झळाळी ( भाग ५ अंतिम )

एका स्त्रीची कथा
( भाग ५ अंतिम )

" आजी ए आजी ! मी आले श्कूलमधून." छोट्या वैदूच्या हाकेने वैशूची तंद्री भंगून ती भूतकाळातून बाहेर आली.

" ये बाळा, बैस माझ्याजवळ." वैशूने त्या छोट्या बाहुलीचे पटापट मुके घेतले. वैशूला लहानपणीची देविका आठवली आणि तिला गलबलून आले. दुसऱ्याच क्षणी आपण एका भ्रष्ट झालेल्या स्त्रीने आपल्या लेकीच्या छोट्या मुलीचे एवढे पापे घेतले यासाठी वैशूला एकदम अपराध्यासारखे वाटले. थोडं सावरून वैशूने विचारले, " तुला कोणी सांगितलं की मी तुझी आजी आहे ?"

" माझ्या मम्माने. तू कुठेतली लांब गेलेलीश ना ? मला मम्माने शांगितलेलं की, तू येणालं आहेश आमच्याकले. आता मज्जाच मज्जा अशनालए. मला तू लोज स्टोली शांगशील ना ?"

" हो सांगेन हा बाळा मी तुला रोज स्टोरी." वैशू आपल्या तीन वर्षांच्या नातीबरोबर बोलण्यामध्ये रंगून गेली होती.

वैशूला नातीला पाहून आणि तिच्याशी बोलून खूप भरून आले होते. तितक्यात देविकाने तिला जेवण्यासाठी बोलावले असता डोळ्यांतील पाणी पुसत वैशू डायनिंग हॉलमध्ये आली. वासंतीने पद्धतशीर डायनिंग टेबलवर जेवण मांडून ठेवले होते. वैदेहीची जेवताना बडबड चालूच होती. आज शाळेत काय घडले ते सगळं काही तिच्या मम्माला म्हणजेचं देविकाला तिच्या बोबड्या भाषेत सांगत होती. वैशू कौतुकाने नातीकडे पाहत होती.

जेवण झाल्यावर वैशूने देविकाला बोलण्यासाठी थांबवले.
" देविका, मी खरंच इथे राहिलेलं तुला आणि विहानला चालेल का ? आताच मी वैदेहीला पाहून तिचे कितीतरी पापे घेतले आणि नंतर मला खूप अपराध्यासारखे वाटू लागले. तू माझी मुलगी आहेस कदाचित तू समजून घेऊ शकशील पण विहानला आवडेल मी त्याच्या लेकीचे पापे घेतलेले ? मी तुझी जन्मदाती जरी असले तरी ह्या नात्यात खूप मोठी दरी निर्माण झाली आहे ग. तुझं मन मोठं म्हणून तू मला तुझ्या घरी घेऊन आलीस. पण मी इथे राहिल्यामुळे तुमच्या दोघांमध्ये कुठलेही वाद व्हायला नको. तुमच्या संसारात कुठलेही वितुष्ट नको. सगळा सारासार विचार कर देविका."

" आई ! तुला मी विहानची कहाणी सांगते. विहान हा देखील एक दत्तक मुलगा आहे. विहानच्या आईची एका माणसाने फसवणूक केली आणि विहान तिच्या गर्भात राहिला. त्याची आई जीव द्यायला निघाली तर एका भल्या माणसाने आणि त्यांच्या पत्नीने तिला वाचवले.

त्या गृहस्थांनी आणि त्यांच्या पत्नीने त्यांच्या घरी तिला त्यांच्या दोन मुलांचा सांभाळ करण्यास सांगितले. विहानची आई अगदी प्रेमाने त्या मुलांचा सांभाळ करू लागली. मानसिक खच्चीकरण झाल्याने विहानच्या आईची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. त्या उभयतांनी तिला औषधपाणी करून देखील विहानला जन्म दिल्यावर तीन महिन्यांतच त्याची आई हे जग सोडून निघून गेली. जाण्याआधी तिने त्या दोघांकडे तिच्या बाळाला सांभाळण्याचे वचन मागितले.

ते दोघे नवराबायको अक्षरशः देवमाणसे. त्यांनी विहानला दत्तक घेतले. आपल्या मुलांसारखे प्रेम त्याला लावले, त्याला घडवले, उच्चशिक्षण दिले. विहान स्वतःच्या हुषारीवर डॉक्टर झाला. आमची भेट आमच्या मेडिकल कॉलेजमधली. बाबांनी मला माझी कहाणी सांगितली होती. विहानने मला लग्नाची मागणी घातली तेव्हा मी माझी कहाणी त्याला सांगितली असता त्यानेही मला त्याची कहाणी सांगितली.

