अपराध कोणाचा, शिक्षा कोणाला? - पर्व दुसरे- भाग १०

This part is in continuation with earlier series.

'एक मिनिट... माझा आशिष?? माझा आशिष?? हे कधी ठरलं?? अस कोणी ठरवलं??'- संध्याच्या चेहऱ्यावर एक हसू फुललं.. सेकंदापुर्वीचा राग जाऊन क्षणात चेहरा लाजेने भरून गेला..

                             -----------------
संध्या आल्यानंतर वृंदाचा मूड आणि तिची आर्ट दोन्ही खरेच बहाराला आली होती.. तिची कल्पना-शक्ती आणि तिची रंगसंगती पाहून संध्याही मनापासून तिचं कौतुक करत होती.. 

प्रदर्शन असल्याने काही दर्दी रसिकही प्रदर्शन पाहायला आलेच होते.. वृंदाची कला पाहून त्यांनी जवळ येत तिच कौतुक केलं होतं.. तिने काढलेल्या चित्रांपैकी काही चित्रं काहींनी खरेदी केली होती..

'वृंदा, तुझी दि उद्या पण येणार आहे ना?? '- आरोहीने हसत विचारलं..

'ते माहीत नाही.. ते आमच्या राणी सरकारांच्या मूड वर आहे?? बरोबर ना राणीसरकार??'- वृंदाने गाल फुगवत संध्याला विचारलं..

'येईन मी उद्यापण.. बट मध्ये माझं दोन-तीन तासांचे एक काम आहे.. तेव्हा मी निघून जाईन आणि संध्याकाळी परत येईन..'- संध्याने म्हटलं तशी वृंदा खुश झाली..

'ये.. येस.. दि उद्यापण माझ्या सोबत..'- वृंदाने संध्याला मिठी मारली..

'ओह ग्रेट.. म्हणजे उद्याही आपला सेल चांगला होणार वृंदा.. यु नो; आपला सकाळपासून काहीच सेल नव्हता बट तुझी दि आल्यावर आपल्या जवळपास  ४०% पेंटींग्स सेल झाल्या आहेत.. तुझी दि आपला लकी चार्म आहे वृंदा.. ब्रिन्ग हर एव्हरीव्हेअर..'- आरोही खुश होत म्हणाली..

'काय म्हणतेस?? दि ऐकलं?? दि.. लव्ह यु दि..'- वृंदाने पटकन संध्याच्या अंगावर उडी मारत तिला मिठी मारली..

तिच्या अशा वर्तनाने संध्याला नकळत तिच्या बहिणीची आठवण आली.. ती स्वतः तिच्या मोठया बहिणीवर असंच जीवापाड प्रेम करत होती..

त्या दिवसाचा वेळ संपला तशी आवरा आवर करून सर्वजण रेडी झाले होते.. 

महेश गाडी घेऊन आला होता पण आता तो गाडीबाहेर पडला नव्हता.. गाडीत बसून तो आपल्या मोबाईलमध्येच पाहत बसला होता.. वृंदा काय समजायचं ते समजून गेली होती.. गाडीत सामान भरून सगळे गाडीत बसले तशी महेशने गाडी चालू केली.. संपूर्ण प्रवासात वृंदा अन आरोहिचीच बडबड चालू होती.. अधून मधून संध्याही त्यांना सामील होती पण महेश मात्र चिडीचूप होता.. आरोहिच्या एक-दोन प्रश्नांना त्याने अतिशय मोजक्या शब्दांत उत्तर दिली होती.. आरोहिला सोडून गाडी कंबळेंच्या घरी पोहचली.. संध्याने सामान घरी नेण्यासाठी वृंदाला मदत केली होती.. सामान वृंदाच्या खोलीत ठेवून; ती आपल्या खोलीत फ्रेश होण्यासाठी निघाली होतीच तितक्यात महेशने हाताने तिचा रस्ता अडवला अन तिच्या कपाळावर आठ्या पसरल्या..

