Jan 22, 2022
पत्रलेखन

You are the king of my heart ❤️

Read Later
You are the king of my heart ❤️

You are the king of my heart ❤️ 

 

 

 

प्रिय अमोल , 

 

        नाव वाचून गडबडलात ना, ह्मम तुम्हाला मी नावाने हाक मारलेली आवडते मला माहिती आहे , पण ते काय आहे ना तुम्हाला आडनावाने हाक मारली की तुम्ही जाम च चिडता , आणि मग मला तुमचा चिडका चेहरा बघून भारी मजा वाटते . पण आज आता पहिल्यांदा पत्र लिहितेय म्हणून तुमची आवड जपतेय . 

         

         ईरा व्यासपीठाने जोडीदाराला पत्र लिहायची स्पर्धा ठेवली , आणि मग तेच निमित्त साधलं , आणि हे माझं पहिलं वहिलं पत्र (तुम्हाला बरं का ) लिहायला घेतले. मला माहिती तुम्हाला असे पब्लिकली व्यक्त झालेले आवडत नाही ,पण काय करणार ?...पत्र जोडीदारालाच लिहा म्हणले आहे ना ,मग आता ही रिस्क घेतेय. चलो कोई नी , प्रॉब्लेम झालाच तर मना लेंगे स्वीटहार्ट .  

 

        ईरा वर किती सुंदर सुंदर पत्र आली आहेत , किती भावनिक , अप्रतिम शब्द , बापरे बाप ! आपण तर कधीच असे एकमेकांना पत्र लिहिले नाही ( किती अरसिक आपण , सेम टु सेम) , फार फार तर मेल केले , त्यात पण " मेघा मेघा , बोला बोला " याचा पुढे तुम्ही गेलात नाहीत . मी आपल्या लग्नाआधी फारच कमी बोलायची , मला बोलकं करायला किती प्रयत्न असायचे तुमचे . तुम्हाला आधी मी बोलत नाही म्हणून प्रॉब्लेम होता, तर आता बोलायची थांबत नाही म्हणून प्रॉब्लेम आहे . काय करावं , मोठाच प्रश्न आहे… जाऊ देत , तुम्हालाच हवी होती बोलणारी , आता भोगा तुम्हीच. 

 

         किती लवकर वेळ गेला ना, अजूनही असे वाटते काल तर भेटलो होतो , तेच नात्यातील नाविन्य , गोडवा अजूनही जसाच तसा टिकवला आहे आपण . आठवतंय काय आपली पहिली भेट ? आपला कांदेपोहेचा कार्यक्रम ?( हो ना आपले अरेंज मॅरेजच , म्हणजे सगळ्यांना आपले लव्ह मॅरेज वाटते अजूनही , पण आपण अरेंज मॅरेज करून मोकळं झालो) किती निरागस दिसत होते तुम्ही तेव्हा , म्हणजे आताही आहातच . आपल्या पहिल्या भेटीत तुम्ही मला अपेक्षा विचारल्या , आणि मी सांगितले मला वेजिटेरियन , नॉन स्मोकर आणि नॉन अल्कोहोलिक मुलगा हवा . ते ऐकून तुम्ही गालाताच हसले होते , मी तर तुमच्या उत्तराची वाट बघत होते. आणि तुमचं उत्तर आले "आणखी काही ?" , मी "येवढेच " … तुम्ही होकारार्थी मान हलवली आणि मला केवढा आनंद झाला होता म्हणून सांगू , मन म्हणाले " येईच वो अपने सपनो का राजकुमार " , मनाने कौल दिला. आणि त्या नंतर लग्नाच्या बोलणीच्या बैठकीत " मला काही नकोय " जे तुम्ही सांगितले ना , मी तर लट्टूच झाले तुमच्यावर . फ्रेंड्सला सांगितले सगळं , तर म्हणाले " असेच सांगत असतात लग्नआधी , कोणीच असं नसतं " … असेलही कदाचित असे , पण तेव्हा तुमच्यावर विश्वास ठेवावा ,असे मनापासून वाटले आणि तुमच्यावर असलेला हा माझा विश्वास कधीच तोडला नाही , दिलेला प्रत्येक शब्द पाळला आहात . 

 

       

           माझी सकाळच मुळात तुमच्यापासून सुरू होते . मला सकाळी तुमच्या हातचाच चहा लागतो . किती चिडवतात तुमचे साळे , साळ्या मला , आता तर त्यांना सुद्धा माहिती झाले , माझा सकाळी उठल्यावरचा पहिला डायलॉग , तेच सुर लावतात " बाबा ssss … चहा sss …." ( हो ना , आपल्याला मुलांना तुम्हाला बाबा म्हणायची सवय लागावी म्हणून मी तुम्हाला बाबा म्हणायला लागले तर आता ती सवयच झाली , किती हसतात सगळे मला , पण तुम्ही बाबा सारखा माझा खूप लाड पण करता, लोकं बोलून सुद्धा दाखवतात "फारच लाडावून ठेवलंय मेघाला याने" . सो जाऊ दे, ज्याला हसायचं हसू देत) . तुम्ही सगळ्यांचे फेवरेट जिजाजी , जिजाजी कशाला अगदी मित्र झालात , सगळ्यांचे आवडते जावई , म्हणजे जावई कसा असावा याची परफेक्ट वाख्या तुम्ही क्रिएट केली. माझ्या घरचे पण तुमचीच साईड घेणार , तुमच्या घरचे पण तुमचीच बाजू घेणार , माझं काय ? यापेक्षा आणखी काय वाईट असू शकते माझ्यासाठी. जाऊ दे , आपली जोडी बेस्ट जोडी आहे आणि यांच्या सारखे वागा , असे जेव्हा सगळे म्हणतात , यावरच मी समाधान मानून घेते. 

 

        तुम्हाला सुपरमॅन बनायचं असतं , सगळं एकट्यानेच करायचं असतं , आमच्या पर्यंत काहीच त्रास पोहचू देत नाही तुम्ही , सगळंच हाता हातात मिळालं आहे . तुमची खूप वाईट सवय आहे , खूप गोष्टी मनातच ठेवता , बोलून नाही दाखवत . घाबरले असलात , दुखावले असलात तरी शांत असता . मला आठवते आपल्या मुलीच्या जन्माच्या वेळेस , तिथे अमेरिकामध्ये आपण दोघच होतो. तुम्ही कितीही ठिक आहो दाखवत असले तरी मला दिसलं होते, हॉस्पिटलला जातांना घाबरले होते तुम्ही . पहिल्या बाळंतपणाच्या वेळेस कंपलिकेशन्स झाले होते , कदाचित म्हणूनही असेल … तिथे एक चांगलं होते , नवऱ्याला पण OT मध्ये सोबत येऊ देतात , तुम्ही एकाही क्षणासाठी माझा हात नव्हता सोडला , (आता तुम्ही मला धीर देत होता की मी तुम्हाला , हे ही कोडंच आहे म्हणा ). मुलगी झाली म्हणून तुम्ही किती खुश झाले होते . आधीच तुम्ही खूप समजदार , पण नवीच्या जन्मानंतर एक स्त्री म्हणून माझ्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन फक्त बायको म्हणून राहिला नाही , तर तुम्ही मला एका बापासारखी माया लावली. आधी माहेरी जायचं नाव काढले तर नाक मुरडणारे तुम्ही आता कधीही जाऊ देता, आहे ना मोठा बदल? 

प्रेग्नन्सीच्या वेळी , तेव्हा तर तुम्ही माझी आई सुद्धा झालात . एकदा तर रात्री 11-12 वाजता मला गोड खायची इच्छा झाली , (म्हणजे मी फक्त माझी इच्छा बोलून दाखवली होती ) मी कँडी क्रश गेम खेळत बसली होतीच कि अर्ध्या तासात तुम्ही चिरवंट ( पाकातल्या पुऱ्या ) बनवून माझ्या समोर प्लेट हजर केली , खरं सांगते त्या प्लेट समोर सगळे पंचपक्वान्न फिके पडलेत. आता सुद्धा तुमच्या हातचं फूड, माझं मोस्ट फेवरेट फूड आहे . 

 

 

      तसे तर तुम्ही मला प्रत्येक रुपात आवडता , पण ऑफिस जातांना तर जाम हँडसम दिसता , तुम्ही ऑफिसला जाण्याचा घाईत असता आणि तेव्हाच मी काहीतरी आगाऊपणा करते. आणि मग तुमचा तो रिप्लाय , " बदमाश " …. केवढा भयंकर गोड वाटतो तो ऐकताना , ओह गॉड , पूर्ण मराठी डिक्शनरी मधला माझा फेवरेट शब्द आहे तो. किती लाजले असता तुम्ही , टमाटर सारखे लाल झाले असता , आणि मग तुमच्या चेहऱ्यावरची ती क्यूट स्मायल , अपना तो दिन बन जाता है यार ! 

 

 

     माझ्या नंदिनी कथेतील श्रीराज , कॉमेंट्स येतात खरंच कोणी असं असू शकतं काय ? आता काय सांगू त्यांना की एक श्रीराज तर माझ्या जवळच आहे , एकदम सेम टू सेम (शी बाबा , तुम्ही तर माझ्या कथा वाचल्या सुद्धा नाहीत , वाचन करण्यात आळशी आहातच तुम्ही , जाऊ दे ). हा पण श्रीराज मधला एक गुण नाहीये तुमच्यामध्ये , त्याला कसे नंदिनीचं काही न बोलताही कळते , तुम्हाला मात्र काहीच कळत नाही. तुम्ही गाडी ठोकून आलात , डोकं दुखत असले , मला तरी तुमच्याकडे बघून लगेच कळतं, तुम्ही मात्र "ढ" आहात हा यात. शॉपिंग साठी पण तुम्हीच माझे फेवरेट पार्टनर , तुम्ही कितीही कुरकुर केली तरी मला तुमच्या सोबतच जायचं असते , तुमच्या आवडीचेच घ्यायचे असते , तुम्हाला पण माहिती आहे हे , आणि मग कधी कधी तुम्ही मुद्दाम भाव खाता. मी पण खूप हुशार , धमक्या दिल्या की तुम्ही सरळ मार्गावर येता.  

 

      तुम्ही फारच जास्त स्पष्ट वक्ता आहात , कधी कधी तर अतीच करता. तुम्हाला मी अजिबात मेकप केलेला , जास्ती सजली धजलेली आवडत नाही , लग्नाच्या आधी एकदा भेटले होते तर लगेच चेटकीण दिसतेय , छम्मकछल्लो वाटतेय , बोलून मोकळे झालात . आगाऊपणा तर आहेच थोडासा तुमच्यामध्ये. आपल्या प्रणवच्या मुंजीमध्ये , मेकप आर्टिस्टने माझा मेकप केला , ताईने विचारले कशी दिसते आहे रे मेघा , तर त्या मेकप आर्टिस्ट समोरच "बकवास " म्हणून आपला शेरा दिला. बिचारीला किती वाईट वाटले होते , जरा छान म्हणाले असते तर तुमचं काय गेले असते काय ? पण नाही तुम्ही तेच बोलाल जे तुम्हाला बोलायचं असतं. तुमच्याकडे कधी कधी डोळे मोठे करून बघायची सवय यामुळेच लागली मला. तुम्हाला सिंपल लिव्हिंगच आवडते , माहिती मला , तुम्ही सुद्धा तसेच राहता , आता मी पण तशीच झालेय , तुमच्या सारखी. तुम्ही एकदा म्हणाले होते " दिसण्याने नाही तर कर्तृत्वाने सुंदर हो " , लक्षात ठेवलंय बरं मी, आणि जमेल तितकं याचं पालन सुद्धा करतेय. तसे तर खरंच आहे , तुम्ही सुद्धा दिसण्याला कधीच महत्त्व दिले नाही आहे , नाही तर तुमच्या पुढे दिसायला काळी सावळी मी , तुम्ही मला पसंतच केले नसते. तुम्हाला तर मी नेहमीच सुंदर दिसले आहे . माझ्या बहिणी, मैत्रिणी किती चिडवतात , ( लग्नाच्या येवढ्या वर्षानंतर सुद्धा ) अमोलला तर मेघा शिवाय कोण दुसरं सुंदर दिसत नाही … कसलं भारी वाटते ते ऐकातांना. 

