अपराध कोणाचा, शिक्षा कोणाला? - पर्व दुसरे- भाग १८

This part is in continuation with earlier series..

'विक्रम, हॅलो विक्रम.. मी.. मी मनोहर बोलतोय.. मला पोलिसांनी अटक केलीय.. माझ्यावर रवीच्या खुनाचा, त्याच्या मुलाला गायब केल्याचा, स्वतःच्या बायको-मुलींवर अत्याचार केल्याचा आणि आस ची बदनामी केल्याचे आरोप लावलेत यांनी.. काहीही कर अन मला बाहेर काढ..मग बघतोच एकेकाला..'- पांडे पोलीस स्टेशनमधून चरफडत होता..

                          ----------------
कोर्टाने पांडेला त्याने केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा म्हणून फाशी सुनावली होती.. शरयूने या साऱ्या कामगिरीबद्दल संध्याला मिठीत घेतलं होतं.. 

तितक्यात ग्लास पडल्याचा आवाज आला आणि संध्याची झोप उडाली होती.. विभावर प्रथमोपचार चालू असताना खुर्चीवर बसून बसून संध्याचा हलका डोळा लागला होता.. 

पांडेंची अटक आणि शिक्षा हे स्वप्न असल्याचं कळताच तिला वाईट वाटलं होतं..

'आपण काही झालं तरी आईला यापुढे अजिबात नाराज नाही करायचं.. आणि या लढाईत आपण तिचा वजीर बनून कामगिरी फत्ते करायची..'- संध्या मनोमन स्वतःला समजावत होती..

शरयू मधल्या वेळेत आशिषशी गप्पा मारत त्याला त्याच्या आणि विभाच्या प्रेमकहाणीबद्दल विचारत होती.. दोघांच्या अगदी हसत खेळत गप्पा चालू होत्या... 

'बाबा, आई त्याला पांडेबद्दल विचारायचं सोडून त्याच्या प्रेम कहाणीमध्ये का इंटरेस्ट घेत बसली आहे??'- संध्याने आशूला प्रश्न विचारला..

'हे बघ बाई.. ती नॉर्मल असते तेव्हाही तिच्या डोक्यातले विचार मला उमगत नाहीत आणि आता तिच्या डोक्यात किती चाली एकाच वेळी चालू असतील ते तिच तिलाच माहीत.. आपण फक्त वाट पाहायची..'- आशूने दीर्घ श्वास घेत एकवार शरयुकडे पाहिलं.. तिच्या गप्पा अजूनही चालूच होत्या..

विभाला शुद्ध आल्यानंतरही ती घाबरलेलीच होती.. ती कधी आजुबाजूच्या माणसांकडे तर कधी आशिषकडे पाहत होती.. त्यात शरयू नेमकी आशिषच्या समोर बसल्याने तिला त्याला पाहता येत नव्हतं.. त्यामुळे ती खुर्चीत बसूनच त्याला वाकून वाकून पाहण्याचा प्रयत्न करत होती.. तो तिथे असल्याचं तिला जाणवत होतं पण त्याचा चेहरा दिसत नसल्याने ती कासावीस होत होती.. 

सारा प्रकार लक्षात येताच आशूने शरयुला विभाची अस्वस्थता लक्षात आणून दिली होती.. 

शरयू तात्काळ उठून तिच्या जवळ गेली होती आणि तिने मायेने तिच्या कपाळावर चुंबन घेत तिच्या मनातला गोंधळ संपवला होता...

'या पुढे तुझा बाप; तुझ्या आशिषला साधा स्पर्शही करू शकणार नाही ही माझी ग्यारंटी..'- शरयूने तिच्या केसातून हात फिरवत तिला धीर दिला तशी ती काहीशी शांत झाली होती.. 

तिला समजावून शरयू तिकडून निघणार तसा विभाने तिचा हात पकडला होता.. तिच्या भाषेत ती तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती.. तिच्या आशिषच्या दिशेने चालू असलेल्या हातवाऱ्यामुळे ती त्याच्याबद्दलच काही तरी सांगत असावी असा सर्वांचा अंदाज होता.. ती खूपच गयावया करू लागल्यानंतर शरयूने आशिषकडे तिच बोलणं समजवण्यासाठी मदत मागितली होती..

