Jan 26, 2022
नारीवादी

झुंजार स्त्री

Read Later
झुंजार स्त्रीभाग १....

संध्याकाळचे प्रसन्न वातावरण,अलवार वारा लहान मुलाप्रमाणे खोड्या काढून अंगावर शहारे आणत होता. तन मन प्रफुल्लित करून निवांतपणा वेचायला भाग पाडत होता. निसर्गाच्या कुशीत राहून,
वाफाळलेल्या चहाचे झुरके घेत ती बाल्कनीतून आजूबाजूच्या नैसर्गिक कलेला स्वतःच्या लोचनात सामावू पहात होती. माहीत नाही का?पण आज जरा हलकं हलकं वाटत होत. शब्दांत व्यक्त व्हावं की मनात सारं जपावं तेही कळत नव्हतं. जे होत ते स्वजनासाठी मुक्तहस्ते उधळावं, एवढंच तीला माहीत होतं. कधी सुख बागडत रहायचं, तर कधी दुःख थैमान मांडायचं. पण जीवनाचा पसारा आवरता आवरत नव्हता. तरीही हे जीवन जगण्यात तिला अनोखा आनंद मिळत होता.खरच एवढ्याश्या आयुष्यात असंख्य उलथापालथ झालेली. त्याच विचारात ती असताना, सुर्यदेवही तीला मी पुन्हा येईन असे आश्वासन देऊन निघून गेला. तोच तर वर्षानुवर्षे तिच्या जीवनाचे पुस्तक नित्यनियमाने वाचायचा.
अंधारलेल्या रात्रीही नव्याने प्रकाशाची हमी देणारा तीचा तो एकमेव सखा होता. जो वर्षानुवर्षे स्वतःची मैत्री जपत होता.

"जीवनगाणे गातच रहावे,
झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे"
अशाच काहीश्या ओळी गुणगुणत
ती हलकेच स्वतःशीच हसत चहाचा रिकामी कप घेऊन आत गेली. चहा म्हणजे तीचा जीव की प्राण होता. भरपूर आलं टाकून चहाचा आस्वाद घेण्याची मजाच काही निराळी होती. सागराच्या लाटांची गाज तिच्या कानात गुंजत होती. हातातून वाळू निसटत जावी तसेच काहीसे तिचे क्षण निघून जात होते, सारेच नाही गवसले परंतु स्वतःच्या कष्टाने तीने तिला हवा तसा सुंदर ८-१० भव्यदिव्य खोल्यांचा बंगला ६-७ वर्षांपूर्वी घेतलेला. आई आणि मुलीसोबत ती रहात होती. बाल्कनीत स्वतःला हवी तशी तीने बाग फुलवलेली. गुलाब, मोगरा, जाई, जुई, चमेली अश्या सुंगध उधळणाऱ्या फुलांच्या झाडासोबतच रसरशीत फळांनी बहरणारी झाडेही तिथे दौलात उभी होती. औषधी रोपट्या प्रमाणेच भाजीपाल्यालाही तीच्या त्या बागेत मानाचे स्थान होते. भल्या पहाटे आई देव्हाऱ्यात जेव्हा विविधरंगी फुलांच्या माळा घालून देव्हारा सजवायची ना, तेव्हा त्या बागेची खरी किंमत जाणवायची. देव्हाऱ्यातील देव आणि तीच्यासाठी तिचे दैव असणारी तीची माऊली, ह्यांना खुश पाहून तीही सुखावून जायची. असंख्य फुलपाखरे त्या बागेत मनमुराद बागडायची. पक्ष्यांच्या किलबिलाटाचा नाद अवघ्या परिसरात घुमत रहायचा. जणूकाही नैसर्गिक नादब्रम्हच. त्यांची भाषा मानवाला उमजत नाही म्हणून, नाहीतर पूर्ण दिवस त्यांच्याशी गप्पा मारायला खुपच आवडलं असत तीला. त्यांच्या सोबत ती शरीराने उडू शकत नव्हती, परंतु मनाची भरारी मात्र उंच गगनात रोजच घ्यायची. जणू काही तशी भरारी घेण्याची सक्ती तीने स्वतःच्या मनाला करूनच दिलेली. सुख हे वेचायचे नसतेच तर ते सतत अनुभवायचे असते. निसर्गाचा हाच तर खरा अनुभव तिने आत्मसात केलेला.
खरच किती छान असत ना, स्व कष्टाने सारं उभारलेल. नकोच कोणाची ती उसनवारी, जे करावं ते स्वतःच्या हिंमतीने, म्हणजे कोणाचं काही ऐकून पण घ्यायला नको.
आईला ही तीच भारी कौतुक. फॅशन डिझायनर म्हणून ती तीचा व्यवसाय ही उत्तमरीत्या सांभाळत होती.बाहेरच्या जगात पैशाने, मानाने ती कितीही नावाजलेली असली, तरी घरच्यांसाठी ती एक सामान्य गृहिणी, मुलगी आणि आईच होती.घरी एक नाही दोन नाही तर तब्बल ५ बायकांना तीने घराची देखभाल करायला ठेवलेलं. स्वयंपाक मात्र ती स्वतःच आवडीने बनवायची. आईला आवडणारे तिखट झणझणीत पदार्थ, आणि मुलीला आवडणारे गोडधोड करताना तीचे मन नेहमी उल्हासित असायचे. रोज रोज नवनवीन पदार्थ करताना तीही हरवून जायची. कधीतरी गरमागरम भजी करताना वडिलांची आणि भावाची आठवण मनाला चटका लावून जायची. तीच्या गतजीवनातील खरे आधारस्तंभ होते ते. आजही तीला मध्येच,"बेटा पाणी आण" हे बाबांचे वाक्य आठवले की त्यांच्या आठवणीत तीच्या काळजाचे पाणी व्हायचे.प्रत्येक रक्षाबंधन, भाऊबीजेला भावाची आठवण चर्रर्र करून जायची. हास्य विनोद किंवा गंभिर समस्या सर्वात तो तीचा पाठीराखा असायचा. दादा दादा करत लहानपणापासून ती त्याच्या भोवती पिंगा घालायची.