 

      आपण दोघं तसे वेगळेच , आवडी निवडी पण वेगळ्या , मला गोड आवडते तर तुम्हाला तिखट , मी स्वतःतच , घरातच रमते तर तुम्हाला फिरायला आवडते. तरी आपण त्यातला सुवर्ण मध्य साधला आहे , तुम्ही गोड खायला शिकलात . आपल्या लग्नाच्या वेळी , माझ्या पाठवणीच्या वेळी , सगळे बाबा लोकं म्हणतात " सांभाळा मुलीला " , आणि माझे बाबा तुम्हाला सांगत होते " ही गोड खूप खाते , लक्ष ठेवा हिच्यावर " ( तुम्ही नीट सांभाळाल , ही जणूकाही गॅरंटी होतीच त्यांना) . किती दिवस तुम्ही पाळत ठेऊन होते माझ्यावर , पण आता कमी झालंय ,हो ना ? लग्न नंतर खूप लाँग ड्राईव्हला गेलो , अख्खं शहर पालथ घातलं , खूप हुंदडलो , पावसात भिजलो , हा पण बाहेर कधी खाण्याची हाऊस नव्हतीच आपल्या दोघांना , बाहेर थेटरमध्ये सुद्धा आपल्या आतापर्यंतच्या आयुष्यात एकदाच मूव्ही बघितला, एकुलता एक " विवाह " , ते पण लग्न आधी, तुम्हाला पण बोर होतं , मला पण झोप येते . घरी बघायचा म्हटलं तरी मी काय तुम्हाला जास्ती बघू देत नाही , बिचारे तुम्ही , माझ्यासाठी क्रिकेट सुद्धा बघत नाही . किती गोड ना तुम्ही. यार तुम्ही मला गिफ्ट सुद्धा देत नाही , लग्न आधी तुम्ही दिल्लीला गेले होते , तिथून जवळपास दहा बारा फ्लेवर मध्ये पेठा पाठवला होता , wow , ते बघून तर माझं दिल गार्डन गार्डन झाले होते … तेच काय आयुष्यातले एकलौते फेवरेट गिफ्ट होते , आता गिफ्ट विषय काढला तर माझ्या हातात पर्स ठेवता , आणि " I am all yours " म्हणून हात पसरवून भारीतला मस्का मारता . असं कोण करते काय यार ? चलो छोडो , माझ्या वाढदिवसाला सुट्टी घेता , मस्त मस्त आपल्या हाताने बनवून खाऊ घालता , अजून काय पाहिजे , मग हे सारं गिफ्ट शिफ्ट पण कमी पडते त्यापुढे.( पण कधी कधी पाहिजे असते हो) 

 

       घरात मी बडबडत असले तरी तुमचा प्रॉब्लेम असतो, शांत असले तर उगाच माझ्या खोड्या काढता , पण तुम्हाला मी खिदळतांनाच आवडते , हे मात्र कन्फर्म. फोन मध्ये घुसून मी हसत असले , तर तुम्ही पण माझ्याकडे बघून हसत असता , बघितलंय मी माझ्या तिरक्या डोळ्यांनी. मी हसायला लागले की कंट्रोलच्या बाहेर जाते , अगदी डोळ्यांतून पाणी येईपर्यंत हसत असते मी , मुलं पण " आईला काय झालं?, अशी का करतेय ही? " असे हाव भाव असतात त्यांचे." व्हॉटसॲपच्या एखाद्या ग्रुप मध्ये उनाडक्या करत असेल ती " .. केवढे भारी ओळखता तुम्ही मला. आजकाल आपला दादू सुद्धा तुम्हाला जॉईन झाला आहे , मी म्हणजे जसेकाही घरातील कार्टून पात्र झाले आहे .तुम्ही दोघं मिळून वाट लावता माझी.   

 

 

