Feb 25, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

तुझ्या सुगंधी आठवणीत भिजलेली पत्रं !

Read Later
तुझ्या सुगंधी आठवणीत भिजलेली पत्रं !


गोष्ट छोटी डोंगराएवढी (१५)

विषय - टपाल /पत्र

शीर्षक - तुझ्या सुगंधी आठवणीत भिजलेली पत्रं!


"तेरे खुशबू में बसे खत, मैं जलाता कैसे?
प्यार में डूबे हुए खत मैं जलाता कैसे?
तेरे हाथोंसे लिखे खत मैं जलाता कैसे?"


जगजीत सिंगचे रेशमी सूर कानात जणु विरघळत होते पण परिणाम मात्र डोळ्यात दिसत होते. घळा घळा अश्रू वहात होते.

आज समिधा भावनिकरीत्या खूप हतबल झाली होती.

"९ ऑक्टोबर जागतिक टपाल दिन" म्हणून साजरा होतो त्यासाठी तिने तिच्या मुलीला शार्वीला निबंध लिहायला मदत केली होती. पण पत्रांचं महत्व सांगताना ती जणू मनातून ढवळून निघाली होती.

कारण पत्रांचा आणि तिचा खूप गहन संबंध होता. आता तंत्रज्ञानामुळं पत्र दूर झाली तरी तिचे तिच्या हृदयाच्या जवळ असलेली पत्र तिने इतकी वर्षे जपून ठेवली होती.

कुणी विश्वास ठेवणार नाही की पंचवीस वर्षांपूर्वीची तिची पत्रांची फाईल तिने अजूनही तशीच जपली होती, जशी तिने तिची शालेय संपत्ती म्हणून तिची सर्टिफिकेट जपली होती.

आजच्या पिढीला हा शुद्ध वेडेपणा वाटेल पण हे तिचं जपलेलं धन होतं, तिची प्रॉपर्टी होती.

लग्नानंतर काही वर्षांनी एकदा जेव्हा आई म्हणाली की "बेटा सुट्ट्यात आलीस की तुझं कपाट आवरून रिकामं कर ना , आम्हाला वापरता येईल."

त्यावेळी तिने एक सुटकेस भरून मैत्रिणींची पत्र आणि जुन्या सर्व पत्रव्यवहाराची थैली, एक फाईल फोल्डरमध्ये जपलेलं धन व्यवस्थित सासरी आणलं होतं.

त्या सूटकेसला नेहमी कुलूप लावलेलं असायचा त्यामुळे तिचा नवरा समीर कधीकधी चिडवायचा.

"माहेरच्या लोकांनी काहीतरी डबोलं दिलंय बेटा तुझ्या मम्माला , म्हणून त्या सुटकेसमध्ये कुलूप लावून ठेवलंय!" असं तो नेहमी मुलीला म्हणायचा.

आज नेमका समीर ऑफिसच्या कामाने टूरवर गेलेला होता व सासरे काही कार्यक्रमासाठी त्यांच्या मुलीकडे गेले होते.

ती आणि शार्वी दोघीच घरी होत्या.

मुलगी शाळेला गेली आणि आज का कुणास ठाऊक मनातून गलबलून आलं.

ही चिठ्ठी शब्द असलेली सगळी गाणी शोधून शोधून ती आज ऐकत होती जणु  संपत आलेल्या त्या टपाल खात्याला मानाचा मुजरा किंवा आठवणींना उजाळा देत होती.

हिंदी चित्रपट संगीतात तर पत्रांची, चिठ्ठीची आणि खत शब्दांवर भल्या मोठ्या गाण्यांचं भांडार आहे.

ऐकता ऐकता जेंव्हा जगजितसिंहचं हे गाणं लागलं तेव्हा मात्र ती खूप बेचैन झाली आणि तिची ती सुटकेस उघडून बसली.

मैत्रिणींची पत्र किती वर्षांपूर्वीची , काही तर पंचवीस तीस वर्षांखालची !

वाचताना अजूनही त्या काळात गेल्यासारखं वाटत होतं आणि अचानक त्याचं फाईलमधलं ते पान निघालं आणि त्याचं शेवटचं पत्र हाती लागलं. तिने प्रेमाने हात फिरवला.

"तुझाच - शार्दुल माने "

तुझाच लिहिण्यामध्ये किती अधिकार भावना होती.
तिने जर त्याला अडवलं नसतं कदाचित आज दोघे सोबत राहिले असते पण तिच्या एका निर्णयाने दोघे विभक्त झाले.

आता तो कुठे आहे, हे तिला माहीत नाही.

पण पत्र किंवा खत म्हटलं की त्याची आठवण येते, अगदी आजही.

तिने ते पत्र हृदयाशी लावलं आणि हळूच त्याचा वास घेतला . किती वेडेपणा होता तो म्हणजे २४-२५ वर्षांपूर्वीच्या पत्राला तो सुगंध राहील का ?

