झळाळी ( भाग ३ )

एका स्त्रीच्या जीवनाची कथा


( भाग ३ )

बजाज आणि वैशू पुण्यात परतले. बजाज ऑफिसमध्ये वैशूशी एकदम नॉर्मल वागत होते जणू काही दोघांमध्ये काहीच घडले नाही. वैशू मात्र बजाजांमध्ये जास्तचं गुंतली होती. ती त्यांच्यासोबत एकतर्फी प्रेम करू लागली होती.

निसर्गाने निसर्गाची किमया दाखवली आणि वैशू गरोदर राहिली होती. तिने ऑफिसमध्ये तातडीने बजाज यांची त्यांच्या केबिनमध्ये भेट घेतली आणि म्हणाली, " सर ! कसं सांगू तुम्हाला तेचं समजत नाही पण तुम्हाला सांगावं तर लागणारचं."

" काय झालं आहे ? सांग."

" सर मी तीन महिन्यांची प्रेग्नेंट आहे. सर मी म्हणत नाही की तुम्ही माझ्याशी लग्न करा पण पुढे जाऊन निदान तुमच्या बाळाचा स्वीकार करा." वैशू म्हणाली.

" काय वाटेल ते बोलते आहेस ? तुझं तुला तरी समजतं आहे का ? मी का म्हणून तुझ्या बाळाचा स्वीकार करू ? कोणा दुसऱ्याचं पाप माझ्या माथी मारते आहेस ? तुम्ही गरीब लोकं आमच्यासारख्या श्रीमंतांकडून पैसे उकळण्याची संधी शोधत असता. आमची नावे बदनाम करत असता. मी कशाला असली थेरं करू ? माझी बायको सुंदर आणि कर्तव्यदक्ष आहे. माझी मुले सुंदर आहेत. तुझ्याबरोबर हे भलतेसलते चाळे मी कसा करू शकतो ? जा तू इथून निघून. ह्या बाळाच्या खऱ्या बापाला सांग. पुन्हा तोंड दाखवू नकोस तुझं."

बजाजांचे ते कठोर शब्द वैशूच्या जिव्हारी लागले. तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या. खोटेनाटे आरोप करून बजाज यांनी वैशूचा काटा काढला होता. उद्विग्न अवस्थेत ती घरी आली. घरी आल्यावर तिच्या आईने ताडले की काहीतरी घडले आहे. वैशूच्या आईने खोदून खोदून विचारल्यावर वैशूने आईला रडत रडत सगळे सांगितले.

" अग नालायके ! कोणाचं पाप पोटात वाढवते आहेस ? तो माणूस तर तुला आणि बाळाला स्वीकारणार देखील नाही. तू इथे क्षणभरही थांबू नकोस. चालती हो ह्या घरातून. आम्हाला आणि तुझ्या धाकट्या भावंडांना तुझ्यामुळे समाजात ताठ मानेने जगता येणार नाही. दोघांची अजून लग्ने व्हायची आहेत. कोण त्यांना स्वीकारेल त्यांच्या मोठ्या बहिणीचे असे कृत्य समजल्यावर ? जा बाई ! तू इथून जा. पुन्हा आमच्या आयुष्यात पण येऊ नकोस." वैशूची आई त्वेषाने बोलत होती.

" पण आई, मी कुठे जाऊ ?" वैशूने अगतिकपणे विचारले.

" कुठे पण जा. तोंड काळं कर तुझं."

वैशूने कपड्यांची बॅग भरली आणि वाट फुटेल तिथे चालू लागली. चालता चालता वैशू मनात विचार करू लागली की, \" तिच्या अपेक्षेप्रमाणे निदान आईने तरी समजून घेतले पाहिजे होते. मी काय कमी कष्ट केले होते का घरासाठी ? माझा किती आधार होता घराला. कुठेतरी जाऊन जीव द्यावा तर ह्या पोटातल्या वाढणाऱ्या जिवाने काय पाप केले आहे ? मी तर मरून जाईन पण तो जीव जगात येण्याआधी त्याला मी मारून कसे टाकू ? ते काही नाही ह्या बाळासाठी आपण जगलेच पाहिजे.\"

चालत चालत ती एका बसस्टँडजवळ पोहचली. मुंबईला जाणाऱ्या बसमध्ये जाऊन बसली. डोळ्यांत असंख्य अश्रूंच्या धारा वाहातचं होत्या. बसमध्ये वैशूच्या शेजारी एक भले गृहस्थ बसले होते. त्यांनी वैशूला एकाद्या वडिलांप्रमाणे ती का रडते आहे असे विचारल्यावर वैशूने त्यांना सगळी हकीकत सांगितली. ते गृहस्थ मुंबईत जात होते. त्यांनी वैशूला तिथे नोकरी मिळवून देण्याचे वचन दिले.

