झुंज.. लघुकथा लेखन स्पर्धा (प्रेरणादायी कथा)

हि कथा एका लढ्याची.. तिने दिलेल्या अनोख्या झुंजेची..

स्पर्धा..
‌प्रेरणादायी कथा


झुंज..

आज सोमवार.. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर कोर्टाचं कामकाज सुरू झालं होतं. कोर्टासमोर आरोपी, फिर्यादी हजर होत होते. पुढच्या तारखा पडत होत्या. काहींचे निकाल लागत होते. काही वकील आपल्या आशीलासोबत विचारविनिमय करत होते. काही बाहेर बसून आपल्या नंबर येण्याची वाट पाहत होते. तिथे येणाऱ्या प्रत्येक चेहऱ्याची कहाणी वेगळी. ती सगळ्यांना न्याहाळत होती. तिला ते आता सवयीचं झालं होतं. पहिल्यांदा जेव्हा ती तिच्या ग्रँडमासोबत आली होती तेंव्हा प्रचंड घाबरली होती. आरोपी असल्यासारखं वाटलं होतं. आजही ती कोर्टाच्या आवारात येरझाऱ्या घालत होती. आज तिच्या केसचा निकाल लागणार होता. जजसाहेबांचं येणं झालं. ते येताच न्यायालयात उपस्थित असलेले सर्वजण जागेवरून उठून उभे राहिले. जजसाहेब आपल्या जागेवर विराजमान झाले. त्याचबरोबर सर्वांनी आपल्या जागेवर बसून घेतलं. न्यायालयाच्या कामकाजाला सुरुवात झाली. तिचं नाव पुकारण्यात आलं.

“ केस नंबर २०५.. जेनीफर फर्नांडिस हाजीर हो..”

न्यायालयातल्या शिपायाने आवाज देताच जेनी आत गेली. समोर विरोधी पक्षकाराला पाहून तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. त्या व्यक्तीचा जीव घ्यावा असं तिच्या मनात आलं. रागानं मुठी वळू लागल्या पण ती शांत उभी राहिली. न्यायालयासमोर जजसाहेबांसमोर ती उभी होती. तिने खूप संयमाने घेतलं आणि ती जजसाहेबांचं बोलणं ऐकू लागली. जजसाहेबांनी बोलायला सुरुवात केली.

“केस नं. २०५ च्या संदर्भात न्यायालयासमोर सादर केलेले दोन्ही पक्षांच्या वकिलांचे मुद्दे ऐकून घेता आणि त्यांनी सादर करण्यात आलेल्या पुराव्यानुसार न्यायालय आपला निर्णय सुनावत आहे की, या केसमध्ये विरोधी पक्षकार जॉन डिसुझा यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खरे आहेत. त्यांनी केलेल्या नीच कृत्यासाठी न्यायालय त्यांना आजन्म करावासाची शिक्षा सुनवत आहे आणि जॉन डिसुझा यांना आदेश देत आहे की, या केसदरम्यान जेनीफर फर्नांडिस यांना झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई म्हणून दहा लाख रुपये रोख देण्यात यावे. केस इज डिसमिस..”

केसचा निकाल लागला. जेनीच्या डोळ्यातून पाणी बरसू लागलं. तब्बल बावीस वर्षांनी तिला न्याय मिळाला होता. तिनं आनंदानं ग्रँडमाला घट्ट मिठी मारली.

“ग्रँडमा वुई वोन..”

ती आनंदानं जवळजवळ किंचाळलीच. तिच्या ग्रँडमाने तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. बावीस वर्षे तिनं झुंज दिली आणि त्या लढ्याला आज इतक्या वर्षांनी यश मिळालं होतं.

“आज जेनी जिंकली. खरंच ती जिंकली? या जिंकण्याचा खरंच तिला आनंद वाटला असेल? हा न्याय मिळवण्यासाठी तिनं काय काय गमावलं? हरवलेलं, कुस्करून टाकेललं बालपण, जे गमावलं त्याची भरपाई खरंच या यशाने झाली?”