'ती.. ती माझ्याबद्दल अजूनही अस्वस्थ आहे.. तिच्या मते मला खूप लागलं आहे त्यामुळे मला ती डॉक्टरांना दाखवण्याची विनंती करतेय..'- आशिषच्या डोळ्यांत पाणी जमा होऊ लागलं होतं..

'विभा मी ठीक आहे ग.. आणि अस बोलून तु त्या काकूंवर अविश्वास दाखवत आहेस असं वाटत नाही तुला?? तु माझी काळजी नको करूस.. मी खरंच ठीक आहे..'- आशिषने शब्दांनी बोलताना विभाला तिच्या भाषेतही समजावलं होतं..

विभाने पुन्हा एकदा डॉक्टर काकूंना हात जोडत त्यांच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला होता..

'काकू ती तुमची माफी मागतेय.. ती जे काही बोलली ती माझ्या काळजीपोटी बोलली.. तुम्हांला दुखावण्याचा तिचा कसलाच हेतू नव्हता..'- आशिषने तिच बोलणं व्यक्त करताच तिने मान डोलवत पुन्हा हात जोडले होते..

तिथल्या सर्वांचेच डोळे पाणावले होते.. साऱ्यांना विभाबद्दल वाईट वाटत होत..

'विभा, उद्या आपण असंही हॉस्पिटलमध्ये जाणारच आहोत.. तिथे आपण तुम्हां दोघांची संपुर्ण तपासणी करणारच आहोत.. डोन्ट वरी.. आता तुम्ही दोघे शांतपणे आराम करा.. आणि.. हा.. मी राधा साने आणि ही माझी दोन मुलं राजेश आणि राकेश..'- साने बाईनी आपल्या कुटुंबाची ओळख करून दिली होती..

आशिष आणि विभाला आत पाठवल्यानंतर संध्याने राकेशसोबत काही चर्चा केली होती.. राजेश आणि सानेकाकू आशिष- विभाला हॉस्पिटलमध्ये तपासणीला नेणार होते..

संध्या आणि आशु केवळ प्रेक्षक बनून राहिले होते.. सारं आटपल्यावर साने काकूंचा निरोप घेत साटम परिवार लॉजवर परतला होता..

आत शिरताच शरयू खुर्चीवर डोकं ठेवून शांत बसली होती.. तिने संध्याला आणि आशूला आधी फ्रेश होण्यासाठी सांगितलं होतं.. संध्या आधी आवरून घेऊन बाहेर आली होती.. आशु फ्रेश होण्यासाठी आत गेला होता.. काही वेळातच त्याला शरयूचा जोर जोरात ओरडण्याचा आवाज आला तसा तो गडबडीने बाहेर आला होता.. 

'मिस्टर साटम.. आवरा लवकर.. आपल्याला ही लॉज सोडावी लागेल.. '- शरयू रागाने थरथरत होती तर बाजूलाच संध्या आपला डावा गाल हाताने झाकून स्फुंदत उभी होती.. बाजूलाच तिच्या मोबाईलचे तुकडे पसरले होते.. आशूला नेमका प्रकार ध्यानात आला तसा तो लगबगीने आवरून बाहेर आला होता.. पुढच्या दहा मिनिटांतच त्या लोकांनी ती खोली सोडली होती.. 

शरयूने संध्याला तिच्या निष्काळजीपणाचे परिणाम दाखवण्यासाठी मुद्दाम रस्त्यावर उभं केलं होतं.. पुढच्या अर्ध्या तासांत तिथे पोलीस हजर झाले होते.. काही मिनिटांनी योगेश आणि वैष्णवीसुद्धा तिथे पोहचले होते.. साटम परिवाराने खोली सोडल्याच कळताच सारेच वैतागले होते.. तितक्यातच लॉजचा कॉम्प्युटर कोणीतरी हॅक करून आतला डेटा डिलीट केला होता तसे ती सारी लोक कपाळावर हात मारून परतली होती..