आमचे प्रेम जमल्यावर आम्ही आमच्या पालकांशी गाठभेट करून दिली. आमच्या पालकांनी आमच्या लग्नासाठी कुठलाही आक्षेप घेतला नाही. माझं लग्न झाल्यावर बाबांनी दोन महिन्यांतच प्राण सोडला. बाबा हयात होते तेव्हाचं मला तुझा शोध घ्यायचा होता पण बाबांच्या आजारपणात त्यांची शुश्रूषा करणे हे मी माझे पहिले कर्तव्य समजले कारण त्यांनी माझ्यासाठी त्यांचे जीवन वाहून घेतले होते.

बाबांनी तुझं नाव सांगितले होते आणि तुमच्या दोघांचा एक फोटो होता माझ्याकडे. लग्नानंतर मी आणि विहान आमच्या कामात व्यस्त झालो आणि लगेचच मला दिवस गेले. बाबांच्या नावाचे मला हॉस्पिटल बांधायचे होते. माझी प्रबळ इच्छा होती की, हॉस्पिटल पूर्ण बांधून होईपर्यंत तुझा शोध लागावा आणि माझी इच्छा पूर्ण झाली. हॉस्पिटलचे उदघाटन तुझ्या हस्ते झाले. विहानने तुला शोधण्यासाठी मला खूप मदत केली."

" अग देविका ! विहान कुठे आहेत? मगासपासून विचारेन म्हणते पण लक्षात आले नाही. तू अचानकपणे माझी मुलगी म्हणून माझ्या पुढ्यात येऊन उभी राहिलीस आणि आता तुझ्या घरी देखील आणलेस. सगळं इतकं फास्ट झालं की, मला काहीच सुचत नव्हते. त्यामुळे मी त्यांची विचारपूस पण केली नाही इतक्या वेळांत. आज ते हॉस्पिटलच्या उदघाटनाला देखील नव्हते." वैशूने देविकाचे बोलणे अर्धवट ठेऊन विचारले.

" विहानला अमेरिकेत त्याच्या प्रबंधाविषयी बोलावणे आले त्यामुळे तो तीन महिन्यांसाठी अमेरिकेला गेला आहे. तुझा शोध लागल्याचे मी त्याला सांगितल्यावर त्याने लगेच मला तुझ्या हातून हॉस्पिटलचे उदघाटन करून घेण्यास सांगितले आणि तुला घरी आणण्याची व्यवस्था देखील करायला सांगितली. विहानचा एक स्वयंसेवक मित्र माझ्यासोबत असल्याने विहानला काहीच टेन्शन नव्हते. आता थोडया वेळाने अमेरिकेमध्ये सकाळ होईल तेव्हा विहान तुझ्याशी बोलायला व्हिडीओ कॉल करणार आहे. तेव्हा तुझ्या जावयाशी बोलून घे."

विहानचा वैशूसाठी फोन आला. विहान बोलू लागला, " आई ! वेलकम होम. तुम्ही घरी आलात मला खूप आनंद झाला आहे. देविका आईच्या प्रेमासाठी आसुसलेली होती. मला तिला तिच्या आईचे प्रेम मिळवून द्यायचे होते. आता कुठलाही विचार मनात न आणता आपल्या लेकीकडे निश्चितपणे राहा.

माझे आईबाबा माझ्या मोठया भावाकडे ऑस्ट्रेलियाला राहतात त्यामुळे आमच्यासोबत एक मोठे माणूस म्हणून तुमचे प्रेम आम्हाला लाभेल. काही दिवसांनी मी भारतात आल्यावर आपण भेटूचं. आणि एक गोष्ट म्हणजे आता तुम्ही तुमचे आवडते छंद जोपासा. तुमच्या सगळ्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करा. जमल्यास फावल्या वेळात आपल्या हॉस्पिटलची व्यवस्था पहा. स्वतःला स्वतःच्या मानसिक स्थैर्यासाठी गुंतवून ठेवा. कराल ना आई तुम्ही इतकं आमच्यासाठी ?"

विहानचे आपल्या जावयाचे उदार मन पाहून वैशू भरून पावली होती. तिच्या डोळ्यांतून अखंड अश्रू वाहत होते. आता वैशूला लेक आणि जावयामुळे समाजात मानाने जगता येणार होते. वैशूच्या गंजलेल्या आयुष्याला नवीन झळाळी प्राप्त झाली होती.

( समाप्त )

सौ. नेहा उजाळे

🎭 Series Post

View all