ग्रँडमाच्या मनात अशा नाना प्रश्नांनी थैमान घातलं होतं. सारा भूतकाळ ग्रँडमाच्या डोळ्यांसमोर एखाद्या चित्रपटासारखा सरकून गेला. कायम हसतमुख असणारी, केसांचा बॉबकट, हातात टेडी, निळ्या डोळ्यांची सहा वर्षाची चिमुरडी जेनी डोळ्यासमोर तरळत होती. नववधूच्या वेषातली सुझेन आणि सुटाबुटातला आपला एकुलता एक रुबाबदार मुलगा वॉल्टर आजही तितक्याच प्रकर्षाने तिला आठवत होते.

“किती सुंदर दिसत होती सुझेन! अगदी परीसारखी.. आणि माझा वॉल्टर एखाद्या प्रिन्ससारखा!”

ग्रँडमा मनातल्या मनात पुटपुटली. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. डोळ्यांत पाणी आलं. आजही आजीला तो आनंददायी दिवस जसाच्या तसा आठवत होता. ज्या दिवशी सुझेन कॅथलिक धर्माच्या रिवाजानुसार वॉल्टरशी लग्न करून घरी आली आणि फर्नांडिस कुटुंबाचा एक भाग बनली. सुझेन आणि वॉल्टरचा प्रेमविवाह. सुझेनच्या लहानपणी कुणीतरी अनाथाश्रमाच्या पायरीवर तिला सोडून गेलं होतं. तेंव्हापासून अनाथाश्रमाच्या संस्थापक मदर मेरीने तिचा सांभाळ केला होता. सुझेन खूप शांत, सालस समंजस मुलगी होती. अभ्यासात हुशार त्यामुळे यशाच्या पायऱ्या तेज गतीनं चढत तिनं तिचं शिक्षण पूर्ण केलं आणि एका नामांकित कंपनीत ‘पर्सनल असिस्टंट’ म्हणून नोकरीलाही लागली. दिवसभर काम करून बाकीचा वेळ ती अनाथाश्रमात घालवत असे. त्या अनाथ मुलांचं करण्यात तिला वेगळाच आनंद मिळत असे.

वॉल्टर दिसायला उंचपुरा, गोरपान, रुबाबदार युवक. नव्याने सुझेनच्या ऑफिसमध्ये सीईओ या पदावर नियुक्त झालेला. वॉल्टरशी ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं आणि मग हिच मैत्री कधी प्रेमात रूपांतरीत झाली त्यांचं त्यांनाच समजलं नाही. गोव्यात स्वतःचा एक टूमदार बंगला. पार्किंगमध्ये उभी असलेली आलिशान गाडी. बऱ्यापैकी बँक बॅलन्स. वॉल्टर आपल्या आईसोबत राहत असे. वडील लहानपणीच वारल्याने लवकरच त्याच्या स्वभावात समंजसपणा आलेला. जे काही होतं ते सारं त्याने स्वकष्टाने कमवलं होतं. सुझेन आणि वॉल्टरचं लग्न झालं. दोघांचा सुखी संसार सुरू झाला. लग्नानंतरचे ते गोड हळवे दिवस मनात जपत संसाराला सुरुवात झाली. दोघं खूप खुश होते. एकमेकांच्या प्रेमाने आधाराने दोघं मिळून संसाररथ पुढं घेऊन जात होते. काही महिन्यांनी सुझेनने ती आई होणार असल्याची गोड बातमी दिली. वॉल्टरचा आनंद गगनात मावत नव्हता. सुझेनच्या त्या नाजूक अवस्थेत वॉल्टर आणि त्याच्या आईने तिची खूप काळजी घेतली होती.