संध्याला आता आपण मोबाईल ऑन करून चुकी केल्याचं जाणवलं होतं.. शरयूचा वेळीच डोळा खोलल्याने तिने तिच्या हातून मोबाईल हिसकावून घेत तो बंद केला होता.. रागाच्या भरात तिने मोबाईल जमिनीवर आपटून; संध्याच्या कानशिलात लगावली होती..

आशूने पटकन फोनाफोनी करत पर्यायी व्यवस्था केली होती.. तिथे पोहचताच; शरयूने संध्याला तिची बॅग खोलण्यापासून अडवलं होत..

'मिस्टर साटम, उद्याच्या उद्या तुमच्या लाडक्या लेकीला मुबंईला परत पाठवून द्या.. अजून एक काम तर धड केलं नाही पण डोक्याला नुसते ताप करून ठेवतेय.. काही बोलायची पण सोय नाही.. का ? तर बाईसाहेबांचा इगो मोठा.. काही विचार न करता चालू पडणार मग मॅडम.. काही उलट झालं तर निस्तरायला आहेच आई-बाप.. बसलेत रिकामटेकडे.. शीट.. का हिला माझ्या पोटी दिलंस देवा?? का??'- शरयू अजूनही रागातच होती..

'नाही जाणार मी.. या वेळेस कुठेच जाणार नाही मी आई.. तु.. तु मला हवं तितकं मार; हवं तितकं बोल.. पण स्वतःला त्रास नको करून घेऊस.. प्लीज आई.. तु..तु.. बाबा चुकले रे मी.. खूपदा चुकतेय.. नाही मी दिदि एवढी परफेक्ट.. पण मला आई कधीच का समजून घेत नाही रे?? का माझं नाव संध्या ठेवलंस बाबा? किती पापी आहे मी; स्वतःच्या आईला कायम दुःखच देत आलीये.. आयुष्यात कधीतरी मला तिच प्रेम मिळेल का रे बाबा??'- संध्या चांगलीच दुखावली होती..

आशु आता द्विधा मनस्थितीत अडकला होता. बायकोचा राग शांत करावा की लेकीला सावराव? त्याला काहीच सुचत नव्हतं.. शेवटी त्याच्यातला बाप जिंकला होता अन तो संध्याकडे गेला तशी शरयूने आत खोलीत जात दरवाजा लावून घेतला होता..

'बाबा, मी खरेच एवढी खुपते का रे आईला.. मी फक्त मेसेज चेक करायला मोबाईल ऑन केला होता.. ती लोक माझ्यावर एवढी नजर ठेवून असतील असे वाटलं नव्हतं रे.. तु जा.. तु जा आणि आईला सांभाळ.. मी सावरेन स्वतःला.. आता मला सवय झाली आहे तिची बोलणी ऐकून घेण्याची.. तु तिला सावर; तिच्यावर खूप जणांच्या आशा लागून आहेत..'- संध्या आपले डोळे फुसत म्हणाली..

'तु आताही चुकते आहेस.. तिला कायमच  तुझ्याबद्दल  जास्त काळजी वाटत आली आहे.. तुला तुझ्या भावनांवर नियंत्रण ठेवता येत नाही त्याचा दोष तु तिला कशी देऊ शकतेस?? नाही संध्या.. अजूनही वेळ गेली नाहीये बेटा.. लढाई अजूनही चालूच आहे.. तुझी आई आपली सेनापती आहे.. आपण तिला साथ दिलीच पाहिजे.. बघ शांत मनाने विचार करून बघ बेटा..'- आशूने लेकीला समजावलं होतं..

त्याने आपली बाजू  घेतल्याचं ऐकून दरवाज्याडून बापलेकीच बोलणं ऐकत असलेल्या शरयुला काहीसं हायस वाटलं होतं.. त्याच वेळी संध्याच्या मनात आपल्याबद्दल असलेले गैरसमज ऐकून तिला वाईट वाटलं होतं..

आशु येण्याची चाहूल लागताच तिने बेडवर पडून झोपण्याच नाटक केलं होतं.. तिला झोपलेलं पाहून आशूने हलकेच तिच्या केसातून हात फिरवत तिच्या अंगावर पांघरूण घातलं होतं.. त्याच्या इवल्याश्या कृतीने शरयूला मनातून आनंद झाला होता..