'तु काय समजतेस ग स्वतःला?? मी.. मी काय एवढा गयागुजरा आहे की माझी सावलीही तुला नकोशी आहे?? तु स्वतः कोण आहेस?? तू स्वतः अजून झिरो आहेस आणि कसला तोरा मिरवतेस?? तुला भाव दिला म्हणजे स्वतःला फार ग्रेट वगैरे समजतेस की काय?? जर समजत असशील तर मी तुला सांगतो की तू फक्त एक सामान्य मुलगी आहेस.. कळलं फक्त एक सामान्य मुलगी.. आणि तीही आमच्या आश्रयाला असलेली.. आम्ही नसतो तर तुला कोणी आसरा दिला असता या अनोळखी शहरात??'- महेश दिवसभराचा राग संध्यावर काढत होता.. पण नकळतपणे तो खूप काही चुकीचं बोलून गेला होता..
त्याच बोलणं ऐकून वृंदा तिच्या खोलीबाहेर आली होती.. महेशचे बोलणे ऐकून ती शॉक झाली होती..

महेश चे बोलणे ऐकून संध्याच्या डोळ्यांत टचकन पाणी आलं होतं.. त्यातला आश्रित हा शब्द तिच्या स्वाभिमानाला खोलवर जखम करून गेला होता.. 

'एम सॉरी.. रियली सॉरी मि. महेश.. मी.. मी.. एम सॉरी..'- संध्याला पुढे सुचेना तशी ती आपल्या खोलीत गेली आणि तिने दरवाजा आतून लावून घेतला.. वृंदाला खरंतर संध्याला सावरण्यासाठी पुढे जायचं होतं पण त्याआधीच तिने दरवाजा बंद केला तशी ती नाईलाजाने बाहेरच थांबली.. 

'काय समजते स्वतःला.. एवढी मोठी हिरोईन आहे का ही.. प्रेम करतो म्हटलं तर एवढा अपमान..आता कशी आली ना ताळ्यावर??'- महेश वृंदाकडे पाहत म्हणाला..

'दादा.. दादा.. तु.. तु ना.. जगातला सर्वांत मुर्ख मनुष्य आहेस.. सर्वांत मुर्ख.. बिग फूल..  आणि जर तुझ्या या मूर्खपणामुळे  तिने काही वेगळा डिसीजन घेतला ना तर लक्षात ठेव..'- वृंदा महेशला धमकावून आपल्या खोलीत गेली होती..

'अरे यार, या घरात माझ्या भावनांची काही कदरच नाही लोकांना..'- महेशही वैतागून आपल्या रूममध्ये गेला..

संध्या कोचवर बसून रडत होती.. आश्रित शब्द राहून राहून तिला अस्वस्थ करत होता.. आता तिला काही झालं तरी कंबळेंच्या घरात राहण्याची बिल्कुल इच्छा होत नव्हती.. तिला त्या घरात गुदमरल्यासारखं होऊ लागलं होतं.. तिने घड्याळ पाहिलं तर रात्रीचे 8 वाजत आले होते.. काय करावं हे तिला सुचत नव्हतं.. सरतेशेवटी तिला एकच नाव डोळ्यासमोर आलं आणि तिने त्या व्यक्तीला फोन करून मदत मागितली.. समोरच्या व्यक्तीनेही सकारात्मक प्रतिसाद दिला अन संध्याचा जीव काहीसा भांड्यात पडला..

'वृंदा, बाळा चल लवकर.. राजूचा बर्थडे सेलिब्रेशन एवढ्यात चालू होईलच.. तुझ्याशिवाय केक कापणार नाही तो..'- सुधा काकी..

'हो मम्मा.. दोन मिनिटांत आले.. माझा लिटिल फ्रेंड आहे तो.. त्याच्या लाडक्या मावशीशिवाय नाहीच कापायचा तो केक..' - वृंदाला आज तिच्या एका मैत्रिणीच्या पाच वर्षांच्या मुलाच्या वाढदिवसाला जायचं होतं..

