Login

झाले मोकळे आकाश भाग १

Zhale Mokale Aakash Part 1 (झाले मोकळे आकाश भाग १)

"आजी आजी काय सुंदर दिसतेस यार तू‌! खरं सांगू माझ्या कॉलेजमध्ये जर तू आलीस ना तर लोक मला बघायचं सोडून देतील."
सरस्वतीच्या केसांमध्ये गजरा माळून देत कल्याणी म्हणाली.

"पुरे आता आजीचं कौतुक. कधी आली नाहीस माझ्याकडे ब्युटी टिप्स मागायला."
सरस्वती म्हणाली.

"काय आजी, लहानपणी तुझ्याकडून मस्तपैकी अंगणात बसून गप्पा ऐकायला मिळायच्या ना चांदण्यांच्या छताखाली.. ते खूप भारी वाटायचं. तुला माहिती आहे अजून सुद्धा मी त्या गोष्टी आठवत असते, पण आजकाल अभ्यासामुळे वेळ मिळत नाही.
अँड मेकअप कंप्लीट."
कल्याणी दीर्घ श्वास घेत म्हटली.

"आजी तुला माहिती आहे, आज तर आजोबा ना तुला सगळ्यांसमोर मिठी मारतील बघ. नाहीतर काय माहिती माझ्या पप्पांनी त्यांच्या ॲनिवरसरीला केलं तसं सगळ्यांसमोर प्रपोज केलं म्हणजे.. अगं ‌बाई मला तर आत्ताच इतकी एक्साईटमेंट होत आहे की काय सांगू."
कल्याणी घाई घाई स्वतःच्या ओठांवर लिपस्टिक लावत म्हटली.

"खरंच तुझ्याकडेही वेळ नसतो का ग माझ्यासाठी?"
सरस्वतीचे डोळे पाणावले होते ती गंभीरपणे कल्याणीकडे पाहत म्हटली.

"ओ मेरी जान चल आता, तु पण काय काय घेऊन बसतेस ना! आणि हो
अगं कॉलेज म्हणजे करीयरचा पिक पॉईंट असतो. हा वेळ फक्त माझा आहे.. आणि मी मला हवं तसं जगणार.
तूच सांगितलं ना आजी, स्वतःच्या इच्छांना कधीच कॉम्प्रमाईज नाही करायचं म्हणून.
बाय द वे आजी तुझ्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या ना, की वेगळीच चमक दिसते बघ.. म्हणजे तुझ्या अश्रूंची सुंदरता. मलाही जमतय नाही का तुझ्यासारखा कविता वगैरे."
गळ्यात वेगळ्या स्टाईलने स्कार्फ अडकवत कल्याणी म्हटली.

"अश्रू शृंगार असू शकतात कल्याणी, पण त्या आनंदाश्रू असायला हवेत! इतर वेळी शृंगार वाटत असले तरीसुद्धा स्त्रीच्या डोळ्यातले अश्रु तिच्या वेदना असतात.
ऐकून चांगलं वाटलं की माझी नात माझ्यासारखी नाहीये, तुला स्ट्रॉंग बनताना पाहणं माझं सर्वात पहिलं स्वप्न होतं माहितीये."
सरस्वती कल्याणीच्या मानेजवळ काजळ लावत म्हटली.

"आजी गं आजी.. चल पार्टी सुरू झाली असेल."
कल्याणीने सरस्वतीचा हात पकडला आणि दोघीही बाहेर आल्या.

बाहेर हॉलमध्ये फार सुंदर सजावट केली होती.
आणि एका बोर्डवर मोठ्या अक्षरात सिल्वर कलरमध्ये लिहिलं होतं.. वेडिंगची सिल्वर जुबली.
पन्नासाव्या लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा.
खाली हार्ट शेपमध्ये लिहिलं होतं सरस्वती आणि विनायक.

सरस्वतीची एन्ट्री होताच सगळेजण जोरात ओरडा करू लागले. कृष्णा तर धावतच समोर आला आणि त्याने आजीला हात दिला.
त्याची ही स्टाइल पाहून सगळेजण जाम खुश झाले आणि टाळ्या वाजवायला लागले.

"बाकी आजी मी आजपर्यंत तुझ्या एवढी सुंदर मुलगी नाही पाहिली. फ्लॅट झालो यार." कृष्णा डोळ्यावरचा गॉगल काढत म्हटला
तसं सरस्वतीला हसू फुटलं.

"आज तर कृष्णा मी सुद्धा तुझ्या साईडला आहे, माझी मम्मी तुझ्या मम्मीपेक्षा चांगली दिसते."
अजिंक्य हसत म्हटला.

"बरं दिसू द्या.. आमच्यासारख्या वर्किंग वुमन्सला धावत पळत घरातली काम आवरून ऑफिसला पळावं लागतं, तुमच्या आईसारखं घरात बसून आयुष्य थोडीच काढता येतं प्रत्येकाला."
शिवांगी (अजिंक्य ची बायको )त्याला म्हटली.
तसा सरस्वतीचा चेहरा लगेच उतरला.
सगळेजण अचानक गंभीर झाले.

