युक्ती

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट........

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट. एक राजा होता. त्याच्या पदरी शस्त्रास्त्रविद्या शिकवणारे गुरू होते. गुरू त्यांच्या क्षेत्रात महाज्ञानी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे बरेच शिष्य होते. पण विश्वनाथ नावाचा शिष्य फारच निपुण होता. तलवारबाजी जणू त्याच्या रक्तातच होती.
अतिशय कठीण असे हात तो लीलया शिकला. गुरूंना त्याच अभिमान होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याचा महाराजांकडून यथोचित सत्कार झाला मग तो देशाटनाला गेला. तिथे वेगवेगळ्या तलवारबाजांना हरवून तो जयपत्रे घेऊन आला. आता त्याचा चेहरा अनुभवाने तेजोमय दिसू लागला. त्याचा लवकरच विवाह झाला. विवाहाच्या पहिल्याच रात्री त्याच्या पत्नीने त्याला म्हंटले, " तलवारबाजीत आपला हात धरणारा कोणी नाही. पण आपल्या कर्तृत्वाची पाहिजे तशी दखल महाराजांकडून घेतली जात नाही. खरंतर राजगुरू हे पद आपणासच मिळायला हवे. नाहीतरी सध्याचे राजगुरू हे वृद्धत्वाकडे झुकले आहेत. आपण महाराजांना सांगून का पाहत नाही.? " तिला काहीतरी जुजबी उत्तर देऊन त्याने गप्प बसवले. पण त्याच्या डोक्यात मात्र राजगुरुपदाचे वारे वाहू लागले. योग्य संधीची तो वाट पाहू लागला.
दर वसंतपंचमीला महाराज मोठा उत्सव साजरा करीत. त्यात वेगवेगळ्या स्पर्धा ठेवीत असत. त्यात प्राविण्य मिळवणाऱ्याला योग्य पारितोषिक देऊन गौरवलं जायचं. या वर्षीच्या उत्सवात गुरूंनी अर्थातच विश्वनाथाला भाग घेण्यास सांगितले. त्याला ही स्पर्धा चिल्लर वाटल्याने तो तयार झाला नाही. खरं म्हणजे त्याला देशोदेशींची जयपत्रे मिळवून अभिमान झाला होता. आणि राज गुरू पदाचीही लालसा होती. एक दोन वेळा त्याने गुरूंनाही आडवळणाने सुचवले होते. पण त्याला झालेला अभिमान पाहून त्यांनी लक्ष दिले नाही. या वर्षीही
विश्वनाथाने त्यांना गळ घातली, की गुरूंनी महाराजांना सुचवावे. निदान उप राजगुरुपद तरी द्यावं. पण गुरूंनी त्यालाही नकार दिला. विश्वनाथाने अनिच्छेनेच स्पर्धेत भाग घेतला. अखेरीस स्पर्धेचा दिवस उजाडला.
तलवारीच्या द्वंद्वयुद्धाचा पुकारा झाला. विश्वनाथने सर्वच फेऱ्या जिंकल्या. त्याचा हात धरणारा कोणीही तलवारबाज
दिसेना. मग त्याला विजयी घोषीत करण्यात आले. फार मोठा सत्कार आणि नजराणे मिळाल्याने विश्वनाथने भर दरबारात महाराजांना त्याला राजगुरूपद देण्याविषयी विनंती केली. पण महाराजांनी ते मानले नाही. तेवढ्यावर स्वस्थ बसला असता तर तो विश्वनाथ कसला ? त्याने महाराजांना परत गळ घातली आणि म्हणाला, " सध्याचे राजगुरू म्हणजे माझे गुरू हे आता अतिवृद्ध झालेले आहेत . त्यांच्या जागी माझी निवड
व्हावी. " महाराजांना अतिशय क्रोध आला. ते काही बोलणार एवढ्यात राजगुरू म्हणाले, " महाराज माझ्या जागी विश्वनाथाची नेमणूक झाली तरी माझी काहीच हरकत नाही. " मग महाराज म्हणाले, " आपला आग्रह असेल तर हरकत नाही . पण या पदावर बसण्याची पात्रता त्याला सिद्ध करावी लागेल. " ते ऐकून महाराज पुढे काही बोलणार तेवढ्यात त्यांचं बोलण तोडीत गर्वाने फुगलेला विश्वनाथ म्हणाला, " महाराज
माझ्याजवळ देशोदेशींच्या तलवारबाजांकडून मिळवलेली जयपत्रे आहेत, शिवाय आपणासही आत्ताच झालेल्या स्पर्धेतले यश मान्य आहे. मग वेगळी पात्रता सिद्ध करण्याची गरजच काय ? " तरीही महाराज कडक शब्दात म्हणाले, "विश्वनाथ तुला तुझ्या गुरूबरोबर द्वंद्वयुद्ध करावं लागेल आणि त्यात जिंकावं लागेल. तरच राजगुरुपद तुला मिळेल. " ते ऐकून राजगुरू म्हणाले, " मी द्वंद्वाला तयार आहे. पण माझी एक अट आहे, दोघांनी घोड्यावर बसावं आणि बसल्यावर जमिनीला टेकणारं म्यान वापरावं. . " विश्वनाथ विचार न करता हो म्हणाला. मुहूर्त पाहून दिवस ठरला. द्वंद्वयुद्धाची जाहिरात झाली. आजूबाजूच्या बऱ्याच राज्यांतून गुरूशिष्यांचे युद्ध पाह्ण्यास येऊ लागले.
अखेरीस द्वंद्वयुद्धाचा दिवस उजाडला. युद्धाचे पटांगण खचाखच भरून गेले. नगारे चौघडे वाजवून द्वंद्वाची इशारत दिली गेली. एका कोपऱ्यातून ललकारत विश्वनाथ आला. दुसऱ्या कोपऱ्यातून शांतपणे राजगुरू आले. महाराजांना दोघांनी वंदन केले. अटीप्रमाणे दोघेही घोड्यावर बसले होते. आणि दोघांच्या तलवारीची म्याने जमिनीला टेकली होती. दोघांनी मग पवित्रे घेतले . एकमेकांच्या अंगावर धावून गेले. राजगुरुंनी आपली एक फुटी तलवार बाहेर काढून विश्वनाथ वर वार केला. विश्वनाथ तलवार काढू लागला परंतू जमिनीपर्यंत टेकणारी तलवार लवकर निघेना. राजगुरुंनी मात्र दुसरा वार करुन त्याला जखमी केलं आणि विश्वनाथ अर्धवट बाहेर आलेल्या तलवारीसहीत घोड्यावरुन खाली पडला. तेव्हा राजगुरु त्याच्या छातीवर पाय रोवून म्हणाले," भल्या गृहस्था , जमिवनीपर्यंत टेकणारं फक्त म्यान हवं होतं. याचा अर्थ जमिनीपर्यंत टेकणारी तलवार हवी असा होत नाही. इथेच तर बुद्धिमत्तेची गरज आहे. जी तुझ्यात कमी आहे.आणखी सारासार विचारही तू केला नाहीस म्हणून हरलास . शेवटी गुरु गुरु असतो. आणि शिष्य शिष्य असतो. "
असं म्हंटल्यावर खाली मान घालून राजेसाहेबाकडे न पाहता विश्वनाथ मैदान सोडून निघून गेला. परंतू गुरु क्षमाशील असल्याने त्याला बोलावून घेऊन समजावले. परंतू अपमान सहन न झाल्याने तो राज्य सोडून निघून गेला.

(संपूर्ण ंं)