अनोखा संस्कारवर्ग

Story revolves around a different project carried out by group of ladies in our society to keep children busy and teach them good values and morals

आम्ही सोसायटीतल्या सगळ्या बायका दररोज संध्याकाळी मुलांसाठी संस्कारवर्ग म्हणून एक तास कार्यक्रम राबवतो त्यात योगासने, स्तोत्रपठण, बोधकथा सांगणे,सामाजिक विषयांवर चर्चा करणे किंवा भजन,कीर्तन म्हणवून घेणे, मुलांना नृत्य, संगीत आणि इतर कलांमध्ये मार्गदर्शन करणे , प्रोत्साहन देणे असा आमचा हेतू म्हणून फावल्या वेळेत हा वर्ग आम्ही चालू केला आहे. त्यानंतर मुलं मैदानी खेळ खेळायला जातात आणि आम्ही दुसऱ्या दिवसासाठी मुलांना मार्गदर्शनाचा विषय किंवा एखादा सामाजिक विषय निवडत असू, त्यासाठी कोण बोलणार आहे, मूलांना कशाप्रकारे समजावलं तर पटेल असं सगळं ठरवत बसतो.

आज मुलं खेळायला गेलीच होती तितक्यात "मम्मा मम्मा, मला कार्तिकने मारलं" असं म्हणत रडत रडतच आठ वर्षाचा देवेश त्याच्या आईकडे म्हणजे निशाकडे आला. निशाने त्याला जवळ घेतले आणि त्याची समजूत काढू लागली पण देवेश जोरजोरात रडतच होता. आता निशा जरा चिडूनच म्हणाली, " काय मुलींसारखा रडतो? तू माझा स्ट्रॉंग बॉय आहेस ना?? आणि boys don't cry! ok?"

याउलट कार्तिकची आई त्याला समजावत होती की असं मित्रांना मारू नये वगैरे..निशाचं बोलणं ऐकून देवेश अगदी शांत झाला आणि डोळे पुसून पुन्हा खेळायला गेला. तो तिकडे जाताना कार्तिकला म्हणाला," मी नाही रडणार, मुली रडतात!" मला त्या दोघांचे ते बोलणं अजिबात पटलं नव्हतं.

माझी मैत्रीण मिता माझ्या बाजूलाच बसली होती, तिची आणि माझी नजरानजर झाली आणि तिच्या डोळ्यातही तेच भाव मला स्पष्ट दिसले. तिलाही निशाचं बोलणं अजिबात आवडलेलं नव्हतं. योगायोग असा की मिता आणि मी दोघीही एका मुलाची आई आहे आणि आमची दोघींचीही मुलं अतिशय चपळ, चंचल आणि मस्तीखोर आहेत त्यामुळे आमचं जरा जास्तच बोलणं होत असते त्यामुळे खूप घट्ट मैत्री झाली होती आमची.. बऱ्याचदा न बोलताही आम्ही एकमेकींच्या मनातलं ओळखून घेऊ शकत होतो.

मिताने डोळ्यानेच मला खुणावले आणि सगळ्यांना  म्हणाली, "उद्याचा संस्कार वर्गाचा विषय मी निवडते. सुवर्णा आणि मी पूर्ण तयारी करून उद्याचा वर्ग घेऊ. लवकरच महिला दिन येतोय त्या पार्श्वभूमीवर आपण या आठवड्याचे कार्यक्रम ठेवूया"! सगळ्या जणी आनंदाने तयार झाल्या.

आम्ही दोघींनी विषय निवडला "स्त्री पुरुष समानता". आता आव्हान असं की वय वर्ष दोन ते पंधरा अशा सगळ्याच मुलाचा समावेश या कार्यक्रमात आहे मग अगदी लहान मुलांना कसं समजावणार? मग माझ्या "सुपीक"???????? डोक्यात एक कल्पना आली की आधी आईच्या मनावर रुजवावे लागेल कारण हा विषय इतका मोठा आहे की तो एक दिवसात, किंवा एक आठवड्यात शिकवण्याइतका सोपा नाहीये.. मुलं आपलं ऐकत नाही, ते आपलं अनुकरण करतात ह्या ठाम मताची मी आहे मग मी मुळाशीच आघात करायचं ठरवलं.