सुझेनने एका गोड मुलीला जन्म दिला. निळ्या डोळ्याची, गोऱ्या रंगाची कुरळ्या केसांची. इवलुशी नाजूक परी सोनपावलांनी घरी आली. वॉल्टर आणि सुझेनने मोठ्या आवडीनं तिचं नाव जेनीफर ठेवलं. जेनीचं करता करता दिवस छान जात होता. दोघेही आपलं मातृत्व, पितृत्व अगदी भरभरून जगत होते. सुझेन घर, ऑफिस,जेनीचा सांभाळ सारं नीट सांभाळत होती. वॉल्टरची आईही आपल्या नातीला जेनीला छान सांभाळायची. तिला न्हाऊ माखू घालायची. घरकामात सुझेनला थोडीफार मदत करायची. आपल्या मुलाचा भरलेला सुखी संसार पाहून ग्रँडमा तृप्त होती. सर्वजण आनंदाने राहत होते. बघता बघता लग्नाला पाच वर्षे कापुरासारखी भुर्रकन उडून गेली. सारं काही सुरळीत होतं पण अचानक त्यांच्या सुखी संसाराला कोणाचीतरी दृष्ट लागावी तसं झालं. नियतीने आपला डाव टाकला.

त्यांच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस होता. जंगी पार्टीची जोरदार तयारी सुरू होती. पै पाहुणे मित्र परिवार जमले होते. जेवणाची, खाण्या पिण्याची उत्तम व्यवस्था केली होती. वॉल्टर आपलं काम उरकून पार्टीत येणार होता. सारेजण त्याचीच वाट पाहत होते. छोटी जेनी तर तिच्या वडिलांची वाट पाहून दमली होती.

“मम्मा, डॅड कधी येणाल? कधी केक कापाचा? डॅड अजून का नाही आला?”

जेनीने अवांतर प्रश्न विचारून सुझेनला भंडावून सोडलं होतं.

“हो येईल गं.. रस्तात आहे.. आलाच बघ..”

तिनं जेनीची समजूत काढली आणि वॉल्टरच्या येण्याची वाट पाहू लागली. सारखं तिचं लक्ष हातातल्या घड्याळाकडे जात होतं. वॉल्टर अजून आला नव्हता. सुझेन त्याला सारखे कॉल्स करत होती पण तो कॉल उचलत नव्हता. ग्रँडमा, सुझेन जेनी त्याची वाट पाहून कंटाळले होते. रात्रीचे बारा वाजत आले होते मग कंटाळून सुझेनने पाहुण्याना जेवायला सांगितलं. जेवणं आटोपून पाहुणे एकेक करून निरोप घेऊन आपापल्या घरी जात होते. इतक्यात बंगल्यासमोर पोलिसांची गाडी येऊन उभी राहिली. सुझेन घाबरली. पोलीस गाडीतून उतरले. सुझेन धावतच त्यांच्या जवळ आली.

“मिसेस फर्नांडिस?”

सुझेनने मान डोलावली.

“मि. फर्नांडिस यांच्या कारचा खूप मोठा अपघात झाला आहे. डोक्याला जबर मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय. पोस्टमार्टमसाठी त्यांची बॉडी सिटी हॉस्पिटल नेण्यात आली आहे. त्यांच्या ओळखपत्रावरून आम्ही इथे येऊ शकलो.”

त्यांनी वॉल्टरच्या अपघाताची बातमी दिली. बातमी ऐकताच सुझेन जागीच बेशुद्ध झाली. ग्रँडमाने हंबरडा फोडला. जेनी कावऱ्या बावऱ्या नजरेने सर्वांकडे पाहत होतीम काय चाललंय तिला काहीच समजत नव्हतं. शेजारच्या लोकांनी, वॉल्टरच्या नातेवाईकांनी सिटी हॉस्पिटलमध्ये जाऊन वॉल्टरचा मृतदेह ताब्यात घेतला. त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. आधीच अनाथ असलेली सुझेन पुन्हा एकदा निराधार झाली. तिचा नवरा तिला कायमचं सोडून गेला होता. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. सुझेनचा सुखी संसार खेळतल्या पत्त्याप्रमाणे कोसळला. डिसुझा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. सर्वांनी त्यांना सावरलं. आधार दिला. वॉल्टरच्या जाण्याने सुझेन कोलमडून गेली होती पण जेनीचा निरागस चेहरा पाहून, वार्धक्याने थकलेल्या आपल्या सासूबाईना पाहून सुझेनने आपलं दुःख आवरलं. डोळ्यातलं पाणी पुसलं. आता सुझेनलाच एक मुलगा म्हणून, आई आणि बाप म्हणून वॉल्टरची सारी कर्तव्ये पार पाडायची होती. जेनी आणि आपल्या सासूबाईकडे पाहून सुझेनने लवकरच या दुःखातून बाहेर पडायचं ठरवलं आणि ती पुन्हा नोकरीवर रुजू झाली.

