अपराध कोणाचा, शिक्षा कोणाला? - पर्व दुसरे- भाग २२

This part is in continuation with earlier series..

शरयू पुढे बोलायला सुरू करणार तितक्यातच कंबळेंना पोलिसांचा फोन आला होता.. पांडेला हृदयविकाराचा झटका आला असून त्याला नजीकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी त्यांनी कळवली होती.. रुग्णालयाच्या वाटेवर असताना पांडेने त्याच्या लेकीला आणि संध्याला भेटण्याची विनंती केली होती..

                             -----------------

फोन येताच कंबळेंनी समस्त साटम परिवार, साने परिवार , विभा अन आशिष यांना सोबत घेतलं होतं.. वृंदा आणि महेशही त्यात सामील झाले होते..

सारी मंडळी हॉस्पिटलमध्ये पोहचली होती.. शरयूने वाटेत असताना काही व्यक्तींना फोन करत त्यानां हॉस्पिटलचा पत्ता दिला होता..

हॉस्पिटलमध्ये पांडेला अतिदक्षता  विभागात ठेवले गेले होते.. पांडेंची पत्नी आधीच तिथे पोहचली होती.. काही तासांपूर्वी तिने त्याच्याविरोधात जबानी दिली असली तरी आता ती आपला पत्नीधर्म निभावत सारी धावपळ करत होती.. आईला पाहताच विभाचा बांध पुन्हा एकदा सुटला होता... तिने लागलीच आईकडे धाव घेत; तिला मिठी मारत रडायला सुरू केलं होतं..  

मायलेकींना दुःख अनावर झालं होतं.. त्या दोघींचा विलाप पाहून साऱ्यांना त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटत होती..

आशूने साने मॅडमच्या कानात काहितरी सांगितलं तसं सानेमॅडमच्याही डोळयातून पाणी ओघळू लागलं होतं.. त्यांनी राजेशच्या कानात काही सूचना केल्या तस तो डॉक्टरांच्या भेटीला गेला होता.. त्याने डॉक्टरांशी काही चर्चा करताच डॉक्टरांची धावपळ सुरू झाली होती.. साने मॅडमच्या आग्रहानुसार; राजेश मनात नसलं तरी स्वतः पांडेवरील उपचारासाठी तयार झाला होता.. 

राजेशच्या सल्ल्याने काही औषध बदलण्यात आली होती.. काही चाचण्या पार पाडून; उपचारपद्धती बदलण्यात आली होती.. तास-दोन तासांत पांडेला काहीसा आराम पडला होता..

'मी माझ्यापरीने प्रयत्न केले आहेत.. इंजेक्शनचा प्रभाव ऑलमोस्ट संपला आहे.. दुर्दैवाने आज मला माझ्या बापाच्या खुन्याला स्वतःच्या हाताने वाचवावे लागले..'- राजेश काहीसा चिडून बोलला तसं साने मॅडमनीं त्याला गप्प केले होते..

तीन तासांच्या प्रतीक्षेनंतर; पांडेच्या अतिआग्रहामुळे संध्या आणि कंबळेंना आत सोडण्यात आले होते..

'ये पोरी.. मानलं बाकी तुला.. मला आणि विक्रमला पुरून उरलीस तु.. तुझ्या बुद्धीला दाद द्यावी तितकी कमीच..'- पांडेने कौतुक सुरूच केलं होतं की संध्याने त्याला थांबवत ती फक्त एक मोहरा असल्याचे सांगितले होते.. 

'म्हणजे??'- पांडे चकीत झाला तशी संध्याने डॉक्टरांची परवानगी घेत शरयु अन आशूला आत बोलवून घेतलं होतं.. आत येताना शरयू फेसमास्क काढून आपल्या मूळ चेहऱ्यात आली होती..

'तुम्हीं??'- शरयुला पाहून पांडे आणि कंबळे; दोघेही उडाले होते.. 

'हो, मी.. जर तुम्हीं मी तुम्हाला दीड वर्षांपूर्वी दिलेली धमकी गांभीर्याने घेतली असती तर आज तुमच्यावर ही वेळ आली नसती..'- शरयूने हसत म्हटलं..