                                 --#--

पांडेने घरी येताच साऱ्यां सुरक्षारक्षकांना आणि नोकरांना फैलावर घेतलं होतं.. काही सुरक्षा रक्षकांना तर त्याने रागाच्या भरात मारहाणही केली होती.. 

एवढं करूनही त्याचा राग अजूनही जोरात धुसमसतच होता.. न राहवून त्याने बायकोकडे मोर्चा वळवला..

'ते लोक आले तेव्हा तु काय झोपली होतीस??'- पांडे..

'अहो, मी माझ्या खोलीत आली होती.. तितक्यात लाईट गेली आणि कोणीतरी बाहेरून दरवाजा लॉक केला होता.. तीन तास मी आतच अडकून होते; शेवटी मनूला शुद्ध आली आणि तिने माझी सुटका केली..'- बायकोने धडाधड सगळं सांगितलं..

'शुद्धीवर आली म्हणजे???'- पांडेने बाजूलाच उभ्या मुलीच्या दिशेने पाहिलं.. सगळ्या शरीरावर कोड असलेल्या त्या मुलीचा त्याला कायम किळस वाटे पण बायको समाजकार्यात असल्याने त्याला प्रतिष्ठेच्या प्रश्नापायी तिला घरात ठेवून घ्यावं लागलं होतं..

'साहेब, ते सगळ्या नोकरांना त्या लोकांनी बंदूक दाखवत मिठाई खायला लावली होती.. त्यात गुंगीचं औषध होतं बहुतेक.. ती मिठाई खाताच आमची शुद्ध हरपली होती..'- मनू चाचपडत बोलली...

'मूर्ख आहात सगळ्याच्या सगळे.. बिनकामाचे साले..'- पांडे दात-ओठ खात बोलला.. 

'व्हाट डू यू मीन सगळे?? तुम्ही मलाही मुर्ख म्हणालात??'- बायको ही आता रागात आली होती..

'हो.. आहेसच तु मुर्ख.. सगळ्यांत मोठी मुर्ख.. एक काम धड करता नाही येत..'- पांडे रागाच्या भरात बोलला..

'स्वतःची काळी काम कमी करा ना मग?? त्याचेच परिणाम माझ्या निष्पाप मुलीला भोगावे लागत आहेत.. मग विचारा कोण मुर्ख..'- बायकोचाही आता चांगलाच पारा चढला होता..

पुढच्याच क्षणात पांडेने तिच्या मुखात उलट्या हाताने ठेवून दिली होती..

'हरामखोर साले, मला शिकवतेस.. तुझी लायकी फक्त किचन सांभाळायची आहे ना? मग तेवढंच करायचं.. माझ्यावर लक्ष ठेवायची गरज नाही.. चल चालती हो माझ्यासमोरून नाहीतर अजून एक दोन चढवेन..'- पांडेने हात उगारल्याची ऍकॅशन केली तशी बायको निमूटपणे आपल्या खोलीत परतली होती..

पांडेने विक्रम कंबळेना फोन करून त्या संध्याचा मुंबईतील पत्ता आणि नातेवाईक लक्ष्य करण्यास सांगितले होते.. तसेच आपल्या सर्व जुन्या शत्रूंची यादी तयार ठेवण्यास सांगितले होती..

'ये तु कोणाशी फोनवर बोलतेय??'- पांडेने अचानक किचनमध्ये येत मनूला विचारलं..

'ते.. ते.. आईशी.. आठवण आली म्हणून.. हे.. हे कॉल रेकॉर्डिंग ऐका हवं तर..'- मनूने फोन त्याच्या समोर ठेवला..

'आई, तु लवकर ये ना ग.. मला सगळा अनुभव मिळालाय.. आता तू येऊन सांभाळ तुझं काम.. उद्या संध्याकाळी मामांना पाठवून दे सामान नेण्यासाठी.. आपण भेटूच परवा सकाळी..'- रेकॉर्डिंग ऐकून पांडेने मोबाईल बंद करून परत तिला दिला..

'बरं बरं.. कमलाला लवकरात लवकर पाठवून दे.. असंही तिच्या हातची चव तुला नाहीच..'- पांडे कुत्सितपणे तिच्याकडे पाहत म्हटलं तशी तिने मान खाली घातली..