कल्याणी काहीतरी बोलणार होती पण सरस्वतीने तीचा हात दाबून धरला आणि नको म्हणून इशारा केला.
तिचं पुढे होत म्हटली,
"बरोबर आहे शिवांगीच, आजकालच्या लोकांना किती काम असतात."

"लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई बाबा." श्रीकांत आणि सई समोर होत म्हटले.
सई सरस्वतीची दुसरी मुलगी.. अजिंक्यची लहान बहिण.
आणि या दोघांपेक्षा लहान विराट जो अजून यायचा आहे.

"विराट मामू कब आयेंगे मम्मा उन्होने मुझे बोला है मुझे अपनी गर्लफ्रेंड से मिलायेंगे."
सईचा मुलगा तुषार म्हटला.

तसा श्रीकांतने त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि सगळेजण थोडे अनकंफर्टेबल झाले.

"चल ना नानी तिथे आजोबांशेजारी बस." मोठा‌ विक्रांत म्हटला आणि त्याने हात पकडून विनायक शेजारी आणून बसवलं.

एखादी नवीन नवरी लाजावी तशी सरस्वतीच्या गालावर खळी पडली. कुठल्याही स्त्रीला तिचा नवरा सोबत असला की प्रशंसेची थोडी तरी आस असतेच. मग ती बोलून दाखवो किंवा ना दाखवो.

"बाकी शिवांगी तू अजून एक गोष्ट बोलायला विसरलीस. हे रूप फक्त घरात बसून आराम केल्याचं नाहीये. हे किलोभर सोन्या मोत्याचे दागिने घातलेत ना अंगावर त्याचाही परिणाम आहे."
विनायक आपलं तोंड वाकडं करत म्हटला आणि सरस्वतीला धक्काच बसला.

"अहो आजोबा हे काय बोलताय तुम्ही. आजी किती सुंदर दिसतेय ना!"
कल्याणी म्हटली.


"अगं हो हो माझी राणी दिसते सुंदर, पण मी काय खोटे बोलत आहे का?
तुला माहिती नाही आयुष्यभर मेहनत करून मी कमावले ते दागिने. यांच काय आहे.. मिरवायला आवडतं नुसतं. आपण होऊन आभार मानलेत का माझे."
विनायक परत एकदा सरस्वतीचा अपमान करत म्हटला.

आता मात्र सरस्वतीच्या डोळ्यातून अश्रू टपकन खाली ओघळले.

तेवढ्यात अजिंक्यच्या फोनची रिंग वाजली.
फोन विराट होता, त्याला सगळ्यांसोबत बोलायचं होतं म्हणून अजिंक्यने फोन स्पीकरवर टाकला.

"हॅलो आई बाबा, सॉरी सॉरी सॉरी.. मी आज नाही येऊ शकत. आय नो की वर्षातला एकमेव दिवस म्हणजे तुमची एनिवर्सरी असते. जेव्हा आपण सगळेजण भेटतो, पण मला यावेळी नाही जमणार. मी गिफ्ट आणि केक पाठवलाय, तो येईलच थोड्या वेळात आणि दोघांनाही हॅपी ऍनिव्हर्सरी."

"अरे पण विराट थोड्या वेळा करता यायला हवं होतं ना तू अनघालाही आणणार होतास?"
सई म्हटली.

"हो ताई ऍक्च्युली आणणार होतो तिला पण आज तिच्या एका बॅचमएटच लग्न आहे ."
विराट सईला म्हटलं.

"घरी ये विराट."
एकदम कठोर गंभीर आवाजात सरस्वती म्हटली.


एका क्षणासाठी सगळ्यांना धक्काच बसला पण विराट तिकडून तिच्यावर चिडत म्हणाला,
"मम्मी हे बघ अश्या आवाजात माझ्यासोबत बोलू नकोस. अनघा आहे सोबत आणि इकडे सुद्धा फोन स्पीकरवर आहे आणि इतका महत्त्वाचा आहे का तुमच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस की माझं लग्न होण्या अगोदरच मी माझ्या होणाऱ्या बायको सोबत भांडण करू त्यासाठी?"
विराट उर्मट सारखा प्रत्युत्तर देत म्हटला.

"मला माहितीये माझी एनिवर्सरी महत्त्वाची नाही आणि मी स्वतः किती महत्त्वाची आहे तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यात, हे सुद्धा माहिती आहे म्हणूनच म्हणत आहे ये.
उद्या माझा निर्णय ऐकल्यानंतर हे म्हणू नकोस की माझ्या आईने माझा विचार केला नाही."
तितक्याच गांभीर्याने सरस्वती पुन्हा म्हटली.

विराट आणि अनुघाही एकमेकांकडे पाहू लागले आणि विराट परत प्रश्न करत म्हटला, "कसला निर्णय?"

"घटस्फोट!"
"मी सरस्वती राठोड तुझे वडील विनायक राठोड यांना घटस्फोट देत आहे."

आभाळात वीज कडकडावी तसेच सरस्वतीचे शब्द संपूर्ण घरभर कडाडले.


क्रमशः
©® अंजली दिनकर औतकार

🎭 Series Post

View all