बेडरूममध्ये जाऊन तिच्या जुन्या कपाटातून तीने काही जुने फोटो काढले, अश्रू आणि हसू ह्यांना साक्षीला ठेवून भूतकाळात ती डोकावू लागली.
आई-वडील,मोठा भाऊ, आणि ती असे सुंदर चौफेर कुटुंब होतं. गावाकडच्या लहान पण टुमदार घरात सुखाने नांदत होते.वडील पोलीस निरीक्षक होते.आई शाळेत शिक्षिका. मोठा भाऊ तेव्हा सातवीत असेल आणि ती चौथीत. दोघेही भावंड खूप हुशार म्हणूनच की काय त्यांच्या भावकीला ते बघवत नव्हतं. त्यावर्षी तर देवाचा आशीर्वाद म्हणून की काय घरात एकावर एक चांगल्या बातम्या आल्या.तीच्या आईला आदर्श शिक्षिका म्हणून राज्यशासनाकडून पुरस्कार जाहीर झालेला.त्यातच भावाला ही स्कॉलरशिप मिळालेली. अजून एक आनंदाची बातमी म्हणजे वडिलांना बढती मिळालेली.त्या दिवशी घरात पेढे, जिलेबी, पुरणपोळ्या ह्यांचा घमघमाट होता. प्रत्येकजण एकमेकांचे कोडकौतुक करत होते.
सुखाची किरणे एक नाही दोन नाही तर चारही बाजुंनी त्यांच्या घरात येऊन जणू झीम्मा खेळत होती.
"आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे" ह्या गाण्यानेही रेडिओ वर अगदी ऐनवेळी ताल धरला होता.

तीला फारस बढती,पुरस्कार ह्यातील एवढं काही कळत नव्हतं, पण आज शाळेत, शेजारी तसेच घरात सर्वत्र दादा च कौतुक होतं होत म्हणून ती खूप खुश होती. येऊन जाऊन त्यालाच ती गोड गोड घास भरवत होती. तीचा दादाही अगदी न कंटाळता तीच्या चिमणी एवढ्या हाताने इवलासा गोडाचा घास खात होता. आईवडील ही कौतुकाने त्या भावंडा चे प्रेम स्वतःच्या लोचनात साठवत होते. शेजारी पाजारी सर्व येऊन अभिनंदन करत होते. कधी घरात जास्त न येणारी तीची मोठी काकी काजू बदाम घालून बनवलेला गोड शिरा घेऊन आलेली. शिऱ्या पेक्षाही गोड अशी ती बोलत होती. एरव्ही आम्हाला दुरूनच हडतुड करणारी काकी आज मात्र प्रेमाने बोलत होती. काकीला पाहून आईचा मात्र तिळपापड होत होता, परंतु केवळ बाबांकडे बघून ती शांत मुद्रेने काकीकडे पहात होती. आईने त्या दिवशी माहीत नाही का? पण तो शिरा काकी गेल्यावर चुलीत ओतून दिला. तीला काहीच कळलं नाही.शिरा खराब होता की कडू होता.बालमन ते जास्त तर्क वितर्क न लावता सरळ अभ्यासात गुंग झालं.

क्रमशः

#कृष्णवेडी

सौ.प्राजक्ता हेदे(बोवलेकर)

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now