अकल्पित (भाग २)

लेकीमुळेच खऱ्या अर्थाने घराचे गोकुळ बनते.


(मागील भागात आपण पाहिले अवनीची तिच्या लाडक्या दादा बहिणीसोबत सुरू असलेली नोकझोक घरातील वातावरण हसरे खळते राहण्यास खूपच मदत करत होते. एकंदरीतच अवनीच्या सततच्या बडबडीमुळे घर अगदी गोकुळासारखे भरलेले वाटायचे. आता पाहुयात पुढे.)

"जावू दे ग वहिनी, तो असाच आहे, लक्ष नको देवू त्याच्याकडे. जळतुकडा कुठला. तू चल आपण बाहेर जावून बोलू."

दादाला वाकुल्या दाखवत सुजाताचा हात पकडून अवनी बाहेर जायला निघाली.

"ओय हॅलो, ती माझी बायको आहे; तुझा नवरा नाही,
समजलं ना. आली मधेच आणि निघाली तिला हाताला धरुन घेवून."

आनंदने सुजाताचा दुसरा हात पकडून ठेवला. आता एकीकडून अवनी आणि दुसरीकडून आनंद. मधल्या मध्ये मरण मात्र सुजाताचे झाले.

"अरे, काय हे? काय लहान मुलासारखे भांडताय?" मधेच आता आईचीही एन्ट्री झाली.

"अगं आई, मी वहिनीला थँक्यू म्हणायला आले होते, पण इथे आले आणि काय पाहिलं माहितीये...?"

"अने, तू आता पुढे बोललीस तर मार खाणार आ माझा. आई हिला अजिबात मॅनर्स नाहीत बरं. नवऱ्याच्या घरी गेल्यावर अशीच वागत राहिली तर तिच्या सासरी आपलीच बदनामी होईल. सांग जरा समजावून हिला."

"मी बरी जाईल माझं सगळं सोडून नवऱ्याच्या घरी. तू वाटच बघ माझ्या जाण्याची. बरं वहिनी, जावू दे... याच्याशी कुठे मी वाद घालत बसले आहे; तुला खूप खूप खूप मोठ्ठं थँक्यू. तुमची रूम तू मला दिल्याबद्दल आणि ह्या दाद्याचा पोपट केल्याबद्दल."

एवढे बोलून दादाला जीभ दाखवत अवनी तिथून पळाली.

आज या गोष्टीला बरोबर दोन वर्षे उलटून गेली. पण सारं काही आठवून आजही सुजाताच्या डोळ्यांत आसवांची दाटी होते. अवनीची ती सततची बडबड सुजाताला आजही तितकीच हवीहवीशी वाटते.

भिंतीवर लागलेल्या अवनीच्या फोटोकडे पाहून आजही सुजाता अवनीच्या आठवणीत रडत बसते. आणि फक्त सुजाताच नाही तर घरातील प्रत्येकजण अजूनही अवनीच्या आठवणीत अश्रू ढाळत असतो.

"आता कुठून तरी अवनी धावत येईल आणि मोठ्याने भौ करेल." असे आजही सुजाताला वाटत राहते.

"आई सांग ना ग या दादाला काही." असे म्हणत अलगद आईच्या कुशीत ती शिरेल. असे नेहमी भासत राहते सुलोचना ताईंना.

"आने हळू हस ग बाई जरा. पोरीच्या जातीला शोभत नाही ते." आजीच्या या वाक्यावर आजीलाच तत्त्वज्ञान सांगणारी अशी ही आजीची लाडकी नात आठवून आजही आजीच्या डोळ्यांत आसवांची दाटी झाल्याशिवाय राहत नाही.

"ये दाद्या तुझ्यापेक्षा जास्त हक्क माझा आहे आ वहिनीवर."

"तिच्या लाडक्या सुजा वहिनीला घट्ट मिठी मारत मला जळवणारी माझी लाडकी बहीण अचानक कुठूनतरी येईल नि नेहमीप्रमाणे माझ्याशी वाद घालत बसेल."
नुसत्या विचारानेच आनंद आजही हमसून हमसून रडत असतो.

"बाबा तुम्ही काळजीच करु नका ओ माझी. मी इथून कुठेही जाणार नाही, तुम्ही फक्त हो म्हणा, घरजावईच करुन आणते की नाही बघा मग मी."
लेकीचे हे गमतीशीर बोलणे आठवून आजही बापाच्या चेहऱ्यावर क्षणात हासू तर डोळ्यांत क्षणात आसवांची दाटी होते.

अगदी मनसोक्त हसणारी, आनंदाने बागडणारी, रडणाऱ्यालाही क्षणात हसायला लावणारी अशी ही अवनी, आज मात्र या जगात नाही. पण तरीही, दोन वर्षात असा एकही दिवस नाही की अवनीची कोणाला आठवण आली नसेल.

सुजाताला अवनीची साथ जेमतेम चारच महिन्यांची लाभली होती. पण त्यातही आयुष्यभराच्या आठवणी ती सुजातासाठी कायमस्वरुपी मागे ठेवून गेली.

शेवटी म्हणतात ना, "जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला." हेही काही खोटे नाही.

क्रमशः

अवनी सोबत नेमके झाले तरी काय? गोकुळासारखे भरलेले घर असे अचानक रिकामे होण्यामागचे नेमके कारण तरी काय?जाणून घ्या पुढील भागात.

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all