आता तिघीच एकमेकांच्या आधार बनल्या. दिवस कसेबसे ढकळत जीवन जगत होत्या. कितीतरी दिवस जेनी आपल्या डॅडच्या आठवणीनी व्याकुळ व्हायची.

“डॅड कुठं गेलाय? कधी येणार?”

प्रश्न विचारत राहायची मग सुझेन आणि तिची ग्रँडमा जेनीची समजूत घालायच्या.

“डॅड दूर गेलाय. लकवरच येईल परत.”

ग्रँडमा सांगत राहायची. म्हणतात ना, काळ हेच दुखावरचं औषध आहे. अगदी तसंच झालं. सरावाने दुःख सवयीचं झालं. वॉल्टरच्या जाण्याने त्यांच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी कशानेही भरून निघणार नव्हती पण त्या आता बऱ्यापैकी सावरल्या होत्या. जगणं सुरू झालं. आता वॉल्टरला जाऊन एक वर्ष झालं होतं. त्याच्या आठवणी अजून तश्याच ताज्या होत्या.

एके दिवशी सकाळी जेनी आपल्या ग्रँडमासोबत ब्रेकफास्ट करत होती. इतक्यात दारावरची बेल वाजली. सुझेनने दार उघडलं. समोर तिच्या कंपनीचे डायरेक्टर मि. जॉन डिसुझा आपल्या आईसोबत आले होते. तिने हसून त्यांना आत यायला सांगितलं. आपल्या सासूबाईंशी ओळख करून दिली. जॉन खूप लवकर जेनी आणि ग्रँडमा सोबत मिसळून गेला. फार जुनी ओळख असल्यासारखं तो बोलत होता. जेनी तर त्याच्या कुशीत बिलगून बसली होती. त्याला सोडायलाच तयार नव्हती. बऱ्याच महिन्यांनी घर पुन्हा एकदा खळखळून हसलं. ग्रँडमाला जॉनच्या रूपात वॉल्टर आल्यासारखं वाटलं. थकलेल्या डोळ्यात आनंद दाटून आला. थोडावेळ गप्पा मारत कॉफी घेऊन झाल्यावर जॉनने बोलायला सुरुवात केली.

“मॉम, मी डायरेक्ट विषयालाच हात घालतो. मी सुझेनला बऱ्याच वर्षांपासून ओळखतोय आणि वॉल्टरलाही ओळखत होतो. दोघेही माझे खूप चांगले मित्र होते. सुझेन आजही आहे. सुझेनच्या आयुष्यात जे झालं ते खूप वाईट होतं पण पुढे चालायलाच हवं आणि सुझेनही जेनीसाठी, तुमच्यासाठी चालते आहे पण हा प्रवास एकटीने करण्यापेक्षा मी तिला साथ दिली तर? आज मी तुमच्याकडे सुझेनचा हात मागायला आलोय. मला सुझेनशी लग्न करायचं आहे. मी तुम्हां सर्वांची जबाबदारी घ्यायला तयार आहे.”

जॉनच्या या अनपेक्षित प्रस्तावाने ग्रँडमा आणि सुझेनने त्याच्याकडे आश्चर्याने चमकून पाहिलं. ग्रँडमाने विचार केला.

“सुझेन वयाने खूप लहान आहे. एकट्या विधवा स्त्रीने समाजात जगणं सोप्प नाही. तिला आणि जेनीलाही आधाराची गरज आहे. आपलं काय.. पिकलं पान कधीतरी गळून जाईल पण सुझेन पुढे संपूर्ण आयुष्य पडलंय. जॉन तिला ओळखतो. चांगले मित्र आहेत. एकमेकांचा आधारानं जगतील.”

