झाकली मूठ ( भाग दुसरा )

बायको समोरं मोठेपणा कधी करू नये आणि तिला मित्रांकडे तर कधी नेऊच नये. फार कठीण परिस्थिती होते बरं.


झाकली मूठ  ( भाग दुसरा )

विषय भूतकाळात डोकावतांना

आम्ही दोघे स्टेशनवर उतरलो. मी येणार म्हणून काही मित्रांना फोन करून ठेवला होता. मी इकडे तिकडे पाहिलं. आमच्याजवळ बरंच सामान होत. पण प्लॅटफॉर्मवर आमच्या शिवाय कोणीच  दिसत नव्हतं. शेवटी ते सगळे बोचके आम्ही स्वतःच उचलले आणि स्टेशनच्या बाहेर आलो.

स्टेशन जवळ राहणाऱ्या एका मित्रा कडे जायचं मी ठरवलं. हा माझा मित्र मी मुंबईला आला की आमच्याकडेच उतरत असे. बराच वेळा त्याने आम्हाला गावी येण्याच आमंत्रण दिलं होतं. म्हणून आम्ही त्याच्याकडे जायचं ठरवलं. तसा त्याला फोनही केला होता. आम्ही त्याच्या दारात पोचलो. नेमक त्याचवेळी त्याला अर्जंट काम निघालं होतं. गावी कोणीतरी आजारी पडल होतं.त्यामुळे बिचारा दुसऱ्या गावाला चालला होता. त्यामुळे त्याला आम्हाला पाहुणचार   काय पण साधं चहापाणीही  करता आला नाही. त्याला त्याचं खूप वाईट वाटतं होतं. पण त्याचा नाईलाज होता. मी त्याच्या खांद्यावर थोपटलं आणि म्हणालो," अरे चालायचं"

त्याने त्याची बॅग हातात घेत म्हटलं ,

"बरं दत्तू, पुढच्या वेळी नक्की यायचं बरं. बरं वहिनी येतो मी "

मग दुसऱ्या मित्राकडे गेलो. तर त्याच्या दाराला भलं मोठं कुलूप होतं. ज्या ज्या मित्रांना आम्ही फोन केला होता, त्या सर्व मित्रांना दुर्दैवाने काही ना काही महत्त्वाची कामे निघालेली होती. बिचाऱ्यांना ईच्छा असूनही माझं आदरातिथ्य करता येत नव्हतं. शेवटी शेवटी मी असं करायचं की रिक्षात सामान तसंच ठेवायचं . मित्रांकडे जायचं .मित्र घरी नसले खाली यायचं .आणि दुसऱ्या मित्राकडे निघायचे. अशी आमची मित्रांची शोधाशोध सुरू होती.

बराच वेळ झाला होता. आम्ही आमच्या गावात येऊन बराच वेळ झाला होता. पण अजून चहा पाणी देखील झालेलं नव्हतं. बायकोच्या चेहऱ्याकडे बघायची माझी हिंमत होतं नव्हती. मी तिची कशीबशी समजूत घालत होतो.

" अग, काम काय मुंबईतल्याच लोकांना असतात असं नाही. तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं ना. बिचाऱ्यांना किती वाईट वाटतं होतं ते. अग माझे संबंधच असे होते."

" बरं ते तुमचे मित्र आणि तुमचे संबंध जाऊ द्या खड्डयात. आता अगोदर एखाद्या हॉटेलमध्ये चला आधी"

हॉटेल म्हटल्यावर मला अचानक आठवण झाली. माझी एका मित्राचे मोठे हॉटेल होते. त्यानेही मला बोलावले होते. मी गर्वाने बायकोला म्हणालो,

" चल तुला माझ्या मित्राच्या पॉश हॉटेल मधे घेऊन जातो" पण तिचा माझ्या या बोलण्यावर अजिबात विश्वास बसला नाही.

" कुठेही चला, पण चला एकदाचे "

असे तिने हताश उद्गार काढले. मग आम्ही आमची रिक्षा तिकडे वळवली. हॉटेल आल.  सामान खाली काढल. हॉटेलच्या काउंटरवर गेलो. रुबाबात विचारलं,

" काय रे किशोर कुठं आहे ?"

" घरी जेवायला गेले आहेत मालक. तुमचं काय काम आहे ते सांगा." काऊंटर वरचा माणूस तल्लीन होऊन कानात काडी घालत होता.

आम्ही सांगितलं ,

"आम्हाला एक रूम पाहिजे आहे. मी तुझ्या मालकाचा वर्ग मित्र आहे. त्याला फोन लावून विचार हवं तर" मी स्टाईल मधे रुबाबात सांगितलं.

काउंटर वरच्या माणसाने  मला पायापासून डोक्यापर्यंत निरखून पाहिलं. मी कोणीतरी मोठा गुंड आहे. गुन्हा करून त्याच्या हॉटेलमध्ये आश्रय मागायला आलेलो आहे. अशाप्रमाणे पोलिसां सारखे प्रश्न विचारायला सुरुवात केली. नाव काय ? किती दिवसासाठी खोली आहे हवी आहे ? या तुमच्या सोबत कोण ? तुमच आणि त्यांच नात काय ? तुम्ही सांगता आहात त्याचा काही पुरावा आहे का ? आधार कार्ड ,पॅन कार्ड नंबर काय आहे ? मी आपला खाली मान घालून त्याच्या समोर उभा  होतो . मी त्याला सांगितलं," अरे बाबा मी तुझ्या मालकाला चांगलं ओळखतो. ते आणि मी एकाच वर्गात होतो." त्यावर तो गुरगूरत म्हणाला," सगळेजण असंच म्हणतात. मालकाला  अख्ख गाव ओळखत. मला काय समजत नाही काय?"

शेवटी मोठ्या मुश्किलीने त्याने मला हॉटेलमध्ये एक दिवस राहायची परवानगी दिली. ती का दिली हे देखील त्याने मला बोलून दाखवलं," साहेब तुमच्यासमोर या बाई आहेत म्हणून तुम्हाला राहू दिलं. नाही तर आम्ही असं कोणत्याही जोडप्याला राहायला परवानगी देत नाही. "

शेवटी मोठ्या  मुश्किलीने  आम्ही हॉटेलमध्ये आराम केला. दुपारी गावात फिरायला पायी निघालो. स्टेशन जवळच्या एका चांगल्या हॉटेल मधे आम्ही चहा प्यायला गेलो. ऑर्डर दिली. आणि चहा पुढे आला ,तेवढ्यात माझ्या पाठीवरती थाप पडली .

"अरे दत्तू, इकडे कुठे ? किती वर्षांनी भेटतो आहेस ?" मी मागे वळून पाहिलं तर  माझा एक वर्गमित्र तिथे आला होता. मग आम्ही सगळ्यांनी एकत्र गप्पा मारत चहा पीला. अर्थात त्याचं बिल मीच भरलं.  तो मला म्हणाला,

" आता आपण जेवायला माझ्या घरी जाऊया", मी बायकोकडे विजयी नजरेने पाहिलं आणि त्याच्या घरी जायला निघालो.

( क्रमशः)
लेखक: दत्ता जोशी

🎭 Series Post

View all