झळाळी ( भाग १ )

एका स्त्रीच्या जीवनाची कथा
( भाग १ )

" इथे उपस्थित असलेले मान्यवर तसेच माझ्या बंधू - भगिनींनो आज ह्या हॉस्पिटलचे उद्घाटन माझ्या आईच्या हस्ते व्हावे अशी माझी इच्छा आहे. आई पुढे येऊन ही लाल फित काप." देविका आपल्या आईला वैशालीताईंना बोलवत होती.

वैशालीताईंच्या डोळ्यांतून सतत अश्रू पाझरत होते. थरथरत्या हाताने त्यांनी लाल फित कापली. उपस्थित मंडळींनी टाळ्यांचा कडकडाट केला. देविकाने अतिशय प्रशस्त हॉस्पिटल वेश्यावस्तीत बांधले होते. शरीरविक्री करणाऱ्या स्त्रिया आणि त्यांच्या मुलांसाठी बांधलेले हे एकमेव सुसज्ज असे हॉस्पिटल होते.

हॉस्पिटलचे उद्घाटन झाल्यावर देविका तिच्या आईला तिच्या घरी जबरदस्ती घेऊन गेली. देविकाच्या प्रशस्त बंगल्यासमोर गाडी उभी राहिली. शोफरने अदबीने गाडीचे दार उघडले असता देविका आणि तिची आई गाडीबाहेर आल्या.

बंगल्यात शिरल्या शिरल्या लगेच देविकाने तिच्या मदतनीस बाईला हाक मारली," वासंती ! ही माझी आई आहे. हिची सगळी व्यवस्था केली आहेस ना तिच्या खोलीत ?"

" हो मॅडम, सगळी चोख व्यवस्था केली आहे. तुम्हाला दोघींना चहापाणी आणू की सरबत देऊ ?"

" अग ! हॉस्पिटलमध्ये चहा - कॉफी झालंच आहे. एक काम कर आम्हाला दोघींना वाळ्याचे सरबत आण. जरा थंडावा येईल. बरं ! जेवणाचं काय केलं आहेस ?"

" मॅडम, तुम्ही बोललात त्याप्रमाणे टोमॅटो सूप, सलाड, व्हेजपुलाव तयार ठेवले आहे. कधी वाढायला घेऊ ते सांगा."

" जेवू आम्ही थोड्या वेळाने. आई सरबत घेतल्यावर तुझ्या रूममध्ये जाऊन फ्रेश हो आणि थोडा आराम कर." देविका आणि तिच्या आईने सरबत घेतले. देविकाने तिच्या आईला तिच्या रूममध्ये सोडले आणि ती तिच्या रूममध्ये जाण्यास निघाली असता वैशालीताईंनी तिला हाक मारली.

" देविका, तुझ्याशी थोडे बोलायचे होते."

" हां ! बोल ना आई."

" देविका, का मला इथे आणलेस ? माझ्यामुळे तुझ्या नावाची किती बदनामी होईल ? मी आता प्रतिष्ठित समाजात ताठ मानेने नाही वावरू शकत. देविका तुझ्यापुढे तुझं उज्वल भविष्य आहे. माझं आता काय राहिलं आहे ? मी समाजासाठी एक कीड आहे. जगली काय किंवा मेली काय. माझ्यासाठी तुझं भविष्य धोक्यात घालू नकोस. मी पाया पडते तुझ्या."

" आई तू कितीही काहीही बोललीस तरी मी माझा निर्णय बदलणार नाही." देविका तिच्या आईचे बोलणे अर्धवट ठेऊन मधेच बोलली.

" देविका, नको ग असं करुस. मला इथे तुझ्या घरी नको ठेऊस. विहानला काय वाटेल ? तुमच्या दोघांचं समाजात केवढे नाव आहे. तुम्हा दोघांना समाजात मान आणि प्रतिष्ठा आहे. माझ्यामुळे तुम्हाला मान खाली घालावी लागेल. तुझी लेक वैदेही अजून लहान आहे. मोठी झाल्यावर तिच्या आजीबद्दल सगळं समजल्यावर तिला माझ्याबद्दल काय वाटेल ते मला नाही सहन होणार." वैशालीताई देविकाला विनवत होत्या.

" आई ! तुला काय सांगू ? लहानपणापासून आई हा शब्द बोलण्यासाठी मी किती तळमळले आहे आणि आता माझी आई मला सापडली तर तिला मी पुन्हा गमावून बसू ? आई तू समाजाला इतकी का घाबरते आहेस ? समाजाने तुला काय दिले ग ? एका चांगल्या घरंदाज मुलीला तिच्या मर्जीविरुद्ध तिचे शरीर विकण्यास भाग पाडले. तू देखील एक माणूस आहेस मग तुला हक्क नाही का ग माणूस म्हणून जगण्याचा ?"

" अग पण इतका का हट्ट करते आहेस ?" वैशालीताईंनी देविकाचे म्हणणे अर्धवट तोडले.

" आई ! जेव्हापासून मला समजलं की, माझी आई जिवंत आहे तेव्हापासून मी किती तुला शोधलं म्हणून सांगू ? आणि आता तुला पुन्हा माझ्यापासून दूर करू ? लहानपणी शाळेत मित्र - मैत्रिणींच्या आई त्यांना सोडायला आणि न्यायला येत असत. आईला पाहिले की ती मुले आईकडे धावत जायची. आईला मिठी मारायची. मग त्यांची आई त्यांचे प्रेमाने पापे घ्यायची. आई, ह्या सगळ्या गोष्टींपासून मी वंचित राहिले आहे ग."

" हो ग देविका, मी सुद्धा तुझ्या बाळलीलांना मुकले आहे ग. नुसतं आतून आतडं तुटायचं ग तुझ्या आठवणीने. उर भरून यायचा पण त्या गलिच्छ वस्तीतून तू चांगल्या ठिकाणी गेलीस याचेच समाधान होते मला." देविकाची आई बोलली.

" आई, आपण दोघी एकमेकींच्या प्रेमाला मुकलो. मला तुझा उबदार सहवास हवा आहे ग आणि विहानचं म्हणशील तर त्यानेच तुला घरी आणायला सुचवले. त्यामुळे त्याने आक्षेप घेण्याचा प्रश्नचं उरत नाही आणि वैदूची काळजी करू नकोस. मी तिला ती जाणती झाल्यावर व्यवस्थित समजावून सांगेन. माझ्या वैदूला आजीचं प्रेम देखील मिळेल."

देविकाच्या बोलण्याने वैशूच्या म्हणजेच देविकाच्या आईच्या डोळ्यांतून घळघळ पाणी वाहू लागले. आजपर्यंत वैशू स्वतःसाठी कधी जगलीच नव्हती का कधी तिची किंमत कोणी केली होती. अगदी जन्मदात्र्या आईने देखील तिला समजून घेतले नव्हते आणि आता कित्येक वर्षांनी देविकाची तिच्या लेकीची भेट झाल्यावर तिची लेक तिला माया लावू पाहत होती. समाजात स्थान देऊ पाहत होती.

वैशूच्या डोळ्यांसमोर तिचा भूतकाळ उभा राहिला.

क्रमशः

सौ. नेहा उजाळे

🎭 Series Post

View all