झळाळी ( भाग २ )

एका स्त्रीच्या जीवनाची कथा


( भाग २ )


" वैशू ! ये बरं घरात. किती खेळशील ?" वैशूची आई सुभद्रा वैशूला ओरडत होती.

" आई ! खेळूदे ना ग मला. आज सुट्टी आहे ना ग शाळेला. मी करेन ना ग नंतर अभ्यास."

" हो अभ्यास कर पण आधी मला जरा दूध आणून दे समोरच्या दुकानातून. शालूला ताप आहे सकाळपासून. तिला रव्याची पेज देते करून. मला कामाला जायचं होतं पण घरातून पाय निघवत नाही."

" शालूला बरं नाही ? मला वाटलं ती अशीच झोपली असेल. दे पैसे मी आत्ता आणते दूध आणि आई तुला जायचं असेल तर जा कामावर. मी बघेन शालूला."

" माझी गुणाची पोर ग ती. तुझ्या जीवावर तर ह्या दोन पोरांना टाकून मी काम करू शकते." सुभद्राने वैशूचा प्रेमभराने मुका घेतला.

वैशूने आईकडून पैसे घेऊन तिने आईला दूध आणून दिले. सुभद्राने रव्याची पेज केली आणि वैशूने शालूला भरवली. तोपर्यंत सुभद्राने लहान्या समीरला दूध पाजण्यासाठी पदराखाली घेतले. शालूचे अंग चांगलेच तापले होते. आईला कामाला जायला सांगून वैशू शालूची शुश्रूषा करत बसली. वैशूने शालूच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवायला सुरुवात केली. थोड्या वेळाने शालूचा ताप ओसरला.

शालूचा ताप ओसरल्यावर वैशूने आईने केलेले जेवण शालूला वाढले आणि स्वतः देखील जेवायला बसली. जेवण झाल्यावर सगळी भांडी स्वच्छ घासून पुसून तिने फडताळात ठेवली. समीरला म्हणजेच तिच्या छोट्या भावाला वरणभात भरवला आणि त्याला झोपवले. संध्याकाळी सुभद्रा घरी आली. येताना तिने ग्लुकोजच्या बिस्किटचा पुडा आणला होता. तिने दोन्ही मुलींना चहासोबत बिस्किटे खायला दिली. आईचा आवाज ऐकून समीर उठला आणि आईला बघून दुधासाठी हट्ट करू लागला म्हणून सुभद्राने पुन्हा त्याला पदराखाली घेतले.

संध्याकाळी आईला थोडी मदत करून वैशू अभ्यास करण्यासाठी बसली. उद्या शाळेत चित्रकलेची स्पर्धा होती त्यासाठी तिने रंगीत खडू, पेन्सिल, पट्टी सगळं काही आठवणीने बॅगेत भरले. नऊच्या सुमारास सुरेश म्हणजेच वैशूचे वडील कामावरून आल्यावर सगळे एकत्र जेवायला बसले. जेवणं झाल्यावर वैशूने सगळी भांडी घासून टाकली. आपली बारा वर्षांची मुलगी परिस्थितीने किती समंजस झाली आहे हे पाहून सुभद्राच्या डोळ्यांत पाणी तरळले.

खरंतर सुभद्राला शालूनंतर मूल होऊन द्यायचे नव्हते पण सासू - सासऱ्यांच्या वंशाच्या दिव्याच्या हट्टामुळे समीरचा जन्म झाला. सुभद्राच्या सासूबाईंनी तर सुभद्राला मुलगा झाला नाही तर आजन्म सुभद्राचे तोंड बघणार नाही अशी धमकी घातली होती. खरंतर तीन - तीन मुलांचा खर्च सुभद्रा आणि सुरेशला परवडत नव्हता म्हणून सुभद्रा पाच - सहा घरी जाऊन जेवण बनविण्याचे, धुण्याभांड्यांचे काम करू लागली कारण सुरेश प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करत होता. त्याच्या तुटपुंज्या पगारात घरखर्च भागत नसे. सासू - सासरे गावी पोटापूरती शेती करत होते. सुरेशला देखील मोठ्या दोन बहिणी होत्या. त्यांच्यापाठी त्याच्या आईला दोन मुलगे झाले पण ते जन्मतःच मृत पावले आणि मग सुरेश जन्माला आला होता त्यामुळे आपल्या मुलाचा वंश पुढे चालण्यासाठी सुभद्राच्या सासू - सासऱ्यांना वंशाचा दिवा हवाच होता.

वैशू मूळचीचं अभ्यासात अतिशय हुशार होती. लहानपणापासूनचं एकदम गुणी. आपल्या परिस्तिथीची तिला जाणीव होती त्यामुळे तिने आईवडिलांकडे कधीच कुठले हट्ट केले नव्हते. एक मात्र ध्यास तिला होता तो म्हणजे शिक्षणाचा. दहावीला ९०% मिळवून खरं तर तिला सायन्स साईडला जायचे होते पण घरची परिस्थिती यथातथाच असल्याने तिने आर्ट्सला प्रवेश घेतला. तिला शिकून खूप मोठे व्हायचे होते. भावंडांचे शिक्षण तसेच घराची आर्थिक परिस्थिती देखील तिला सुधारायची होती. स्वतःच्या मेहनतीने स्कॉलरशिपवर ती ग्रॅज्युएट झाली. पुढे शिकण्याची प्रचंड इच्छा असूनदेखील तिने आईवडिलांचा भार हलका करण्यासाठी एका नामांकित कंपनीत नोकरी करू लागली.

वैशू अतिशय मेहनती. दहा मुलांची कामे एकटीने उरकायची. तिचा कामामध्ये असणारा चपळपणा, प्रामाणिकपणा याने कंपनीचे मालक श्री. नरेंद्र बजाज तिच्यावर खूप खुश होते. बजाज हे अतिशय श्रीमंत. लक्ष्मी त्यांच्या घरी पाणी भरत असे. त्यांना तीन वर्षांची जुळी मुले होती. बजाज पस्तिशीतले असूनदेखील तिशीतील वाटतअसत.

वैशू ऐन तारुण्याच्या दारात उभी होती. त्यामुळे साहजिकच ती बजाजांकडे आकर्षिली जात होती. बजाज यांचे रुबाबदार व्यक्तिमत्त्व, त्यांचे स्टायलिश कपडे, सौम्य वासांचे महागडे परफ्युम्स आणि बोलताना त्यांची होणारी दिलखेचक अदा यांनी वैशू त्यांच्यावर एकदम फिदा झाली होती.

एके दिवशी ऑफिसच्या कामानिमित्त बजाज वैशूला घेऊन मुंबईला गेले. संध्याकाळी परत पुण्याला परतायचे होते पण मुंबईत तुफान पाऊस सुरू झाला. त्या पावसात बाहेर पडणे शक्य नसल्याने त्यांना हॉटेलमध्येचं थांबावे लागले. हॉटेलमध्ये त्यांना स्वतःला आणि वैशूसाठी अशा दोन रूम बुक केल्या. रात्री डिनरसाठी वैशू त्यांच्याबरोबर हॉटेलच्या डायनिंग हॉलमध्ये गेली. वैशूने नुकताच मुंबईत शॉपिंग केलेला ब्लॅक कलरचा वनपीस घातला होता. तिच्या गोऱ्या रंगावर तो खूप खुलून दिसत होता. बाहेर पाऊस आणि समोर रुपसुंदरी याने बजाज यांचे चित्त खवळले. त्यांचे जेवणात देखील लक्ष लागत नव्हते. कसेबसे जेवण संपवून ते त्यांच्या रूममध्ये गेले. सरांना नक्की कसला त्रास होतो म्हणून वैशू त्यांची विचारपूस करायला गेली असता त्यांनी गोड बोलून वैशूला प्रेमाच्या जाळ्यात फासले आणि वैशू तिचे सर्वस्व बजाजांना देऊन बसली.

क्रमशः

सौ. नेहा उजाळे

🎭 Series Post

View all