ग्रँडमाने विचार करून त्यांच्या लग्नाला होकार दिला. सुझेनला समजावून सांगितलं. सुझेन दुसऱ्या लग्नाला तयार झाली. लग्न करून सुझेन आणि जेनीफर जॉनच्या घरी राहायला आल्या. सुझेनच्या नव्या संसाराला सुरुवात झाली. जॉन आणि त्याची आई सुझेन आणि जेनीशी खूप प्रेमाने वागत होते. थोड्याच दिवसात जॉनने चांगल्या शाळेत जेनीचं नाव दाखल केलं. ती आता ‘जेनीफर डिसुझा’ झाली होती. जॉन आणि त्याच्या आईच्या प्रेमळ वागण्याने जेनी आणि सुझेन त्या घरात खूप लवकर मिसळून गेल्या. ग्रँडमा अधून मधून त्यांना भेटायला येत असे कधी सुझेन आणि जेनी ग्रँडमाला भेटायला येत असत. ऋतुचक्र वेगाने फिरत होतं. सारं काही सुरळीत सुरू आहे असं वाटत असतानाच एका अनामिक वादळाने दस्तक दिली आणि त्या वादळात जेनी पूर्णपणे उन्मळून पडली.

एक दिवस जॉन दुपारीच लवकर घरी आला. सुझेन ऑफिसला गेली होती. आईनं विचारल्यावर तब्बेत ठीक नाही जरा आराम करतो असं म्हणून तो त्याच्या खोलीत गेला. त्याचं डोकं खूप भणभणत होतं. त्याने व्हिस्कीचा एक पेग बनवला. एक दोन पेग पोटात गेल्यावर त्याला बरं वाटू लागलं. इतक्यात त्याला जेनीचा आवाज आला. जेनी शाळेतून घरी आली होती. आजीनं जॉन घरी आल्याचं सांगितलं तशी ती आनंदून गेली. धावतच त्याच्या खोलीत आली आणि पाठीमागून ‘डॅडा..’ म्हणत त्याला बिलगली. जॉन नशेत धुंद होता.

“आलीस जेनी,. चला फ्रेश व्हा.. चल मी तूझे कपडे बदलतो.”

असं म्हणत त्यानं जेनीला जवळ घेतलं. घट्ट मिठी मारत तिचा पापा घेतला. त्याने तिला बाथरूममध्ये नेलं आणि  आंघोळ घालून टॉवेल गुंडाळून बाहेर आणलं. बाहेर आल्यावर जेनी साऱ्या खोलीत जेनी इकडून तिकडे पळत होती. जॉन तिला पकडण्यासाठी तिच्यामागे धावला. तिला पकडत असताना तिचा गुंडाळलेला टॉवेल जॉनच्या हातात आला. जेनी मात्र तशीच पुढे पळत होती. तिचं ते नग्न रूप पाहून जॉनच्या भावना चाळावल्या. त्याने डोळे विस्फारले. ‘जेनी थांब..’ असं म्हणत अखेरीस त्यानं तिला पकडलं आणि घट्ट मिठी मारत तो म्हणाला., 

“जेनी, चल आपण एक गेम खेळूया.”

“कोणता? तू माझ्यासाठी नवीन व्हिडिओ गेम आणलाय का डॅडा?”

जेनीने निरागसपणे प्रश्न केला. नशेत धुंद असलेल्या जॉनने तिला उत्तर दिलं.

“त्यापेक्षा भारी गेम मी तुला दाखवणार आहे. जिवंत गेम. तुला खूप आवडेल पण हा गेम फक्त तू आणि मीच खेळायचं आणि या गेमबद्दल कोणालाच काही सांगायचं नाही.”

“मम्मालाही नाही?” - जेनी

“नाही तिला तर मुळीच नाही”

जॉन दरडावत म्हणाला.

“असा कोणता गेम आहे डॅडा? चल ना खेळूया.. लवकर दाखव मला..”

जेनी निरागसपणे म्हणाली.

“चला.. बेडवर खेळूया..”