'चल ग बाई लवकर.. एका तासांत आपल्याला परत यायचं आहे..'- सुधा काकींची घाई चालूच होती..

वृंदा आणि सुधा काकी बाहेर पडल्या तस संध्याला हायस वाटलं..  इतक्यात तिला आठवण झाली तशी तिने भराभरा आपली बॅग भरायला घेतली.. बॅग भरताना ती सारखी घड्याळ पाहत होती कारण समोरचा व्यक्ती पुढच्या अर्धा तासांत तिला घेण्यासाठी येणार होता..

तिच सार आवरून झालं आणि तिने बॅग उचललीच होती की तिला काहीतरी आठवलं आणि तिने माघारी फिरत टेबलावर एक चिठ्ठी लिहून ठेवत त्यावर एक दोनशे रुपयांची नोट ठेवून ती घराबाहेर पडली होती.. तिच्या नशिबाने तिला घराबाहेर पडताना कोणीच पाहिलं नाही आणि फोनवरील व्यक्तीही अगदी वेळेत बाईक घेऊन गेटवर आला होता.. ओळख पटताच संध्या पटकन बाईकवर बसून त्या व्यक्ती सोबत निघून गेली होती..

'थँक्स आशिष..'- संध्याने त्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं..

'मला चंदू बोल.. प्लीज..'- त्याने हलकं मागे वळून तिला म्हटलं..

गाडी काही मिनिटांत एका गल्लीसमोर उभी राहिली तशी संध्या उतरून; बॅग सावरत आशिषच्या पुढील सुचनेची वाट पाहत उभी राहिली..

'तु जास्त अपेक्षा ठेवली नाहीस ना??'- आशिष गाडी लावून आला अन त्याने संध्याची बॅग उचलली..

'नाही.. अरे पण माझी बॅग.. आय मीन मी उचलते..'- संध्या त्याच्या हातून बॅग घेण्याच्या प्रयत्नांत त्याला धडकली..

'हो..हो.. हळू.. पळवत नाहीये ती बॅग.. तुला जस्ट मदत म्हणून उचलली होती..'- आशिष हसत म्हटला तशी ती काहीशी लाजली..

काही वेळ असंच एकमेकांना पाहत ती उभी असतानाच योगेशचा आशिषला फोन आला आणि त्यांची तंद्री भंग झाली.. काही वेळांत आशिष संध्याला घेऊन चाळीतल्या एका घरी आला.. दहा बाय दहाच्या त्या खोलीत चारजण राहत होते.. आज त्यात संध्याची भर पडली होती..

'ये.. हा आमचा राज-महाल.. बघ तुला जमतंय का??'- आशिष हसत म्हणाला..

संध्याने घरात पाऊल टाकताच; योगेश अन वैष्णवीची तोंड वाकडी झाली होती.. आशिषने अशी अनोळखी आणि तेही काही क्षणापूर्वी योगेशला जखमी करणाऱ्या मुलीला घरी आणणं त्यांना अजिबात रुचल नव्हतं..

'सध्या आमचे दिवस फिरले आहेत सो आम्ही इथे लपून बसलो आहोत.. आम्ही तीन आणि अजून एकजण आहे.. तोच आमचा आणि बाहेरच्या दुनियेतला दुवा आहे.. म्हणजे आम्ही तिघेही त्या पांडेच्या हिटलिस्टवर आहोत त्यामुळे आम्ही खुलेआम जास्त बाहेर पडू शकत नाही.. त्यामुळे तोच आमची मदत करतो सर्व बाबतीत.. खायला आणायला गेला असेल, आला की ओळख करून देतो.. बाकी या दोघांना तु ओळ्खतेसच..'- आशिष हलकं हसत म्हटला तसे दोघेही काहीसे चिडले..

