झुंज - विधिलिखित

A fight against odds in Life

शीतल, नावाप्रमाणे शांत, मृदु स्वभावाची मुलगी. जितकी ती शांत, निर्मळ मनाची, तितकच तिचं आयुष्य मात्र परिश्रमाने आणि संकटांनी गजबजलेलं. आयुष्याच्या प्रत्येक टप्यावर जणू एक नवीन आव्हान, एक नवीन संकट तिचं वाट पहात असे. शीतलला ह्या सगळ्याची सवयच झाली असावी कारण हा लढा सुरू झाला तो आईच्या गर्भापासून.

शीतल घरातले शेंडेफळ. दोन मोठे भाऊ, तिच्या पेक्षा जवळजवळ १२-१५ वर्षांनी मोठे. तिच्या आईला आपण गरोदर आहोत हेच मुळी तीन महिन्यांनी कळलं. चाळीशीच्या टप्यावर राहिलेला गर्भ, हा खरं तर तिच्या आईला नकोसावाटणारा होता.शीतलच्या वडिलांनी आपल्या लेकीचे स्वागत केले. बाळाच्या आगमनाने आईच्या मनाला वात्सल्याचा पान्हा फुटला. लक्ष्मीच्या पावलांनी लेक घरात आली. तिच्या येण्याने घरात सुख, समृध्दी लाभली.

आई वडील आणि दोन्ही मोठ्या भावांची, छोटी बहीण शीतल, सगळ्यांची लाडकी होती. शीतलचे सगळे लाड, हट्ट सहज पुरवले जात. तिने काही मागण्या आधीच खेळणी, ड्रेस, चॉकलेट खाऊ सगळं तिच्या समोर हजर असायचे.सगळं छान सुरू असताना दृष्ट लागावी असेच घडले. अचानक हृदय विकाराच्या झटक्याने शीतलच्या वडिलांचे निधन झाले. लहानग्या निरागस शीतलच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र अवघ्या आठव्या वर्षी हरपले.

लहान वयात काही कळण्या आधीच शीतलच्या आयुष्याला कलाटणी देणारी ही भयंकर घटना घडली. आर्थिक परिस्थती बदलली, मोठ्या इंग्रजी शाळेत शिकणारी शीतल, आता आपल्या आई बरोबर शहरापासून दूर तिच्या मामाच्या घरी जाऊन राहू लागली.डिग्री शिक्षण पूर्ण करून दोन्ही भाऊ नोकरीला लागले. संपूर्ण घराचा भार सांभाळणं त्या दोघांच्या तुटपुंज्या पगारात भागणार नव्हत. आईने आपल्या दोघा मुलांना शहरातल्या फ्लाट वर रहायला सांगितले आणि तिथे इतर नोकरी करणारे लोक पेईंग गेस्ट म्हणून ठेवले आणि स्वतः लहानग्या शीतलला घेऊन भावाकडे गेली.

अचानक आलेल्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ शीतलवर आली. तिला लहान वयात मोठं व्हावं लागलं. परिस्थितीची आलेल्या संकटाची संपूर्ण जाण नसून देखील शीतल खूप समंजसपणे आणि धीराने तोंड देत होती. मिळतील तसे परवडतील ते कपडे वापरणे, पुस्तकं दप्तर, साध्या शाळा शिकणे ह्या सगळ्यासाठी तिने आईकडे कधी असं "का" म्हणून विचारणा केली नाही.सात आठ वर्षे सरली, आणि दहावी नंतर शीतल वं तिची आई पुन्हा शहरात आपल्या घरी परतल्या. तोवर दोघे भाऊ थोडं स्थरी स्थावर झाले. चांगली नोकरी पगार, पुन्हा हळू हळू आयुष्याची गाडी रुळावर येऊ लागली.

मोठ्या भावाने प्रेम विवाह केला. त्याच्याच ऑफिस मध्ये  काम करत असलेल्या मैत्रिणीशी त्याने साध्या पद्धतीने विवाह केला. नवीन वहिनी घरात आली, अनेक वर्षांनी घरात आनंदाची लहर आली.पण लग्नं करून येताच काहीच महिन्यात तिने आपल्या पतीला सांगितले, "सासूबाई आणि शीतलची वेगळी सोय करा, मी एकत्र रहाणार नाही!"मोठ्याने आपला संसार दुसऱ्या भाड्याच्या खोलीत हलवला, आणि आई आणि बहिणीला वडिलांच्या घरात  राहता आलं. पण घर खर्चाला लागणारा पैसा आता त्या मोठ्या भावाकडून येणं बंद झाला. त्याला आपला संसार, घर , बायको ह्या जबाबदाऱ्या वाढल्या.