आमची दोघींची मुलं आमचं खूप अनुकरण करतात.. विशेष म्हणजे ते दोघेही फक्त दीड वर्षाची आहे.माझा मुलगा मी जे काम करेन तिथे माझ्या मागे असतो आणि त्याला ते प्रत्येक काम करायचं असतं मग मीही बिनधास्त करू देते....गंमत म्हणून मी माझ्या मुलाचे झाडू मारताना, कपडे धुताना, फरशी पुसताना, पोळी बनवताना अशे गमतीशीर विडिओ काढलेले होते. मिता कडेही तिच्या मुलाचे ती वाचत असताना तोही वाचन करायला पुस्तक समोर पकडून बसलेला विडिओ होता, देवाची पूजा करतानाचा विडिओ होता. आम्ही हे सगळे विडिओ एकत्र करून छानसं गाणं टाकून व्हिडिओ मुलांना दाखवण्याची व्यवस्था केली.

तो विडिओ बघितल्यावर मुलांनी टाळ्या वाजवल्या पण त्यांना त्यातून बोध नव्हता झाला. त्यांनी गंमत म्हणून बघितला पण त्यांच्या माताना थोडा बोध नक्कीच झाला असावा. माझ्या मुलाचे काम करतानाचे विडिओ बघून मलाही खूप जणांनी टोकलं होतं.. मुलीची कामं लावते, किती दमावतेस त्याला इत्यादी पण मी दुर्लक्ष केलं करण माझ्यासाठी तो एक संस्काराचा भाग आहे.

मुलांना विचारल्यावर आमच्या अपेक्षेप्रमाणे देवेश बोलला, "अरे हा तर मुलीचे काम करत आहे, म्हणून हसलो मी!" मी त्याला म्हणाले, " असं कोण म्हणाले की ही सगळी कामं मुलींची असतात?" तर तो हसत म्हणाला "मम्माने"....त्याचं हे बोलणं ऐकून मी निशाकडे बघितलं. तिला एव्हाना तिची चूक समजली होती..

मी पूढे म्हणाले, "मुलं कोरी पाटी घेऊन जन्माला येतात, आपण बालवयात जे त्यांच्या मनावर रुजवू ते आयुष्यभरासाठी त्यांच्या मनावर कोरलं जाईल. हे मुलीचं काम आणि हे मुलाचं हे मुळात ठरवलेच कुणी? रडणं ही फक्त बायकांची मक्तेदारी हे जर आपणच आपल्या मुलांना शिकवलं तर हा स्वतःचाच, स्त्रीत्वाचा अपमान नाहीये का? जसं मिताचा मुलगा तिचं बघून पुस्तक वाचतो, देवाची पूजा करतो तसंच तो बाकी गोष्टीही तिच्या बघून करेल, मग एक आई म्हणून आपली ही जबाबदारी नाहीये का की एक मुलाला आपण अशा वातावरणात वाढवलं पाहिजे की जिथे मुळात मुलगा मुलगी भेदभाव नाहीये तरच आपण येणाऱ्या पिढीकडून समाजाचे कल्याण करवून घेऊ शकतो.मुळात स्त्रीने समान वागणुकीची सतत भीक का मागावी तो तिचा जन्मसिद्ध हक्क आहे. स्त्री पुरुष समानता मुलांना शिकवायची असेल, रुजवायची असेल तर सुरुवात आपल्या घरातून नको का करायला??"

सगळ्यांना आमचा मुद्दा पटला. टाळ्यांचा कडकडाट झाला. सगळ्या मुलांनी आम्ही रोज आईला घरकामात मदत करणार असं आश्वासन दिलं आणि खेळायला गेली. निशा आणि बाकी बऱ्याच स्त्रियांनी माझे आणि मिताचे आभार मानले. आमचा हा संस्कारवर्गाचा निर्णय अतिशय योग्य वळणावर चालू आहे याची आम्हाला खात्री पटली..

मित्रमैत्रिणींनो ही सत्यघटना आहे.. आवडल्यास लाईक आणि कमेंट करून जरूर कळवा. माझे इतरही ब्लॉग वाचण्यासाठी मला फॉलो करा.