अपराध कोणाचा, शिक्षा कोणाला? - पर्व दुसरे- भाग १७

This part is in continuation with earlier series.

शरयूच्या मोबाईलवर अचानक दोन अनोळखी नंबरवरून स्माईली आल्या तसा तिचा चेहरा खुलला.. संध्याला काही कळेनासं झालं तस तिने तिला विचारलं..

'युद्धाचं बिगुल वाजलंय.. आपल्याकडून शंख फुकला गेलाय.. आता प्रतीक्षा आहे पांडेच्या उत्तराची...'- एवढं बोलून शरयू गालातल्या गालात हसू लागली होती..

                               -------------

संध्याला काहीच सुचेनासे झालं होतं... धक्क्यात काही काळ ती गप्पच राहीली होती..

'चल महेशला भेटायला जाऊ..'- शरयूने तिला अजून एक धक्का दिला होता..

'महेशला?? आता? का? '- संध्या चांगलीच गोंधळली होती..

'मॅडम, त्याच्या बाबाच्या ऑफिसमध्ये जाऊन नेमकं त्याने करायचं काय ते तर त्याला कळायला हवं ना? ते तर आपल्यालाच त्याला सांगावं लागेल ना बेटा..'- शरयूने संध्याचे  गाल हळुवार ओढत तिला म्हटलं..

काही वेळातच त्या दोघी महेश राहत असलेल्या लॉजवर पोहचल्या होत्या.. अचानकच संध्याने अवाक होत शरयूचा हात धरला होता तशा दोघी जागीच थांबल्या होत्या..

'हे इथे?? कसं शक्य आहे??'- संध्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले होते..

'कोण आहेत हे??'- शरयूने तिला विचारलं..

'ही.. ही तर आस ची माणसं.. म्हणजे.. तो बघ लाल टी-शर्ट वाला आशिष.. रवी काकांचा मुलगा, त्याच्या बरोबर आहे तो योगेश.. वृंदाचा बॉयफ्रेंड आणि आशिषचा विश्वासू माणूस..'- संध्याला अजूनही काही सुचत नव्हतं..

आशिष आणि योगेश फोटो दाखवून लॉज मालकाकडे नेमकी संध्याचीच चौकशी करत असल्याचं त्या दोघींना कळलं तशा त्या दोघी सावध झाल्या होत्या..

लॉज मालकाने त्यांना संध्या आणि महेशच्या मैत्रीबद्दल माहिती देताच; त्या दोघांनी महेशला खाली बोलवत त्यालाही संध्याबद्दल खोदून खोदून विचारलं होत..

महेशनेही संध्याबद्दल आपण अनभिज्ञ असल्याचं सांगितलं होतं.. ती आपल्याला न सांगताच लॉज सोडून गेल्याची बातमी त्यांना दिली होती.. पण गायब होण्याच्या आधी काही तास ती तिकीट एजंटसोबत मुंबईचे तिकीट अर्जंट मिळवून देण्यासाठी बोलत असल्याचे ऐकल्याची थाप त्याने त्यांना दिली होती.. शेवटी दोघेही तिथून निघाले.. जाता जाता आशिषने जवळच पडलेला दगड उचलून रागाने हवेत भिरकावला होता.. काही वेळातच ती दोघ बाईकवर बसून तिथून गेली होती..  ती लोक गेली तस संध्याने महेशच्या दिशेने पाऊल टाकलं तस शरयूने तिला अडवलं होतं..

'थांब काही वेळ इथेच.. नाहीतर आपल्यामुळे महेश फसायचा..'- शरयूने संध्याला सावध केलं..

इकडे महेश ती लोक जाताच शरयूच्या मोबाईलवर फोन करत होता.. वारंवार फोन करूनही शरयू त्याला काहीच प्रतिसाद देत नव्हता..

अशीच काहीशी पंधरा मिनिटं गेली असतीलच की आशिष अन योगेश परत आले होते.. आल्या आल्या त्यांनी महेशचा मोबाईल त्याच्या कडून हिसकावून घेत त्याची पुन्हा झडती घ्यायला सुरू केली होती..