'डोन्ट वरी गाईज.. मी जास्त जास्तीतजास्त दोन दिवस राहीन.. बाकी मला माझी वेगळी सोय करावीच लागेल.. मी तुमच्यासोबत नाही राहू शकत..'- संध्याने त्यांना कोड्यात पाडणारे उत्तर दिली तशी दोघेही खवळले..

'हो, आम्ही काय डाऊन-मार्केट लोक, गैरप्रकारांचा आळ असलेले गुन्हेगार.. आमच्यासोबत कशाला राहशील तु?? आणि तसच जर आहे तर मग आज का आलीस इथे?? तुला गरज होती म्हणून?? आमच्या चंदू दादाच्या चांगल्या स्वभावाला गुंडाळून तु चांगलं नाही करत आहेस, लक्षात ठेव..'-  वैष्णवी थरथर कापत बोलत होती..

तिच्या अशा बोलण्याने चकीत होत आशिषने संध्याकडे पाहिलं तर तिच्या चेहऱ्यावर कमालीची शांतता होती.. 

'चिऊ.. गप्प..अगदी गप्प.. काय बोलतेस?? हेच शिकवलं का बाबांनी आपल्याला?? ती अडचणीत होती.. तिने मदत मागितली आणि मी ती केली.. यांत तिला सूनवण्यासारखं काय आहे??'- आशिष वैष्णवीला बोलला.. तो पुढे काही बोलणार त्याआधी संध्याने त्याचा हात पकडला होता..

तिच्या हाताचा नाजूक स्पर्श होताच आशिष अगदीच गोंधळला होता..

'तुझी काळजी आहे रे त्यांना.. तुझ्यासोबत आजवर घडलेल्या घटनांची धास्ती आहे त्यांना.. ते त्यांच्या जागी बरोबर आहेत..'- संध्याने म्हटलं पण तिने आशिषचा धरलेला हात अद्यापही सोडला नव्हता.. ना की आशिषने तिला तशी आठवण करून दिली होती..

'मग वृंदासोबत आम्ही ठीकच केलं ना?? आता कळली ना तुला कंबळेंच्या घरची माणसं कशी आहेत ते?? '- योगेशने असे म्हणताच संध्याचा चेहरा बदलला..

'तु वृंदाला दुखावण्याचा प्रयत्न तर करून बघ.. जिवंतच सोडणार नाही तुला पुढच्या वेळेला..'- तिचा गोरापान चेहरा रागाने लालबुंद झाला होता.. तिच्या मुठी आवळल्या गेल्या होत्या परंतु नेमका आशिषचा धरलेला हात एका हातात असल्याने तो ही सोबत आवळला गेला तसा आशिष वेदनेने कळवळत ओरडला.. आणि संध्याला नेमकं काय ते लक्षात आलं..

'आय एम सॉरी.. रियली सॉरी.. तु.. तु तरी सोडायचास ना हात? दुखलं का?? मी.. मी हात खूप जोरात दाबला का??'- संध्याच्या ओठातली काळजी तिच्या चेहऱ्यावरही दिसत होती आणि ते पाहून आशिष मनोमन सुखावला होता..

'दादा, काय बोलली ती ऐकलं का??'- वैष्णवीने आशिषला म्हटलं तसा तो भानावर आला..

'तुम्ही जे ऐकलं ते बरोबरच ऐकलं.. त्या घरात वृंदा आणि सुधाकाकी म्हणजे वृंदाची आई या दोन निरागस व्यक्ती आहेत. आणि त्यांना जर कोणी हानी पोहचवणार असेल तर त्याला त्याआधी माझा सामना करावा लागेल..मग तो कोणीही असो; मी सोडणार नाही...'- संध्याने योगेश अन वैष्णवीच्या डोळ्यांत डोळे घालत त्यांना सांगितलं..