त्यावेळी सुगंधी पत्र पाठविण्याची पध्दतच होतीच. म्हणजे तसं तो पाठवायचा व कधी कधी ती पण सुगंधी उत्तर पाठवायची.

ती तर बाजारात नवीन आलेली फुलांची व सुंदर लेटरहेड विकत आणून प्रत्येक वेळेला वेगळ्या पानावर त्याला पत्रं पाठवायची.

त्यांचं नातं मूळात जुळलं होतं ते टपालामुळेच!

त्यावेळी झालं असं की समिधाची मावशी व काका दर दोन वर्षाला त्यांच्या दिवाळी अंकासाठी एक राज्यस्तरीय लेखन स्पर्धा घ्यायचे व त्यात आलेलं उत्तम साहित्य, कथा कविता लेख व ललित असं सगळं व पुरस्कार प्राप्त साहित्य दिवाळी अंकात प्रकाशित व्हायचं.

पण त्या वर्षी मावशीच्या घराचं बांधकाम चालल्यामुळे तिचा पोस्टाचा पत्ता उपलब्ध नव्हता म्हणून ती जबाबदारी तिने समिधा ला दिली होती.

समिधाला वाचनाची खूप आवड होती त्यामुळे आलेलं साहित्य घेणं , त्याची नोंद करणं व उत्तम साहित्य वेगळं करणं हे कामं ती आवडीने करीत होती.

पत्ता समिधाचा असल्याने पत्र म्हणजे टपाल समिधाच्या नावाने येत होतं.

रोज पोस्टमन काका शिंदे यांची रोजच चक्कर असायची. प्रचंड टपाल यायचं. एखादं रजिस्टर पोस्ट असायचं मग ते सही करुन घ्यावं लागायचं.
पोस्टमन काका निवांत पायरीवर बसायचे , टपाल द्यायचे व पाणी पिऊन मग निघायचे.

असा हा पत्रप्रपंच दीड महीना चालला अन यातच ती शार्दुल मानेची ओळख . . . मग मैत्री आणि मग . . . अगदी एकमेकांना न पाहता झालेलं प्रेम !

त्याचं पहिलं पत्र आलं होतं -
"आदरणीय समीधा मॅडम " अशा संबोधनाने व संपलं होतं ,
"आपल्या सकारात्मक प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत- एक स्पर्धक " असं!

मग तिने पुढच्या पत्रोत्तरात सांगितलं की ती कॉलेजकन्या आहे व ती फक्त संकलन करतीय.

मग संबोधनं बदलत गेली.

स्पर्धा झाली. त्याच्या " मुक्या कळ्या " या कवितेला दुसरं बक्षिस मिळालं.


कविता दिवाळी अंकात छापून आली.


त्याचं सन्मानपत्र टपालाने त्याच्या घरी गेलं.


इतर सगळ्या स्पर्धकांची पत्र हळूहळू धन्यवादाने वगैरे बंद झाली.

मावशी -काका त्यांच्या घरी रहायला गेले व सगळं टपाल व शिंदे काकांचं नियमित येणं,  सगळं थांबलं पण

. . . पण एक गोष्ट अविरत चालत राहिली , ती म्हणजे शार्दुल व समिधाचा पत्रव्यवहार .

तिने पाठवल्यानंतर चौथ्या दिवशी त्याला पत्र पोहोचायचं व लगेच त्याचं उत्तर लिहिलं की चौथ्या दिवशी समिधाला मिळायचं.

अगोदर चारोळ्या यायच्या मग तिचं काल्पनिक चित्र काढलेलं असायचं एखाद्या पत्रात मग कधी कविता आणि नंतर अत्तर मारलेलं ते सुगंधी पत्र!

दोघांकडूनही अगतिकता तेवढीच वाढली होती.

भारावल्यासारखे दोघे वेगळ्याच विश्वात होते.

आलेलं पत्र पुन्हा पुन्हा वाचायचं असा नाद  लागलेला त्यामुळे काही पत्र तर पाठ झाली होती. 

त्याचवेळी "सिर्फ तुम! नावाने एक सिनेमा आला.

आपलंही असंच काही होईल व एकमेकांना न पाहता ही प्रेमकथा पूर्ण होईल या भ्रमात ते दोघे होते.
प्रेमात पडल्यावर माणसाला वास्तविकतेचं भान रहात नाही म्हणतात तेच खरं .

एकमेकांना आपण पूर्णपणे ओळखतो असा समज दोघांचाही झालेला असताना जात नावाची एक प्रथा असते व ती सामाजिक चौकट आपण तोडू शकत नाहीत हे ही त्या बापड्यांना कळालं नव्हतं .
मन खूप खोल गुंतली होती.


आणाभाका झाल्या होत्या.


आपण कसे दिसतो याने दोघांनाही काहीच फरक पडणार नव्हता.

स्पर्धा झाल्यावरही जवळ जवळ आठ महिन्यानंतर पर्यंत हा प्रेमपत्रव्यवहार व्यवस्थित चालू होता.
त्याने इंटरव्यु दिला होता व महिनाभरात त्याला नोकरी लागणार होती. त्यानंतर तो भेटायला येणार होता असं त्यांचं ठरलं होतं.

