केविलवाण्या चेहऱ्याने विचारलं..

'आई-बाबांनी रवी बाबांकडून दत्तक घेतलेली मुलगी... ती मीच.. मोनिका आशिष साटम..पण ताई म्हणायचं हा मला... तुझ्यापेक्षा मोठी आहे मी..'- मोनिकाने हसत उत्तर दिलं..

आतापर्यंत संध्यालाच शरयू अन आशूची दत्तक मुलगी समजू लागलेल्यानां हा जबर धक्का होता.. खुद्द संध्याही या सत्यपासून अनभिज्ञ होती.. तिने चकीत होत आई- बाबांकडे पाहिलं तर यावेळेस आशु तेवढा हसत होता; शरयूचा चेहरा तेवढा निर्विकार होता.. सत्य ऐकून संध्याचा जीव मात्र भांड्यात पडला होता..

'मोनिका, आय एम प्रावूड ऑफ यु बेटा.. मोहनला चांगलंच बांधून ठेवलंस.. त्याला वाटत राहिलं की आसमध्ये अफरातफर माजवण्यासाठी तु त्याचा मोहरा आहेस पण खरंतर तोच आपला एक मोहरा होता हे त्याला आता कळलं असेल..'- आशूने मोनिकाची तारीफ केली होती..

'थँक्स बाबा.. सगळी माँ साहेबांची कृपा.. तिने सांगितलेले मी लक्षात ठेवलं आणि काम सोप्प झालं.. या मोहनच्या सगळ्या वाईट कामांचे पुरावे मी जमा केले आहेत आणि यांच्यापण..'- मोनिकाने त्या व्यक्तीच्या डोक्यावरची बंदूक हटवली होती.. पुढे जात तिने साऱ्या माणसांना इशारे करताच; मोहन आणि त्या व्यक्तीचे हात-पाय बांधून त्यांना एका जागी उभं करण्यात आले होते..

'ताई  बरोबर बोलली होती.. या वेळेस आमचा ज्यांच्याशी सामना होता ते आमच्याहून सगळ्याच बाबतीत सरस होते.. त्यांनी इतक्या खोलवर जाऊन मूळ गुन्हेगार शोधला म्हणजे मानलं पाहिजे यांना... नाहीतर कोणाला माहीत होतं की मनोहर पांडे हा केवळ एक प्यादा आहे म्हणून..'- कंबळें शरयूचे कौतुक अन साने मॅडमचे शब्द राकेशला सांगत होते....

'आणि जर मी तुम्हांला मीही एक प्यादीच आहे असं सांगितलं तर???'- शरयूने भुवई उंचावत कंबळेंना म्हटलं तसा तिथे एकच कल्लोळ माजला होता..

'काय?? वेड लागेल अशाने आम्हांला..'- पांडे जवळपास ओरडलाच होता..

'हो.. मी या लढाईमधला फक्त एक वजीर आहे.. आमच्या गटाचा सुत्रधारही कोणी वेगळाच आहे..'- शरयू हसत म्हणाली.. 

सर्वजण आश्चर्यचकित झालेले असतानाच एका व्यक्तीने पोलिसांना घेऊन, घटनास्थळी प्रवेश केला होता.. 

'तु?? तुपण??'- मोहनच्या तोंडून उद्गार बाहेर पडले होते.. त्याने बाजूला आपल्या सूत्रधाराकडे पाहिले तर त्याचेही डोळे विस्फारलेले होते..


क्रमश:

© मयुरेश तांबे

कथेचे सारे अधिकार लेखकाच्या अधीन असून; कथा नावासाहित प्रसिद्ध करण्यास काही हरकत नाही.. 

सादर कथा ही काल्पनिक असून;   एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी सबंध आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा ही नम्र विनंती..

धन्यवाद..

🎭 Series Post

View all