'अँड यु.. तुझं जर तिच्यावर प्रेम असेल तरच तु तिला उद्यापासून भेटायचं.. आणि जर का तु फक्त तुझा तो घाणेरडा प्लॅन डोक्यात ठेवून भेटणार असशील तर मी तुझे दोन्ही पाय जायबंदी करेन ऑर जास्तच डोक्यात गेलास तर तुझ्या मित्रांवर तुला श्रद्धांजली वाहायची वेळ येईल.. बिलिव्ह मी.. मी ज्यांना आपलं म्हणते त्यांना मी कायम जपते.. जस्ट किप इन युअर माईंड..'- संध्या त्यांना निग्रहाने बोलत होती..

'चंद्रिका, आज आमची बाजू ऐकशील का ग? प्लीज??'- आशिषने मागून तिला आवाज दिला तशी ती शांत झाली..

'हो ऐकेन मी.. आज तुमच्याकडून ऐकायचं आहेच मला... त्याशिवाय मला माझं लक्ष्य मिळणारच नाही..'- संध्याने आशिषच्या डोळ्यांत डोळे घालत म्हटलं..

'चंद्रिका, कृपया आता तरी सांग.. कोण आहेस तू? आणि तुझं काय कारण आय मिन लक्ष्य आहे; इथे नागपुरात येण्याचे??'- आशिषने आज संध्याकडून संपूर्ण माहिती घेण्याची ठरवलीच होती..

'मी चंद्रिका सुकम.. मुंबईवरून आली आहे.. रवी पाटील काकांना त्यांची प्रतिष्ठा मिळवून द्यायला... आज ते हयात नाही याची नागपूरकरानीं हळहळ व्यक्त करायला हवी; त्यासाठीच मी आली आहे.. मी आली आहे ती आस पुन्हा डौलाने उघडलेली बघण्यासाठी, मी आली आहे ते तुला निर्दोष सादर करण्यासाठी आणि झालंच सगळं मनासारखं तर तुला नेण्यासाठी..'- संध्याने हसत उत्तर दिलं तसे सगळेच आश्चर्यचकित झाले...

'पण.. पण तुझा या सगळया गोष्टींचा काय संबंध?? तु.. तु अजूनही काहीतरी आहे की जे लपवते आहेस..'- आशिष बोलला..

'हो.. मी लपवल्या आहेत काही गोष्टी तुझ्यापासून.. मीच मान्य करते.. पण माझ्यावर विश्वास ठेव आशिष; मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी आहे.. शब्द अन शब्द खरा आहे.. सो प्लीज माझ्या हेतूंवर संशय घेऊ नकोस.. मी इथे फक्त अन फक्त तुझ्यासाठीच आहे.. आससाठी आहे.. राहिला सवाल लपवलेल्या गोष्टींचा तर लक्षात ठेव की प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते अन त्या त्या वेळेला तुझ्यासमोर त्या त्या गोष्टी स्वतःहून येतील.. ज्या दिवशी आपलं टार्गेट पुर्ण होईल त्या दिवशी तुला सर्व सत्य माहीत असेल.. आय प्रॉमिस..'- संध्याने त्याचा हात आपल्या हातात घेत त्याला आश्वस्त केलं तसा त्याचा गोंधळ काहीसा कमी झाला..

'तु?'- संध्या आणि सर्वांच्या खाण्याची सोय करायला गेलेला मुलगा एकमेकांना सामोरे येताच एकत्रित उद्गारले..

                                    --#--


इकडे कंबळेंच्या घरात महेश कपाळाला हात लावून बसला होता.. संध्याची घर सोडत असल्याची चिठ्ठी वाचून वृंदा आणि सुधा काकींनी त्याला भरपूर झापल होतं..कधी नव्हे ती आजी ही त्यात सामील झाली होती.. महेश अक्षरशः एकटा पडला होता.. तरी अजून कंबळे यायचे होते..

काही वेळाने कंबळे आले होते.. लवकर आवरून ते हॉलमध्ये येऊन बसले होते..