         छोट्या मोठ्या कुरबुरी तर असतीलच नात्यात , नवरा बायकोचं नातंच असे असते , कुरबुरी नसल्या तर बोर होईल ना लाईफ … पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळी माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिले आहात , हा ती वेगळी गोष्ट आहे की प्रत्येक वेळी तुम्ही मलाच समजावता , " तू समजदार आहेस , तुला कळते " … नेहमीच असा गोडगोड डायलॉग चीपकवता मला . आपली कधी कधी भांडणं होतात , कितीही भांडणं झालीत , अबोला आला , तरी रात्री झोपताना मला तुमच्या हाताचीच उशी हवी असते , तेव्हा मात्र तुम्ही कधीच राग काढत नाही , हा पण सकाळ झाली की परत आपला अबोला continue होतो. तुम्ही पण आगाऊ आहात हा , लगेच मला मनवायला येत नाही , मी शांत होईल याची वाट बघत असता , याचाच मला फार राग येतो आणि मग मी आणखी चिडते. मी बोलत असले की तुम्हाला अजिबात ऐकू जात नाही , मुद्दाम करता ना तुम्ही असे ? पण आजकाल तर आपला राग पण जास्ती वेळ टिकत नाही , लगेच एकमेकांना बघून हसायला सुद्धा लागतो .  

 

 

      पण खरं सांगायचं तर तुम्ही खरंच खूप योग्य प्रकारे मला साथ दिली आहे , माझा रिस्पेक्ट करता , मला व्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे , माझे निर्णय मला घ्यायची मोकळीक दिली आहे , कुठल्याच गोष्टी माझ्यावर लादल्या नाहीत. तुमच्या मुळेच मी माझे छंद जोपासू शकते आहे, तुम्ही मुलांना सांभाळता म्हणून मी माझी एनजीओची कामे करायला बाहेर जाऊ शकते. तसा चांगल्या गोष्टींचा नेहमीच तुम्ही सपोर्ट केला आहे , आणि वेळोवेळी मदत सुद्धा केली आहे. माझ्या लेखणीमुळे आणि माझ्या रांगोळ्यामुळे , थोडीफार लोकं मला ओळखायला लागली आहेत . " हो , मी त्याच मेघाचा नवरा आहे " , खूप अभिमानाने तुम्ही सांगत असता , तुम्ही तुमची ओळख माझ्या नावाने सांगता , खरंच ते ऐकून खूप भारावल्या सारखे होते आणि खूप आनंद सुद्धा होतो. 

 

    मला नेहमीच माझे घरचे , माझे फ्रेंड्स म्हणत असतात , " मेघा तू खूप लकी आहे , तुला अमोल सारखा उत्कृष्ट जीवनसाथी मिळाला आहे " , मी तर तेव्हा त्यांची गंमत करत असते की " अमोल लकी आहे , मी त्यांना भेटलीये ते "... पण खरंच मी कबूल करते की " मीच जास्त भाग्यशाली आहे , जे तुम्ही माझे आहात " . तुम्ही एक मुलगा , भाऊ , नवरा , बाबा म्हणून तर चांगले आहात पण एक माणूस म्हणून तुम्ही खूप उत्कृष्ट आहात. माणुसकी जपलिये तुम्ही . 

 

        I am very much proud of you Sweetheart . तुम्ही खूप खूप खुश राहावे , हीच देवाचरणी प्रार्थना आहे . बाकी मी आहेच तुम्हाला त्रास द्यायला ( यार, आता हा तर माझा हक्कच आहे तुमच्यावर , आणि मी देणारच. )  

     

 

      ईरा वर इतकी छान छान पत्र आली आहेत की आपण काय लिहावं , हा मोठाच प्रश्न पडला होता मला . ना तर सुंदर भाषा येत , ना ही आपल्या आयुष्यात सेंटी होण्यासारखं काही घडलं , मला वाटतं याचं सगळं श्रेय तुम्हालाच जाते , आयुष्यातील सगळे प्रॉब्लेम्स तुम्ही इतके smoothly हॅण्डल केले आहे तुम्ही , की आमच्या पर्यंत दुःखाची कुठलीच झळ पोहचली नाही. मग जरा काय लिहावं प्रश्नच पडला. पण मग विचार केला , जे आहे ते , कधी कधी तुम्हाला सांगितले नाही तेच बोलून मोकळं व्हावं. अजून खूप होतं , पण वेळ कमी पडतोय , तर इथेच आटोपते घेते . 

 

" जैसे हो वैसेही रहणा

जग घुमेया , थारे जैसा ना कोई … " 

 

बायको , तुमची बायको …. 

 

 

(ता. क. निशी , तुझ्या आग्रहा खातर लिहिले आहे हे पत्र…. स्पर्धेसाठी नाही. Thank you , लिहायला सांगितले म्हणून , खूप भारी वाटते आहे. ) 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️