अनोखी गुरुदक्षिणा

A story of a young girl who came from small village

गुरुदक्षिणा

©®अमित मेढेकर

"अनु किती वाजलेत बेटा?"
"आई 2 वाजत आलेत, अजून वेळ आहे आपल्याला  पोहचायला तु निवांत झोप बरं जरा. मी आहे ना! विचार केल्याने त्रास होईल." अनु आईला म्हणाली पण मनातून थोडी तिची सुद्धा चलबिचल चालू होतीच.
"तू पण झोप ना...."
"मला नाही झोप येत आई प्रवासात..आणि पुणे येईलच 4वाजता..."
हलणाऱ्या ट्रेनच्या डब्याबरोबर तिचे विचार पण हेलकावत होते.

अनु एक हुशार मुलगी जी कोकणात आपल्या आईसोबत राहत असे. अभ्यासात तिचा हात कोणी धरू शकणार नाही असे असले तर परिस्थिती ही अत्यंत बेताची होती, आई थोडेफार शिवणकाम करून पैसे मिळवीत असे आणि त्यात त्यांचे कसेबसे भागत होते. स्कॉलरशिप मिळत असल्यामुळे 10वी पर्यंत तरी तिच्या शिक्षणाची सोय तालुक्याच्या गावी  झाली होती पण पुढे काय? हा प्रश्न आ वासून तिच्या आईसमोर उभा होता.

बघता बघता दिवस सरले महिने सरले आणि वर्ष सुद्धा!  दहावीत 96%टक्के मार्क मिळवून अनु तालुक्यात पहिली आली होती. तिचा सत्कार झाला, बक्षिसे मिळाली,  कौतुक झालले पण आता खरे प्रश्न समोर उभे होते ते म्हणजे कॉलेज? पुढील शिक्षण?

तिच्या नशिबाने सत्कारावेळी एक सज्जन गृहस्थ तिथे होते ज्यांना कोणाकडून तर अनूची सगळी परिस्थिती कळली होती, त्यांनी पुढाकार घेऊन तालुक्यातील एका चांगल्या कॉलेजमध्ये तिच्या 12वी पर्यंतच्या शिक्षणाची व्यवस्था करून दिली.
मन लावून अभ्यास करणारी अनु सायन्स घेऊन कोणत्याही शिकवणीविना 91% मार्क मिळवून 12वी पास झाली. 

इंजिनिअर व्हावे अशी तिची ईच्छा होती पण त्यासाठी शहरात जावे लागेल, आईला तर एकटीला सोडायचे नाही मग काय करायचे?

तरी आईने तिला पाठबळ दिले आणि तिने फॉर्म भरला आणि पुण्यात नंबर लागला तसे तिने विचार बदलत तिथेच तालुक्याच्या ठिकाणी ऍडमिशन मिळवून BSC Computer  चांगल्या मार्कने पूर्ण केले.

नाहीतरी पाठीमागे काही नाही, मग आईला एकटे सोडायचं नाही, जे होईल ते बघू छोटी नोकरी करू पण आईला सोबत नेऊ या पक्क्या बेतात मायलेकी आता मात्र पुण्याकडे निघाल्या होत्या. 

साठवलेले जे काही थोडे पैसे आणि दोन चार दागिने होते ते घेऊन दोघी पुण्याला रवना झाल्या.

ट्रेन पहाटे 4 वाजता स्टेशन ला पोचणार होती, कोणी एक गावाकडील 'धनकवडी' येथे राहतात इतकेच माहीत होते. त्यांचा मोडकातोडका पत्ता घेऊन अनु आली होती...तिचा  हा विश्वास होता की इथे काही सोय होईल.

"आई अगं उठ! आपण स्टेशन ला पोहचलो." उठून बसत अनु म्हणाली.
आईला तरी कुठे झोप होती, ती पण जागीच होती.

जुलै महिना असल्याने बाहेर पाऊस कोसळत होता.  बाहेर काळाकुट्ट अंधार होता आणि स्टेशन ला  जाग होती पण सगळेच अनोळखी....कसे बसे सामान सांभाळत दोघी स्टेशन ला उतरल्या आणि प्लॅटफॉर्मवर उभ्या राहिल्या.. 15 मिनिटे झाल्यावर अनु म्हणाली "आई पाऊस थांबेल असे वाटत नाही, आत्ता निघू...पुढे बघू."

पहाटेच्या अंधारात दोघी स्टेशन बाहेर पडत होत्या. समोर भले मोठे पुणे शहर आ वासून उभे होते आणि त्यांच्या मनात अनामिक भिती आणि काळजी उभी होती.

रिक्षावाले जे उभे होते त्यातील काही जण ठाम पणे धनकवडी म्हणल्यावर 500रुपये द्या यावर अडून होते.

बिचकत त्या दोघी पुढे पुढे जात त्या स्टेशनबाहेर आल्या. समोरून एक रिक्षा येताना दिसली, अनु ने हात दाखवला तशी ती थांबली.
एक साधारण 60 ते 65 वयाचे रिक्षा चालवणारे व्यक्ती होते...त्यांनी विचारले, " कुठे जायचे?"
"आम्हाला धनकवडी ला जायचे आहे. हा बघा पत्ता." अनु ने दाखवले त्यावरून ते नवीन आहेत हे त्या रिक्षावाल्याने ओळखले.

"ठीक आहे बसा."
"पैसे किती होतील?"
"मीटर प्रमाणे घेईन" ते म्हणाले तसे त्या दोघी बसल्या. आईने हातातली पिशवी मागे ठेवली, अनु ने बॅग पायाशी घेतल्या आणि खांद्यावरील सॅक सांभाळत बसली. 
मनातल्या हूरहुरीने इकडे तिकडे बघत अनु कधी बाहेर दिसणाऱ्या पुण्याकडे तर कधी आईकडे बघत होती.

रिक्षा चालवणारे काका आपल्या शांत विचारात पुढे जात होते. 
बसून बऱ्याच वेळ झाल्यावर अनु ने विचारले "काका किती लांब हो अजून ?"
" अजून 10 मिनिटे लागतील" असे आरशातुन तिच्याकडे बघत त्यांनी सांगितले."

थोड्या वेळाने त्या एका बिल्डिंग समोर आल्या " हे बघा तुमच्या ऍड्रेस प्रमाणे हे अपार्टमेंट आहे".
"किती  पैसे झाले काका?" अनु म्हणाली.
"210 झालेत" 
"ठीक आहे म्हणत तिने पैसे दिले, बाजूला गोंधळलेली आई कशी बशी उतरून इकडे तिकडे बघत होती.

"अग आई जरा बॅग घे ना" अनु म्हणाली तशी यंत्रवत त्यांनी बॅग खाली घेतली. त्या बॅग सांभाळत अनु गेट कडे निघाली आणि तिच्या पाठोपाठ आई.
रिक्षा टर्न घेऊन निघून गेली.
अनु म्हणाली "तू खालीच थांब मी भेटून येते."

आई इकडे तिकडे मोठ्या बिल्डिंगकडे नवलाईने बघत होती, मोठाली दुकाने तिने येताना पहिली होती त्याचे नकळत दडपण तिला जाणवत होते आणि अचानक तिला आठवले की आपली पिशवी हातात नाहीच!

10 मिनिटाने अनु घाबरी घुबरी झालेली खाली आली, पहाते तर आई रडत बसली होती.
"अग काय झालं आई?"
"अनु अगं माझी पिशवी मिळत नाही आहे त्यात पैसे होते  आणि माझे जे काय होते ते आपले दागिने!"
 असेल इथेच नीट बघ."
"नाही ग अनु! मला वाटते की रिक्षात राहिली. आता कसे करू?  मी सगळे पैसे ठेवले होते" आणि रडायला लागली.
आता अनु हादरली कारण त्या ऍड्रेस वर भलतेच लोक राहत होते त्यामुळे कोणी ओळखीचं नाही हे कळले होते  आणि आता पैसे पण हरवले होते.

काय करू काय नाही हे सुचत नव्हते. आता उजाडले होते सकाळचे 6.30 वाजायला आले होते,चहाचे एक दुकान दिसत होते जे एक स्त्री उघडत होती.
चहाची गरज खूप होती पण चहा घ्यायला सुद्धा आता पैसे नव्हते.

सामान हातात घेऊन त्या जायला निघाल्या तेवढ्यात एक रिक्षा बाजूला आली आणि थांबली. अनु ने लक्ष दिले नाही तसे आतून आवाज आला " मुली जरा थांब."
अनु ने वळून पाहिले तर ते सकाळचे रिक्षा वाले काका होते.
जवळ येत ते म्हणाले " ताई काय झाले?"
रडत आई म्हणाली " दादा एक निळी बॅग होती पण दिसत नाही हो, आणि त्यात माझे महत्वाचे सामान आहे."