'कोणाचा नंबर आहे?? कोणाला एवढा उतावीळपणे फोन करत होतास? खरं खरं सांग..'- आशिष अक्षरशः त्याच्या अंगावर धावून गेला होता... 

'भाई, रिलॅक्स ना.. मी करतो हँडल.. काय महेश वृंदाची काळजी नाही वाटतं?? तुला माहितेय ना तुझी बहीण माझ्या प्रेमात किती वेडी आहे ती?? मी मनात आणलं तर..'- योगेशने विचित्र हावभाव करत महेशला धमकी दिली..

सारा प्रकार पाहून संध्या हबकलीच होती पण आता तिच्या  चेहऱ्यावर राग गडद होऊ लागला होता.. योगेशचे शब्द ऐकून तिच्या मुठी आवळल्या गेल्या होत्या.. त्याच वेळी तिला आता महेश काय उत्तर देतोय याचीही चिंता लागून होती..

'हा.. हा संध्याचाच दुसरा नंबर आहे.. मी.. मी ती गायब झाल्यानंतर फेसबुकवरून तिच्या आईला संपर्क करून मिळवला होता.. हे.. हे बघ चॅट..'- महेशने त्याचे शरयुसोबतचे चॅट दाखवताच ती दोघे शांत झाले होते.. जाता जाता आशिषने पुन्हा दगड उचलला होता.. पुन्हा त्याने तो हवेत भिरकावला होता.. हीच कृती त्याने दोनदा केली होती..

'संध्या मला उद्या तो योगेश हॉस्पिटलमध्ये हवा..कोणाच्याही भावनांशी खेळणाऱ्या, विश्वासघातकी माणसाला चारचौघांत मान वर करून वावरण्याचा काहीच हक्क नाही.. पण लक्षात ठेव मला तो हॉस्पिटलमध्ये हवा, स्मशानात नाही..'- शरयूने नकळत संध्याच्या रागाला अजून चेतवल होतं..

'डन आई.. बट मला हा कोणी भामटा वाटतोय ग.. हा आसचा असूच शकत नाही..'- संध्याने आपली शंका मांडली..

'चला म्हणजे कुठेतरी डोकं चालायला लागलं म्हणायचं तुमचं..'- शरयू हसत म्हणाली..

आईच्या हसण्याचा अर्थ न लागल्याने संध्या परत काही बोलणार तितक्यात तोपर्यंत दोघी महेश समोर पोहचल्या होत्या..

'थँक्स काकी.. तुम्ही जी शंका व्यक्त केलीत अगदी तसंच झालं बघा.. बरं झालं तुम्ही फेसबुकवर मला तुमचा नंबर पाठवलात आणि तेही संध्याचा नंबर म्हणून.. नाहीतर.. ही.. ही.. पांडेंची माणसं आहेत काकी.. संध्याबद्दल विचारत होती.. मी तर काही नाही सांगितले.. पण काकी माझी बहिण..'- वृंदाच्या काळजीने महेशच्या डोळयातून काही थेंब बाहेर पडले होते..

'डोन्ट वरी महेश.. वृंदाला आम्ही काहीही होऊ देणार नाही.. असंही योगेश उद्या फक्त सकाळीच त्याच्या पायावर चालेल.. बरोबर ना डार्लिंग??'- शरयूने संध्याकडे पाहिलं तशी तिनेही मान डोलवली..

'म्हणजे??'- महेश आता चांगलाच गोंधळला होता.. 

'आम्ही वचनं विसरत नाही महेश.. तुझ्या कुटुंबाच्या कोणत्याच सदस्यावर आम्ही संकट येऊन देणार नाही.. अगदी तुझ्या डॅडवर पण नाही..'- शरयूने त्याच्या खांद्यावर हलकं थोपटत त्याला आश्वस्त केलं..

महेशने कृतज्ञपणे शरयुला हात जोडले होते..