शरयूचे बोलणं ऐकून खुद्द संध्यालाही शॉक बसला होता.. तिने चमकून आशुकडे पाहिलं तर तो गालातल्या गालात हसत होता.. 

'पण.. पण तुम्हांला आमचे इरादे कसे कळले?? म्हणजे तुम्ही दिड वर्षे आधीच कसं काय आम्हांला ट्रॅक करत होतात?? आज तरी त्या सर्व गोष्टींवरून पडदा उचलाल का??'- पांडेने शरयुला विनंती केली.. 

'हो सांगते ना.. आशिष पाटीलच्या आईने स्वतःचा जीव गमावून मला वाचवलं होतं.. त्याचवेळी मी तिला तिच्या परिवाराच्या मागे उभं राहण्याचं वचन दिले होते.. आणि जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी ते निभावेन.. मग त्यासाठी मला कोणत्याही थराला जावं लागलं तरी मी जाईन..'- शरयू शांतपणे बोलत होती.. बाकी सारेजण दरवाज्यातून ऐकत होते..

'संध्या पाटीलच्या मृत्यूनंतर; रवीने त्याच्या मुलाला; आशिषला घेऊन नागपूर गाठलं.. इथे त्याने आपली वकिली करता करता; गोरगरिबांसाठी 'आस' ही संस्था सुरू केली.. संध्यावरच त्याच प्रेम त्याच्या हृदयात अजूनही तसच होतं म्हणून तिच्या स्मरणार्थ त्याने याच संस्थेच्या माध्यमातून प्रेमींना एकत्र आणण्यास सुरुवात केली..  त्याच्या सत्कार्यामुळे त्याची लोकप्रियता हळूहळू वाढू लागली होती.. त्याच नाव गाजू लागलं तसं मी त्याला सावध केलं होतं.. त्याला मी समाजात डोळसपणे वावरण्याचा सल्ला दिला होता.. मी दर तीन महिन्याने त्याला मुद्दाम भेटायला जायची.. त्याला भाऊ मानल्यामुळे त्याच्याबद्दलची काळजी मला स्वस्थ बसू द्यायची नाही.. त्यामुळे मी आणि आशूने त्याच्या संस्थेतली एक गोड मुलगी दत्तक घेतली होती.. म्हणजे तिची खुशाली कळण्याच्या निमित्ताने आम्हांला त्याला भेटता येईल आणि कोणाला संशय येणार नाही.. आम्ही फोनवर भरभरून बोलत असलो तरी प्रत्यक्ष भेटीत एक अनोळखी म्हणूनच भेटत होतो.. दत्तक मुलीचे फोटो अन तिची प्रगती दाखवण्याच्या बहाण्याने आम्ही तिथे भेट द्यायचो..'- एवढं बोलून शरयूने आपले डोळे गच्च मिटले होते.. तरीही तिच्या डोळयातून पाणी बाहेर पडले होतेच.. तिची नेमकी अवस्था आशूच्या लक्षात आली तसं त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला धीर दिला होता..

शरयूच्या तोंडून दत्तक मुलगी हा शब्द ऐकताच संध्याचा जीव कासावीस झाला होता.. या वेळेस आशूने तिच्या नजरेला जाणून दुर्लक्षित केलं तशी ती अधिक अस्वस्थ झाली..

'या साऱ्या घटनाक्रमाची सुरुवात कंबळेंच्या बायकोने केली होती.. अचानकपणे दोन वर्षांपूर्वीपासून   ती आसमध्ये येऊ लागली.. भले ती रवीला भाऊ म्हणत असली तरी तिच वागणं मला संशयास्पद वाटलं.. मी तीन दिवस नागपुरात मुक्काम ठोकून तिची सारी माहिती काढली होती.. '