शीतलने एकंदर परिस्थिती पाहता आईला सुचवले, आपण पुन्हा घरी पेईंग गेस्ट ठेऊ. ह्या वेळेस नोकरी करणाऱ्या शिकणाऱ्या मुली ठेऊ. त्यांना चहा, नाश्ता जेवणाचा डबा देखील देऊ. म्हणजे घर खर्च भागेल.सोळा वर्षांच्या आपल्या मुलीने शांतपणे समजून उमजून विचार पूर्वक दिलेला सल्ला आई ऐकतच राहिली. तिच्या आईला शीतलच म्हणणं पटलं. दोघी मायलेकी जमेल तसं, होईल ते करून त्यांच्या आयुष्याचा गाडा ढकलत होत्या.

दरम्यान दुसरा भाऊ परगावी कामा निम्मित गेला, तो तिथेच स्थायिक झाला. त्याने लग्नं केले आणि आपला संसार सुखाने थाटला. आई बहीण आणि मोठा भाऊ हे आपल्या कुटुंबातले आहेत, हेच तो रीतसर विसरला होता. त्याला परिवार आणि ओघाने येणारी जबाबदारीच नको होती!शीतलासाठी हे आपल्या लाडक्या मोठ्या भावांच हे रूप धक्का दायक होतं.दोन्ही भावांनी आई आणि बहिणीचे जबाबदारी एकमेकांवर झटकली. मधल्या मध्ये माय लेकी होरपळल्या. पण आजवर इतके वाईट दिवस आणि अनेक धक्के पचवले, तसा हा एक, म्हणत शीतल ने शांतपणे मान्य केलं. आईला देखील सांभाळल आणि स्वतः ही सावरली.

बारावी नंतर, डिग्री शिक्षण घेत असताना शीतलने शाळेतील मुलांच्या शिकवण्या घेतल्या. पैसे साठवू तेच वेळेला उपयोगी पडतील ही तिची दूरदृष्टी. दोन मोठी कमावती मुलं असून देखील आई, आपल्या लेकी जवळ शीतलच्या भरवश्यावर दिवस ढकलत होती.शितलने आईचा सांभाळ, औषध पाणी, डॉक्टर दवाखाना मायेनं प्रेमाने केला. तिने कधीच आपल्या भावांना दोष दिला नाही की स्वतःची जबाबदारी फेटाळली नाही. आईला आता लेकीच्या लग्नाचे वेध लागले होते. पण शीतल म्हणायची " आई, मी लग्नं करणार नाही. तुला सोडून मी कुठेही जाणार नाही."

तेव्हा शीतलच्या वेळेस गरोदर असताना, नकोशी वाटणारी गर्भधारणा, पण आज तिच लेक आपला खरा आधार आहे हे शीतलच्या आईला उमजले. आपलं तेंव्हाच वागणं, आपले विचार पूर्णपणे चुकीचे होते, हे आठवून आईला रडू कोसळले. जन्माला येण्या पासूनच आयुष्याशी झूंज शीतलच्या नशिबी आली ह्या विचाराने त्यांना घेरले.आपल्या लेकीचे पुढे चांगलंच व्हावं हीच त्यांची इच्छा होती.तिनं लग्नं करून, संसार नवरा, घर एक सुखी सुंदर आयुष्य अनुभवावं हीच प्रार्थना त्या रोज देवाकडे करत.

ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर शीतलला कॉलसेंटरमध्ये नोकरी मिळाली. सकाळची शिफ्ट असल्याने ती पहाटे ऑफिस करायची आणि संध्याकाळी शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांची घरीच शिकवणी घ्यायची.संपूर्ण दिवस तिचा नोकरी, क्लास घेण्यात जात असे. तिच्या वयाच्या चार चौघींसारख बाहेर भटकणे, खरेदी, मित्र मैत्रिणी ही सवड तिला कुठे मिळणार? आई आणि घराची जबाबदारी पेलणारे तिचे हात, थकले तरी सांगणार कोणाला?