"ताई कुठल्या रंगाची होती, निळ्या का?" 

अनु थोडी दचकली, पण तेवढ्यात त्या माणसाने शर्ट मधून ती बॅग काढली आणि तिच्या समोर धरली. 
 आई ने ती बॅग पाहून पटकन हातात घेऊन स्वतःच्या जवळ घेतली.

अनु आणि आईच्या च्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. अनुने  ऐकले होते की मोठ्या शहरात काहीही हरवले तर पुन्हा मिळत नाही आणि तिला तर हरवलेले पैसे पुन्हा नजरेसमोर दिसत होते.

पाणावलेले डोळे घेऊन, हात जोडून ती त्यांच्याकडे पाहत होती.
 त्यांचे सामान अजूनही तिथे पाहून त्या काकांनी आपलेपणाने तिची चौकशी केली.
अनु ने त्यांना सांगितले की, 'त्यांच्या गावचे ओळखीचे या ठिकाणी राहायचे. आमचे गावात असताना संबंध चांगले होते. आता इथे राहत नाहीत. त्यांचा नंबर तिच्याकडे नाही आणि त्या दोघी त्याच भरवश्यावर आल्या होत्या दुसरे कोणी इथे माहीत सुद्धा नाही.'

"बेटा, विश्वास ठेवणार असशील तर मी काही सुचवू का?"
"काका असे का म्हणता हो? जिथे हरवलेलं माणूस सापडत नाही तिथे हरवलेले पैसे दागिने तुम्ही आणून दिलेत यापेक्षा अजून मोठं काय? ओळखीच्या लोकांनी दगा दिला आणि तुम्ही हरवलेली हिम्मत मिळवून दिली. हे पैसे नसते मिळाले तर आम्ही कुठलेच राहिले नसतो. सांगा तुम्ही जे तुम्हाला वाटते ते".

" इथे जवळच माझे घर आहे. तुमची हरकत नसेल तर थोडा वेळ तिथे चला. माझी बायको आणि मी दोघेच आहोत. थोडे निवांत व्हा. चहा घ्या. मग ठरवू काय करायचे ते."

ज्या प्रेमाने आपुलकीने ते बोलत होते त्यासाठी 'अनु'ला नाही म्हणता येत नव्हते आणि तिच्याकडे काही पर्याय पण नव्हता तिने आईकडे पाहिले. आईला परकं शहर,नवीन लोक यामुळे काही सुचत नव्हते पण 'अनु'वर विश्वास म्हणून ती हो म्हणाली आणि त्या दोघी त्या काकांच्या घराकडे निघाल्या.

रिक्षा ऊभी करून त्यांनी पाठी यायला सांगितले. जेमतेम 2 खोल्याचे घर होते. त्यांना पाहुन त्या घरातील बाईने आश्चर्यकारक लूक दिला तसं नजरेनेच काकांनी तिला शांत राहा सांगितले.

आत जाऊन त्याने त्या बाईला काही सांगितले तशी ती बाई शांत होऊन बाहेर आली आणि त्या माय लेकीची आस्थेने चौकशी केली. त्यांना हात पाय धुवायला लावून आले घातलेला गरम चहा दिला. तोवर बऱ्यापैकी त्यांचे आपसात बोलणे सुरू होते.

"अनु बेटा माझ्या माहितीत एक गृहस्थ आहेत जे तुला कदाचित मदत करू शकतील, मी त्यांना भेटून येतो तोवर तुम्ही इथेच राहा आज."

त्या दोघींना ओशाळाल्यासारखे झाले तसे त्या काकू म्हणाल्या " अहो काळजी करू नका, आज उद्या पर्यंत हे नक्कीच काही मार्ग काढतील."

"काका खूप।साधे आणि छान आहेत" अनु म्हणाली.
"असणारच! हे एक रिटायर्ड शिक्षक आहेत."
 तसे चमकून अनु ने त्यांच्याकडे पाहिले तर ते हलकेच हसले आणि म्हणाले " हे पुणे आहे बेटा. इथे चरितार्थ चालवायला काहीतरी काम करावेच लागते आणि मेहनत केल्याने कोणतेही काम कमी होत नाही" 

"आमचा एक मुलगा कामासाठी दिल्लीत असतो. तिथून पैसे पाठवतो. आम्ही नवरा बायको दोघे इथेच!"

 अनु ने लगेच त्यांना वाकून नमस्कार केला आणि म्हणाली " काका तुम्ही खरंच देवासारखे भेटलात आम्हाला. नवीन शहर, अनोळखी लोक, पैसे हरवले आम्ही कल्पना पण नाही करू शकत की काय झाले असते."

"एक लक्षात ठेव बेटा, तो पाठीराखा आहे ना! मग सगळं नीट होईल. तुम्ही बसा, मी आलोच थोड्या वेळाने."

"काका माणुसकीला देव म्हणेन मी. तुम्ही आम्हाला भेटलात. प्रेमाने आपुलकीने मदत केलीत ती ही निःस्वार्थ  पणे. जे स्वतःकडे ठेऊ शकले असतात ते परत करायला आम्हाला पुन्हा शोधून काढलेत...तुम्ही तर आमचे पाठीराखेच असेच मी म्हणेल. देव तर आहेच पण व्यक्ती सुद्धा महत्वाचा जो ते करून देतो." भावनिक होऊन अनु बोलत होती.

काका काहीच न बोलता बाहेर त्या माणसाला भेटायला गेले.

अनु ने काकुला मदत करत स्वंयपाक केला, आणि स्वतःबद्दल सांगितले तसे त्यांना तिचे खूप कौतुक वाटले. 
जेवायच्या वेळेस काका परत आले आणि म्हणाले, 
जवळच एक  खोली मिळेल जिथे तात्पुरती सोय होऊ शकेल. तसे त्या दोघींना बरे वाटले.
त्या दिवशी संध्याकाळी च त्यांच्या मदतीने अनु ने त्या खोलीत सामान हलवले.

दुसऱ्या दिवशी लगेच छोट्या जाहिराती बघायला सुरुवात केली. लगेच मोठे काही मिळेल अशी आशा न ठेवता तिने एका कॉम्पुटर इन्स्टिट्यूट ला टीचर म्हणून जॉईन केले.

हळूहळू त्या दोघी तिथे रुळत होत्या. त्या काकू आणि आई मध्ये छान मैत्री झाली होती. काका अजूनही सर्वतोपरी तिला  मदत करत होते.

एका संध्याकाळी "काका-काकू" अश्याअनुच्या जोरदार आवाजाने ते दोघे एकदम दचकले.
"अनु काय झाले बेटा?" काकांनी काळजीने विचारले..
"डोळे बंद करा काका"
"काय झाले ते तर सांग"
"डोळे बंद तर करा"
त्यांनी डोळे बंद केल्यावर त्यांच्या हातात एक पिशवी अनु ने ठेवली.
काकांनी उघडले तर आत मध्ये 'ग्रे कलरच्या सफारी सूट' चे कापड होते.
काकूंच्या हातात तिने एक लाल रंगाची काठपदराची साडी ठेवली.
"अनु हे काय?" काकांनी विचारले.

" या शहरात माझी पहिली कमाई आज झाली. माझा पहिला पगार आज मिळाला. त्यातून तुम्हा तिघांसाठी काहीतरी घेतले...आवडले का?"

"अगं, पैसे सांभाळून वापरावे...आमच्या साठी घेण्यापेक्षा तू स्वतःसाठी घ्यायला हवे..आमच्या म्हाताऱ्यांसाठी कशाला....?" 

"काका, मी माझ्यासाठीच घेतले आहे"

"म्हणजे?" काकांनी चमकून विचारले.

"तुमच्यासाठी घेतले की ते माझ्यासाठीच घेतल्यासारखे आहे. माझे सुख तुमच्या आनंदातच नाही का? जेव्हा कोणी नव्हते तेव्हा तुम्ही होता..जेव्हा आपले नव्हते तेव्हा तुम्ही होता...जेव्हा आमच्यावर संकटे होती तेव्हा तुम्ही होता...माझ्या साठी प्रत्येक वेळेला तुम्हीच होता काका...मग मी तुमच्यासाठी काही केले तर ते माझ्या साठीच नाही का!"

काका आणि काकू काहीच न बोलता भरलेल्या नजरेने तिच्याकडे पहात होते. 

"तुमच्या रुपात मला वडील, काका आणि एक आदरणीय गुरुजी मिळाले आहेत. मला माझ्या पद्धतीने त्यांना 'गुरूदक्षिणा' देऊ देत की"

अनुच्या या बोलण्याने एका रिटायर्ड शिक्षकाचा 'ऊर' आज अभिमानाने भरून आला होता. त्या 2 खोलीच्या घरातील आनंद आज तिथे मावत नव्हता.

©®अमित मेढेकर