'त्यातून मला कळलं की ती कंबळेंची पत्नी आहे पण ती वरचेवर मनोहर पांडेला भेटते.. ही गोष्ट मला काही पटली नव्हती तस मी अजून खोलात गेली.. आणि मला माहिती मिळाली की पांडे अन कंबळे हे तर शालेय जीवनांपासूनचे कट्टर दोस्त.. पण या दोस्तीला काळिमा फासली ती पांडेनेच.. कंबळेंच लग्न झाले तेव्हा पांडे तुरुंगात होता.. अडीच वर्षांनंतर तुरुंगाबाहेर आल्यावर त्याला कळलं होतं की कंबळेंची पत्नी ही दुसरी तिसरी कोण नसून त्याची भूतपूर्व प्रेयसी आहे.. तिला समोर पाहताच पांडेतला विकृत जागा झाला होता.. त्यावेळी गरोदर असलेल्या सुधाची तो कंबळेंच्या अपरोक्ष जीवापाड काळजी असल्याचं दाखवायचा.. कंबळेना जाणीवपूर्वक मोठया कामात गुंतवून त्याने तिच्या मनात आपलं स्थान पुन्हा मिळवलं होत.. त्या दोघांचे सबंध पुन्हा फुलू लागले होते.. एक वर्षात पांडेने सुधाला पूर्णपणे स्वतःच्या नादी लावलं होत.. पांडे आणि सुधाच्या भेटी वाढू लागल्या तसा कंबळेना संशय आला आणि त्यांना सत्य कळलं.. पांडेने पुढे जात कंबळेला याची वाच्यता कुठेही न करण्याची धमकी दिली होती अन तस केल्यास; कंबळेंच्या आईला अन त्याच्या नवजात मुलाला संपवण्याची धमकी दिली होती.. भीतीने आणि नाईलाजाने कंबळे गप्प झाले होते.. त्याने पांडे अन सुधाला मोकळं रान भेटलं होत.. दोघांच्या नात्याने सारी मर्यादा ओलांडल्या आणि त्याचीच परिणीती म्हणजे वृंदाचा जन्म.. बरोबर ना कंबळे??'- शरयूने कंबळेंवर नजर रोखत विचारलं..

' दुर्देवाने खर आहे हे सगळं.. किती कमनशिबी आहे की ज्याला सच्चा दोस्त मानलं त्यानेच मला उध्वस्त केलं..'- कंबळेंनी खाली मान घालत उत्तर दिलं..

'विक्रम, माझा अपराध माफीच्या लायकीचा तर मुळीच नाही पण तरीही जमलं तर माफ कर.. माझ्यामुळे तुझा संसार मोडला.. तुझं कौटुंबिक जीवन माझ्यामुळे संपलं.. तुला धमकावून; तुला तुझ्या मनाविरुद्ध वागायला लावलं.. कित्येकदा तुला सरळ मार्गावर येवास वाटलं पण मी येऊ दिलं नाही.. मला माफ कर दोस्ता..'- पांडेने हात जोडले होते पण कंबळेंनी त्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं होतं..

बाहेर उभ्या महेश अन वृंदाने सारं ऐकलं होतं.. स्वतःच्या आईच व्यभिचारी रूप समोर येताच त्यां दोघांना जबर धक्का बसला होता.. त्यातही आपण एक अनौरस संतान असल्याचे कळताच वृंदा पुरती कोसळली होती.. तिचा रक्तदाब कमी होत ती बेशुद्ध झाली होती.. सुदैवाने साने मॅडम जवळच असल्याने त्यांनी तातडीने तिच्यावर उपचार सुरू केले होते...

'बट या सर्व गोष्टी तुम्हांला कोणी सांगितल्या?? '- कंबळेंनी शरयुला विचारलं..

'तुमच्या आईने.. सत्य कळल्यावर तुम्ही नैराश्यात गेला होतात; दारूच्या आहारी गेला होतात.. आणि असंच एकदा दारूच्या अंमलाखाली तुम्ही तिला सारं सत्य सांगून टाकले आणि त्यांनी मनूला..'- शरयूने खुलासा केला..

'मनु?? आमची मोलकरीण?? पण तिचा या सगळ्यांशी काय संबंध??'- पांडेने चकीत होत विचारलं..

'सांगते सांगते.. वेळ आली की सांगते.. आपण क्रमा क्रमाने जाऊयात की..'- शरयू हसत म्हणाली..