त्यानं जेनीला उचलून कडेवर घेतलं. बेडवर नेलं. त्याने स्वतःचे कपडे काढले आणि तिच्या सर्वांगावर हात फिरवू लागला. किस करत होता. तिचे नाजूक हात स्वतःच्या सर्वांगावरून फिरवत होता. जेनीला हा गेम मुळीच आवडला नव्हता. नावडता स्पर्श तिला जीवघेणा वाटत होता. ती नको नको म्हणत असताना तो तिच्यावर अत्याचार करत राहिला. जेनी रडत होती. ओरडत होती आणि अवघ्या सात वर्षाच्या जेनीवर त्या नराधमानं बलात्कार केला होता. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी.. एक नाजूक कळी उमलण्यापूर्वीच कुस्करली गेली. एका पित्यानं आपल्या कोवळ्या मुलीचं बालपणच हिरावून घेतलं होतं.

“हे जर कोणाला सांगितलंस तर जिवंत गाडून टाकीन”

जॉनने जेनीला धमकी दिली होती त्यामुळे घाबरून जेनी कोणाचजवळ काही बोलली नाही. ती फक्त रडत राहिली.

आता जॉनला हे सवयीचं झालं. रोज तो तिच्यावर अत्याचार करत होता. जेनी मुकाट्यानं सारं सहन करत होती. जेनीच्या बालमनावर परिणाम होत होता. पूर्वीची हसतमुख असलेली जेनी पूरती बदलून गेली. ती कोणाशी बोलेनाशी झाली. शाळेतही ती गप्प गप्प राहू लागली. नेहमी वर्गात पहिल्या क्रमांकवर असणारी जेनी अभ्यासात मागे पडू लागली. शिक्षकांनाही नवल वाटलं. त्यांनी सुझेनला शाळेत बोलवून तिच्या प्रगती बद्दल सांगितलं. घरी आल्यावर सुझेनने जेनीवर राग काढला.

‘अभ्यास नको, नुसतं खेळायला हवं तुला’

असं म्हणून मारही दिला. जॉनने तिला अडवलं. आणि तिला जवळ घेऊ लागला तशी जेनी स्वतःची सुटका करत धावत आपल्या खोलीत गेली. सुझेन जॉनकडे रागाने पाहत ओरडली.

“सगळे तुझे फाजील लाड आहेत. बघ तुझ्याशी तरी नीट वागतेय का? काय झालंय पोरीला? अशी का वागतेय?”

“तू शांत रहा.. मी बघतो तिच्याकडे.. समजावून सांगतो तिला..”

असं म्हणत तो जेनीच्या खोलीत गेला आणि पुन्हा तेच.. बऱ्याच वेळाने तो जेनीला घेऊन बाहेर आला. जेनी शांत शून्यात पाहत होती. पुढे हे कित्येक महिने असंच चालू राहिलं. एक दिवस घरात फक्त जेनी आणि जॉनची आई दोघीच होत्या. घरात कोणी नाही हे पाहून जेनीने रडत रडत घडलेला सगळा वृत्तांत आजीला सांगितला. ते सगळं ऐकून आजीला एकदम धक्का बसला. जेनीला जवळ घेत जॉनची आई म्हणाली.

“बेटा, ही गोष्ट तू माझ्याशिवाय कोणाला सांगितली नाही ना?”

जेनीने नकारार्थी मान हलवली. जॉन घरी आल्यावर तिनं त्याला तिच्या खोलीत बोलावलं. तो येताच आईनं जॉनच्या कानाखाली सणसणीत लगावून दिली आणि त्याला याबद्दल जाब विचारला. जॉनने आपल्या आईसमोर झालेल्या या दुष्कर्माचा कबूलीजबाब दिला. जॉनच्या आईला काय करावं समजेना. खूप विचार करून जेनीच्या आजीने तिला गप्प राहायला सांगितलं. ‘घरातली गोष्ट घरातच राहायला हवी अशी ताकीद दिली.’ जेनीने ही गोष्ट आजीला सांगितली म्हणून जॉनने जेनीला खूप मारलं. तिच्यावर अत्याचार केला.

“परत तोंड उघडलंस तर तुझा जीव घेईन.. याद राख..”

जेनी निराश झाली. तिने सुझेनला अप्रत्यक्षपणे सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण जॉन सतत सुझेनच्या सोबत असल्यानं जेनीला तिला सांगता येत नव्हतं. जेनी हळूहळू कोमेजून चालली होती. तिची मानसीक स्थिती ढसाळत चालली होती.