'सुधा अग त्या संध्याला बोलवशील का ग?? मला तिच्याशी एक चर्चा करायची होती..'- कंबळेंनी सुधा काकींना आवाज दिला अन प्रत्युत्तरदाखल  सुधा काकींनी संध्याने लिहिलेली चिट्ठी त्यांच्यासमोर धरली.. कंबळेंनी चिठ्ठी वाचायला घेतली..

"आदरणीय आजी,
साष्टांग नमस्कार... खरंतर प्रत्यक्षात आशीर्वाद घेऊन बाहेर पडायचं होतं पण नाही जमलं.. काही चुकलं असल्यास माफ करा..

आदरणीय कंबळे काका,
थँक्स.. आज जिथे माणुसकीला थारा नाहीत तिथे तुम्ही मला तुमच्या घरात थारा दिलात.. तुम्ही मला तुमची असिस्टंट बनवण्याची माझी विनंतीसुद्धा स्वीकारलीत..या सर्व गोष्टींबद्दल मी तुमची कायम ऋणी असेन.. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तीन दिवसांनी तुम्हांला तुमच्या ऑफिसमध्ये येऊन भेटेन.. जर तुमची इच्छा असेल आणि तुम्ही माझ्यावर रागावला नसाल तर , काका प्लीज मला तुमची असिस्टंट करून घ्या.. मला तुमच्याकडून खूप काही शिकायचं आहे...

प्रिय काकी,
मागच्या दोन दिवसांत तुम्ही मला अगदी आईसारखी माया दिलीत.. आणि मी ही तुमच्यात माझी आईच पाहिली.. तुमच्याकडून दोन दिवसांत खूप काही शिकायला मिळालं.. तुमचे विचार खरेच ग्रेट आहेत.. खरंतर कंबळे काकांना सल्यासाठी बाहेर जाण्याची गरजच नाहीये.. असो मी दुर्दैवी की मला यापुढे तुमच्याकडून जास्त काही शिकता येणार नाही.. माझ्या या कृतीने तुम्ही दुखावल्या असाल तर मनापासून सॉरी.. तब्येतीची काळजी घ्या काकू.. 

माय लिटिल सिस्टर वृंदा,
आय होप, तुला तरी माझं वागणं पटलं असेल.. जे झालं त्याला माझा नाईलाज होता.. बट यु डोन्ट वरी.. मी तुझ्या आजूबाजूलाच असेन.. तुझी इच्छा असली आणि नसली तरी.. 

महेश,
थँक्स अ लॉट.. वेळेत माझे डोळे उघडल्याबद्दल.. ठरल्याप्रमाणे माझं दोन दिवसांच्या स्टेची रक्कम या चिट्ठीसोबत ठेवत आहे..

तुमची दोन दिवसांची पाहुणी,
        संध्या साटम."

कंबळेंनी सभोवताली पाहिलं तर किचनमध्ये सुधा काकी स्फुंदून रडत होत्या.. वृंदाही सुधा काकींच्या मिठीत शिरून रडत होती.. तिच्या कोमेजलेल्या चेहऱ्यावरून स्पष्ट होत होतं की ती खूप वेळेपासून रडत असावी..  

'पप्पा, सॉरी.. हे सगळं माझ्यामुळे झालंय..'- महेशने काही वेळापूर्वी त्याच्यात आणि संध्यामध्ये झालेला संवाद त्यांना सांगितला तसा कंबळेंना संताप अनावर झाला पण अचानकपणे त्यांनी स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवलं...

'तुझी स्वतःची लायकी काय आहे रे??'- कंबळेंनी महेशला विचारलं तशी त्याने मान खाली घातली..

'काहीच नाही पप्पा.. पण.. पण मी स्वतःला लवकरच प्रुव्ह करेन पप्पा..'- महेशने वडिलांना सांगितलं तसे ते हसले..

'ठीक आहे.. तुला माझ्या ऑफिसबाहेरचा लॉज आठवतोय का रे?? तो श्रीगणेश लॉज??'- कंबळेंनी महेशला विचारलं..