'पांडेच्या सांगण्यावरून सुधाने साळसूदपणाचा आव आणत; आमच्या साध्यासुध्या बंधूला एका फसव्या नात्यात बांधायला सुरू केलं होतं.. रवीच्या लक्षात आलं नसलं तरी माझ्या चांगलच लक्षात आलं होतं.. त्यातच एक दिवस मी पांडेच्या एका गृहनिर्माण प्रोजेक्टची जाहिरात पाहिली आणि माझा संशय विश्वासात बदलला.. जाहिरातीत दाखवलेल्या प्रोजेक्टच्या जागेवरच आस उभी होती.. म्हणजेच आसला संपवून तिथली जमीन बळकवण्याचा तुमचा कट माझ्या लक्षात आला होता.. तेव्हाच मी रवीला सावध केलं होतं.. आणि त्याचक्षणी शरयू साटमने आपल्या मुळ रुपात येण्याचं ठरवलं होतं '- शरयूचा चेहरा आता गंभीर झाला होता.. 

'बापरे.. भयंकर तयारीच्या आहात तुम्हीं.. मग मला एक गोष्ट कळली नाही.. जर तुम्हांला इतक्या साऱ्या गोष्टी माहिती होत्या तर तुम्हीं रवी पाटिलची हत्या का रोखू शकला नाहीत?? आस सील कशी होऊ दिलात??'- कंबळेंनी आपली शंका विचारली..

'पांडेचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी..'- शरयूने उत्तर दिलं..

'पण त्यासाठी तुम्हीं ज्याला भाऊ मानलात त्याला मरू दिलं??'- पांडेने चकीत होत विचारलं..

'कोण म्हणतं रवी पाटिल मेला?? आणि तेही त्याच्या मागे मी खंबीरपणे उभी असताना??'- शरयूने एक नवाच गौप्यस्फोट केला होता..

'काय?? '- कंबळे, पांडे आणि संध्या एकत्रच ओरडले होते.. 
बाहेर उभी मंडळीही चक्रावली होती..

'डांगे.. आत याल का??'- शरयूने हाक दिली तसा एक व्यक्ती आत रूममध्ये आला होता.. त्याला पाहून कंबळे उडालेच होते..

'डांगे? तुम्ही इकडे??'- आपल्या ऑफिसमधल्या कर्मचाऱ्याला पाहून त्यांना आश्चर्य वाटत होतं..

'डांगे नाही रवी पाटिल...'- त्या व्यक्तीने आपला फेसमास्क काढत साऱ्यांना धक्का दिला होता..

'विक्रमा.. यार एका स्त्रीशी पंगा घेणं किती खतरनाक असतं त्याचा प्रत्यक्ष उदाहरण आपण पाहतोय रे.. पण मग ज्याला आम्ही मारला तो कोण??'- पांडे अजूनही धक्क्यात होता.. त्याच हृदय जोरजोरात धडधडू लागलं होतं..

'तुमचा राईट हॅन्ड.. अल्बर्ट.. ज्याच्या गॅंगला तुम्ही रवीला मारायची सुपारी दिली होतात.. त्याला हिप्नॉटाईज करून आम्ही त्याला तुमच्या विरोधात खोटं सांगून भडकवला होतं.. तो तुम्हाला धडा शिकवणारच होता की त्याच्याच गॅंगने गैरसमजुतीने त्याची हत्या केली होती.. तो गेला तेव्हा त्याचा चेहरा व्यवस्थित होता मग मी अन साने मॅडमनी त्याच्या जागी रवीचा चेहरा लावला होता; जेणेकरून तुम्हांला वाटेल की तुम्ही रवी पाटिलला संपवलत.. आणि  रवी पाटिलला नवा चेहरा देऊन; त्याला आम्ही कंबळेंच्या ऑफिसमध्ये रुजू केलं.. या कामात आम्हांला कुलकर्णी वकिलांची खूप मदत झाली.. त्यांनी रवीला कंबळेंच्या संशयित नजरेतून लपवण्यात आम्हांला मोलाची मदत केली..'- शरयूने उलगडा केला तरी आशु सोडून साऱ्यांच्या तोंडाचे आ वासले होते..