पण देव कधीच झोपलेला नसतो. त्याच्या दारात उशीर असेल अंधार नसतो. या उक्तीप्रमाणेच एक दिवस जेनीवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फुटली. एकदा शाळेत शिक्षकांनी ‘माय फादर’ या विषयावर निबंध लिहायला सांगितलं होतं. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या वडिलांबद्दल खूप छान लिहलं होतं. टीचर सर्वांच्या वह्या पाहत होत्या. त्या जेनीच्या टेबलाजवळ आल्या. जेनीची नोटबुक हातात घेतली. वहीतलं ते वाक्य वाचून त्या एकदम दचकल्या.

“एव्हरी फादर इज नॉट आयडॉल फॉर एव्हरी चाईल्ड.”

त्यांनी जेनीकडे पाहिलं आणि ताबडतोब मुख्याध्यापकांच्या कॅबिममध्ये गेल्या. जेनीची वही दाखवली. मुख्याध्यापिका मॅडमही दचकल्या. जेनीसोबत काहीतरी विपरीत घडतय याची त्यांना पुसटशी कल्पना आली. त्यांनी जेनीला बोलवून घेतलं. तिला खूप विचारण्याचा प्रयत्न केला पण जेनी स्तब्ध बसून होती. मॅडमनी विचारलं.

“तुला आम्हाला काही सांगायचं नसेल तर दुसरं कोणाशी बोलायचं आहे का? आपण त्यांना बोलवून घेऊ.”

त्यांच्या वाक्यासरशी जेनीच्या डोळ्यात एकदम वेगळी चमक दिसली. ती घाईने म्हणाली.,

“माझ्या ग्रँडमाला..”

शाळेतल्या मुख्याध्यापकांनी जेनीच्या ग्रँडमाला बोलावून घेतलं. ग्रँडमा येताच जेनी तिच्या गळ्यात पडून ओक्शीबोक्शी रडू लागली. ग्रँडमाने तिला मायेनं गोंजारलं. पाठीवरून हात फिरवत तिला शांत होऊ दिलं. जेनी हळूहळू शांत झाली आणि तिने रडत रडत आजवर घडलेल्या सगळ्या वाईट घटना ग्रँडमाला सांगितल्या. तिच्या सावत्र बापाने तिच्यावर अन्याय केला होता. जेनीच्या तोंडून हे सगळं ऐकून ग्रँडमा पूर्णपणे हादरली होती. सारे शिक्षकही हादरून गेले. तिनं जेनीला घट्ट पोटाशी धरलं. ग्रँडमाने आपले डोळे पुसले आणि एका निर्धारांने जागेवरून उठली. थकलेल्या त्या पायात कुठून बळ आलं देव जाणो! तिनं जेनीला सोबत घेऊन तडक पोलीस स्टेशन गाठलं आणि जॉन विरुद्ध रीतसर तक्रार केली. पोलिसांनी जेनीची वैद्यकीय तपासणी केली. वैद्यकीय अहवालातून जेनीवर कित्येक महिने अत्याच्यार होत होता हे सिद्ध झालं. पोलिसांनी जॉनला ताब्यात घेतलं. ‘जॉन डिसुझा’ हे गोव्यातलं बडं प्रस्थ होतं. एका नामांकित कंपनीच्या मालकावर त्याच्याच मुलीने बलात्काराचा आरोप केला होता. खूप शरमजनक गोष्ट होती. सारा गोवा हादरून गेला.

‘आपल्याच घरात आपल्या पोटच्या मुलीवर अत्याचार होत होता तरी आपल्याला याचा मागमूसही लागला नाही.’ या गोष्टीचं शल्य सुझेनच्या मनाला टोचत राहिलं. सुझेन जॉनला सोडून आपल्या जुन्या घरी परत आली. आता ती जेनीला कधीच एकटं सोडणार नव्हती. ज्या गोष्टी जॉनच्या आईने लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला होता ते सगळं जगासमोर आलं होतं. कुठेही तोंड दाखवायला जागा राहिली नव्हती पण तरीही जॉनची आई आपल्या मुलाच्या चुका पोटात घालून लढत राहिली. आरोप प्रत्यारोप होत राहिले. जॉनच्या आईने जेनीवर खोटे आरोप केले. केस चालू राहिली एक नव्हे, दोन नव्हे तब्बल बावीस वर्षे.. ग्रँडमा आता खूपच वृद्ध झाली होती. आपल्या नातीच्या या संघर्षमयी लढ्यात ती तिच्यासोबत राहिली. कायम..