'महेश, उद्यापासून तुझं एकच काम असेल.. तुझ्या डॅडवर नजर ठेवणं आणि त्यांच्या प्रत्येक हालचालींची माहिती मला पोहचवणे.. उद्या तुला त्यांची पाठ बिल्कुल सोडायची नाहीये.. आणि संध्याकाळी चारपर्यंत तर ते घरी अजिबातच गेले नाही पाहिजेत याची विशेष काळजी घे.. बाकी आम्ही सांभाळतो..'- शरयूने महेशला त्याची कामगिरी सविस्तरपणे समजवून सांगितली होती..

तिघांनी जास्त वेळ एकत्र थांबण धोक्याचं होतं त्यामुळे दोघी महेशचा निरोप घेऊन लगेच निघाल्या होत्या....

'आई, काही शंका कधीपासून माझा जीव खातायेत ग..'- संध्याने शरयूच्या हाताला हलकं पकडत तिला विचारलं..

'तु ज्याला आशिष समजतेस तो मुळात आशिष नाहीच आहे.. तो पांडेने उभा केलेला डमी आहे.. कारण आशिष डावखुरा आहे आणि याने मघाशी दगड उजव्या हाताने भिरकावले तेही दोन्ही वेळा.. माझं मध्ये रविसोबत बोलणं झालं होतं तेव्हा त्याने आशिष मितभाषी पण प्रेमळ असल्याचं म्हटलं होतं.. आणि हा तर.. एकंदरीत तो आशिष असणं शक्य नाहीच.. आणि महेशने जी आसच्या सदस्यांची लिस्ट आपल्याला दिली होती; त्यानुसार रघु सोडला तर बाकी तिघेही आस मध्ये फक्त एक महिना आधी जॉईन झाले आहेत.. वयाच्या चोवीस- पंचविसाव्या वर्षी माणूस स्वतः संघर्ष करतो; कुठल्या संस्थेचा आश्रय शोधत नाही.. आय होप मी तुझ्या शंकाची उत्तरं दिली आहेत.. '- शरयूने हलकं स्मित करत संध्याकडे पाहिलं..

'तु..तु..'- संध्याच्या चेहऱ्यावर प्रचंड मोठा आश्चर्याचा धक्का दिसत होता.. तिला बोलणं न सुचावं इतपत ती शरयुवर इंप्रेस झाली होती..

'तु.. तु.. ग्रेट आहेस आई..'- संध्या मिठी मारण्यासाठी शरयुकडे झुकली तशी शरयू दोन पावलं मागे सरकली होती..

'मी तुला सगळ्यांत पहिली बजावलेली गोष्टच तु विसरलीस संध्या.. तुला मी प्रत्येक फोनच्या शेवटी हेच सांगत आली आहे की भावनांवर नियंत्रण ठेव मग तो कोणताही भाव असो.. तरीही तुला काही अजून ते जमत नाहीये.. आणि राहिला माझ्या या  रुपाला मिठी मारण्याआधी तर तुला आधी ती कमवावी लागेल.. तुला मी जास्त कठोर वाटत असेल किंबहूना तुला माझा भयंकर रागही आला असेल पण मी एक आई आहे आणि माझ्या लेकीला सांगूनही समजत नसेल तर तिला वठणीवर आणण्याची कला मला चांगलीच ठाऊक आहे.. '- शरयूने भर रस्त्यात लेकीवर शाब्दिक फटके चढवले होते..

'मी.. मी पुढे काळजी घेईन..'- आईच्या नाराजीमुळे संध्याचे डोळे पाणावले होते.. निमूटपणे खाली मान घालून ती शरयुसोबत चालू लागली होती..

                                  --#--

पांडेच्या घरातून त्याच्या मुलीला आणि सोबतच्या तरुणाला पळवून आणून आशिष आणि सोबतच्या दोघांनी एका बंगल्यावर ठेवले होते.. 

बंगल्याची मालकीण डॉक्टर होती.. तिने लगेच सोबतच्या तरुणावर प्राथमिक उपचार चालू केले होते.. त्याच्या शरीराची प्राथमिक तपासणी करत तिने त्याला कोणतीही आंतरिक जखम नसल्याचा आशिषला निर्वाळा दिला होता.. 