आईला शीतलच्या भविष्याची काळजी लागून राहिली. वयोमानानुसार आईची तब्येत खंगत चालली होती. उशिराने झालेली लेक आता तेवीस वर्षांची होईल. आईला हेच वाटे "पोरीचं माझ्या मागे करणारं कुणीच नाही. भाऊ असून नसल्यासारखे. एकदा लग्न करून योग्य जोडीदार मिळाला की शीतलच्या जीवनाची आणि संसाराची घडी बसेल."

"माझ्या माघारी तुझा हक्काचा माणूस, तुझा नवरा असेल, तुझ घर असेल", ही शीतलची समजूत आई सारखी घालत असे. लग्नं कर, हा शीतलच्या मागे आईने तकादाच लावला. "असं अनोळखी कोणाशी कसं लग्नं करून मी तुला सोडून जाऊ? हे शीतलचं ठरलेले उत्तर असे."

आईचं म्हणणं तिलाही मनात कुठेतरी पटत होतं. तिला देखील वाटू लागले, आता आयुष्यात शांत विसावा हवा, कुण्या मजबूत खंद्यांचा आधार असावा. घर, संसार एक सुखी परिवार असावा. पण यात तिच्या आईला कधी दुरावणार नाही याची हमी देणारा, आईची जबाबदारी घेणारा कुणी समजूतदार जोडीदार मिळेल का? लग्नं करताना हीच एक तिची अट होती.या एका बाबतीत परमेश्वराने तिचे मागणे ऐकले आणि तिच्यावर प्रसन्न होऊन तिला एक समंजस, मेहनती आणि शीतलवर प्रेम करणारा जोडीदार मोहन, नवरा म्हणून मिळाला. ती जिथे कॉल सेंटरमध्ये काम करत होती, तिथे दोघांची भेट झाली, मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघे विवाह बंधनात अडकले.

मोहन आणि शीतलच्या वैवाहिक आयुष्याची सुंदर सुरुवात झाली. लग्नानंतरचे दिवस म्हणजे शीतलच्या आयुष्यात जणू सुखांच्या सरी बरसल्या! तिच्या पूर्व आयुष्यातील दुःखाची सल हळू हळू कमी होऊ लागली जेव्हा तिच्या मनावर मोहनने त्याच्या प्रेमाची फुंकर घातली.सुखी समाधानी आयुष्य काय असतं हा अनुभव शीतलच्या वाटणीला मोहनच्या रूपाने आला. लग्नाला वर्ष होताच शीतलला मातृत्वाची चाहूल लागली. शीतल आणि मोहन एका गोंडस मुलाचे आई बाबा झाले. बाळराजे घरात येताच घराचे गोकुळ झाले.

बाळ झाल्यानंतर शीतलने बाळाकडे आणि घराकडे आपलं पूर्ण लक्ष केंद्रित केलं. कॉल सेंटरची नोकरी सोडली आणि घर आणि बाळ संभाळण्यात रमली. घरात असली तरी शांत बसून राहील किंवा आराम करेल ती शीतल कुठली. तिने तिच्या शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या शिकवण्या सुरू ठेवल्या.
मोहन घरासाठी, बाळाच्या उज्वल भविष्यासाठी खूप मेहनत घेऊन काम करून पैसे कमावण्याची खटपट करत होता. चांगल्या मोठ्या कंपनीत नवीन नोकरी लागली आणि पगारवाढ मिळाली. जास्त पैसे म्हणजे ओघाने जास्त काम आणि जबाबदारी आलीच. नोकरीच्या धावपळीत मोहननी त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केले.

वेळी अवेळी जेवण, कामानिमित्त उशीरापर्यंत जागरण या सगळ्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. मोहन आजारी पडला. खूप अशक्तपणा आला. वजन देखील झपाट्याने कमी झाले. डॉक्टरांनी काही रक्त तपासण्या सांगितल्या, त्या केल्यावर हे निदर्शनास आले की मोहनला मधुमेह झाला आहे.
शीतल आणि मोहनसाठी हा धक्का पचवणं अवघड झालं. आत्ता कुठे सगळं स्थिर स्थावर होत होतं थोडे आनंदाचे क्षण, सुखाचे दिवस बघायला मिळत होते आणि अचानक हा मधुमेह! तो ही मोहनच्या अवघ्या एकोणतिसव्व्या वर्षी! जरा कुठे शीतलच्या आयुष्य सुखमय होत आहे, असं म्हणता म्हणता, तिच्या आनंदात नियतीने विरजण घातले.