                                    --#--

दुसऱ्या दिवशी सकाळी शरयू उठायला गेली तर आशूने तिचा हात झोपेत पकडून ठेवला होता..  तिने त्याची झोप न तुटता तो सोडवण्याचा प्रयत्न केला तरीही पकड सुटली नाही तशी ती तशीच बाजूला बसून राहिली..

'नशीबवान आहेत.. आशिष अन विभा.. त्यांना प्रेमाची रंगीबेरंगी दुनिया तरी अनुभवता येतेय... आणि एक माझं बेरंगी आयुष्य.. आशु, किती शिक्षा देशील रे मला.. आजही तुझ्या प्रेमासाठी तरसतेय रे मी.. '- नकळत शरयूच्या डोळयातून पाणी ओझरलं.. तितक्यात हाताची पकड काहीशी सैल झाली अन आपला हात सोडवून घेत ती बाथरूममध्ये गेली होती..आत जात काही क्षण ढसाढसा रडल्यानंतर तिने स्वतःला सावरत सारी दिनचर्या आटपली होती..

आवरून बाहेर येताच तिला संध्या रूममध्ये नसल्याचे लक्षात आले होते.. टेबलावर एक कागद फडफडत होता.. ते पाहून शरयुला पुन्हा धडकी भरली तस धावत जाऊन तिने तो कागद उचलला..

'डोन्ट वरी आई.. या वेळेस मी काही कुठे पळून जात नाहीये.. तु दिलेलं काम करायचं आहे म्हणून लवकर निघतेय.. मला खात्री आहे की तुझा आशिर्वाद माझ्या पाठिशीच असेल.. तुझी नावडती; तुझ्या दुर्देवाने तुझी लेक..'- पत्र वाचून शरयुला हायस वाटलं होतं पण त्याचवेळी तिला संध्याच्या आक्रस्ताळेपणाचीही भीती वाटत होती.. पुढच्या मिनिटाला पत्राच्या शेवटचा मजकूर वाचून शरयूला मनापासून वाईट वाटलं होतं.. 

'मी जे करतेय ते तुझ्या भल्यासाठीच करतेय सोन्या.. एक सत्य अजून तुझ्या आयुष्यात यायचं आहे माझ्या बच्चा.. तुझ्या काळजीपोटीच मला तुला कायम अशा शिकवण्या द्यावा लागतायेत ग.. देव करो आणि ते सत्य कधीच तुझ्यासमोर नको येवो आणि मला तुझे लाड करण्याची संधी मिळो..'- शरयू मनातल्या मनात बोलत असली तरी तिचे डोळे अश्रूंनी तुडुंब भरले होते..'

                                 --#--

संध्याने योगेशला पहाटे जॉगिंग करता करता बरोबर गाठलं होत..  त्याची सकाळची जॉगिंग करण्याची सवय त्याला वृंदाच्या बडबडण्यातून लक्षात होती..

तिने पहाटे चारपासूनच त्याच्या घराच्या ठिकाणी दबा धरून ठेवला होता.. मोका मिळताच तिने मागून जाऊन त्याला केमिकलच्या मदतीने बेशुद्ध केलं होतं.. त्यानंतर तिने सोबत आणलेल्या रिक्षावाल्याच्या मदतीने त्याला पुन्हा एकदा एका खोलीत बंद केलं होतं.. योगेशचे हात-पाय बांधून त्याला खुर्चीवर बसवण्यात आलं आणि त्याचे तोंड तात्पुरते कपड्याने बंद करत; तो आवाज करणार नाही याची खबरदारी घेण्यात आली होती.. 

'तु?? तुझी एवढी हिंमत?? साल्या हात सोड माझे.. मग दाखवतो तुला..'- समोर महेशला पाहताच योगेश दात ओठ खात म्हणाला.. 

'मग तुला काय वाटलं तु माझ्या बहिणीला हानी पोहचविण्याची धमकी देशील आणि मी असाच शांत बसेन??'- महेशने त्याच्या नजरेला नजर देत म्हटलं..