समिधाला तो दिवस तिव्रतेने आठवायला लागला.
नेमकं त्या दिवशी पोस्टमन काका येण्याच्या वेळी ती आत घरात होती आणि बाबा बाहेर पायर्‍यांवर उभे होते.
सायकलची घंटी वाजवून शिंदे काकांनी आवाज दिला , "बेबी घे तुझं सुगंधी टपाल आलंय !"

नेमकं बाबांनी ते हातात घेतलं व त्याचा वास घेतला. त्यांना सुगंधामुळे वेगळीच शंका आली. ते पत्र उघडणार इतक्यात समिधा पळत आली व पत्र हिसकावून घेतलं. त्यांनी ते वाचलं असतं तर महाभारत घडलं असतं.

त्यांनी उलट तपासणीचे प्रश्न विचारले व तिने मैत्रिणींचे पत्र आहे ,वगैरे ,असं काहीतरी सांगून वेळ मारून नेली.
पण नशीब की वडिलांनी तिचा मान राखून जबरदस्तीने पत्र घेतलं नाही.

पण त्यांनी तिच्या मावशीला मात्र कडक शब्दांत सांगितलं की \"ते तिच्यासाठी स्थळ निश्चित करतायत आणि आता स्पर्धेतल्या कुणाचं पत्र त्यांच्या घरी येता कामा नये.\"

मावशीने समिधाकडून सहज बोलताना जुजबी माहिती काढली व कडक भाषेतलं एक पत्र शार्दुल मानेंच्या पत्त्यावर गेलं.

पुढच्या आठवड्यात माफी मागणारं एक पत्र मावशींच्या पत्त्यावर आलं व सगळं थांबलं.
तिच्या हातात त्याचं ते शेवटचं पत्र होतं. . . तुझाच शार्दुल लिहिलेलं.ती लगेच भानावर आली.

९० च्या दशकातल्या सगळ्या मुलींप्रमाणे तिचंही आईवडिलांनी ठरवल्या ठिकाणी औपचारिक पद्धतीने लग्न झालं.

पुढचं सगळं . . . सोहळा , संसार , मूलबाळ सगळंच यांत्रिक पणे होत राहिलं. त्याची आठवण कशी येणार कारण त्याला तर पाहिलं पण नव्हतं .
त्याने एकदा फोटो मागितला होता पण ती म्हणाली होती की \" नको आपण प्रत्यक्ष भेटूनच एकमेकांना पाहूयात. \"

पण ते प्रत्यक्षात घडलंच नाही .

वडिलांना प्रेमविवाह किंवा जातीबाहेर लग्न करणार्‍यांचा खूप तिटकारा होता. लग्न ठरवताना ते म्हणाले की \" माझ्या मुलांनी असं काही केलं तर त्यांच्या जोडीदारांना पहले कापून फेकेन मग जन्मठेप झाली तरीही चालेल. \"

या गोष्टीने समिधा खूप घाबरली.

समिधा वर्तमानात आली.


जगजीत सिगचं हळुवार गीत चालू होतं. . .

"जिनको दुनिया की निगाहों से छुपाए रक्खा
जिनको इक उम्र कलेजेसे लगाए रक्खा।"

समिधा विचारात पडली -
त्या गाण्यातल्या शब्दांप्रमाणे ही सगळी पत्र दिवस रात्र विचार करून लिहिलेली होती ,त्याच्या प्रेमाची निशानी होती आणि त्यातला शब्द न शब्द पाठ झाला होता.
त्यालाही तसंच वाटत असेल का ?
की राग असेल त्याला माझ्यावर ? मी धोका. दिला म्हणून? मी तर निरोपही घेतला नाही त्याचा? कसलं हे पत्रप्रेम?"

पुन्हा गजल मनात रुळायला लागली-


"तेरे खुशबू में बसे खत, मैं जलाता कैसे?
प्यार में डूबे हुए खत मैं जलाता कैसे?
तेरे हाथोंसे लिखे खत मैं जलाता कैसे?"

गजलेतल्या शेवटच्या ओळीप्रमाणेच करायचे ठरवून तिने डोळे पुसले. पसारा आवरला , कुलूप लावलं व त्याची पत्र घेवून निघाली.

त्या ओळी अशा होत्या-

"तेरे वो खत मैं आज गंगा में बहा आया हूँ,
आग बहते हुए पानी में लगा आया हूँ!"

समाप्त

©®स्वाती बालूरकर , सखी
दिनांक -१६. १० .२२
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Swati Balurkar, Sakhi

Hindi teacher in CBSE school

I swati Balurkar, working as Hindi teacher in CBSE school in Aurangabad at present. Having 25 years of experience in teaching. worked 23 years in Hyderabad . 1990-1994 I wrote many stories n poems and got published. After break started writing in July 2018 again. I am published writer on PRATILIPI MARATHI and STORYMORROR.

//