विभाला आणताना त्यांनी खबरदारी म्हणून तिचे डोळे झाकून आणि तिच्या हातांना बांधून आणलं होतं.. त्या झटापटीत ती बाजूच्या कपटावर कलांडून बेशुद्ध झाली होती.. त्यात तिच्या डोक्याच्या मागच्या भागाला थोडी जखम झाली होती..

तरुणावर उपचार करून झाल्यावर डॉक्टर बाई विभाकडे वळल्या होत्या.. त्यांनी जखम साफ करण्यासाठी तिथे डेटॉल लावताच विभाने खडबडून डोळे उघडले होते..

समोर त्या तरुणाला पट्टी बांधलेल्या अवस्थेत पाहून आणि आजूबाजूला सारे अनोळखी लोक पाहून ती गर्भगळीत झाली होती.. आपली जखम विसरून तिने त्या तरुणाकडे धाव घेतली होती.. खाणाखुणानेच ती त्याची चौकशी करत होती..

'आशिष.. हाय.. मी आशिष साटम (आशु).. तुझ्या मैत्रिणीला सांग आम्ही तुझ्या मदतीसाठीच इथे आलो आहोत म्हणून.. आम्ही काही हिच्या बाबासारखी वाईट माणसं नाही आहोत.. बघ; भीतीने तिच्या बिचारीच्या तोंडून शब्दही फुटत नाहीयेत.. थोडं शांत कर तिला..'- आशिष काळजीने बोलला तस विभाने मागे वळून पाहिलं आणि अचानक मान खाली घालून; रडक्या चेहऱ्याने खुणेनेच तिने आपल्याला बोलता येत नसल्याचं सांगितलं तसे आशिष पाटिल (आशिष) सोडून सारेच अवाक झाले होते.. सर्वजण एकमेकांची तोंड बघू लागले होते..

'आमच्या सुटकेसाठी थँक्स काका.. मला पांडेच्या मोलकरणीने आधीच माहिती दिली होती.. आणि राहिला सवाल हिचा तर हो ही मुकी आहे.. पण ऐकू येते तिला काका.. देवाने तिचा आवाज काढला पण त्याबदल्यात खूप मोठं मन दिलंय तिला.. खूप मोठं मन.. प्रेमळ मन.. '- आशिषने भरल्या डोळ्यांनी तिला मिठीत येण्याचं आवाहन केलं तशी ती हलकेच त्याच्या मिठीत शिरली होती.. 

नंतरचे काही क्षण त्यांचा मूक संवाद सुरू होता.. दोघांच्याही डोळयातून अखंड अश्रुधारा वाहत असतानाच; एकमेकांच्या मुखावरून हात फिरवत ; दोघ एकमेकांना धीर देत होते.. आज कित्येक दिवसांच्या अंतराने दोघे एकमेकांसमोर होते.. पांडेने जवळपास दीड महिना दोघांना डांबून ठेवलं होतं.. आज इतक्या दिवसांच्या विरहानंतर भेटल्यावर दोघांनाही भावना अनावर झाल्या होत्या.. विभाचे हातवारे कळत नसले तरी आशिषच्या शरीरावरच्या जखमांवर ती व्यक्त करत असलेला मूक आक्रोश उपस्थित साऱ्यांना जाणवत होता.. आशिष तिला तिच्या भाषेत धीर देण्याचा प्रयत्न करत असला तरी तिच समाधान होत नव्हतं.. वारंवार त्याच्या पट्टी बांधलेल्या शरीराकडे बोट दाखवत; ती रडत होती.. अधून मधून ती डॉक्टरांकडे पाहत हात जोडत होती.. एक- दोनदा तिने अचानकपणे त्यांचे पायही धरले होते.. त्यांच्या पायाशी बसून ती वारंवार आशिषकडे हात दाखवायची आणि परत त्याच्या बाजूला जात आपल्या भाषेत त्याला धीर देण्याचा प्रयत्न करायची.. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला आधार देण्याचा प्रयत्न करताना तिला स्वतःच रडण मात्र काही आवरत नव्हतंच.. 