'अरे जा रे.. तुला जे करायचं ते कर.. जा जाऊन सांग तिला सगळं.. तुझ्यापेक्षा तिचा माझ्यावरच जास्त विश्वास आहे.. जा सांग तिला.. घे खुलेआम बोलतो मी; माझ्यासाठी ती फक्त एक प्यादी आणि माझी भूक मिटवण्याची मादी आहे; बाकी काही नाही.. तुझ्या बापाला आमच्या कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आमची चाल आहे ती.. आणि तु फक्त सोड रे मला.. नाही आमच्या दोघांचा हॉट व्हिडीओ तुला पाठवला तर नाव नाही सांगणार.. आणि काय असा बायकांसारखं मला बांधून ठेवलं आहेस.. मर्द असशील तर सोड मला.. आणि कर माझ्याशी दोन दोन हात..'- योगेशने महेशला हसत हसत आव्हान दिलं..

' तुझ्या तर #%&@@, सोडणार नाही मी तुला..'- महेश रागाने त्याच्या अंगावर धावून जाण्यासाठी उठलाच होता की मागून येत कोणीतरी त्याचा हात धरला होता..

'तु??'- योगेश चकीत झाला होता..

'महेश, मीही तुझ्यासारखीच असा उतावीळपणा करते रे.. म्हणून मला पण शिव्या पडतात.. बट आता मला चांगलाच धडा मिळाला आहे.. काम तडीस नेण्यासाठी जोश तर हवाच पण त्यापेक्षा जास्त होश असावा.. कुत्रा कितीही भुंकला तरी आपण लक्ष द्यायचं नसतं रे.. त्याला वाटतंय की तो पांडे; त्याचा बाप आहे तर तो काहीही करेल अँड कधीही पकडला जाणार नाही.. बरोबर ना?' संध्याने फटकन त्याचा फेसमास्क उतरवला होता..

'मोहन????'- महेशला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.. 

'अरे तु माझा बेस्ट फ्रेंड होतास ना?? आणि माझ्याच बहिणीच्या बरबादीवर टपलास तु?? तुला दादा म्हणायची ना रे ती???'- महेशला अजूनही विश्वास बसत नव्हता..

'अरे हाड.. तुझी साधी माझ्या बाजूला बसायची लायकी नाही आणि म्हणे बेस्ट फ्रेंड.. थू.. आणि तुला सांगू का ती मला ढीग दादा म्हणो रे पण माझ्या नजरेत तर वेगळंच होतं ना रे.. आह कसली हॉट आहे रे ती.. थोडी मंद आहे एवढंच.. बाकी तिला लुटायला जाम मजा येईल..'- त्याने महेशला डीचवणे चालूच ठेवलं होतं..

महेश पुनः रागाने उठला तस संध्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवत परत त्याला अडवलं होतं..

'मोहिले काका..'- संध्याने हाक मारली तसे त्या खोलीत एक कुटुंब हजर झालं होतं.. सगळ्यांचे डोळे लाल आरक्त होते.. मोहिले तर हाताच्या मुठी वारंवार आवळत होते.. 

'मोहन, ओळ्खतोस यांना??'- संध्याने विचारलं तशी त्याने नकारार्थी मान हलवली..

'शारदा.. ये ग पुढे.. ये बिनधास्त..'- संध्याने आवाज दिला तशी मागून एक मुलगी आली होती.. घाबरलेली असली तरी तिच्याही डोळ्यांत संताप काठोकाठ भरला होता..

'ही शारदा आणि हे तिच कुटुंब.. आता काही आठवलं??'- संध्याने म्हटलं तसा योगेशने भीतीने आवंढा गिळला... त्याला आपलं कॉलेजमधील दुष्कर्म आठवलं..

'ताई, मारून टाका या नराधमाला.. माझं आयुष्य बरबाद केलं.. माझ्या कुटुंबाला मान वर करण्याचीही सोय राहिली नाही ती याच नालायकामुळे.. मैत्रीच्या आडून माझ्यावर बलात्कार केला या हरामी मुलाने.. याला जगण्याचा हक्क नाही ताई.. अशा किती शारदा याने देशोधडीला लावल्या असतील ताई.. याला मारून टाका.. '- शारदा बोलता बोलता खाली बसली आणि जोरजोरात रडू लागली.. सारे मोहिले कुटुंब तिला सावरायला धावले..

