Login

झाले मोकळे आकाश..

स्वतःच्या मनाला ही मनाप्रमाणे कधी तरी जगू द्यावे.नाही तर प्रत्येक गोष्टीत मन मारण्याची आणि इत?

'वृषाली 'शांत आणि अबोल व्यक्तिमत्त्व असणारी देवधरांची मोठी सून. प्रतापरावांची आई म्हणजे वृषालीच्या सासूबाई, अत्यंत कडक स्वभावाच्या...सर्वांनी आपल्या कडक शिस्तीनुसारच वागायलाच हवे असा धाक होता त्यांचा सर्वांवर.
              प्रताप आणि वृषाली च्या लग्नानंतर पुढच्या दोन वर्षात प्रतापरावांच्या दोन्ही भावांची लग्न झाली. पण थोडयाच दिवसात आपल्या सासूच्या अति शिस्तीला वैतागून वृषाली च्या दोघी जाऊबाईंनी आपापले संसार वेगळे मांडले.
                याचा परिणाम म्हणून सासूबाईंनी वृषालीला आणखीनच धाकात ठेवले. धाकट्या सुनांचा राग ही त्या तिच्यावर काढत असत. काही ना काही कारणाने तिला घालून -पाडून बोलत, तिच्या सर्व कामात सासूबाईंना आजकाल चुका जास्तच दिसत होत्या. वृषाली ला ही तिच्या मनाजोगा संसार करू द्यावा असे त्यांना कधी वाटलेच नाही ..
पण शांत स्वभावाची वृषाली आपल्या सासूबाईंना कधी उलट उत्तर देत नसे, ना त्यांच्याबद्दल कुणाकडे तक्रार करत असे.
          प्रतापराव ही आपल्या आईचे मन दुखावेल असे वागत नसत. कायम आईची बाजू घेत. त्यामुळे त्यांच्या वागण्याला जणू खत -पाणीच घातले गेले. पण नवऱ्याने कधी तरी आपल्याला ही समजून घ्यावे अशी वृषालीची ही अपेक्षा होतीच.. ती त्यांना कधी कळलीच नाही.
          चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वृषाली आणि प्रतापरावांना मुलगा झाला. 'अभय'...त्याचे नाव ही सासूबाईंनी च ठेवले, मोठ्या आवडीने. तो ही आपल्या आजी च्या कडक शिस्तीतच वाढला. पण आपल्या नातवावर माया ही तितकीच केली त्यांनी.
            शालेय शिक्षण संपताच अभय मोठ्या शहरात पुढील शिक्षणासाठी गेला. शिक्षण पूर्ण झाले तशी नोकरी ही मिळाली आणि अभय ने आपल्या वर्ग मैत्रिणीला, अवनीला लग्नासाठी मागणी घातली.
            अभय ने अवनीला लग्नासाठी परस्पर मागणी घातलेली कळताच वृषालीच्या सासूबाईंनी आकाश- पाताळ एक केले. या लग्नाला ठाम नकार होता त्यांचा. खूप प्रयत्नानंतर अखेर अभय आपल्या आजी चे मन वळविण्यात यशस्वी झाला आणि अभय -अवनी चे लग्न पार पडले.
             वृषाली ला अवनी पाहताक्षणी आवडली होती. अभय -अवनी च्या लग्नानंतर दोघींची छान गट्टी जमली. अवनीच्या येण्याने वृषालीला एक नवी मैत्रीण मिळाली आणि या मैत्रीमुळे सासू- सुनेचे नाते आणखीनच घट्ट झाले. अवनीच्या साथीने हळू हळू वृषालीचा स्वभाव ही खुलू लागला.
        पण वृषालीच्या सासूबाई मात्र नाखूष होत्या.
नातसूनेने वृषाली सारखेच त्यांच्या शिस्तीत वागायला हवे होते. तिचे मॉडर्न वागणे-बोलणे, नोकरी करणे अजिबात आवडत नव्हते..त्यांनी अवनी सोबत खूप दिवस अबोला धरला.. आता तिच्या कामात ही त्यांना चुका दिसू लागल्या. राग राग करू लागल्या त्या आपल्या नातसूनेचा.
            अवनी पार वैतागून गेली. जेव्हा तिने अभय कडे वेगळे राहण्यासाठी हट्ट धरला तेव्हा मात्र वृषाली खवळली..आज इतक्या वर्षात कधी नव्हे ते आपल्या सासूबाईंना बोलू लागली...
             मी जे सहन केलं तेच माझ्या सूनेने का करावं? तिला ही मन आहे..आपल्या मनाजोगे आयुष्य जगण्याचा अधिकार आहे...तसा मला ही होताच. पण प्रतापरावांनी म्हणावी तशी साथ दिलीच नाही कधी. तुम्ही म्हणाल तशीच वागले... मला ही मनमोकळ जगायचं होत...खूप काही करायचं होत...तुम्ही कायम गृहित धरलंत मला... प्रसंगी अपमान केलात..राग-राग केलात...तुमच्या अशा स्वभावामुळे धाकट्या दोघी अखेर घर सोडून गेल्या..
               आज माझ्या सूने वर ही तीच वेळ का यावी!...निदान या दोघांचा संसार तरी त्यांच्या मर्जीनुसार होऊ दे...मी सारं सहन केलं म्हणून अवनी ने ही तसेच निमूटपणे तुमचे ऐकावे असा हट्ट का?
          प्रतापराव अवाक् झाले.. आज इतक्या वर्षात पहिल्यांदाच वृषाली ने आपल्या सासूबाईंना सुनावले होते, त्यांना विरोध केला होता.
         सासूबाई काहीच बोलत नाहीत...हे पाहून वृषाली म्हणाली आज पर्यंत मी तुम्हाला आई अशी हाक कधीच मारली नाही सासूबाई...कारण तुम्ही माझ्यासोबत कायम 'सासू 'सारख्याच वागलात. सासूचे 'प्रेम ' तुम्ही कधी दिलेच नाही..आणि मी ते अनुभवले ही नाही... निदान अवनीला तरी ते मिळू दे...स्वतःच्या मनासार संसार करू द्या त्यांना आणि आम्हाला ही..?
         सासूबाईंच्या डोळ्यांतून एकसारखे अश्रू वाहत होते. त्यांच्या मनात नेमके काय चालले आहे हे वृषाली ला कळत नव्हते...मात्र आज तिला खूपच मोकळे वाटत होते.. अनेक वर्षांनी मनावरचेे साचलेले मळभं दूर झाल्यामुळे.