अखेर साऱ्या मानसिक त्रासामुळे आणि आधीच डोक्याला झालेल्या जखमेमुळे ती बेशुद्ध पडली तशा डॉक्टरबाई तिच्याकडे धावल्या होत्या..

सारा प्रकार पाहून सारेच स्तब्ध झाले होते.. कोणालाच काही सुचत नव्हतं.. 

आशु तर मटकन खाली बसला होता.. त्याच्या डोळ्यासमोर त्याची आणि संध्याची प्रेमकहाणी फिरू लागली होती.. आपलाही असाच विनाशब्दांचा संवाद चालायचा हे आठवून त्याच्या डोळ्यांतून झरझर पाणी वाहू लागलं तस त्याने पटकन मान फिरवत आपले डोळे फुसले होते.. नेमकी त्याने मान दरवाज्याच्या दिशेने फिरवली होती आणि त्याने पाहिलं तर शरयू दारात उभी राहून सारा प्रकार पाहत होती.. 

एकमेकांशी नजर भिडताच आशूने मान खाली घातली होती.. त्याच्या मनातली वेदना शरयुला जाणवली होती.. त्याला पुन्हा संध्याच्या आठवणींकडे जाताना पाहून तिलाही दुःख झालं होतं..

'तसही ती गेली तेव्हापासून आशु तिला विसरलाच नव्हता.. आज त्याची जखम पुन्हा चेतवली गेली एवढेच..'- शरयू स्वतःलाच दिलासा देत होती..

'डोन्ट वरी.. पांडेला घेरण्याची तयारी झाली आहे...बट आशु मी आताच्या घडीला जरी व्हिलन असली तरी तुला असं खचलेलं नाही पाहू शकत रे.. तु मला विक करशील अश्याने.. '- शरयूच्या डोळ्यांत पाणी पाहून आशूलाही वाईट वाटलं होतं..

'एम सॉरी शरू'- त्याने दबक्या स्वरात तिची माफी मागितली होती..

                                 --#--

'विक्रम, हॅलो विक्रम.. मी.. मी मनोहर बोलतोय.. मला पोलिसांनी अटक केलीय.. माझ्यावर रवीच्या खुनाचा, त्याच्या मुलाला गायब केल्याचा, स्वतःच्या बायको-मुलींवर अत्याचार केल्याचा आणि आस ची बदनामी केल्याचे आरोप लावलेत यांनी.. काहीही कर अन मला बाहेर काढ..मग बघतोच एकेकाला..'- पांडे पोलीस स्टेशनमधून चरफडत होता..


3...

क्रमशः

या कथेचे दोन्ही पर्व लिहिताना आजवर मला एक लेखक म्हणून रवी पाटिल या पात्राच्या वाट्याला सुख न लिहिता आल्याच दुःख होतच पण त्याहीपेक्षा जास्त वाईट विभा रंगवताना वाटतंय..

हा भाग उशिराने येण्याचं कारणच ते ठरलंय.. तिची प्रेमभावना रंगवण्याचा आटोकाट प्रयत्न केला तरीही समाधान काही लाभलंच नाही.. पहिल्यांदाच कोणतातरी भाग मी सुरुवात आणि शेवट लिहून तयार केला आणि तो वेळेत पोस्ट करता आला नाही कारण मध्यभाग मला काही लिहीता येत नव्हता.. आताही ही मी स्वतः त्या विभाबद्दलच्या लेखनाबद्दल समाधानी नाही.. शेवटी जितकं जमलं तितके लिहिलं.. आशा आहे की तुम्ही समजून घ्याल.. 

बाकी अशा खऱ्याखुऱ्या विभानां आणि त्यांना समजून घेण्याऱ्या आशिषनां (आणि उलटही) माझा सलाम!! 

© मयुरेश तांबे

कथेचे सारे अधिकार लेखकाच्या अधीन असून; कथा नावासाहित प्रसिद्ध करण्यास काही हरकत नाही.. 

सादर कथा ही काल्पनिक असून;   एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी सबंध आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा ही नम्र विनंती..

धन्यवाद..

🎭 Series Post

View all