बाहेर उभ्या आशिषला आपला बाप जिवंत असल्याचे कळताच भयंकर आनंद झाला होता.. तो  धावत तडक आत आला होता आणि त्याने रवीला मिठी मारली होती.. बाप-लेकीच्या मिलनानंतर आता दुसऱ्या बाप-बेट्याची भेट होत होती.. 

समोरचे चित्र पाहून शरयुही खुश झाली होती..

'आत्या; तु हे मला आधी का नाही सांगितलंस??'- आशिषने शरयुला प्रश्न केला होता..

'मी जर तुला आधी सांगितलं असतं तर तु याला भेटण्यापासून स्वतःला रोखू शकला नसता आणि यांना सत्याचा सुगावा लागला असता... तुझ्या बाबाला सुरक्षित ठेवण्यासाठीच मला हे सर्व करावं लागलं बेटा..'- शरयूने त्याला थोपटत म्हटलं तशी रवीनेही होकारार्थी मान हलवत तिच्या बोलण्याला दुजोरा दिला होता..

'म्हणजे रवी अन कुलकर्णीच्या मदतीने तुम्हीं माझ्या ऑफिसमधली माहिती काढलीत??'- कंबळेंनी हसता हसता तर्क मांडला..

'हो.. आणि अजून एक जण.. महेश.. तुमचे चिरंजीव..'- शरयुनेही हसत माहिती दिली..

'बाप रे!! तो कसा काय तुमच्या गळाला लागला??'- कंबळेंनी चकीत होत विचारलं..

'एक सत्यासाठी आणि दुसरं प्रेमासाठी..'- शरयूने उत्तर दिलं..

'नाही कळलं.. सविस्तरपणे सांगाल का??'- कंबळे..

'जरी सुधा कंबळे स्वार्थासाठी आसमध्ये जात होती तरी महेश आणि वृंदाच्या मनात मात्र आसबद्दल प्रचंड आपुलकी होती.. तिथल्या मुलांबद्दल त्या दोघांनाही कणव होती.. त्यामुळे जेव्हा महेशला सत्य कळलं; तेव्हाच त्याने आम्हाला साथ देण्याचं ठरवलं होतं.. आणि संध्यावर त्याच प्रेम होतंच.. तेही एक कारण होतं की तो आमच्या सोबत टिकून होता..तुमचं आणि पांडेंच सारं दैनंदिन वेळापत्रक तो आम्हांला मिळवून देत होता.. त्यानुसार आम्ही आमच्या गोष्टी प्लॅन करायचो.. तुमच्या दोघांच्या शत्रूंची माहितीही त्यानेच आम्हांला काढून दिली होती.. त्याची गरज नाही पडली तो भाग अलहिदा..'- शरयूने उलगडा केला..

'अच्छा..त्याच हे संध्याप्रकरण माहीत नव्हतं मला..'- कंबळे म्हणाले..

'हो.. संध्या नागपुरात दाखल झाल्यापासूनच तो तिच्या प्रेमात आहे.. इतका की मारहाण झाली तरी संध्याचा ठावठिकाणा त्याने योगेश उर्फ मोहनला सांगितला नव्हता..'- शरयूने संध्याकडे पाहत म्हटलं..

'मारहाण कधी झाली होती???'- संध्याने चमकून प्रश्न केला..

'तु मोहनला किडनॅप करण्याच्या आदल्या रात्री.. मोहनला कळलं होतं की महेश त्याच्याशी खोटं बोलला आहे म्हणून.. त्याने चवताळून महेशवर हल्ला चढवला होता.. जवळपास पंधरा मिनिटे त्याने मोहन अन त्याच्या साथीदारांच्या माराला दाद दिली नव्हती.. रोहन वेळेत पोहचला नसता तर कदाचित त्याला गंभीर दुखापत झाली असती..'- शरयूच्या खुलाश्याने संध्याला महेशबद्दल मनोमन वाईट वाटलं होतं..

'एक मिनिट!! रोहन म्हणजे??'- पांडेने चमकून विचारलं..

'पांडे सर माझी आठवण काढलीत??'- रोहन पोलिसी गणवेशात पांडे समोर हजर झाला होता..

'तु?? तु.. तु पोलिस??'- पांडेला झटका बसला होता..