'हो.. त्याच काय??'- महेश..

'तुझी बॅग भरायची आणि उद्या सकाळी तिथे चालू पडायचं.. जेव्हा आयुष्यात काही बनशील तेव्हाच या घरात पाऊल टाकायचं.. दुसऱ्यांच्या मुलीला ज्ञान शिकवतोस ना? बघू तु स्वतः किती पाण्यात आहेस ते..'- कंबळेंनी शांतपणे सांगितलं आणि ते आपल्या खोलीत जाण्याआधी किचनमध्ये वळली..

'ती मुलगी वेगळी आहे सुधा.. तिला निमित्त भेटलं फक्त आपल्या घराबाहेर पडायचं.. असंही आपल्या घरात राहण्यात तिचा स्वाभिमान आड येतच होता..'- कंबळेंनी बायकोशी बोलताना लेकीच्या डोक्यावरून हात फिरवला..

'डॅड, तुम्ही तिला असिस्टंट म्हणून  ठेवाल ना?? म्हणजे मला तिथे येऊन तरी दि ला भेटता येईल..'- वृंदाला रडू आवरत नव्हतं..

'एका अटीवर.. जर माझी प्रिन्सेस आता रडायची थांबली तरच तुझी दि माझी असिस्टंट.. नाहीतर नाही..'- कंबळेंनी असे बोलताच वृंदा आपले अश्रू फुसून, रडायचं थांबवून शांत उभी राहिली..

'ये बाळा..अग तिला असिस्टंट करून घेण्यात माझाच फायदा आहे ग.. तिच्यासारखी स्मार्ट मुलगी माझं खूप काम करेल अन तिच्या शांत डोक्याचा मलाही खूप फायदा होईल.. सो ती माझी असिस्टंट होणारच.. बट मला वाटत आपण तिला तिचा स्वाभिमान जपायला देवुयात.. तिला तिची सोय करू देत.. बाकी तिला काही लागलं तर आपण आहोतच की..'- कंबळेंनी लेकीला मिठीत घेत समजावलं तशी ती शांत झाली..

कंबळेंनी बायको आणि लेकीला शांत केलं आणि त्यांना संध्याबाबत आश्वस्त केलं.. बेडरूमकडे जाताना त्यांनी महेशला परत एकदा त्यांच्या निर्णयाची आठवण करून दिली होती...

महेशने आजूबाजूला पाहिलं पण आज कोणीच त्याच्या पाठिंब्यासाठी किंवा सांत्वनासाठी पुढे आलं नव्हतं.. नाही म्हटलं तर सुधा काकींच्या हृदयात कालवाकालव झाली होती पण त्यांना संध्याचे शब्द आठवले त्यामुळे त्याही महेशकडे गेल्या नाहीत..

कंबळेंनी संध्याला असिस्टंट म्हणून घेण्याचे फिक्स केले.. तसे त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्येही कळवले .. 

परंतु एका गोष्टीपासून ते बिल्कुल अज्ञान होते की संध्याच्या रुपात एक भयंकर वादळ त्यांच्या आयुष्यात प्रवेश करत झालं होतं.. आधीच पेटलेल्या तिच्या सुडाग्नीत आज रात्री आशिष अन त्यांच्या सहकाऱ्यांच्या व्यथेचे तेल पडून; बदल्याची आग अधिक तेज होणार होती.. आता फक्त प्रश्न एवढाच होता की त्या आगीत नेमकं जळणार काय?? अख्खा विक्रम कंबळे की कंबळेंमधला खलनायक??

क्रमशः

© मयुरेश तांबे

कथेचे सारे अधिकार लेखकाच्या अधीन असून; कथा नावासाहित प्रसिद्ध करण्यास काही हरकत नाही.. 

सादर कथा ही काल्पनिक असून;   एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी सबंध आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा ही नम्र विनंती..

धन्यवाद..

🎭 Series Post

View all