बालवयात झालेल्या या अत्याचाराने जेनी खचून गेली होती. तिच्यावर मानसोपचार करण्यात आले. हळूहळू ती या धक्यातून सावरत होती. आपला लढा आपणच लढवला पाहिजे हे तिला कळून चुकलं. आपल्या कविता, कथा, ललित यामधून व्यक्त व्हायला लागली. दुसऱ्या कोणाकडून प्रोत्साहनाची अपेक्षा करण्यापेक्षा ती स्वतःलाच आपल्या लेखनातून प्रोत्साहित करायला शिकली. वर्तमानपत्रातून ‘महिलाविशेष’ या सदराखाली महिलांच्या प्रश्नांबद्दल विचार मांडू लागली. नुकतंच वर्तमानपत्रात एक आर्टिकल लिहून आलं त्यात तिनं लिहलं होतं.

“नेहमी शांत राहून मी खूप थकले होते. आपल्या सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे, आपल्या मानसिकतेबद्दल. दुर्दैवाने माझ्या आजीने माझ्यावर विश्वास ठेवला नाही. माझ्या सावत्र वडिलांनी देखील आधीच कबूल केले होते, तरीही तिचा विश्वास बसत नव्हता आणि तिनेच माझ्या सावत्र बाबांना पोलिस ऑफिसमधून बाहेर काढले. ती वेडी नाही का?”

आज बावीस वर्षांनी ‘बाल शोषण आणि लैंगिक अत्याचार प्रकरण’ या तिच्या केसचा निकाल लागला. ती जिंकली आणि आजच्या वर्तमानपत्रात तिचा लेख छापून आला होता आणि तिनं त्यात लिहलं होतं.,

“माझे दुःस्वप्न माझ्या सावत्र बाबांचे आहे जे पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर येते. मी विसरण्याचा प्रयत्न करत आहे पण माझ्या मनात खोलवर मला वाटते की माझी छोटी जेनी अजूनही घाबरली आहे.”

आणि तिनं पुढं लिहलं होतं.

“आणि अश्या अनेक छोट्या जेनीसाठी मला काम करायचं आहे. त्यांना निर्भर बनवायचं आहे.. मी काम करत राहिल अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत..”

पूर्णविराम. निशा थोरे (अनुप्रिया)


नमस्कार मित्रमैत्रिणींनो,

लघुकथा लेखन स्पर्धेतील हि माझी प्रेरणादायी कथा.. हि कथा गोव्यात घडलेल्या सत्यघटनेवर आधारित आहे. आजही आपल्या समाजात बाल शोषण आणि लैंगिक अत्याचार होत असतात. समाजाच्या भीती पोटी शरमेपोटी हि प्रकरणं घरातच दाबली जातात. काहीच अशा जेनीफर आणि ग्रँडमा असतात की त्या अन्यायाच्या विरुद्ध लढा देतात. झुंज देतात. जेनी स्वतःचसाठी प्रेरणा बनली. आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा बाऊ न करता ती या दुःखाला सामोरी गेली. तिने बावीस वर्षे लढा दिला आणि ती जिंकली. तिने काय मिळवलं या पेक्षाही आपलं बालपण गमावून ती अशा मुलींसाठी काम करण्यास पुन्हा उभी राहिली. तिचीही कथा, व्यथा खरंच मला खूप काही शिकवून गेली.

तुम्हाला माझी ही कथा कशी वाटली जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रिया, लाईक्स माझ्या लिखाणास प्रगल्भ करतील यात शंकाच नाही. प्लिज जरूर लाईक्स, कॉमेंट्स करा..

धन्यवाद

© निशा थोरे (अनुप्रिया)