डॉक्टरांच्या मते मोहनने घेतलेला कामाचा ताण, त्याच्या जेवणाच्या अनियमित वेळा आणि व्यायामाचा अभाव हेच मधुमेह एवढ्या लहान वयात होण्याचे मुख्य कारण होय. शीतलने आता कटाक्षाने लक्ष देऊन मोहनच्या जेवणा खाण्याच्या सवयी, वेळा त्याची औषधे सगळ नीट पाहिलं. मोहनची तब्येत सुधारली, चांगली जीवनशैली, वेळेवर जेवण, थोडा व्यायाम आणि मुधुमेहाच्या नियमित औषध, या सगळ्याचा चांगला परिणाम दिसून आला.

काही दिवस सगळं सुरळीत छान चाललय असं वाटेपर्यंतच तो वाईट दिवस उजाडला ज्या दिवशी मोहन ऑफिसमध्ये चक्कर येऊन कोसळला. तातडीने त्याला दवाखान्यात दाखल केले. रक्त चाचणी, सी. टी. स्कॅन करून घेतले. थोडं बरं वाटलं म्हणून एक दिवसानंतर घरी सोडलं. रक्त तपासणी आणि सी. टी. स्कॅन रिपोर्ट दोन दिवसांनी मिळणार होते. तेव्हा पुन्हा डॉक्टरांनी भेटायला बोलावले.शीतल आणि मोहन दोन दिवसांनी हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट आणायला गेले. त्यांना पुसटशी कल्पनाही नव्हती नियतीने त्यांच्या समोर  काय वाढून ठेवलंय. डॉक्टरांनी सांगितले मोहनला कर्करोग झाल्याची संभावना आहे!! हे ऐकताच शीतलच्या पाया खालची जमीन सरकली! ती कर्करोग  ऐकून, तिथेच चक्कर येऊन पडली.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार बायोपसी करून घ्यावी लागेल ज्यामुळे कर्करोगाचे पक्कं निदान होईल. कर्करोग हा शब्द ऐकताच, कानात कोणीतरी गरम शीश ओतावे अशी भावना मोहन आणि शीतल यांना जाणवत होती.
"का असं सगळं माझ्या नशिबाला आलंय, माझी काय एवढी मोठी चूक झाली की देव मला शिक्षा देतोय, हे माझ्याच नशिबी का?" शीतल आतून कोलमडून गेली होती.

घरी परतले तेव्हा दोघे सुन्न झाले होते. काय करावं काय बोलावं दोघांनाही कळेना! रडून काही उपयोग होणार नाही, ती स्वतः सावरण्याचा प्रयत्न करत होती, आणि मोहनला सुध्दा धीर देत होती. बायोप्सीचा रिपोर्ट काय येईल, पुढे काय आणि कसं होईल या विचारांनी झोप उडाली. कशातच शीतलचे लक्ष लागत नव्हते.मधे दहा दिवस कसे तरी उलटले. आज बायोप्सीचा रिपोर्ट मिळणार त्यासाठी दोघे दवाखान्यात गेले. नको तेच झालं, डॉक्टरांचे प्रार्थामिक निदान बरोबर निघाले. कर्करोग! यापेक्षा भयंकर कोणाच्याच आयुष्यात घडू नये!! डॉक्टरांनी सांगितले, हा रोग पूर्णपणे बरा होईल, घाबरु नका, आता नवीन औषधे आधुनिक केमो थेरपी या सगळ्यामुळे कर्करोग बरा होईल.

डॉक्टरांच्या शब्दांनी शीतल आणि मोहन यांना धीर मिळाला. आहे ती परिस्थिती मान्य करून, लढा देण्यासाठी तयार होण्या व्यतिरिक्त इतर पर्याय नव्हताच! कुठल्याही कठीण परिस्थितीत कणखरपणे उभ राहून आलेल्या संकटाशी झूंज देऊन त्यावर मात करणे हा गुण कदाचित शीतलच्या रक्तातच असावा.

"एखाद्याच्या पदरात देव एवढं दुःख, एका मागे एक अशी संकटं का देतो?? माझ्या नशिबात हे विधिलिखित असले तर संकटला सामोरं जाण्याची क्षमता देखील माझ्यात परमेश्वराने दिली असेल ! माझ्या सहन शक्तीच्या क्षमते पेक्षा जास्त दुःख परमेश्वर मला देणार नाही" याची शीतलला खात्री होती. 

मोहन आणि शीतल यांची कर्करोगाच्या विरोधात झूंज सुरू झाली....

समाप्त

© तेजल मनिष ताम्हणे