मुंबईत पोहचल्यावर त्या सद्गृहस्थांनी वैशूला प्रथम एका हॉटेलमध्ये नेऊन जेऊ घातले त्यानंतर त्यांच्या ओळखीच्या डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये वैशूला सुपरवायझरची नोकरी मिळवून दिली. वैशूने त्यांचे आभार मानले आणि ती एका भाड्याच्या रूममध्ये राहू लागली.

वैशू इमानेइतबारे नोकरी करत होती. तिचे दिवस पण आता भरत चालले होते. यथावकाश तिला एक सुंदर मुलगी झाली. पण इथे देखील वैशूचे दुर्दैव आड आले. हॉस्पिटलमधल्या एका वॉर्डबॉयने वैशूवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ती त्याच्या तडाख्यातून सुटली तर रोज काही ना काही निमित्ताने तो तिला त्रास देऊ लागला. वैशूने त्याची तक्रार केली तरी त्याला कुठलीच शिक्षा केली गेली नाही. उलट वैशूने त्याची तक्रार केली म्हणून तो जास्त चेकाळला. वैशूच्या घरी घुसून त्याने त्याची भूक भागवून घेतली.

वैशू तिच्या लहान बाळाला घेऊन पुन्हा वाट फुटेल तिथे चालत राहिली. चालता चालता दमून एका गार्डनमधील एका बाकड्यावर बसली असता एका इसमाने तिची मायेने विचारपूस करून तिला नोकरीचे आश्वासन देऊन वेश्यावस्तीत आणले. ती वेश्यावस्ती आहे हे वैशूने ताडल्यावर तिने पळायचा प्रयत्न केला पण त्या इसमाच्या शक्तीपुढे तिचे काही चालले नाही आणि तिची रवानगी वेश्यावस्तीत झाली.

ती वस्ती आणि त्या बायका बघून वैशू खूप घाबरली. एक जाडजूड बाई तिथे एका खाटेवर पान खात बसली होती. इशाऱ्यानेच तिने त्या इसमाला पैसे द्यायला लावले. वैशू त्या बाजारात विकली गेली होती. तिने त्या स्त्रीला मला इथे कुठे आणले विचारले असता ती स्त्री गदगदून हसली आणि बोलली की, " एक मूल आहे तुला म्हणजे तू कोरी नाहीस. बाहेरच्या जगात राहशील तर बलात्कारावर बलात्कारचं तुझ्यावर होत राहतील. निदान इथे तुझ्या शरीराचे मोल तरी मिळेल." असे म्हणून त्या स्त्रीने एका अंधाऱ्या खोलीत तिला ढकलले. एक तिथे तिच्या वयाचीच मुलगी होती तिने तिला सांगितलं हा नरक आहे. जसं जमेल तसं इथून पळ काढ. वैशू बिचारी आपल्या नशिबाला दोष देत रडत राहिली.

त्या रात्री वैशूला तिथल्या बायकांनी आपल्यासारखे सजवले आणि एका मनुष्याला तिच्या खोलीत पाठवले. तो मनुष्य तिच्यावर अधाशासारखा तुटून पडला. तिच्या शरीराचे लचके तोडत राहिला. वैशूची लेक मधेच भुकेसाठी रडली तर अत्यंत कळवळत तिने बाळाला पदराखाली घेतले. त्या नीच माणसाने तिच्या बाळाला बाजूला ढकलून पुन्हा तिच्या शरीराशी खेळू लागला. असे वरचेवर घडतचं गेले. रोज वेगवेगळ्या पुरुषांना आपले शरीर तिला बहाल करावे लागे.

क्रमशः

सौ. नेहा उजाळे

🎭 Series Post

View all