संध्याही शारदासमोर जाऊन गुडघ्यावर बसली..

'बघ, याला ठार मारण्याची माझीही इच्छा होतेय पण मी मजबूर आहे.. याचा बाप गजाआड होईपर्यंत तरी हा जिवंत राहायला हवा.. पण तूला शिवरायांची बलात्काऱ्यांना चौरंगा करण्याची शिक्षा माहितेय का?? आज आपण याचं तेच करूयात की.. उभ्या आयुष्यात याला  याच्या पायावर उभं राहता आलं नाही पाहिजे.. याचा बाप जेलमध्ये गेला की मग याचे हात निकामी करूयात..'- संध्याने मोहनकडे रागाने पाहत म्हटलं.. 

सगळं बोलणं ऐकून मोहनला धडकीच भरली होती.. त्याला दरदरून घाम फुटला होता..

'शारदा, हे घे.. आणि चांगलंच बदडून काढ याला..'- संध्याने तिच्या हातात एक लाकडी दांडा देत तिला मोहनसमोर ढकललं होतं..

आधी काहीशी घाबरलेली शारदा अचानकपणे आक्रमक झाली होती..

'का?? का?? का माझं आयुष्य उध्वस्त केलंस?? कोणी तुला हक्क दिला माझ्या अब्रूशी खेळण्याचा??'- रडता रडता तिने हातातल्या दांड्याने मोहनला मारायला चालू केलं होतं.. तोंडात कपडा कोंबळ्यामुळे त्याला ओरडाताही येत नव्हतं..

सगळ्या मोहिले कुटुंबीयांनी तो बेशुद्ध होईपर्यंत त्याला बेदम मारहाण केली होती.. मारहाण करताना त्या लोकांनी स्वतःचे चेहरे ढाकले होते.. संध्याने त्याचा एक व्हिडिओ बनवला होता.. संध्या एन.सी.सी. मध्ये असताना प्राथमिक उपचार शिकली होती;  ते शिक्षण वापरत तिने मोहनवर जुजबी उपचार केले होते..

'अरे कशाला ट्रीट करतेस त्याला?? मरु दे साला.. विश्वासघातकी..'- महेशने रागाने म्हटलं.. तो तसे बोलताच समस्त मोहिले परिवाराने त्याला दुजोरा दिला होता..

'अरे कोल्ह्याला बाहेर काढण्यासाठी काहीतरी फूस द्यावी लागेलच ना.. हाच आपला तो चारा समज..'- संध्याने सगळ्यांना उद्देशून म्हटलं तसं साऱ्यांनी तिच्या हुशारीची तारीफ केली..

                                   --#--

'चला महेशराव..'- संध्याने बाहेर येताच म्हटलं.. 

'कुठे?? आणि तुझा मास्क??'- महेश गोंधळला होता..

'तुझ्या घरी.. आणि मी तिथे मास्क लावणार नाहीये..'- संध्याने निर्विकारपणे उत्तर दिलं..

'डोक्यावर पडली आहेस का?? डॅड पोहचतील तेवढ्यात..'- महेशने काळजीने म्हटलं..

'तु त्याची चिंता नको करूस.. मी हँडल करेन त्यांना..'- संध्याने त्याला आत्मविश्वासाने म्हटलं..

'पण एवढी रिस्क घेण्याची गरजच काय??'- महेश तिला अडवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता..

'अरे.. आईने मागून येऊन तिचं सैन्य उभं केलं.. मग मला माझं सैन्य नको का उभं करायला?? तिने तर परकी माणसं तिच्या बाजूने वळवलीत मग मी माझी माणसं माझ्या बाजूने नाही वळवू शकत??'- संध्याने हसत म्हटलं...


2...

क्रमशः

© मयुरेश तांबे

कथेचे सारे अधिकार लेखकाच्या अधीन असून; कथा नावासाहित प्रसिद्ध करण्यास काही हरकत नाही.. 

सादर कथा ही काल्पनिक असून;  एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी सबंध आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा ही नम्र विनंती..

धन्यवाद..

🎭 Series Post

View all