'येस.. सब-इन्स्पेक्टर पंकज फ्रॉम मुबंई.. तस तर मी इकडे ड्युटीवरच आलो होतो.. त्याच काय आहे ना पांडेसाहेब.. तुम्ही पडलात एक नामचीन गुंड.. तुमच्या जोडीला हे कंबळे म्हणजे एकत्रित तुम्ही सैतानांची फौज.. तुमच्यासमोर एकट्या इन्स्पेक्टर राकेशचा निभाव लागणं शक्यच नव्हतं मग आमच्या या बहिणाबाईनीं आपले जुने संपर्क वापरून; माझी या केसच्या निमित्ताने इथे तात्पुरती बदली करवून घेतली होती.. मला इथे येऊन फक्त तुमच्या गोटात शिरायचं होतं.. मग काय.. तुमच्या गॅंग मधल्या रोहनला उचलला आणि त्याचा चेहरा मी घेतला.. या मेकअपची किमया आमच्या ताईसाहेबांचीच..'- पंकजने आपला नकली चेहरा उतरवून शरयुला टाळी दिली..

'विलक्षण तयारी!!'- पांडेला आता दरदरून घाम फुटला होता.. 

' खरंतर तुम्ही मला मोहनसोबत आशिष पाटील बनवून पाठवलं आणि आमचं काम अजूनच सोप्प झालं.. आम्हांला एकाच वेळी तुम्ही आणि तुमच्या त्या वाया गेलेल्या पोरावर नजर ठेवणं  सोयीचं झालं होतं.. बाकी तायडे; वेशभूषा एक नंबर हा..'- बोलता बोलता पंकज संध्याच्या दिशेला सरकला होता..

'काय मॅडम?? मामाचा चेहरा ओळखू नाही आला तर कमीतकमी आवाज तरी ओळखता यावा की नाही?? डायरेक्ट मामावर लाईन मारतेस??'- पंकजने संध्याच्या डोक्यावर टपली मारत तिची मस्करी केली तशी तिने पटकन जीभ चावत कान पकडले होते..

संध्याला पाहताच; पांडेला स्वतःच्या लेकीची आठवण आली तशी त्याची नजर रूमच्या दरवाज्याकडे गेली.. दरवाज्या आडून एक व्यक्ती अतिरागाने त्याच्याकडे पाहत होती.. त्या व्यक्तीने पांडेला काही इशारे केले होते तसे पांडेला अस्वस्थ वाटू लागलं होतं.. त्याच्या छातीत पुन्हा वेदना होऊ लागल्या होत्या.. कंबळेंनी तात्काळ डॉक्टरांना बोलवलं होत.. डॉक्टरांनी सर्वांना लगेच बाहेर पाठवून; पांडेवर उपचार सुरु केले होते..

                                   --#--

'बाबा.. तुम्ही घेतलेली दत्तक मुलगी कोण?? '- न राहवून संध्याने पांडेच्या रूमबाहेर येता येताच आशूला सवाल टाकला होता..

'संध्या.. काय घाई आहे तुला.. तुला जे सत्य कळायचंय ते कळेलच.. पण वेळ आल्यावर..  तुझ्या तोंडातुन हा प्रश्न पुन्हा बाहेर आला नाही पाहिजे..'- शरयूने कडक आवाजात तिला म्हटलं..

'मी.. मीच ना ती?? म्हणूनच तु माझा एवढा राग करतेस ना?? मी तुझी मुलगी नाही म्हणूनच तुला मी केलेली कोणतीच गोष्ट पसंद येत नाही ना..सांग ना.. आता का मान फिरवतेस?? मिसेस शरयू मला उत्तर हवंय..'- संध्याला आता रडू कोसळलं होतं..

'तुला जे समजायचं ते समज..'- शरयू आशुचा हात धरून त्याला जबरदस्ती बाजूला घेऊन गेली होती.. 


क्रमश:

© मयुरेश तांबे

कथेचे सारे अधिकार लेखकाच्या अधीन असून; कथा नावासाहित प्रसिद्ध करण्यास काही हरकत नाही.. 

सादर कथा ही काल्पनिक असून;   एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी सबंध आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा ही नम्र विनंती..

धन्यवाद..

🎭 Series Post

View all