प्रिय सांताक्लोज....

सांताक्लोज नकळत आपला अविभाज्य भाग बनला.


प्रिय सांताक्लोज,

अरेच्चा, तू प्रिय कधी झालास खरं तर कळलंच नाही!

नाही म्हणजे आमच्या लहानपणी तू आहेस आणि ख्रिसमसला काही विशिष्ट मुलांना गिफ्ट्स देतोस हे माहित होतं आम्हाला पण अप्रूप नव्हतं रे..... कारण तेव्हा एकादशीला पंढरीचा विठुराया, दसऱ्याला राम, गणपती उत्सवातला उंदीर मामा हे जास्त जवळचे वाटायचे. तू तिकडचा, परदेशी पाहुणा अशी आमची समज होती कारण आम्ही मराठी शाळेत आणि मराठी माणसांच्या महाराष्ट्रात शिकत होतो ना.....

आता तुला वाटेल, ही काय बरळते आहे? हो रे, आहोत आम्ही secular.... लहानपणापासून \"सर्व देव नमस्कार: केशवं प्रतिगच्छती\" हा श्लोक शिकवताना आई बाबा सर्वधर्म सहिष्णूता शिकवायचेच! त्यामुळेच तर आम्ही जेवढ्या आनंदाने मंदिरात जातो तेवढ्याच श्रद्धेने चर्च आणि मशिदीतही जातो, अजुनही! मुलांनाही तेच शिकवतोय आणि! पण एखाद्या दिवाळीला किंवा आषाढी एकादशीला तू काही विठोबा म्हणून येत नाहीस किंवा सांताक्लोज नेहेमी पुरुषच का असतो असं स्त्री पुरुष समानतेवर चिरंतन निष्ठा ठेऊन असणारी आमची, आजची पिढीही विचारत नाही ह्याचं आश्चर्य वाटतं.

प्रत्येक गल्लीत खेळला जाणारा भोंडला जाऊन कोपऱ्याकोपऱ्यावर खेळला, छे, रंगला जाणारा गरबा पाहून जसं वाटतं ना तसंच घराघरात तयार केलेला महाराजांचा किल्ला लोप पाऊन घराघरात सजवला जाणारा ख्रिसमस ट्री पाहून वाटतं. आमचा कृष्ण पण रात्री बारालाच जन्मला होता रे, तुझ्याप्रमाणेच! पण त्याचा जन्म साजरा करायला आमच्या घरातले फक्त ज्येष्ठ जागे असतात तर तुझा जन्म साजरा करायला सगळी तरुण मंडळी, मुलं एवढंच नाही सगळे मॉल्स, केक शॉप्स, गिफ्ट्स शॉप्स सगळेच जागे असतात.

खूप जण म्हणतात की आम्ही आमच्या संस्कारांबाबत आग्रही नाही राहिलो तर काही म्हणतात की आपल्या कडे सणवार इतके आहेत त्यामुळे इंटरेस्ट वाटत नाही तर कोणीच म्हणतात की अंधश्रद्धा फोफावली..... असो, कारण काहीही असो पण हल्ली तू जास्त जवळचा वाटतोस मुलांना हे नक्की! दिवा पाहुनी लक्ष्मी येते हे रोजचंच आहे पण रोषणाई, ख्रिसमस ट्री पाहून तू येतोस हे जास्त अप्रूप आहे. ख्रिसमस केक हा दहीहंडीच्या गोपाळकाल्यापेक्षा अगदी सहज उपलब्ध होतो, तो होऊ नये असं नाहीच पण मुलांनी गोपाळकालाही चाखावा, म्हणजे त्यांना तो आपण चाखवावा एवढीच अपेक्षा! ख्रिसमस ट्री सजवताना तुळशीच्या झाडापाशीही दिवा लावण्याचं लक्षात ठेवावं एवढीच मनिषा!

अगदी मनापासून सांगू, तुझं स्वागत करण्यात किंवा ख्रिसमसच्या ह्या सगळ्या उत्साहात काहीच चूक नाही. नवचैतन्य आहे ते, मन अगदी प्रसन्न होऊन जातं सगळं बघून! पण आज मला तुला हेच विचारायचं आहे की अनोळखी वाटणारा तू नकळत हळूहळू प्रिय झाला आहेस आणि आमचे सण कुठेतरी मागे पडतायेत ही किमया कशी काय घडली? बरं तेवढंच नाही तर त्यात लोकांना वावगं वाटत नाही. आपल्या घरातल्या कुटुंबियांना पूर्ण विसरून शेजारच्यांना समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करावा ही मानसिकता बरोबर की चूक मला तर काही समजेना....

तुला नावं ठेवतच नाही, मी तेवढी लायकच नाही. उलट येशू ख्रिस्त आणि त्यांनी जगाला दिलेली शिकवण ह्यासमोर सगळेच नतमस्तक आहेत. माझं म्हणणं, तूच समजून सांगशील का सगळ्यांना, आहे तो आपापला धर्म जपा आणि इतरांबद्दल सहयोगाची भावना ठेवा. हल्ली आपल्या देवाना, संतांना, त्या विचारसरणीला खोटं ठरवायचं आणि इतर धार्मिक कृत्यांना भरभरून सपोर्ट करायचा असं फॅड आहे. माणुसकीचा धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे हाच विचार बिंबवताना सर्व देव थकले आहेत.

प्रिय सांता, तू जास्त बोभाटा न करता, शांतपणे येऊन सगळ्यांना गिफ्ट्स देतोस, गरजूची मदत करतोस आणि म्हणूनच सगळ्यांना, मलाही आवडतोस. हे पत्र तुझ्या हाती पडल्यावर तू ह्यावरही विचार करणार का? माझी मदत करणार ना? हो कारण हल्ली परक्या माणसांचं अनुकरण किंवा त्यांनी सांगितलेलंच म्हणणं पटतं आम्हाला हिचं शोकांतिका आहे आमची.....

तुझी लाडकी,
हिंदू सांताक्लोज भक्त!

©️®️डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर